अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे ‘बाल संबल’

0

अनाथ आणि निराधार मुलांचा आधार बनून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार कमी लोक कार्यरत आहेत. आणि अशा अगदी मोजक्या लोकांमध्ये पंचशील जैन यांचा समावेश होतो. जे अनाथ मुलांच्या उद्धाराचा केवळ विचार करत न बसता पुढे सरसावले. आज ते अशा अनाथ निराधार मुलांना केवळ शिक्षणच नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. राजस्थानातील पंचशील जैन यांची ‘बाल संबल’ ही योजना अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, खेळ तसेच व्यवसाय उपयोगी प्रशिक्षण याची व्यवस्था करते.


या प्रकल्प अंतर्गत २५० अनाथ आणि निराधार मुलांच्या राहण्याची, खाण्याची आणि खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात १२५ मुलगे तर १२५ मुली राहू शकतील. येथे शालेय शिक्षणासोबतच मुलांना संगणकाचे आणि हस्तकलेचे देखील प्रशिक्षण दिले जाते. जयपूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावरील सिरोही येथे १५ एकर जागेत पसरलेल्या ‘बाल संबल’ मध्ये सध्या ४० मुले राहत आहेत. या मुलांमध्ये अनाथ तसेच रस्त्यावर कचरा वेचणारी मुलेही सहभागी आहेत. इथे राहणाऱ्या अधिकतर मुलांना रेल्वे स्टेशन, बस स्टेशन अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस फिरत असता राजस्थान बाल कल्याण समिती च्या मदतीने इथे आणण्यात आले आहे.


इथे त्यांना राहण्याच्या सुविधेसोबतच पहिली ते आठवी पर्यंतचे राजस्थान बोर्डाची मान्यता प्राप्त शिक्षणही दिले जाते. मुलांच्या खेळाच्या आवश्यकते कडे विशेष लक्ष देऊन इथे त्यांच्या साठी वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळी मैदाने आहेत. पंचशील युवर स्टोरी ला सांगतात – “माझी इच्छा आहे की या मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांना ज्या खेळत गती आहे त्यात देखील आम्ही मदत करावी म्हणजे ते काही बनून येथून बाहेर पडतील”


‘बाल संबल’ मध्ये शिक्षणाबरोबरच संगीत आणि कलाकुसरही शिकवले जाते. याव्यतिरिक्त येणाऱ्या काळात ही मुले आपल्या पायावर समर्थपणे उभी रहावीत म्हणून त्यांना शिवणकाम, सुतारकाम, लोहारकाम आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची अनेक कामे शिकवली जातात. ‘बाल संबल’ मधील अनेक मुले ‘मार्शल आर्ट’ आणि तिरंदाजी मध्ये चांगले नाव कमावत आहेत. पंचशील यांची योजना आता इथे एक स्विमिंग पूल आणि स्टेडीयम बनवण्याची आहे. म्हणजे इथली मुले राष्ट्रीय आणि अांतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करू शकतील.


पंचशील जैन यांचे वडील एक स्वतंत्र्य सेनानी होते आणि स्वातंत्र्य प्राप्ती नंतर त्यांनी समाज सेवेच्या कामात स्वतःला वाहून घेतले. त्यांनी राजस्थान मधील चुरू जिल्हयातील एका गावाला स्वतःच्या हिंमतीवर आदर्श गाव बनवले. पंचशील आठ भावंडांपैकी एक, त्यामुळे त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती नेहमी बेताचीच राहिली. मात्र अशातही आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याचा ठसा पंचशील यांच्यावर खोलवर उतरला. त्यांनी सुरवातीला परिवाराच्या आर्थिक उन्नती करता डायमंड टूल्सच्या व्यवसायात नशीब आजमवायचे ठरवले. डायमंड टूल्स चा वापर कठीण दगड कापण्यासाठी केला जातो. पंचशील सुरवातीच्या दिवसांबद्दल सांगतात, “मी जेव्हा हा उद्योग सुरु केला होता तेव्हाच संकल्प केला होता की वयाच्या ५० वर्षांनंतर हा व्यवसाय सोडून समाजसेवेसाठी वेळ देईन. म्हणूनच २००८ मध्ये मी आपला व्यवसाय भावांच्या हवाली करून दिला आणि ‘बाल संबल’ योजनेसोबत स्वतःला जोडून घेतले".


पंचशील यांचे मत आहे की, “देशाचे भविष्य मुले आहेत, जर मुलांचे भविष्य चांगले नसेल तर देशाचे भविष्य कसे चांगले होऊ शकते” पंचशील यांनी जेव्हा हे काम सुरु केले होते त्यावेळी ते एकटे होते मात्र आता हळूहळू अन्य लोकही या योजनेसोबत जोडले जात आहेत आज त्यांच्या जवळ १० कार्यकर्त्यांची टीम आहे.

वेबसाइट : www.balsambal.org

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : सुयोग सुर्वे