केळी प्रक्रिया उद्योगाच्या अखंड धडपडीतून लाखो शेतक-यांच्या प्रश्नाला उत्तर मिळवून देणा-या शोभाताई वाणी

केळी प्रक्रिया उद्योगाच्या अखंड धडपडीतून लाखो शेतक-यांच्या प्रश्नाला उत्तर मिळवून देणा-या शोभाताई वाणी

Friday July 15, 2016,

6 min Read

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी होत आहे, त्यामुळे शेतीच्या उद्योगात वाईट स्थिती निर्माण झाली आहे. केवळ शेतीच्या उत्पादनातून शेतक-यांच्या कच्च्या शेतमालाला भाव मिळणार नाही त्यामुळे शेती आधारित पुरक प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत यावर सा-या तज्ञांचे एकमत आहे. प्रत्येक विभागात अशी हंगामी किंवा भौगोलिकतेवर आधारीत फळपिके आहेत त्यांना ‘शेल्फ लाईफ’ नसल्याने त्यांचे उत्पादन केल्यावर बाजारात भाव नसेल तर शेतकरी संकटात सापडतो. आंबा फणस किंवा केळी ही पिके घेतली तर बाजारात भाव नाही मिळाला तरी या पिकांना उत्पादना नंतरच्या प्रक्रिया उद्योगाला जोडले तर त्यातून नवा रोजगार उभा राहतोच शिवाय शेतमालाला हमीने चांगला भाव मिळतो आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे ‘शेल्फ लाईफ’ असल्याने त्यांनाही बाजारात चांगला भाव मिळवता येतो. केळी पिकासाठी हा प्रयोग यशस्वी केला आहे जळगाव जिल्ह्यातल्या एका शेतकरी महिलेने! शोभा वाणी यांनी केळीपासून चिवडा, चिप्स शेव बिस्किटे लाडू आणि चक्क गुलाबजाम तयार केले आहेत त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. केळीला चांगला भाव मिळत नसल्याने प्रक्रियेव्दारे मुल्यवर्धन हा त्यावरचा चांगला पर्याय असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

image


केळीच्या शेतीसाठी जळगाव जिल्हा प्रसिध्द आहे, याच जिल्ह्यात यावल तालुक्यात साकळी गावात उमेश आणि शोभा वाणी यांनी केळीप्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. त्यातून त्यांनी अनेकांना प्रेरणा तर दिली आहेच पण शेतक-यांच्या कृषीमालाला प्रक्रिया केल्यावर चांगला भाव मिळतो हे सिध्द करून फार मोठ्या प्रश्नाला यशस्वी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. घरच्या केळीशेतीला फारसा भाव नाही हे पाहून आधी चिप्स निर्मिती करण्याचे त्यांनी ठरविले. मग १९९९च्य सुमारास शोभाताईंनी प्रथम चिप्स तयार करून ते प्रदर्शनात ठेवले पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र नाऊमेद न होता त्यांनी ते चिप्स आजूबाजूच्या लोकांना मोफत वाटले. त्यांचे चिप्स मग लोकांना आवडले, पण त्यासाठी त्यांनी अक्षरश: सर्वांच्या घरांचे उंबरठे झिजवले. मुलीच्या शाळेतील डब्यात चिप्स देऊन त्यांनी आधी शालेय विद्यार्थीनींच्या रुपात ग्राहक मिळवले. मग शाळेच्या प्रदर्शनातच चिप्स विक्री करून केवळ दोन तासात तीनशे रुपये मिळवले, “ही सुरुवात होती” शोभाताई सांगतात.

image


यातून नक्कीच काही मार्ग निघेल अशी आशा दिसल्याने त्यांनी पती उमेश यांच्याशी चर्चा केली आणि साकळी येथे निर्मल महिला उद्योगाची स्थापना केली. केवळ चिप्सविक्री करून भागणार नव्हते कारण बाजारात काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी असाव्या लागतात त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात हे त्यांना ऐव्हाना लक्षात येऊ लागले होते त्यामुळे त्यांनी केळीच्या अन्य नव्या पदार्थांच्या प्रक्रियेला चालना दिली. मग साकारले केळी चिवडा, बिस्कीटे, शेव, लाडू, गुलाबजाम हे जिन्नस! मात्र या पदार्थांना देखील कसे तयार करायचे याचे शास्त्रीय ज्ञान त्यांच्याकडे नव्हते त्यामुळे त्यावर घरीच वेगवेगळे प्रयोग करत त्यांनी ग्राहकांच्या माध्यामातून त्यात सुधारणा करण्यास सुरुवात केली आणि एका ख-या अर्थाने स्वयंभू उद्यमीच्या वाटचालीला प्रारंभ झाला. काहीवेळा निराशा झाली मात्र त्यातून काय योग्य असायला हवे याचा शोध घेत त्यांनी नेहमी प्रयोगातून चुका सुधारल्या आणि यश मिळत गेले.

image


 पदार्थांना कसे लोकांच्या आवडीचे बनविता येईल हे पाहताना त्याचे व्यावसायिक गणितही त्या जोडत गेल्या. गुणवत्ता आणि दर यांचे संतुलन साधत त्यांनी या नव्या केळी प्रक्रिया उद्योगाला सावरले. त्यातून पसारा वाढला तेव्हा त्यांच्या स्वत:च्या तेरा एकर शेतीमधील केळी कमी पडू लागली कारण यासाठी बाराही महिने कच्ची केळी लागतात. त्यामुळे मग इतरांकडून केऴी घेण्यास सुरुवात केली. केळीचे दर हा नवा विषय नव्याने समोर आला. या पिकाच्या हवामान उत्पादन आणि मागणीच्या चक्रात केळी उत्पादक शेतकरी नेहमीच संकटात असतात. मात्र त्याचा परिणाम या प्रक्रिया उदयोगावर होऊ द्यायचा नसेल तर कच्च्यामालाच्या किमती स्थिर असायला हव्यात अन्यथा प्रक्रिया उद्योगसुध्दा अडचणीत येऊ शकतो हा धोका त्यांना माहिती होता. “आपल्या उत्पादनाची ग्राहकपेठ कायम कशी राहिल यावरही या गोष्टींचा परिणाम होत असतो” असे त्या म्हणाल्या.

image


निर्मल महिला गृह उद्योग या नावाने त्यांनी सुरू केलेल्या या उद्योगात वर्षभरात सुमारे 10 ते 15 टन चिप्स, 15 टन चिवडा, शेव, बिस्कीट, लाडू, पीठ यांची विक्री होते. “एक किलो चिप्स तयार करण्यासाठी पाच किलो कच्च्या केळीची गरज भासते”. अशी माहिती त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, “सुरवातीला पाच- दहा किलो पदार्थांची निर्मिती व्हायची. आज दैनंदिन पाच क्विंटल, तर वर्षभरात सरासरी १५० टन कच्च्या केळीवर प्रक्रिया होते आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, धुळे, जळगावात मोठ्या प्रमाणावर ग्राहक त्यांचा उपयोग करतात.” वार्षिक सुमारे २५ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल करणारा हा त्यांचा केळी प्रक्रिया उद्योग इतरांसाठी आता आदर्श ठरला आहे.

पदार्थांचे दर (किलोचे) चिप्स - दोनशे ते अडिचशे रु., शेव - २५० रु., चिवडा – ३०० रु., बिस्कीट - २५० रु., पावडर- २०० ग्रॅम- ४५ रु. असे आहेत. याशिवाय उपवासाची तसेच मुले, गर्भवती महिलांसाठी पोषक बिस्किटे तयार केली आहेत. मागणीनुसार गुलाबजामही तयार करून दिले जातात. त्या म्हणाल्या, “जळगावसह अन्य ठिकाणच्या प्रदर्शनांत सहभागी झाल्याने पदार्थांचे मार्केटिंग सोपे झाले. सह्याद्री वाहिनीसह आकाशवाणीवर मुलाखत प्रसारित झाल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक येथून चिप्स, शेव, चिवडा, लाडू आदी पदार्थांना मागणी वाढली. जळगावातील अखिल भारतीय केळी प्रदर्शनाने प्रक्रियायुक्त पदार्थांना आणखी कवाडे खुली केली.”

