आसपासचा परिसर आणि समुदायांसाठी सक्षम 'सोशल' नेटवर्क उभारणीचे ‘ताल्लुक’चे लक्ष्य

आसपासचा परिसर आणि समुदायांसाठी सक्षम 'सोशल' नेटवर्क उभारणीचे ‘ताल्लुक’चे लक्ष्य

Friday November 27, 2015,

4 min Read

सोशल नेटवर्कस् (सामाजिक संबंध) आणि संवाद या गोष्टी आता पूर्वीप्रमाणे राहिल्या नसून, त्या दिवसेंदिवस कमी कमी होताना दिसत आहेत. एकमेकांचे मित्र आणि सहकारी असलेल्या विशाल आणि सुधीर या दोघांच्या जेंव्हा हे लक्षात आले, तेंव्हा त्यांनी आसपासच्या परिसरातील लोकांसाठी ‘ताल्लुक’ (TALLUK) या सोशल नेटवर्कची मुहूर्तमेढ रोवली. हे एक वेब-बेस्ड व्यासपीठ असून, परिसरातील लोकांमधील सामाजिक मिलाफ आणि नातेसंबंध वाढविणे हे ‘ताल्लुक’चे लक्ष्य आहे.

“ ज्या पद्धतीने समाजात संवाद होत असे, त्यामधील अंतर वाढत चालल्याचे मला दिसले, परिणामी आसपासच्या परिसरात सामाजिक मिलाफ कमी होऊ लागला आणि त्याही पुढे जात, भारतातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढू लागले. बलात्कारासारख्या कितीतरी क्रूरकृत्यांनी आम्हाला विचार करण्यास प्रवृत्त केली, की अशी एखादी व्यवस्था उभारता येईल का, ज्या माध्यमातून आसपासच्या परिसरातील लोकांचे लक्ष राहील आणि गरजेच्या वेळी ते प्रतिसाद देतील,” विशाल सांगतात.

त्याचबरोबर त्यांना हेदेखील आढळून आले की, माणसामाणसांमधील प्रत्यक्ष संवाद कमी होण्यामागील प्रमुख कारण हे ऑनलाईन सोशलायजिंग (ऑनलाईनच्या माध्यमातूनच लोक एकमेकांच्या अधिक संपर्कात असणे) आहे. पण बऱ्याचदा आपण ज्यांच्याशी संवाद साधत असतो, ते हे आभासी जगातील लोक, प्रत्यक्षात आपल्याला खरी गरज असताना मात्र आपल्या मदतीला येऊ शकत नाहीत.

image


हजारो मैल दूर रहाणाऱ्यांविषयी लोकांना माहिती असते आणि त्यांच्याशी संवाद साधण्यातच ते हरवून गेलेले असतात. पण त्यामुळे वास्तविक भौतिक जगातील लोकांमध्येच एक मोठे अंतर निर्माण झाले आहे. शिवाय हे आभासी जगातील लोक गरज असताना कोणताच सहयोग किंवा मदत करु शकत नाहीत.

त्यातूनच आसपासच्या परिसरात, खऱ्याखुऱ्या जगातील लोकांमध्ये संवाद वाढविण्यासाठी काही तरी करता येईल का, जेणेकरुन या आधुनिक समाजातमध्ये सुरक्षितता वाढविणे शक्य होईल, याबाबतचे कुतहुल या जोडगोळीत जागृत झाले.

पण खरी कलाटणी तेंव्हा मिळाली, जेंव्हा ‘ताल्लुक’ च्या कल्पनेवर या जोडगोळीचे काम सुरु असतानाच, त्यांना त्यांच्या घरुन हे सांगणारा फोन आला की, त्यांची मुले ही आपापल्या लॅपटॉमध्येच मग्न आहेत आणि खेळण्यासाठी बाहेर जात नाहीयेत. यातूनच त्यांना एक असे सॉफ्टवेअर निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली, ज्यामुळे आसपासच्या परिसरातील लोकांना तर एकत्र आणता येईलच पण त्याचबरोबर लहान मुलांनासुद्धा त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी खरे मित्र मिळतील.

केवळ आसपासच्या लोकांनाच न जोडता, एक पाऊल पुढे जात त्याभागातील छोटे व्यापारी आणि सेवा पुरवठादारांनाही जोडण्याचे काम करत, ताल्लुकने ‘प्रायवेट सोशल नेटवर्क’ची परिभाषाच बदलून टाकली.

रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनस् (आरडब्ल्युए), मार्केट वेलफेअर असोसिएशनस् (एमडब्ल्युए), विविध समुदाय आणि इतर गटांना एकमेकांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने ताल्लुक हे एक वन-स्टॉप प्लॅटफॉर्म अर्थात एकच परिपूर्ण व्यासपीठ ठरत आहे आणि अशाप्रकारे शेजाऱ्यांमधील मिलाफ आणि संबंधही वाढवित आहे.

