वेगळ्या वाटेवरचा वेगळा बिजनेस....

0

करीयर किंवा मग घर यामध्ये जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा बहुतांश महिलांना घराला झुकतं माप द्यावं लागत. शुभांगी तिरोडकरांच्या बाबतीतही असंच घडलं.१९८२ ला लग्न झाल्यावर त्यांना एयर होस्टेसची नोकरी सोडावी लागली. पण त्या घरी बसून राहिल्या नाहीत तर त्यांनी स्वत:च्या मेहनतीवर एक वेगळा मार्ग निवडला. आपली नवीन ओळख बनवली. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून बकुळ बिल्डींग सोल्यूशन्स कंपनीकडे पाहता येईल.


शुभांगी याचे पती दिलीप तिरोडकर यांनी एसीसी सिमेन्टची एजन्सी घेतली होती. हा काळ असा होता जेव्हा सिडकोनं नवी मुंबई शहर विकासित करायला घेतलं होतं. त्यामुळं सिमेंटला मोठी मागणी होती. तिरोडकरांनी घरीच ऑफिस थाटलं होतं. सकाळपासून फोन सुरु व्हायचे ते दिवसभर खणखणतच राहायचे. दिवसभर ऑर्डर्स आणि बिल्स तयार करण्यात जायचा. हळूहळू दिलीप नवी मुंबईच्या बाहेरची कामं पाहू लागले. त्याना सतत बाहेर जाव लागायचं. यामुळं बकुळ सिमेन्ट एजन्सीची सर्व जबाबदारी शुभांगी यांच्यावर आली. त्यावेळी साधे फोन ही कुणाकडे नव्हते जर फोन बिघडला तर नवी मुंबईहून चेम्बुरला जाऊन फोन करावा लागत असे. रेल्वे वॅगन्समधून येणारा माल सोडवण्यासाठीही चेंबुरला जायला लागायचं. आणि एखाद दिवस उशीर झाला की दंड भरावा लागत असे. अशी सर्व तारेवरची करसत. यातूनही मार्ग काढून त्या उभ्या राहिल्या. कोकण रेल्वे आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला लागलेला बराचसा सिमेंटचा माल शुभांगी यांच्या एजन्सीकडून पुरवला गेलाय. मागील काही वर्षांत त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये रेडी मिक्स सिमेंट, बल्क सिमेंट आणि इतर इमारतीच्या साहित्यांची भर टाकली असून ते रेडीमिक्स कॉंक्रिटही पुरवतायत.

सिमेन्ट एजन्सी चालवणारी महिला असू शकते यावर कुणाला विश्वासच बसत नव्हता. सुरवातीच्या काळात जेव्हा शुभांगी जेव्हा ऑर्डर घ्यायला लागल्या तेव्हा समोरची व्यक्तीला एजन्सीच्या मालकाशी बोलायचं असायचं. मग मीच या एजन्सीची मालकीण आहे हे अगोदर समजावून सांगायला लागायचं. आता या दिवसांची आठवण झाली की त्यांना हसू येतं.


आता शुभांगी यांची मुलं मोठी झालीयत. त्यांनी आपआपले स्वतंत्र व्यवसाय सुरु केलेत. पण तरीही शुभांगी यांनी आपला व्यवसाय सोडलेला नाही. उद्योगाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक संधी स्वीकारल्या. महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री एन्ड एग्रीकल्चरच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या त्या सदस्या आहेत. एक एअरहोस्टेस ते आई, सिमेंट एजन्सीची मालक, विविध स्वयंसेवी संस्थांची सदस्य असा शुभांगी तिरोडकर यांचा प्रवास रोमहर्षक आहे आणि थक्क करणाराही. मेहनतीची आणि शिकायची तयारी ठेवली तर आपल्याला जे येत नाही, ज्यातलं काही माहीत नाही त्यातही आपण यशस्वी होऊ शकतो, हेच त्या आपल्या उदाहरणातून सांगतात.