भारतीय हस्तकलेचा खजिना जगापुढे खुला करणारी ‘तिजोरी’

0

‘तिजोरी’ भारतीय हस्तकलेला जागतिक पटलावर नेऊन ठेवणारं एक ऑनलाईन दुकान. भारतीय कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू उत्तर अमेरिकेत विकण्यासाठी मानसी गुप्ता यांनी २०१३ मध्ये याची स्थापना केली. हा उद्योग सुरू केला तेव्हापासून मानसी यांनी खूप आव्हानांचा सामना केलाय. हा उद्योग सुरू करण्याची कल्पना त्यांना कशी सुचली याबद्दल मानसी सांगतात की, वॉर्टनने उद्योजकांसाठी सुरू केलेल्या उपक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या, वॉर्टन- मोरक्को प्रवासादरम्यान त्यांनी हस्तकलेच्या काही वस्तू खरेदी केल्या. पण विमानानं भारतात सामान आणण्यातील काही अडचणींमुळे आवडलेल्या वस्तू त्यांना खरेदी करता आल्या नाहीत. थोडी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की उत्तर अमेरिकेत भारतीय हस्तकलेच्या वस्तुंना मोठी मागणी आहे आणि इथला या वस्तुंचा बाजार ३२ बिलियन अमेरिकन डॉलर आहे. उत्तर अमेरिकेतील हस्तकलेच्या वस्तुंची बाजारपेठ खूप प्रचंड असली तरी दलालांमुळे या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधी खूप महाग झालेल्या असतात. मानसी यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला.


“ भारतातील शिल्पकार, विणकर आणि कारागिरांनी हाताने तयार केलेल्या वस्तुंना योग्य किंमत देऊन त्या ग्राहकांपर्यंत विनासायास पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता,” असं मानसी सांगतात. “मर्यादित काळासाठी वस्तुंची विक्री या तत्वावर तिजोरीचं काम चालतं. यातून ग्राहकांना दररोज नवनवीन वस्तुंची खरेदी करता येते आणि उशीर केला तर वस्तु मिळणार नाही या विचाराने ग्राहक ती लवकर विकत घेऊन टाकतात,” अशी भूमिकाही मानसी स्पष्ट करतात. म्हणूनच भारतीय हस्तकलेचा खजिना जगासमोर खुला करणाऱ्या या उद्योगाचं नाव ‘तिजोरी’ असं ठेवल्याचंही त्या सांगतात.

फिलाडेल्फियामध्ये असताना हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. काही पुरवठादारांशीही बोलणी झाली होती, पण त्यांची संख्या खूप कमी होती. अखेर २०१२मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आणि २०१३ मध्ये व्यवसायाला सुरूवात झाली. त्यांनी वेबसाईट सुरू केली आणि त्यावर अडीचशे ऑर्डर्सही आल्या. पण पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश झाली. व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच टीमचे पाच सदस्य झाले होते. सुरूवातीला फक्त उत्तर अमेरिकतेच तिजोरीचा व्यवसाय होता पण आता त्यांनी भारतातही हा व्यवसाय सुरू केलाय.


मानसी या जन्मापासून जम्मू काश्मीरमध्येच राहिल्या होत्या. लहानपणापासून कुटुंबासोबत पर्यटनाला जाण्याच्या सवयीमुळे हस्तकलेच्या वस्तुंबदद्ल त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झालं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००४मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून बीसीए केलं आणि त्यानंतर ब्रिटनमधल्या वेल्स विद्यापीठातून पदवीव्युत्तर पदवी घेतली. भारतात परतल्यानंतर त्यांनी काही दिवस आयबीएममध्ये नोकरीही केली.

वस्तु मागवण्यापासून त्यांचं मार्केटिंग करण्यापर्यंत तसंच व्यवसायाचं दररोजचं कामकाज मानसी एकट्या बघतात. पण वाढता व्याप बघता त्यांना आणखी कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता भासतये. ‘तिजोरी’च्या निर्मितीमध्ये मानसी यांना भागीदार म्हणून अंकीत यांचं सहकार्य लाभलं.

अंकीत हे फक्त गुंतवणूकदार नाहीत तर आपले सल्लागारही आहेत असं मानसी सांगतात. तिजोरीची व्याप्ती इतर देशांपर्य़ंत वाढवण्याचा विचार त्या व्यक्त करतात. त्यासाठी जास्तीत जास्त कारागिरांना सोबत घेण्याचा त्याचा प्रयत्न आहेत.

नवीन उद्योग सुरू करु इच्छिणाऱ्या महिलांसाठी टीप्स :

१. संयम, मनशांती आणि समर्पणाने काम करा

२. आपल्या कामावर निष्ठा ठेवा आणि आवडणारंच काम करा

३. सगळ्यांशी मिळून मिसळून वागा.