एक भटारखाना… दररोज लाखभर पोटं भरणारा!

0

एक भव्य भटारखाना… उन्हाळा, पावसाळा, हिवाळा… तिन्ही ऋतू… अहर्निश… २४ तास सलग धगधगत असतो… क्षुधाशांतीसाठी! धर्म, वंश, जात-पात, गरीब-श्रीमंत अशी कुठलीही सीमारेषा इथे आखलेली नाही. ‘भुकेल्याला अन्न’ हेच या भटारखान्याचे अखंड व्रत… क्षुधाशांती हाच एक धर्म त्याने धारण केलेला. सांगा कुठे असेल का असे काही जगाच्या पाठीवर?

मोठाल्या चुली, भट्ट्या, तंदूर इथे कधीही विश्रांती घेत नाहीत. धक्का बसला ना? अहो असे चमत्कार आपल्या भारतातच घडतात… म्हणजे काय! भारतातच आहे हा भटारखाना… अमृतसरच्या सुवर्णमंदिरात… भटारखान्यात येणारा प्रत्येक माणूस सारखा! ‘समता’ हेच इथले मूलभूत मूल्य आणि ‘समरसता’ हेच इथले मूलभूत तत्वज्ञान!

‘बोले सो निहाल… सत श्री अकाल!’

लाखो भाविक दररोज या मंदिरात येतात. नतमस्तक होतात. भंडाराही इथे अखंड चालतो आणि म्हणून भटारखानाही अखंड चालतो. दररोज ५ हजार किलो सरपण भस्म होते आणि शंभराहून अधिक एलपीजी गॅस सीलिंडर स्वाहा होतात. शेकडो स्वयंसेवक वाढपी म्हणून सेवा बजावतात. उष्टी काढण्यासाठी, भांडी धुण्यासाठी आणि भटारखान्यात कामासाठी ४०० हून अधिक कर्मचारी दिवसरात्र राबत असतात. स्वयंसेवक म्हणून विनामूल्य राबणारेही तितकेच.

बरेचदा तर कर्मचाऱ्यांहून जास्त संख्या या स्वयंसेवकांची असते.

समतेच्या संकल्पनेचे दर्शन इथे पावलोपावली घडते. मग गुरुद्वारा असो वा भटारखाना वा भंडाऱ्याची जागा.

भंडाऱ्याच्या म्हणजेच भोजनस्थळाला इथे ‘लंगर’ म्हटले जाते.

भाविकांचे चप्पल-जोडे सांभाळणे, तहानलेल्यांना पाणी पाजणे अशा कामांची संधी आपल्याला मिळावी म्हणून भलेभले दिग्गज स्पर्धेत असतात. इथे लौकिक श्रीमंती-गरिबीला काही अर्थ उरत नाही.

माणुसकीच्या एका धाग्यात सगळे सारखेच ओवले जातात.

मध्यंतरी एका अप्रिय घटनेमुळे सुवर्णमंदिर पुन्हा चर्चेत आले होते. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या ३० व्या स्मृतिदिनी काही अनुयायांमध्ये आपसात वाद झाला होता. पण हा वाद म्हणजे एक अपवादात्मक घटना. इथे समन्वय हीच भावना एरवी सदासर्वकाळ नांदत असते.

तुम्ही निरिश्वरवादी असलात तरी किमान एकदा तरी सुवर्णमंदिराला भेट द्यायलाच हवी. स्वयंस्फूर्त सेवा आणि व्यवस्थानातला समन्वय यांचा उत्कृष्ट मिलाफ किती सुंदर परिणाम साधतो, हे इथे आल्यानंतरच खऱ्या अर्थाने कळते. जगाच्या पाठीवर कुठेही हे तुम्हाला पहायला आणि शिकायला मिळणार नाही. इथल्या भंडाऱ्यावर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होतात. दररोज येणाऱ्या भाविकांकडून आणि परदेशातून मिळणाऱ्या दान, देणग्या तसेच वर्गणीवर हा सगळा रहाटगाडा चालतो.

सुवर्णमंदिर हे शिखांचे पवित्र धार्मिकस्थळ आहे, पण अन्य धर्मियांवर इथे कुठलीही बंधने नाहीत. इथे चालणाऱ्या सर्व प्रकारच्या धार्मिक विधींमध्ये अन्य धर्मीयही सहभागी होऊ शकतात.