त्यांची कल्पना ऐकल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातच काम करणारे त्यांचे सहकारी, अभिषेक चौहान आणि रुनल दहीवडे, यांना देखील त्यांच्याबरोबर येण्याची प्रेरणा मिळाली.

“ आज आमची चार जणांची भक्कम टीम आहे, ज्यापैकी एक पीआर अर्थात जनसंपर्क करण्याच्या कामात खूपच कुशल आहे, दुसरा आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ आहे आणि तीन जण हे सेल्स अर्थात विक्री क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. त्याशिवाय आमची सॉफ्टवेअर डेवलपेंट करणारी एक लहानशी टीम आहे,” विशाल सांगतात.

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज असूनही, या टीमला जाणवले की एकूण आवश्यक तंत्रज्ञानाची विस्तृत्व रुपरेषा (ब्ल्युप्रिंट) तयार करणे काही तेवढे सहज नाही. सुदैवाने संस्थापक सदस्य हे उत्तम तांत्रिक पार्श्वभूमी असलेले होते आणि खूपच मोठ्या विचारमंथनानंतरच उत्पादनाची सुयोग्य दिशा ठरविण्यात आणि ताल्लुकची भरभराट होण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व्यवस्था समजून घेण्यात त्यांना यश आले.

तर ग्राहकासमोर उत्पादन सादर करणे आणि डिजिटल मार्केटींग स्ट्रॅटेजी, यांसारख्या आव्हानांचा यशस्वी सामना सल्लागार मंडळाच्या मदतीने त्यांनी केला.

ताल्लुक स्वतःला शंभर टक्के क्लाऊड-बेस्ड युटीलिटी वेब पोर्टल म्हणवून घेते, ज्याचे लक्ष्य आहे आरडब्ल्युए, एमडब्ल्युए, क्लब्ज आणि अशा इतर गटांचे काम सुलभ करणे. त्यांच्या कामकाजाचा खर्च कमी करण्यास आणि त्यांचे काम अधिक कार्यक्षम करण्यास, हे सहाय्यभूत ठरते.

‘ताल्लुक’ देऊ करत असेलेल्या विभागांपैकी काही विभाग आहेत - दळणवळण प्रणाली, ऑनलाईन निवासी निर्देशिका, सामाजिक उपक्रम, ऑनलाईन निवडणूका, विक्रेते व्यवस्थापन, बातम्या आणि हायपर-लोकल (hyper-local) सेवांचे जवळपासचे पुरवठादार..

ताल्लुक हे मोबाईल फोनच्या माध्यमातून उपलब्ध असल्याने कधीही आणि कुठुनही त्याचा वापर करता येऊ शकतो. तसेच या उत्पादनमध्ये सिंगल सोअर्स कोड या वैशिष्ट्याचा वापर केला असून तोडग्याची एकच आवृत्ती असल्याने, प्रत्येकवेळी प्रणालीत बदल झाल्यानंतर पॅचेस आणि अपडेटच्या प्रक्रियेतून जाण्याची काहीच गरज नाही.

ऑनलाईन प्रायवेट सोशल नेटवर्क म्हणून ते अतिशय योजनाबद्ध प्रकारे स्थापित केल्याचे विशाल सांगतात, जे आरडब्ल्युए व्यवस्थापन आणि हायपर लोकल सेवांसाठी सुलभ होते.

लोकांना त्यांच्या आसपासच्या लोकांशी जोडणारे आणि हायपर लोकल सेवांसाठी व्यवहार सक्षम करणारे हे व्यासपीठ आहे. ते पुढील रेव्हेन्यू जनरेशन मॉडेल्स वापरतातः

१. ताल्लुकवर लहान व्यवसाय संलग्नतेसाठी वर्गणी

२. वन-स्टॉप बिल पेमेंट सेवा

३. हायपर-लोकल सेवा

४. प्रिमियम मोबाईल ऍप सबस्क्रिपशन्स फॉर ‘सेफ्टी’

“ अवघ्या काही महिन्यांच्याच काळात आम्ही ४४ आरडब्ल्युए आणि ७ एमडब्ल्युए ची नोंदणी केली असून २,१८९ वापरकर्ते आहेत. दरमहा हा आकडा वाढतच आहे,” विशाल सांगतात.

निधी मिळविणे आणि वेगाने वृद्धी करणे, हे त्यांचे स्वप्न आहे. या टीमचा विश्वास आहे की, एकदा आवश्यक तो निधी मिळाल्यास ते एक मिलियन (दशलक्ष) घरांपर्यंत एका वर्षाच्या आत पोहचू शकतात.

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन