'बुक माय अॅक्टिविटी'च्या मदतीनं शोधा आपल्या छंदासाठीचं योग्य ठिकाण 

0

अमेरिकेतून नाशिकमध्ये आलेल्या शिल्पा धमने यांनी आपल्या मुलीचे छंद जोपासण्यासाठी वेगवेगळ्या क्लासेसचा शोध घ्यायला सुरवात केली. अर्थात ही शोधाशोध त्या इंटरनेटच्या माध्यमातून करत होत्या.  शोध घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की अशा कुठल्याही क्लासची माहिती किंवा त्यांना जे अपेक्षित आहे ते तर इंटरनेटवर उपलब्धच नाही. यातूनच मग 'बुक माय अॅक्टिविटी'चा जन्म झाला. शिल्पा आणि त्यांचे पती चिन्मय धमने यांनी एकत्रितरित्या आपल्या पाल्यासाठी नक्की कुठला क्लास, कुठलं प्रशिक्षण केंद्र चांगलं आहे. आपल्या घरापासून किती दूर, किती फी अशी सर्व काही माहिती देणारी  ऑनलाईन सेवा सुरु केली. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळतोय. 

मुळचे नाशिकचे असलेले शिल्पा आणि चिन्मय हे दोघेही आर्किटेक आहे. शिक्षणासाठी पुणे आणि त्यानंतर अमेरिका, तिथंच सहा वर्षे नोकरी आणि पुन्हा नाशिक असा त्यांचा प्रवास झाला. आता अमेरिकेत असताना तिथल्या  विकसित तंत्रज्ञानाची त्यांना सवय झाली होती. एका क्लिकवर सर्व काही माहिती मिळण्याची सवय झाली होती. “जेव्हा नाशिकमध्ये आम्ही आलो तेव्हा मुलीसाठी नक्की कुठे, कसला क्लास आहे याचा शोध सुरु झाला,  तेव्हा समजलं की तशी माहितीच उपलब्ध नाही. म्हणजे या शहरात नक्की कुठला क्लास कुठे आहे ? तिथे नक्की कसं शिकवलं जातं ? घराच्या आसपासच आहे का ? किती फी आहे ? मला हव्या असलेल्या विभागात आहे का ? अशा अनेक प्रश्नांना फक्त तिथं अगोदर कोण गेलं असेल तर तोच एक माहिती मिळवण्याचा मार्ग होता. अमेरिकेत आपल्या घराच्या आसपास असलेल्या सर्व अॅक्टिविटी सेंटर्सची माहिती एका क्लिकवर मिळायची. ते इथं होत नव्हतं. इथंच आम्हाला बुक माय अॅक्टिविटीची कल्पना सुचली.” शिल्पा सांगत होत्या. 

बुक माय अॅक्टिविटीची कल्पना डोक्यात आल्यावर शिल्पा यांनी स्वत: घराजवळच्या सर्वच ठिकाणी जिथं वेगवेगळे क्लास चालवले जातात त्याची माहिती घेतली. म्हणजे क्लास नक्की कुठला ? तिथं कोण शिकवतात ? किती फी ? कसं पोचायचं? वैगरे वैगरे. ही माहिती गोळा झाल्यावर काही महिन्यांनी मग बुक माय अॅक्टिविटी आकाराला येऊ लागलं. “ हे डेटा कल्केशनचं काम सुरु असताना मला अनेक नातेवाईंकाचे फोन यायचे, अनेकजण भेटल्यावर आपल्या पाल्यासाठी आपल्या विभागात क्लास कुठे आहे हे सांग अशी विचारणा करायचे. मी त्यांना माहिती पुरवायचे. यातूनच आम्ही जे काही करतोय ते योग्य आहे हे वाटून गेलं, आत्मविश्वास वाढला. नवीन डेटा कलेक्शन चांगलंच उपयोगी पडलं. १  ऑगस्ट २०१५ ला बुक माय अॅक्टिविटी डॉट को डॉट ईन (www.bookmyactivity.co.in) या  ऑनलाईन सेवेला सुरवात झाली, टॅगलाईन ठरली 'फाईन्ड व्हॉट यू लव' म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या शोधा, य़ाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. 

