१७ वर्षीय मुलाने केले ६ लाखांचे दान, कर्करोगग्रस्त मुलांच्या मदतीचा उचलला विडा

१७ वर्षीय मुलाने केले ६ लाखांचे दान,  कर्करोगग्रस्त मुलांच्या मदतीचा उचलला विडा

Tuesday October 20, 2015,

3 min Read

एखादे काम पूर्ण करण्यासाठी वय किंवा अनुभवापेक्षा अधिक गरज असते ती निष्ठेची. जर एखाद्या व्यक्तीमध्ये निष्ठा आणि काम करण्याचे झपाटलेपण असेल तर ती व्यक्ती मोठ्यातील मोठे कार्य अगदी सहजपणे पार करू शकते आणि इतरांसाठी आदर्श बनू शकते. अशाच प्रकारे १७ वर्षांचे शील सुनेजी हे आपले उत्कृष्ट कार्य पार पाडून असेच आदर्श बनले आहेत. शील यांनी इतक्या कमी वयात आपले प्रयत्न आणि निष्ठेच्या बळावर, ज्याचा अनेकांना फायदा झाला असे कार्य करून दाखवले. त्यांनी एक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आणि या माध्यमातून साडे सहा लाख रूपये गोळा केले. हे पैसे त्यांनी कर्करोगाशी झगडणा-या पीडितांना दान केले. शील यांनी बेंगळुरूच्या 'इंटरनॅशनल स्कूल' या शाळेमधून आपले शालेय शिक्षण घेतले. जेव्हा ते इयत्ता ११ वी मध्ये होते, त्यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची पारख करता यावी म्हणून शाळेने अनेक कार्यक्रम आयोजित केले होते.

image


अशाच एका कार्यक्रमाअंतर्गत ते आपल्या मित्रासोबत सरकारी शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी जात असत. ही मुले खूपच गरीब होती. या कामातून शील यांना मोठा आनंद मिळायचा. आपल्या पूर्ण प्रयत्नांनी त्यांनी त्या मुलांना शिकवणे सुरू केले. मुलांना मदत होईल असे एखादे कार्य आपण भविष्यात का करू नये असे विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर शील यांनी शोध घेतला असता त्यांना 'समीक्षा फाऊंडेशन'बाबत माहिती मिळाली. 'समीक्षा फाऊंडेशन' ही संस्था कर्करोगाने ग्रस्त झालेल्या मुलांना मदत करण्याच्या कामात सक्रीय होती. त्या मुलांवर उपचार होत असतानाच्या काळात ही संस्था त्यांना शिकवण्याचे काम करत होती. शील यांनी 'समीक्षा फाऊंडेशन'मध्ये जाऊन त्या मुलांना शिकवणे सुरू केले.

image


या मुलांना अधिक मदत व्हावी यासाठी या कामाची कक्षा वाढवली पाहिजे असा विचार मुलांना शिकवण्याच्या दरम्यान शील यांच्या मनात आला. असे कोणते काम करावे यावर विचार करण्यात ते सतत व्यस्त राहू लागले. त्यांनी लोकांशी बोलायला सुरू केले. ज्यावर ते चांगले काम करू शकतील अशा कल्पनेच्या शोधात ते होते. फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून त्या द्वारे पैसा उभा करावा आणि त्या पैशातून कर्करोग पीडित मुलांची मदत करावी असा विचार एकदिवस त्यांच्या डोक्यात आला.

आपल्या या विचारावर त्यांनी काम करायला सुरू केले. बंगळुरूच्या प्ले एरीनामध्ये एक फुटबॉल स्पर्धा आणि फॅमिली डे इव्हेंट आयोजित करावा, आणि त्यातून जे पैसे गोळा होतील ते सर्व मुलांच्या मदतीसाठी द्यावेत असे त्यांनी ठरवले. जर आपला हेतू चांगला असेल तर त्याचा परिणाम सुद्धा चांगलाच मिळतो असे म्हणतात. ही स्पर्धा एकदम सुपरहीट ठरली. या स्पर्धेच्या माध्यमातून शील यांनी सहा लाख रूपये गोळा केले. 

शील यांनी शाळेमध्ये बिझनेस मॅनेजमेंटबाबत जे ज्ञान मिळवले होते, त्या ज्ञानाचा त्यांनी या कामासाठी उपयोग केला. शील यांनी या कामासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा भरपूर वापर केला. त्यांनी भरपूर लिंक्ड इन रिक्वेस्ट पाठवून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणा-या लोकांशी संपर्क साधला. शील यांना त्यांच्या मित्रांचे देखील खूप चांगले सहकार्य लाभले. त्यांच्या मित्रांनी घरोघरी जाऊन दानाची मोहिम चालवली आणि त्याद्वारे दानाची रक्कम गोळा केली. लोकांकडून चेक घेऊन त्या बदल्यात त्यांना '८० जी प्रमाणपत्र' देण्यात आले. ही स्पर्धा योग्य प्रकारे पार पडावी यासाठी 'युईएफए'ची मान्यता असलेल्या पंचांची नियुक्ती करण्यात आली. खेळताना खेळाडूंच्या सुरक्षेसाठी 'सकरा वर्ल्ड रुग्णालया'सोबत सहकार्यासाठी टाय अप करण्यात आले. स्पर्धेसाठी सर्व संघाची निवड झाल्यानंतर शील कॉर्पोरेट कपन्यांकडे गेले आणि पैसे दान देण्याची विनंती त्यांना केली. या सर्व प्रयत्नांमुळे ते सहा लाख रूपयांची रक्कम गोळा करण्यात यशस्वी झाले. अनेक कंपन्यांनी ही स्पर्धा स्पॉन्सर सुद्धा केली.

या स्पर्धेने शील यांना बरेच काही शिकवले. आता त्यांना आपल्या परिश्रमाने आपले ध्येय गाठायचे आहे. आपल्या प्रयत्नांनी आपण पैसा कमवावा आणि आपले शिक्षण पूर्ण करावे आणि त्याचा इतरांनाही लाभ द्यावा असे त्यांना वाटते. असे केल्याने ते इतरांसमोर आदर्श उभा करु शकतील असे शील यांना वाटते. समाज कल्याणाचे काम आपण सतत करत राहण्याची शील यांची इच्छा आहे. सध्या ते आपल्या इंजिनिअरींगच्या अभ्यासासाठी कॅनडामध्ये आहेत. लवकरच आपण शील यांना एका तरूण उद्योजकाच्या रुपात पाहू हे निश्चित आहे. प्रयत्न आणि परिश्रम करणाऱ्याचा कधीही पराभव होत नाही हे शील यांनी आपल्या प्रयत्नांनी सिद्ध करून दाखवले आहे.