केवळ जळगाव परिसरातच त्या सप्ताहात सुमारे दोनशे किलो चिप्स आज विकतात. यशस्विनी सामाजिक अभियानातून त्यानी ग्रामीण महिलांचा बचत गट तयार केला आहे, बिग बाझार कडूनही त्यांना केळी बिस्कीटांच्या ६५०किलोची मागणी आहे.मात्र काही तांत्रिक कारणाने हा पुरवठा सध्या केला जात नाही असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या सा-या उद्योगात पती उमेश यांच्याही मोलाच्या सहकार्याने सारे काही शक्य झाले आहे हे त्या आवर्जून सांगतात.

image


त्यांच्या या उद्योजकतेचा सन्मान म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यात प्रक्रिया उद्योगाद्वारे केळीचे मूल्यवर्धन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे जिजामाता कृषिभूषण पुरस्कार पहिला महत्वाचा पुरस्कार आहे. याशिवाय त्यांनी २००८, २००९ मध्ये नवी दिल्लीतील "इंटरनॅशनल हॉर्टी एक्‍स्पो'मध्ये सहभाग नोंदवला होता.

image


image


सह्याद्री मराठी वाहिनीतर्फे त्यांची एका वर्षासाठी ग्रामीण कृषी सल्लागार समितीवर नेमणूक करण्यात आली होती. शोभाताई या सध्या अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेन्ट एजन्सी, जळगाव जिल्ह्याच्या समिती सदस्य आहेत. शोभाताई यांना

१.आॅल इंडिया बनना एक्सहिबिशन अॅवाॅर्ड- २०००

२. उद्यमी महिला नागरी सहकारी ग्रामीण पुरस्कार. 

३. महाराष्ट्र राज्य जिजामाता भूषण पुरस्कार-२००३. 

४. आंतरराष्ट्रीय कार्यशाळा केळी पुरस्कार, पुणे-२००४. 

५.खान्देश लोकमत सखी पुरस्कार २००५. 

६. परिवर्तन मित्रा पुरस्कार-२००६.

 ७.जमशेदजी टाटा राष्ट्रीय व्हर्च्युअल अकादमी अध्यक्ष फैलोशिप - 2006. 

८.राष्ट्रीय सब महाराष्ट्र पत्रकार संघ एकता फैलोशिप - 2007. 

९.भारत कृषि मंत्रालय द्वारा आयोजित आर टी एक्सपो २००८ आणि २००९ च्या उत्पादनांचे सर्वोत्तम सादरीकरण पुरस्कार. 

१० सह्याद्री कृषिरत्न पुरस्कार २००९ 

११. डिसेंबर २०१३, सीआयआय तामिळनाडू केळी महोत्सवाच्या द्वितीय सत्रात "सत्र अध्यक्ष" म्हणून निवड.

१२. एबीपी माझा कृषी सन्मान पुरस्कार - मार्च २०१६

१३.राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या वतीने तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय फेलोशिप, 

 अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना वेळोवेळी गौरविले जात आहे. त्या सध्या भारत कृषक समाजाच्या कौन्सिलर मेंबर म्हणून कार्यरत आहेत आणि या केळी प्रक्रिया उद्योगात ग्रामीण कृषीआधारीत जीवनाला आणखी कसे समृध्द करता येईल याचा शोध घेत प्रयोगशील प्रक्रिया उद्योग म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या पुढच्या वाटचालीस युअर स्टोरीच्या शुभेच्छा!

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एका झोपडीतून सुरु झालेला 'अंबिका मसाला' उद्योगाचा प्रवास आता परदेशात जाऊन पोहोचलाय

तीन अशिक्षित महिलांना उभारली करोडोंची कंपनी, १८ गावातील ८००० महिलांना बनविले स्वावलंबी

चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !


    Share on
    close