रामणवाडीच्या निमित्ताने ‘जंगल मे मंगल’, वेणूमाधुरी ट्रस्टच्या प्रयत्नातून ग्रामसमृध्दीचे साक्षात दर्शन!

गोमुत्र डेअरी संकल्पनेतून भाकड गाईदेखील देतात शेतक-यांना जीवदान!

5

‘जंगल मे मंगल होना’ अशी हिंदी भाषेत उक्ती आहे, म्हणजे काय ते कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी अभयारण्याच्या परिसरातील रामणवाडी या गावाच्या स्वयंपूर्णतेच्या इतिहासाची आणि वर्तमानाची माहिती घेतल्यावर लक्षात येते. आपण नेहमी ऐकले असेल की पंचहात्तर वर्षांपूर्वी महात्माजींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र दिला, त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देखील ग्राम गीतेतून गावाच्या समृध्दी आणि विकासाचे स्तोत्र गायले आहे, विनोबांच्या ग्रामोदयाचा देखील आम्हाला वारसा लाभला आहे आणि अगदी अलिकडचे म्हणजे अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी किंवा पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजारच्या ग्रामसमृध्दीच्या कामाबाबत आम्ही वाचले, पाहिले असेल.

या सा-यांच्या पावलांवर पाऊल ठेवत दाजीपूर अभयारण्याच्या विस्तारित क्षेत्रात आल्याने बफर झोनमधून ‘आम्हाला जंगलातून बाहेर काढून स्थलांतरित करा’ असे सांगणा-या रामणवाडी गावात आज मात्र ‘आम्हाला इथेच राहायचे आहे’, किंबहूना जे स्थलांतरित झाले होते ते पुन्हा गावात येवून शेती करत सुखाने जीवन जगत आहेत अशी स्थिती आली आहे. हे सारे घडले ते वेणूमाधूरी ट्रस्टच्या गेल्या अठरा वर्षांच्या निरंतर आणि अथक प्रयत्नामुळेच. युवर स्टोरी मराठीने या स्वयंपूर्ण गाव आणि समृध्द गाव करण्याच्या ध्यास पर्वाच्या अठरा वर्षांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता, जी माहिती मिऴाली त्यातून या कामात रोल मॉडेल( आदर्श गाव) म्हणवून घेण्याची जबरदस्त क्षमता आहे हे नक्कीच सांगता येईल. वेणूमाधुरी ट्रस्टच्या प्रकल्पांचे समन्वयक राहूल देशपांडे यांच्याशी युवर स्टोरीने संवाद साधला त्यातून या प्रकल्पाच्या १८ वर्षांच्या संकल्पनेच्या अमृतफलदायी प्रवासात भूत, वर्तमान आणि भविष्याला जोडण्याची शक्ती असल्याचे दिसून आले.


पाटबंधारे प्रकल्पासाठी काम करताना ग्रामस्थ, रामणवाडी
पाटबंधारे प्रकल्पासाठी काम करताना ग्रामस्थ, रामणवाडी

राहुल देशपांडे (४३) यांनी पर्यावरण व्यवस्थापन विषयात मास्टर्स पदवी मिळवली आहे, तसेच ते रसायनशास्त्र या विषयात विद्यापिठातील अव्वल दर्जाचे पदवीधर आहेत. मुंबईत पर्यावरण विषयक कामांचा पाच वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी विदेशात काम करण्याचा आणि व्यावसायिक कारकिर्द घडविण्याचा मानस केला होता, मात्र इस्कॉन सोबत असलेल्या ऋणानुबंधातून ते गावखेड्यातील प्रकल्पांच्या कामात गेल्या अठरा वर्षापासून कार्यरत आहेत. वेणू माधुरी ट्रस्ट (www.venumadhuri.org) ज्याचे नेतृत्व ऋषीकेश मफतलाल (अरविंद मफतलाल समुहाचे अध्यक्ष) आणि भक्ती रासमित्र स्वामी यांनी केले आहे. वेणुमाधुरी ट्रस्ट म्हणजे शाश्वत एकत्रित पध्दतीने गावाच्या समृध्दीच्या विकासासाठी पारंपारिकतेला जोडून करण्यात येणारी चळवळ आहे. त्या बाबतची माहिती देताना राहूल देशपांडे म्हणाले की, “स्वयंपूर्ण-समृध्द गांव या संकल्पनेच्या सुरूवातीच्या काळापासून मी या प्रकल्पाचे समयन्वयन करत आहे. सन २००० पासून यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली, त्यासाठी राधानगरी तालुक्यातील रामणवाडी या गावाची निवड करण्यात आली.

