संतसत्पुरुषांच्या १६० हून अधिक वस्तू पुण्यातील संत-वस्तूसंग्रहालयात, शिवदुर्गा मराठे यांची अनोखी कामगिरी

संतसत्पुरुषांच्या १६० हून अधिक वस्तू पुण्यातील संत-वस्तूसंग्रहालयात, शिवदुर्गा मराठे यांची अनोखी कामगिरी

Monday March 28, 2016,

4 min Read

कलियुगात संत हेच देव आहेत असे अनेक ज्ञानीजनांनी सांगून ठेवले आहे. महाराष्ट्र तर संतभूमी म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी संतांनी जे कार्य शतकानुशतके करून ठेवले आहे त्या पायावर समाजाचा सांस्कृतिक, आध्यात्मिक तसंच आधुनिक डोलारा उभा राहिला आहे. संतांचे कार्य काय आहे हे केवळ त्यांच्या चरित्रांची पारायणे करून कळणार नाही. संतांची भक्ती करून त्यांची खरी ओळख होणार नाही. संतांची शिकवण काय होती, याचा आपण विचार केला आणि आचरण केले तरच संत कोण होते हे जाणून घेणे सुलभ होईल.

सर्वांच भलं व्हावं, सर्वाना समाधानी आयुष्य लाभावं यासाठी संत झटत असतात बाह्यांगी चारचौघांसारखे दिसणारे, मात्र आत्मिक सामर्थ्य असणारे संत अहंकारमुक्त महामानव असतात. संतांच्या वाणी आणि कृती मध्ये अंतर नसते. म्हणून तुकोबांनी म्हटले आहे, ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ सर्व वंदनीय अशा संतांची आजच्या प्रचंड स्वार्थी गर्दीत ओळख तरी कशी होणार ? संतांच्या सहवासाची आस असणारे लोक संतांच्या तीर्थक्षेत्रांना, समाधीला भेट देण्यासाठी भटकत राहतात. प्रचंड गर्दीत बाजारात खरोखर संत चरणांचे दर्शन होते का? हाच खरा प्रश्न आहे.

या भूमीला संत नर-रत्नांची खाण म्हटले आहे. या संतांची ओळख करून घेतांना त्यांचे विचार, शिकवण, याचे दर्शन करून घेताना एकाच क्षेत्री साऱ्या तेहतीस कोटी देवतांचे दर्शन घेण्याचा योग येईल का ? या प्रश्नाचे उत्तर पुण्याजवळ घोरपडी इथं असलेल्या संत वस्तुसंग्रहालयाला भेट दिल्यावर मिळते.

image


पुण्यानजीक घोरपडी गावामध्ये कलाशंकर नगर परिसरातील रतन एनक्लेव या गृहसंकुलातील शिवदुर्गा मराठे यांच्या वास्तूमध्ये ७५ हून अधिक संतसत्पुरुषांच्या १६० हून अधिक नित्य वापरातील वस्तू निगुतीने मांडून ठेवल्या आहे. जुन्या जमान्यातील प्रख्यात चित्रकार दत्तात्रय धोंडो तथा डी.डी.रेगे यांनी प्रसंगी पदरमोड करून जमवलेल्या या संत वस्तूंचा हा आगळावेगळा संग्रह त्यांच्या कन्या शिवादुर्गा मराठे यांनी जतन करून ठेवला आहे. आपल्या पित्याच्या या अलौकिक कार्याचा वारसा चालवताना सौ मराठे यांनी देखील बरीच जमापुंजी आणि अर्धेअधिक आयुष्य खर्ची घातले आहे. 

image


या वस्तुसंग्रहालयात केवळ संतसत्पुरुष यांच्या दुर्मिळ व नित्य वापरातील वस्तूच नव्हे तर चित्रकार डी.डी. रेगे यांनी साकारलेली अनेक पेंटींग्स आणि दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रे सांभाळून ठेवली आहेत. संतसत्पुरुषांच्या वस्तूंचा शोध घेवून त्या पदरमोड करून मिळवणे आणि सांभाळून ठेवणे, हे काम सहज सोपे नाही, परंतु हा अलौकिक ठेवा जमविण्याचे काम डी.डी.रेगे यांनी जीवनभर केले. त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या पित्याच्या स्मृतींना उजाळा देत सौ मराठे यांनी या वस्तू सांभाळण्याचे आधारव्रत सुरूच ठेवले आहे. ‘संत वस्तू म्हणजे त्या त्या महापुरुषांनी वापरलेल्या वस्तू’.

