रखवालदारी करणार्‍या शूर भगिनी!

रखवालदारी करणार्‍या शूर भगिनी!

Tuesday November 10, 2015,

3 min Read

महिला रखवालदार आणि त्यातही रात्रपाळीत काम म्हटल्यावर जरा विचित्रच वाटेल...मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दोन बहिणींनी आपल्या जीवाची पर्वा न करता हा मार्ग स्वीकारला. घरात कोणीही कमावता पुरुष नसताना आपल्या वृद्ध मातेच्या करड्या नजरेखाली या दोन बहिणी रात्रभर जागून रखवालदारीचे काम करत आहेत. हे ऐकून तुम्हा सर्वांना आश्‍चर्य वाटेल. ही कथा आहे आजच्या नवदुर्गा सुषमा शिरसाठ आणि महानंदा जगताप या दोघा बहिणींच्या रखवालदारीची....

image


बदलत्या जीवनशैलीने सर्वसामान्यांपासून धनाढ्यांपर्यंत प्रत्येकाचे जीवन धावपळीचे करून टाकले आहे. सकाळी घरातून कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुली व महिला या संध्याकाळी ‘सातच्या आत घरात’ पोहोचण्याच्या प्रयत्नात असतात. कधी कामातील उशीर, तर कधी गाड्यांचा गोंधळ यामुळे घर गाठण्यासाठी नऊ-दहा वाजलेले असतात. अगदी रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत रस्त्यांवर ‘धडाकधुडूक’ सुरूच असते. त्यामुळे मुंबई शहराप्रमाणे धावणारे ठाणे शहर रात्रभर जागे असते. मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यातही सूर्य अस्ताला गेल्यानंतर एक नवी दुनिया उगवते. दिवसाउजेडी दिसणार्‍या, अनुभवास येणार्‍या जगापेक्षा हे जग फार वेगळे आहे. ज्यावेळी दिवसभर प्रवाशांची ने-आण करणार्‍या रिक्षा रात्रीच्या वेळेस विसावा घेतात, त्यावेळी त्यांच्यावर पहारा करण्यासाठी ठाण्यातील सुषमा शिरसाठ व महानंदा जगताप या दोन शूर बहिणी जाग्या असतात. दुप्पट भाडे मिळते म्हणून अनेक रिक्षाचालक रात्री अकरा ते पहाटे तीनपर्यंत स्टँडवर असतात. रात्रजीवनाची ही लगबग अगदी उघडपणे दिसत नाही. त्यासाठी एक नव्हे तर अनेक रात्री भटकून काढाव्या लागतात.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रोड क्रमांक २३ वर दिवसा नेहमीच वर्दळ असते. दिवसभर रस्त्यांवर वेगाने वाहणार्‍या वाहनांचा कर्णकर्कश आवाज कुठे तरी थांबत असतानाच संध्याकाळच्या सुमारास ज्याप्रमाणे पक्षी आपल्या घरट्याकडे वळतात त्याप्रमाणे दिवसभर रिक्षा चालवून दमलेले रिक्षाचालक रिक्षाला विसावा मिळावा यासाठी रस्त्याच्या कडेला आपली रिक्षा आणून उभी करतात. पण या रिक्षाचालकांना आपल्या रिक्षाचे नुकसान होईल किंवा चोरी होईल याची अजिबात भीती वाटत नाही. कारण दररोज रात्री केवळ १० रुपये घेऊन रिक्षा सांभाळण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच सावरकर नगर येथे राहणार्‍या सुषमा शिरसाठ (वय ४० वर्षे) आणि महानंदा जगताप (वय ३५ वर्षे) या दोघी बहिणी सज्ज असतात. एखाद्या रिक्षाचालकाने रस्त्यावर रिक्षा उभी केली की रिक्षाचे कुलूप तोडणे, रिक्षा चोरणे, रिक्षातील सीएनजी गॅस कमी झाल्याचे प्रकार घडतात. हे प्रकार घडू नये म्हणून १० रूपये घेऊन या दोघी बहिणी रिक्षांवर नजर ठेऊन असतात.

image


आपल्या संस्कृतीत मुलींनी रात्री-अपरात्री घराबाहेर फिरणं तितकंसं योग्य मानलं जातं नाही. मात्र रिक्षांवर जागता पहारा ठेवणार्‍या या दोन बहिणी आपल्या संरक्षणासाठी कायम सज्ज असतात. एका हातात मिरचीची पूड आणि एका हातात काठी घेत रात्री त्या पहारा देत असतात. सुषमा आणि महानंदा या कामावर असताना त्यांच्या वृद्ध मातेची या आपल्या दोन पिलांवर घारीसारखी नजर असते. सुषमा आणि महानंदा यांच्या भावाने सुरू केलेला व्यवसाय त्याच्या मृत्यूनंतर पुढे सुरू ठेवत असतानाच वृद्ध आई आणि स्वतःच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च देखील त्या या व्यवसायाद्वारेच सांभाळत आहेत. महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात याचेच हे ज्वलंत उदारहण.

महिलांनी मनात कोणतीही शंका न ठेवता निर्धाराने उभे रहावे व आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जावे. त्यामुळे कोणताही पुरुष आपल्यावर अन्याय करायची हिंमत करणार नाही, असे सुषमा शिरसाट सांगतात. तर आपल्या लेकींच्या कामात थोडा का होईना म्हणून हातभार लावण्यासाठी ७० वर्षीय राईबाई त्यांच्याबरोबर एका खुर्चीवर बसून शेकोटीचा आधार घेत रखवालदारीचे काम करीत असतात. रिक्षा सांभाळताना रिक्षाचे काही नुकसान झाले तरी ते भरून द्यावे लागते. त्यामुळे हे फार जोखमीचे आणि जबादारीचे काम असल्याचे सांगताना या मातेचा गळा सारखाच दाटून येत होता.

image


एकीकडे ठाण्यातील रिक्षा चालकांच्या बाबतीत महिला शंका व्यक्त करत असतानाच या तीन महिलांनी मात्र रिक्षा सांभाळण्याचे काम करून एक वेगळाच आदर्श घडवून दिला आहे. फक्त भविष्यात पालिका किंवा वाहतूक विभागाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही तर नक्कीच त्यांचा हा व्यवसाय भविष्यात देखील सुरू राहील. आजच्या काळात महिला सशक्तीकरणाच्या नुसत्या गप्पा न मारता सुषमा, महानंदा आणि राईबाई सारख्या महिलांना सरकारने आधार दिला तर अनेक महिला कंबरेला पदर खोचून पुढे येतील यात शंकाच नाही.

ज्यावेळी सुर्यास्तानंतर ठाण्यातील रिक्षाचालक विसावा घेतात, त्यावेळी त्यांच्या रिक्षांची काळजी घेणार्‍या या दोघा बहिणींना मानाचा सलाम!