या गावात शेतीला पाणी नव्हतं, त्यामुळे इथले लोक चरितार्थासाठी सर्वोतोपरी जंगलावरच अवलंबून असायचे. हिरडा जमा करायचे, मध जमा करायचे, शिकाकाई जमा करायचे, लाकूड तोडायचे, मोठ्या प्रमाणात जंगलतोड व्हायची. शिकारीला जायचे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलाची हानी होत होती. भाकड गाईसुद्धा जंगलात सोडून दिल्या होत्या. गावाच्या सर्वांगिण विकासाचा पाया पाणलोट किंवा जलसंधारणाच्या कामातून तयार करण्याचे आव्हान होते, मात्र सुरूवातीला ज्या गावात प्रचंड पर्जन्यमान असतानाही मे अखेरीस पिण्याचे पाणी नव्हते आणि केवळ अडिच एकर शेतीला सिंचनाची सोय होती. आम्ही सुरवातीला पाणलोटक्षेत्र विकासाची कामे केली आणि त्या माध्यमातून तिथे अडीच एकर जी बागायती जमीन भिजत होती ती पन्नास एकर बागायती झाली. तेथे आज किमान पन्नास एकर शेतीला बारमाही सिंचनाच्या सोयी आहेत. शेतीची कामं वाढली, लोकांना बारा महिने काम मिळाले, पाण्यामुळे कुटिरोद्योग आले, यामुळे जंगलावरचं अवलंबन कमी झालं. बाहेरगावी गेलेली माणसं परत आली. ज्या भाकड गायी जंगलात सोडून दिल्या होत्या. त्यांना परत आणलं.”


देशपांडे पुढे म्हणाले की, “ डोंगरी वस्ती दुर्गम भागातील जंगलात असलेल्या या गावात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन हाच शेतक-यांच्या समृध्दीचा मार्ग असू शकतो म्हणून पूर्वी जंगलात सोडून दिली जाणारी जनावरे पाळण्याचा आणि त्यांच्या दुधासोबत गोमुत्राचा वापर करून कुटीरोद्योग करण्याचा अभिनव प्रकल्प राबविण्यात आला आणि त्यातून शेणापासून नैसर्गिक धुप, मध, आणि नैसर्गिक शाम्पू तयार केले जातात, त्यातून ग्रामिण महिलांना रोजगार मिऴाला आहे. गोबर गॅसपासून स्वयंपाकासाठी इंधन आणि डोंगरी देशी गाईच्या गोमुत्रापासून अर्क आणि तत्सम टाकाऊतून टिकाऊ या प्रकारच्या उद्योगांची रचना करण्यात आली.” ते पुढे म्हणाले की, “ या गावाच्या शेती सोबतच पर्यावरण, म्हणजेच सेंद्रीय शेती, शिक्षण आरोग्य, रोजगार अशा सर्वच प्रश्नात लक्ष घालून आज गावाला समृध्द करण्याचा प्रयत्न ब-याच अंशी यशस्वी करण्यात आला आहे.”  


देशपांडे यांच्या मते, आज गावच्या लोकांना आत्मविश्वास आला आहे, ते गाव सोडून न जाता येथेच राहून सुखाने जगता येईल असा व्यवसाय करत गुण्यागोविंदाने राहात आहेत. कित्येक वर्षात कोणतीही तक्रार कुणी पोलीस ठाण्यात घेवून गेले नाही हीच याची पावती म्हणावी लागेल. रामणवाडीचा आदर्श आता आजुबाजूच्या गावांनी घेतला आहे, त्या ठिकाणी वेणू माधुरी ट्रस्टने लक्ष देण्यास सुरूवात केली आहे, गावात उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून खेडी समृध्द करता येतात हे या कार्यातून सप्रमाण सिध्द झाले आहे.

गोमुत्र डेअरी

वेणू माधुरी प्रकल्पामध्ये सध्या जोरदार चर्चेत आहे ते गोमुत्र संकलन मोहिम! याबाबत माहिती देताना राहुल देशपांडे म्हणाले की, “ काही शेतकरी दररोज गोमुत्र दुधाप्रमाणेच डेअरीत जमा करतात ‘वेणुमाधुरी ट्रस्टने गोमुत्राची डेअरी’ उपक्रम म्हणून हा उपक्रम राबविला जातो.”


ते म्हणाले की, “देशी गाई भरपूर होत्या, त्यावेळी गोमुत्र व शेणाचे महत्व कोणाला माहित नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमुत्राचे महत्व समजले. त्यामुळे देशी गाईंच्या गोमुत्राचे सकंलन सुरू झाले. रामणवाडी मध्ये कैक पटीने देशी गाईंच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या गोमुत्राचा भाव प्रति लिटर आठ रूपये आहे. या गोमुत्रापासून औषधी अर्क आणि साबण उद्योग केला जातो. गोमुत्रातील औषधी तत्व आता वैज्ञानिक पातळींवरही स्पष्ट झाल्याने गोमुत्राचा औषधी कारणासाठी वापर वाढला आहे, त्याचा प्रत्ययही वाढत्या मागणीतून येत आहे.”