इथल्या भंडाऱ्यात दररोज १ लाखावर लोक जेवतात. २४ तास भोजनसेवा उपलब्ध असते. जगभरातून येणाऱ्या स्वयंसेवकांच्या श्रमदानाने हे दिव्य सहजगत्या पार पडते.

या भटारखान्यात शेकडो लोक स्वयंपाकात मदत करतात. स्त्री-पुरुष मिळून स्वयंपाक करतात.

सुवर्णमंदिरात स्वयंसेवकासाठी वयोमर्यादा नाही. कुणी ८ वर्षांचा असो वा ८० चा कुणीही इथे सेवा बजावू शकतो.

जेवणानंतर उष्टी भांडी चमचे आणि ताट व वाटी अशा दोन गटांत वेगवेगळी केली जातात, जेणेकरून ती धुणे सोपे जावे.

उष्टी भांडी अनेकदा धुतली जातात, जेणेकरून ती स्वच्छ धुतली जावीत. थोडेसेही खरकटे राहू नये आणि तेलाची जरा चिपचिपही राहू नये.

सगळे स्वयंसेवक एकाचवेळी भांडी स्वच्छ करतात. यादरम्यान स्वयंसेवकांच्या चिजवस्तूंवर खास निगराणी ठेवली जाते. स्वयंसेवकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नको म्हणून व्यवस्थापनाकडून काळजी घेतली जाते.

सेवा आटोपल्यानंतर स्वयंसेवकांना मोठ्या वाटीत चहा दिला जातो. (सर्वच प्रकारचे पेय पदार्थ इथे ग्लासाऐवजी अशा वाटीतच दिले जातात.)

दररोज ३ लाखांहून अधिक भांडी इथं धुतली जातात आणि पुढच्या जेवणासाठी वापरली जातात.

जेवायला येणाऱ्या मंडळींचे मनापासून स्वागत केले जाते आणि लोकांना मनापासून जेवू घातले जाते.

जेवणानंतर काही लोकांना थोडा आराम करावासा वाटतो, त्यांची व्यवस्था ‘दिवान हॉल मंजी साहिब’मध्ये केली जाते. देवाच्या दरबारात येणारा कुणी का असेना. वेगळी वागणूक कुणालाही दिली जात नाही. कुणालाही झोपायला जागा ५-६ फुटाचीच लागते.

दररोज ७ ते १० हजार किलो पीठ लागते.

स्वयंसेवक आणि कर्मचारी मिळून काम करतात. पोळ्या लाटतात. प्रसाद बनवतात. एका अंदाजानुसार इथे दररोज २ ते ३ लाख पोळ्या लाटल्या जातात.

इथे सेवा बजावणाऱ्यांच्या आनंदाला सीमा नसते. या आनंदाची कल्पना कुणी अन्य करूच शकत नाही.

मंदिरात शिरताच पाय धुण्याची खास व्यवस्था आहे. विशेष म्हणजे हे पाणी निरंतर वाहते असे आहे. इतरांबद्दलचे सगळे पूर्वग्रह स्वच्छ करा आणि वाहून जाऊ द्या, असा संदेशही यातून आहेच.

मंदिराभोवतीच्या तलावात आंघोळ करणे म्हणजे एकप्रकारचे पूण्यसंपादन अशी बऱ्याच जणांची श्रद्धा असते.

स्वयंसेवक कुठूनही आलेले असोत, सगळे समान असतात. दुसरे म्हणजे कुठलेही काम इथे हलक्या दर्जाचे मानले जात नाही, मग ते पादत्राणे सांभाळण्याचे काम असो अगर पाणी पाजण्याचे.

जगभरातून मिळणारी वर्गणी आणि देणग्यांबद्दल धन्यवाद! इथे कितीतरी प्रकारचे काउंटरही असतात. उदाहरणार्थ थंड पाण्याचा काउंटर. फार स्वस्तात इथे पिण्याचे थंड पाणी मिळते.

शेकडो लोक दररोज इथे आपली रात्र घालवतात. मोकळ्या आकाशाखाली मोकळ्या अंगणात मस्त पहुडतात. ‘वाहे गुरू’चे नाव घेतात अन् झोपी जातात.