नाशिक शहरात गेल्या वर्षभरात दीड हजाराहून अधिक क्लासेस आणि अॅक्टिविटी सेंटरची नोंदणी वेबसाईटवर झाली आहे. यात नाशिकच्या गल्लीबोळात असलेल्या क्लास आणि अॅक्टिविटी सेंटरची नोंदणी आहे. म्हणजे आपण जर नाशिकच्या एका भागात राहत असाल तर त्या भागात नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी क्लासेस उपलब्ध आहे. हे क्लासेस फक्त शैक्षणिक अभ्यासक्रमाचे नाहीत तर छंद जोपासण्यासंदर्भातले आहे. त्यावर क्लासची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती दिवसेंदिवस अद्यावत करण्यात येतेय. त्यामुळे अगदी नवा क्लास सुरु झाला तरी त्याचं तातडीनं इथं रजिस्ट्रेशन करण्यात येतं. 

शिल्पा सांगतात, “अश्या इतर वेबसाईटही आहेत ज्या माहिती पुरवतात पण आम्ही क्लास आणि अॅक्टिविटी सेंटरच्या माहितीची पडताळणी करतो, त्यावर त्यांचं रेटींगही ठरवण्यात येतं. त्यामुळे क्लास चालक आणि तिथं जाणाऱ्या पाल्य आणि पालकांच्या प्रतिक्रिया उपलब्ध असतात. त्यामुळे संबंधीत क्लास सुरु करायचा की नाही याचा निर्णय घ्यायला मदत होते.”

आता बुक माय अॅक्टिविटीवर फक्त क्लासेस असतात असेच नाहीत तर सुट्यामध्ये जे छोटे छोटे सेमिनार, समर कॅम्प, ते किती दिवसांचे आहेत, नक्की काय शिकवणार तसंच इतरही छोट्या गोष्टींची नोंद करता येते. अर्थात सध्या हे सर्व मोफत आहे. पुढे जाऊन त्यातून जाहिरात स्विकारुन बिजनेस म़ॉडेल विकसित करण्यात येणार आहे हे शिल्पा यांनी स्पष्ट केलंय.


“ आम्ही या वेबसाईट आणि अॅपचा जेव्हा विचार केला तेव्हा एका पालकाला आपल्या पाल्याला कुठल्या क्लासला टाकण्याअगोदर नक्की काय विचार करतात याचा वेध घेतला. सर्वांचा प्रश्न एकच होता आपल्या घरापासून किती लांब आहे आणि या आधीच्या लोकांचे अनुभव कसे आहेत. या सर्व प्रश्नाची उत्तरं वेबसाईट आणि अॅपवर अगदी एका क्लिकनं मिळाली अशा प्रतिक्रिया जेव्हा मिळतात तेव्हा खूप बरं वाटतं. आम्ही आमच्या मुलींसाठी असे अॅक्टिविटी सेंटर शोधत होतो त्या शोधातून हा अविष्कार झाला.” शिल्पा अभिमानाने सांगतात.

सध्या बुक माय अॅक्टिविटीवर  अकरा शहरातलया क्लासेसची आणि इतर अॅक्टिविटीची माहिती देण्यात येतेय. हळूहळू ही व्याप्ती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.  

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा  :

एका ड्रायव्हरचा इंजिनिअर मुलगा ‘जिज्ञासा’ मार्फत देत आहे गरीब मुलांना शिक्षणाची उत्तम संधी 

... जेणेकरुन झोपडपट्टीत राहणारी मुलेसुद्धा फिल्म बनवू शकतील आणि पुढे जाण्याची ‘प्रेरणा’ घेतील 

‘बोलत्या पोस्ट’ चा ऑनलाईन वाचन कट्टा !