ʻटेस्ट द थंडरʼच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये शीतपेयाची आवड निर्माण करणारे आरजेसी

ʻटेस्ट द थंडरʼच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये शीतपेयाची आवड निर्माण करणारे आरजेसी

Sunday December 13, 2015,

5 min Read

बिग बाईट या ब्रॅण्डने केएफसी आणि मॅकडॉनल्डला जोरदार टक्कर दिली का?, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनासोबत या ब्रॅण्डची तुलना करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या ब्रॅण्डचे संस्थापक रमेश जे चौहान (आरजेसी). आरजेसी हे बिस्लेरी इंटरनॅशनल या ब्रॅण्डचे संस्थापक आहेत. त्याशिवाय थम्स अप, लिम्का, गोल्ड स्पॉट, माझा आणि सायट्रा यांसारख्या दर्जेदार उत्पादनांचे ते निर्मातेदेखील आहेत. कालांतराने त्यांनी ही उत्पादने कोका-कोला या कंपनीला विकली. आरजेसी यांनी एकहाती या उत्पादनांची निर्मिती केली असून, २० वर्षानंतर त्यांनी त्याची विक्री केली. या उत्पादनांमधील साम्य ग्राहकांना त्याच्याशी एकनिष्ठ ठेवण्यास मदत करते. आरजेसी यांनी या उत्पादनांच्या निर्मितीवर घेतलेल्या कष्टामुळे त्यांना हे यश प्राप्त झाले असून, त्यामुळेच त्यांचा जीवनप्रवास सर्वसामान्यांकरिता प्रेरणादायी ठरतो. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनप्रवासातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

image


कोणत्याही व्यवसायात तुमच्या ग्राहकाला ओळखणे, ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि आरजेसी हा नियम कटाक्षाने पाळत. आरजेसी यांनी त्याकाळी कारकिर्दीला सुरुवात केली, ज्याकाळात उद्योजकांना आजच्या तुलनेत चांगले दिवस नव्हते. आरजेसी सांगतात की, ʻगोष्टी नैसर्गिकरित्या जसजशा येत गेल्या, तसतशा प्रकारे आम्ही त्या हाताळत गेलो. त्याकाळी आमच्याकडे कोणत्याही स्तरावरील नियोजन नव्हते. बाजाराच्या रणनितीचा अभ्यास करुन पावले उचलण्याऐवजी आम्ही साहसाच्या जोरावर अनेक कामे करत होतो. आम्ही त्या काळाच्या प्रवाहानुसार गेलो, स्वतःच्या चुका सुधारत गेलो तसेच हळूहळू आमच्या कार्य़पद्धतीत सुधारणा करत गेलो.ʼ मार्केट शेयर आणि स्पर्धा यांसारख्या गोष्टींमध्ये न अडकण्याचा सल्ला आरजेसी देतात. ʻतुम्हाला जे हवे आहे ते करा. तुमच्या आतील आवाज ऐका. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही आलेखाची किंवा बाजार मूल्यांची गरज नसेल.ʼ, असे ते सांगतात. ते पुढे सांगतात की, ʻजर माझ्या प्रतिस्पर्ध्याची वाढ होत असेल, तर मी त्याला ती थांबवण्यास सांगू शकतो का?, ते शक्य नाही, त्यामुळे सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, पुढे जात असताना स्वतःच स्वतःच्या चुका सुधारा. त्यामुळे तुम्ही कधीही अपय़शी ठरणार नाही.ʼ, असा सल्ला ते देतात. आरजेसी आणि त्यांचे वडिल जयंतीलाल चौहान यांनी त्यांचा आतील आवाज ऐकला आणि कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या कार्य़स्थळावर राबवण्यात येणाऱ्या रणनिती जुन्या काळाप्रमाणे अंमलात आणल्या. मात्र त्या प्रभावी ठरल्या. त्यांनी त्यांच्या कार्यालयात एक फलक लावला होता. ज्यावर ते विक्रीसंबंधातील माहिती नोंदवून ठेवत. तसेच त्यावरच ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे काम करत असत. ʻजरी तुम्हाला माहित नसेल की, आता काय करायचे आहे. तरी तुम्हाला कोणीही काहीही सांगणार नाही. देवच तुम्हाला मदत करेल. चांगला नफा मिळणारी उत्पादनेच दुकानदार आपल्या दुकानात विक्रीस ठेवतो. जर तुम्ही पहिल्या वेळेस त्यांना तुमची उत्पादने दुकानात विक्रीस ठेवण्याकरिता राजी करू शकला नाहीत, तर पुन्हा पुन्हा त्याचे प्रयत्न करत रहा. प्रदीर्घ प्रयत्न करण्यास शिका.ʼ, असे ते सांगतात.

बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये आरजेसी कायमच आपल्याकडील कुशल कामगारांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत. त्यामुळे आरजेसी यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले कामगार पाहून कोणालाही आश्चर्य़चकित व्हायची गरज नाही. आरजेसी यांच्या मते, माणसाची खरी ओळख फक्त त्यांच्या पात्रतेवरुन ठरवता येत नाही. ʻजर एखाद्याला काही शिकण्याची इच्छा असेल, तर ती व्यक्ती पदवीधर व्यक्तिपेक्षादेखील चांगली सिद्ध होऊ शकते.ʼ, असे त्यांना वाटते. बिग बाईट अयशस्वी होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे योग्य कामगार नसणे, असे आरजेसी यांना वाटते. ʻप्रत्येकाला एका यशस्वी आणि प्रस्थापित ब्रॅण्डसोबत जोडले जायचे आहे. कोणालाही नवख्या किंवा नव्याने सुरू होणाऱ्या उत्पादनावर मेहनत घ्यायची नाही आहे. दरम्यानच्या काळात आम्हाला जाणीव झाली की, आमचा पुष्कळसा वेळ वाया जात आहे. नवीन आव्हाने स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज होतीʼ, असे ते सांगतात. आरजेसी यांनी कायम आपल्या उत्पादनावर विश्वास ठेवला. ते सांगतात, ʻव्यवसाय हा कायम उत्पादनावर अवलंबून असतो. तुमचे उत्पादन काहीही असो. साबण, तांदुळ, मीठ किंवा गाडी यापैकी काहीही उत्पादन असो. अखेरीस त्याचा दर्जा हा तुमच्या ब्रॅण्डवर आणि तो कशाप्रकारे ओळखला जातो यावर अवलंबून असतो.ʼ त्यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांचे श्रेय त्यांनाच दिले जाते. मात्र त्यांनी नियुक्त केलेल्या जाहिरात कंपनीचा यात सिंहाचा वाटा आहे, असे त्यांना वाटते. आरजेसी त्यांच्या या जाहिरात फंड्याबद्दल बोलताना सांगतात की, ʻमाझी संकल्पना सहजसोपी होती. मला एक लहान एजन्सी हवी होती, जेथे त्या कंपनीचा मालकच आमच्या उत्पादनाच्या जाहिरातीचे काम पाहील .ʼ भारतातील घराघरात प्यायल्या जाणाऱ्या लिंबूपाण्याच्या पार्श्वभूमीवर लिम्काची जाहिरात करण्यात आली. पत्रकार आणि जाहिरात रणनितीकार के कुरीयन यांची लिम्काच्या जाहिरातीची संकल्पना होती. के कुरीयन ही ती व्यक्ती आहे, ज्यांनी अमूल बटर हे नाव घरोघरी पोहोचवले. ड्युक्स कंपनीच्या ʻमॅंगोलाʼ या आंब्याच्या पेयावरुन प्रभावित होऊन तयार करण्यात आलेल्या ʻमाझाʼ या शीतपेयाच्या जाहिरातीची संकल्पनादेखील के कुरीयन यांची होती. मॅंगोला हे पेय त्याकाळी तेवढे यशस्वी ठरले नाही. आरजेसी यांना हीच संधी मिळाली. अखेरीस योग्य यंत्रणेची जुळवाजुळव केल्यानंतर आणि प्रक्रियेनंतर ʻमाझाʼ ही भारतातील पहिली शीतपेयाची कंपनी ठरली, जिने काचेच्या बाटलीमधून शीतपेयाची विक्री करण्यास सुरुवात केली. १९७७ साली बाजारात दाखल झालेल्या थम्स अप या उत्पादनाने कोक आणि पेप्सीला टक्कर दिली. मात्र ते आव्हानात्मक होते, अशी कबूली आरजेसी देतात. परदेशातून आयात करावे लागणारे कोला नट एक्स्ट्रॅक्ट वापरण्याऐवजी त्यांनी या शीतपेयासाठी स्थानिक पदार्थ वापरण्याचे ठरविले. जायफळ, दालचिनी, व्हॅनिला, लिकोराईस यांचा वापर करुन त्यांनी एक वेगळेच उत्पादन तयार केले. तसेच भारतीयांची तीव्र चवीची आवड लक्षात घेऊन त्यांनी या उत्पादनात त्यानुसारच पदार्थ वापरले. १९९३ साली कोका-कोलाने थम्स अपची मालकी घेतली. त्यानंतर कोलाच्या बाजारात थम्स अपने कायम आपले वर्चस्व राखले. थम्स अपचे यश हे आरजेसी यांच्या तुमच्या ग्राहकांना ओळखा, या मूलमंत्राच्या यशाचा दाखला देणारे आहे. तुमच्या उत्पादनावर विश्वास ठेवा आणि धाडसी रहा, असा सल्ला आरजेसी देतात.

image


आरजेसी हे काही गुंतवणूकदार नव्हते. स्टार्टअपसंबंधीतील एक्सेलेटर आणि इनक्युबेटर याबाबत त्यांनी कायम दुर्लक्ष केले. ते सांगतात, ʻमी त्या वाईट मुलांपैकी एक आहे, जे फक्त त्यांच्या तीव्र भावनांवर आधारीत काम करतात. त्यामुळे मी नव्या उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा सल्ला देऊ शकत नाही.ʼ मात्र ज्या कोणाला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, त्यांना ते मोलाचा सल्ला देतात की, ʻजर तुमच्याकडे भांडवल जास्त असेल तर तुम्ही एक मोठा ब्रॅण्ड तयार करू शकता. मी एका आशेवर आधारीत विचार करण्यावर विश्वास ठेवतो. अखेरीस सर्वकाही सुरळीत होते. आणि जर तुम्ही तसे करू शकला नाही तर तुम्ही यशस्वी झाला नाहीत. मी असे नाही म्हणत की, तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हवेच. मात्र तुमच्याकडे किमान पायाभूत कल्पना तरी हवी.ʼ आरजेसी सांगतात की, इतरत्र कुठेही जरी पाहिले नाही तरी भारतात पुरेशा संधी आहेत. तुम्ही जे काही करत आहात त्याबद्दल ठाम रहा. त्याविषयी कोणताही आळस करू नका. ʻतुमचे लक्ष फक्त ध्येयावर असू द्या. बाजारात ज्या घडामोडी घडत असतात, त्यावर डोळे आणि कान असू द्या. त्यानुसारच तुमची धोरणे ठरवाʼ, असा सल्ला आरजेसी देतात.

लेखक - प्रिती चमीकुट्टी

अनुवाद - रंजिता परब