image


या संग्रहालयात आपल्याला महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात संत संतसत्पुरुषांच्या लोकप्रिय असलेल्या अनेक दैनंदिन वापरातल्या वस्तूंचा संग्रह पहावयास मिळतो. यामध्ये अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दैनंदिन वापरातील भरजरी उंच टोपी, नित्य वापरातील दोन शाली, जंगली महाराज पुणे यांची जपमाळ, भरजरी कफनी, अंगठी, लोटा, पादुका, प.पू. श्री नृसिंहसरस्वती स्वामी आळंदी यांच्या नित्यपूजेतील उजवा शंख, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मृगजिन (आसन) कद, उपरणे, अहमदनगरच्या अवतार श्री मेहेरबाबांची कफनी, श्री पंत महाराज बाळे कुन्द्रीकर-बेळगाव यांच्या नित्य वापरातील एकमेव काठी, शिर्डीच्या साईबाबांची लंगोटी व करदोडा, नाणी, पादुका, साकोरीच्या उपासनीबाबांचे गोणपाट, मफलर, श्री नारायण महाराज-केजगाव यांची जरीची टोपी, जाकीट, कौपिन, नागपूरच्या अवलिया ताजुद्दीन बाबा यांची भरजरी चादर, चित्रकुटच्या श्री माधवनाथ महाराज यांचे धोतर, उपरणे, पुण्यातील साधू श्री टी.एल.वासवानी यांचा शर्ट, टोपी, श्री शंकर महाराज (धनकवडी ) पुणे यांचा हंटर, रुद्राक्षमाळ, जंबिया. श्री संत गाडगेबाबा यांची नित्य वापरातील वस्त्र, सज्जनगड-श्रीधरस्वामींच्या पादुका, छाटी, कमंडलू, शेगाव-गजानन महाराजांची चिलीम, श्री माॅ आनंदीमयी यांच्या पादुका व पायठसे या व्यतिरिक्त आणखी काही संत वस्तू येथे जतन करण्यात आल्या आहे. या दुर्मिळ वस्तूंबरोबरच संतश्रेष्ठांच्या दुर्मिळ छायाचित्रांची मूळ प्रत या संग्रहालयात पाहायला मिळते.

image


“या संत वस्तू संग्रहालयामध्ये गेल्या तीनशे वर्षांपासूनच्या जुन्या वस्तू असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात करावा लागतो. माझ्या वडिलांनी हे वस्तू संग्रहालय सुरवातील आळंदी येथे उभारले होते. मात्र, त्याकरिता अनुदान, सहकार्य किंवा मदत देण्याची सोडाच त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या वस्तूसंग्रहालयातील वस्तूंचा सांभाळ आम्ही करतो असे सांगत, अनेकवेळा लोकांनी त्या घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. धाकदपटशा देखील करायचा प्रयत्न केला, चोऱ्या करायचा देखील प्रयत्न झाला”, असं शिवदुर्गा मराठे यांनी सांगितले. तरीही आज हे संत वस्तू संग्रहालय विनामूल्य पाहता येते. यामागे आपल्या वडिलांची प्रेरणा कारणीभूत आहे असं त्या म्हणतात. 

image


महाराष्ट्रात आज अनेक श्रीमंत देवस्थान आहेत तेथे दान करणारे अनेक दानशूर देखील आहे. पण संतांच्या या संग्रहालयाला मदत करताना त्यांच्यातील व्यावसायिक वृत्ती जागी होते, याचाही अनुभव मराठे आणि त्यांचे वडील यांनी वेळोवेळी घेतला आहे. या संत वस्तू संग्रहालयाला भावी काळात निस्वार्थ आणि सच्चा मदतीची अपेक्षा आहे. तरच मोठ्या परिश्रमानं जपून ठेवलेली ही इवली इवली संतस्मारकं भावी पिढ्यानकरिता जतन करून ठेवणे शक्य होणार आहे असे आवाहन सौ मराठे करतात. महाराष्ट्र शासन आणि संत भक्तांनी याकरिता प्रयत्न करायला हवे हीच खरी श्री रेगे आणि कुटुंबीयांनी केलेल्या कार्याची पोचपावती असेल. महाराष्ट्रातील भूमीवर नांदलेल्या संत महंतांना एकाच ठिकाणी भेटण्याचासाठी या वस्तूसंग्रहालयाला एकदातरी भेट द्यायला हवी. 

वेबसाईट : http://www.ddregemuseum.org/