कचरा वेचक मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी धडपडत आहेत, बनारसचे प्राध्यापक राजीव श्रीवास्तव! 

0

ज्यावेळी आमची आणि तुमची मुले खांद्यावर बँग आणि हातात बाटली घेऊन शाळेत जातात. त्याचवेळी समाजात काही अशी मुले देखील असतात, जी कचरा वेचण्यासाठी बाहेर पडतात. जगण्यासाठी धडपड आणि गरिबीशी झगडण्यासाठी या मुलांनी कच-याला स्वतःचा आधार बनविले. कच-याच्या ढिगा-यात ते आयुष्याचे तत्वज्ञान शिकतात. जगण्याचा दृष्टीकोन त्यांना येथूनच मिळतो. वाराणसीत अशाच मुलांचे आयुष्य साकारत आहेत, राजीव श्रीवास्तव. शहराच्या लल्लापुरा भागात राहणारे राजीव श्रीवास्तव बीएचयू मध्ये इतिहासाचे सहायक प्राध्यापक आहेत आणि आता कचरा वेचणा-या मुलांचे चित्र बदलण्यासाठी ओळखले जातात. राजीव आता मुलांना शिक्षित करण्याचे काम करत आहेत. प्रशिक्षणामार्फत ते गरीब मुलांचे नशीब बदलवू इच्छितात. या मुलांना आपल्या पायावर उभे करू इच्छितात. जेणेकरून हे देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. हे खूप कठीण होते, मात्र राजीव यांनी हे कठीण कार्य करून दाखविले. वर्ष १९८८ मध्ये राजीव यांनी काही लोकांच्या मदतीने विशाल भारत नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्यांनी आपले पुढील लक्ष्य निश्चित केले. राजीव यांच्यासाठी हे काम इतके सोपे नव्हते. मात्र स्वतःशी निश्चय करून राजीव यांनी आपले लक्ष्य गाठलेच. राजीव रोज सकाळी कचरा वेचणा-या मुलांना लल्लापुरा येथील आपल्या संस्थेत शिकवितात. 

राजीव यांची कचरा वेचणा-या मुलांसोबत सामील होण्याची कहाणी खूपच मनोरंजक आहे. राजीव यांनी युवर स्टोरीला सांगितले की,

“वर्ष १९८८ मध्ये एप्रिलचा महिना होता. दुपारच्या वेळी गरम वातावरणात इंटरमिजेटची परीक्षा देऊन परतत होतो. परीक्षा केंद्राच्या काही अंतरावर मी आपल्या मित्रांसोबत मिठाईच्या एका दुकानात थांबलो. त्याच दरम्यान दुकाना जवळील एका हैंडपंपवर खराब झालेल्या कपड्यानी एक लहान मुलगा आला. त्याच्या खांद्यावर एक गोणी लटकली होती आणि त्यात काही सामान होते. इतक्या तळपत्या उन्हात तो मुलगा दुकानाजवळील हैंडपंपवर पाणी पिऊ लागला. मात्र तेव्हा तेथील दुकानदार तेथे आला आणि काठी घेऊन त्या मुलाला ओरडू लागला. बिचारा लहान मुलगा पाणी न पिताच तेथून निघून गेला. या घटनेबाबत जेव्हा मी दुकानदाराला विचारले, तेव्हा त्याचे उत्तर खूपच आश्चर्यचकित करणारे होते. दुकानदाराने सांगितले की, जर या कचरा वेचणा-या मुलाने येथे पाणी प्यायले असते, तर त्याच्या दुकानावर कुणीही मिठाई खाण्यासाठी आले नसते. या घटनेने मला खूप हळवे केले आणि तेव्हापासूनच मी गरीब मुलांसाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला.” 

या घटनेने राजीव यांचे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकले. त्याच रात्री राजीव यांच्या मनात फक्त हाच विचार येत होता की, या मुलांचा काय दोष आहे. या मुलांना गरीब होण्याची शिक्षा दिली जात आहे का? गरीब असल्यामुळे यांच्याकडून शिक्षणाचा अधिकार काढून घेतला आहे का? या देशात गरिबांना शिक्षित होण्याचा काही अधिकार नाही का? या घटनेमुळे राजीव यांनी कचरा वेचणा-या मुलांना साक्षर करण्याचे अभियान सुरु केले आणि दुस-या दिवसापासूनच आपल्या अभियानाला लक्ष्यापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नात लागले. त्यावेळी राजीव मुगलसराय येथे राहत होते. हे काम इतके सोपे नव्हते. राजीव सांगतात की, सुरुवातीला त्यांना खूप समस्या निर्माण झाल्या. कचरा वेचणारी मुले त्यांच्यासोबत सामील होण्यासाठी तयार नव्हते. या मुलांसाठी रोजगार मिळणे याला पहिले प्राधान्य होते. ही मुले शिक्षणाला महत्व देत नसत. मात्र, राजीव यांनी देखील माघार घेतली नाही. कधी ते शहराच्या गल्ल्यांमध्ये शोध घेत तर, कधी कच-याच्या ढिगाकडे फेऱ्या मारायचे. राजीव गरीब मुलांची भेट घेत असत. त्यांना साक्षरतेचे महत्व पटवून सांगत असत. दिवस गेले, आठवडे गेले, काही महिन्यानंतर राजीव यांच्या मेहनतीला यश आले. खूप मेहनतीनंतर गरीब मुलांचा एक गट त्यांच्यासोबत येण्यासाठी तयार झाला. राजीव यांना केवळ मुलांना शोधण्याचाच त्रास झाला नाही तर, अनेक लोकांचे बोलणे देखील त्यांना ऐकावे लागले.