 

वेणुमाधुरी ट्रस्ट टीम सदस्य
वेणुमाधुरी ट्रस्ट टीम सदस्य

वेणुमाधुरी ट्रस्टने गाईंच्या संवर्धनासाठी प्रयोग सुरू केले आहे. गाईंचे दूध हे उत्पन्नाचे साधन झालेच; शिवाय या गाईंपासून झालेल्या पाड्याची वाढ करून त्याच्या ताकदीवर त्यांनी गावात तेलघाणा सुरू केला. यंत्राच्या माध्यमातून तयार झालेल्या तेलातील घटकात व बैलाच्या घाण्यातील तेलाच्या घटकात फरक असल्याने या तेलालाही मागणी आहे.


तेलघाणा
तेलघाणा

 पूर्वी गाय कत्तलखान्यात जात होती ते बंद झाले असून मोठ्या संख्येने गोमुत्र  संकलन केले जाते. पहिल्या धारेचे गोमुत्र गावकरी धरतात. आठ रुपये लिटर दराने घालतात. देशी गाईचे वाळलेले शेण रानगोवरी या नावाने सहा रुपये किलो दराने विकत घेतले जाते. अनेक धार्मिक विधी, जंतुनाशक धुरासाठी दोन रुपयाला एक छोटा तुकडा, या दराने ही रानगोवरी विकली जाते.  गाईच्या वाळलेल्या शेणाच्या तुकड्यावर एक चमचा गाईचे तूप, तांदळाचे काही दाणे टाकून ते पेटवल्यास होणाऱ्या धुरातून अनेक हानिकारक जंतू नाहीसे होतात, असा दावा केला जातो हीच पद्धती ‘अग्निहोत्रात वापरली जाते. या पार्श्‍वभूमीवर गोमुत्राची डेअरी उपक्रम पहिल्या टप्प्यात यशस्वी झाला आहे. 


विविध उत्पादने 
विविध उत्पादने 

वेणूमाधुरी ट्रस्टचे राहुल देशपांडे व रामणवाडी येथील युवराज पाटील, मारुती पाटील, दत्ता पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. ज्यांची गाय आहे, त्यांनी गोमुत्र विकायचे राहू दे; पण वैयक्तिक जीवनात गोमुत्राचा वेगवेगळ्या अंगांनी वापर केला, तरी ते खूप मोलाचे ठरणार आहे, असा वेणुमाधुरीचा दावा आहे. त्यामुळेच सध्या ‘गोधन भांडार’ या गाईच्या विविध घटकांवर आधारित औषध दुकानातून एक लिटर अर्क केलेले गोमुत्र १५० रुपयांना, २०० मिली गोमूत्र ४० रुपयांना, तर पूजा विधीसाठी छोट्या बाटलीतून १०० मिली गोमूत्र १० रुपयांना विकले जाते. पिकावरील कीड घालवण्यासाठी गोमुत्राची मागणी वाढली आहे. देशी गाईच्या गोमुत्राचे औषधी उपयोग खूप मोठे आहेत. 


बायोगॅस प्रकल्प
बायोगॅस प्रकल्प

गाय, दुधाला कमी झाल्यावर मारून टाकण्यापेक्षा गोमुत्र आणि तिच्या शेणापासून मौल्यवान शेणखत, तसेच त्यातून मिथेन हा वायू तयार करण्याचे यंत्र सुद्धा तयार झाले आहे सर्वागीण ग्रामीण विकासाकरिता भारत सरकार तर्फे राबवण्यात येणारे उन्नत भारत अभियानचे अध्यक्ष डॉ विजय भटकर यांनी वेणु माधुरी ट्रस्ट तर्फे राबवण्यात येत असलेले रामणवाडी इथले उपक्रम पाहिले आणि त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले कि, “रामणवाडी प्रकल्प हा उन्नत भारत अभियानासाठी प्रेरणादायी आहे. संपूर्ण भारतातील खेड्यांमध्ये रमणवाडी प्रकल्प राबवण्यात यावा”. डॉ विजय भटकर यांच्या सारखे शास्त्रज्ञ या सेवाभावी संस्थेच्या कार्यामागे म्हणूनच मार्गदर्शकाच्या रूपाने उभे राहिले आहेत.


शेतकऱ्यांनी चांगल्या गोष्टी शिकून गोमुत्राचा अधिकाधिक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे आपण आपल्या पोराबाळांचा सांभाळ करतो तसेच गाईंचा सांभाळ केला जातो असे देशपांडे म्हणाले. आज गाईंसाठी सरकार खूप काही योजना घेवून येत आहे, मात्र वेणु माधुरी सारख्या सेवाभावी संस्थानी आपल्या सरकारच्या तुलनेत क्षीण असलेल्या शक्तीतून क्रांती करून दाखवली आहे गरज आहे अशा प्रयत्नांना बळ देण्याची, त्यांच्या मागे मदतीचा खंबीर पाठिंबा उभा करण्याची! प्रत्येकाने यासाठी आपले थोडे का होईना योगदान दयायला हवेच! त्यासाठी या प्रकल्पाचे समन्वयक राहूल देशपांडे यांना rahul@venumadhuri.org किंवा www.venumadhuri.org या संकेतस्थळावरून संपर्क होऊ शकतो.