राजीव सांगतात की, “जेव्हा मी कचरा वेचणा-या मुलांना साक्षरतेविषयी जागरूक करत होतो, तेव्हा जवळपासचे लोक माझ्यावर हसायचे. माझी थट्टा – मस्करी करायचे. मात्र मी या गोष्टींकडे कधीच लक्ष दिले नाही. लोकांच्या हसण्यामुळे माझ्यातील जिद्द अधिक वाढली. मी आपल्या लक्ष्याच्या दिशेने अधिक मजबूत विचारांसोबत पुढे चालत गेलो".

राजीव यांनी गरीब मुलांना साक्षर करण्याचे जे स्वप्न पहिले होते, ते त्यांना कोणत्याही किंमतीत साकार करायचे होते आणि असेच काहीतरी झाले. जशजशी वेळ जात होती, तसतसे त्यांचे स्वप्न देखील साकार होत होते. राजीव यांनी आपल्या संस्थेत कचरा वेचणा-या मुलांना शिकविणे सुरु केले. सुरुवातीस मुलांची संख्या मर्यादित होती, मात्र काही दिवसांनीच राजीव यांच्या या अभियानात मुले सामील होऊ लागली. प्रत्येक दिवशी सकाळी लल्लापुरा स्थित विशाल भारत संस्थेत कचरा वेचणा-या मुलांची शाळा भरत असे. येथे मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांना नैतिकतेचे देखील शिक्षण दिले जात असे. त्यांच्या मेहनतीचा हा परिणाम झाला की, आतापर्यंत ४६७ मुले साक्षर झाले आहेत. त्यापैकी काहींनी तर, राजीव यांच्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर पीएचडी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

राजीव प्रत्येकवेळी या मुलांसोबत धैर्याने उभे रहातात. आनंद असो, किंवा दु:ख राजीव यांची साथ या मुलांना जगण्याची नवी उमेद देते. जन्मापासूनच आई- वडिलांच्या प्रेमाला वंचित काही मुले तर, राजीव यांनाच आपले पिता मानतात. आणि वडिलांच्या जागी राजीव यांचेच नाव लिहितात. राजीव यांच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी बहुआयामी प्रतिभेचे देखील आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, जी कामे आपले नेता करत नाहीत, ती येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहेत. सामाजिक घटनांशी संबंधित मुद्द्यांसाठी मुलांनी एक कायदेशीर बाल संसद स्थापित केली आहे. या संसदेत प्रत्येक प्रकारचे मुद्दे प्रकाशझोतात आणले जातात. गरीब मुलांची कशाप्रकारे मदत केली जावी. त्यांच्या मुद्द्यांना कशाप्रकारे समाजाच्या समोर आणले जावे. बालश्रम कशाप्रकारे रोखले जावे. अनेक प्रकारच्या मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला जातो. या संसदेत जोरदार चर्चा होते. फरक केवळ इतकाच असतो की, या संसदेत नेत्यांप्रमाणे गोंधळ आणि ओरडा ओरडी नसते, तर शांतता असते. केवळ बाल संसदच नव्हे तर, या मुलांनी चिल्ड्रन बँक देखील स्थापित केली आहे. ज्यात मुले आपले पैसे जमा करतात. गरजू मुलांची या बँकेमार्फत मदत देखील केली जाते. 

राजीव यांना या कामासाठी अनेक सन्मान देखील मिळाले आहेत. शिक्षणाच्या शेत्रात विशेष योगदानासाठी संयुक्त राष्ट्र संघा व्यतिरिक्त टर्की, ट्युनिशिया आणि जाम्बिया या देशाकडून त्यांना विशेष सम्मान देखील मिळाला आहे. सरकारने नारा दिला आहे- सर्व शिका, सर्व पुढे चला, मात्र समाजात काही असे लोक आहेत, जे सरकारच्या स्वप्नांना साकार करत आहेत आणि राजीव त्यांच्या पैकीच एक आहे. राजीव यांनी उचलेल्या एका पावलाने अनेक मुलांच्या ओठांवर हसू झळकले आहे. राजीव यांच्या या समाज सेवेने  एक आगळे उदाहरण सर्वांसमोर मांडले आहे.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

कचरा वेचणाऱ्या सरूताईंनी कवितांच्या माधमातून मांडल्या कष्टकऱ्यांच्या व्यथा  

अनाथ मुलींचे माहेरघर ठरले ‘परिवर्तन कुटूंब’

ʻस्लम क्रिकेट लीगʼच्या माध्यमातून पूर्ण होते गरीब मुलांचे स्वप्न

लेखक : आशुतोष सिंह.

अनुवाद : किशोर आपटे.