पारंपारिक आणि अत्याधुनिकतेची सांगड तुमच्या पेहरावातही

पारंपारिक आणि अत्याधुनिकतेची सांगड तुमच्या पेहरावातही

Sunday November 22, 2015,

4 min Read

"तुम्ही काय परिधान केलं आहे यावरून जगाला तुमची ओळख पटते, विशेषत: आजच्या या युगात जिथं एकमेकांशी संपर्क अगदी त्वरित होतो. फॅशन ही त्वरित समजणारी भाषा आहे," मुसी प्राडा

अनेकांना वाटतं की फॅशन आणि पेहराव या निव्वळ उथळ बाबी आहेत. लोक जगासमोर स्वत:ला सादर करतात आणि त्याबद्दल ते आनंदी असतात. खरंतर फॅशन डिजाइन या शब्दातच विविध आणि व्यापक अशी श्रेणी करता येते. नेहमीच्या पेहरावापासून ते उच्चतम दर्जाच्या वस्त्र संस्कृतीपर्यंत. ही कुणा एकाची कल्पना असते आणि त्यातून ती कलाकृती निर्माण झालेली असते. या क्षेत्राला लाभलेल्या आकर्षणासोबतच अपार मेहनतसुद्धा त्यामागे आहे. त्याचबरोबर मोठ्या ठिकाणी आपलं कलेक्शन सादर करण्यापूर्वीच भरावी लागणारी रक्कम हा ही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पदवी मिळवल्यानंतर रिंकू सोबती यांनी लंडन इथल्या एका डिजायनरबरोबर काम केलं. इथंच त्यांना समजलं की हे काम त्यांना आवडतंय आणि येतंय सुद्धा! त्यामुळेच कोणतंही व्यावसायिक प्रशिक्षण न घेताही त्या गेली २० वर्षे या व्यवसायात आहेत.

image


व्यवसाय उभारणी :

अगदी छोट्याश्या युनिटसोबत त्याचं काम सुरु झालं आणि आजमितीस त्यांच्यासोबत तब्बल २०० जण काम करताहेत.

" दक्षिण दिल्लीत माझं स्टोर आहे. गेल्या २० वर्षांपासून आम्ही कधीच इथून दुसरीकडे जाण्याचा विचारही केला नाही किंवा दुसरी शाखा उघडण्याचाही विचार केला नाही . आमचे ग्राहक जे आहेत ते इथेच येतात आणि त्यांना इथं येउन खरेदी करणं अधिक सोयीस्कर वाटतं."

त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली तेंव्हा या क्षेत्रात आजच्या इतकी स्पर्धा नव्हती . पारंपरिक की आधुनिक या वादात न पडता त्यांनी नेहमीच दोन्ही गोष्टींची सरमिसळ करत फॅशन जिवंत ठेवली.

" लोकांना नवनव्या स्टाइल्स आवडतात. मी सर्वात पहिल्यांदा कामं केलं त्या डिजायनरचा प्रभाव आताही आहे. हल्ली लोक त्यांच्या पैशाची योग्य किंमत मिळते का ते बघतात. त्याचबरोबर हे कपडे अधिक काळ घालता येतील का यावरही त्यांचा भर असतो . अन्य डिजायनरबरोबर स्पर्धा वगैरे मला मान्य नाही. कारण प्रत्येक डिजायनरची स्वत:ची वेगळी ओळख आणि काम करण्याची वेगळी पद्धत असते. खरंतर आता स्पर्धा ही ग्राहकांसोबत आहे. "

आपल्याकडचा हातमागावरील कामाचा नवं कलेक्शन त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच प्रदर्शित केलं. आजचा जमाना हा सेंद्रिय घटकांवर भर देणारा आहे , मग हातमाग का मागे राहील ? त्यामुळेच समाजाच ऋण फेडताना संस्कृतीशी नातं घट्ट ठेवूनच परतावा करावा लागेल या मताच्या त्या आहेत. "अनेकांना आमच्याकडच्या संग्रहात हातमागाचा वापर असू शकेल याचा विचारही पटत नाही , पण मला वाटतं , जी नवीन पिढी आहे ती अत्यंत हुशार आहे , कारण त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान तर आहेच , पण दुसरीकडे , त्यांना आंतरराष्ट्रीय कल असणारे कपडे ही या सरमिसळीतून मिळतात . "

image


ई-कॉमर्स आणि फॅशन उद्यम

रिंकू यांनी अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेऊन आपले कलेक्शन सादर केलेत. लंडन ,न्युयॉर्क ,पॅरिस, लॅक्मे फॅशन वीक इत्यादीं. ही यादी वाढतच जाणारी आहे. " तुम्ही काहीही घालू शकता , पण ते योग्य कापलेलं आणि योग्य शिवलेल असावं. तुमच्या बांध्याला शोभणारं असाव. " असं रिंकू म्हणतात. ई-कॉमर्समुळे तुम्ही जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत तुमचं कलेक्शन घेऊन जाऊ शकता आणि या माध्यमातूनच त्यांनी देशातल्या विविध भागांपर्यंत आपल्या कलेक्शनचं नाव पसरवलं आहे . "आम्ही आमच्या या छोट्याशा बुटिकमध्ये खरंतर खुश होतो. महागडे आणि सुंदर कपडे आम्ही इथून ग्राहकांना विकत असू आणि जे काही उत्पन्न येत होतं त्यात आम्ही समाधानी होतो. ई-कॉमर्सनं आमचं जग अक्षरश: बदलून टाकलं. तुम्हाला इथं इतका प्रचंड प्रतिसाद मिळतो की भांबावून जायला होतं. आमच्या किंमती समाधानकारक असायला हव्यात, शिवाय आमच्या स्वत:च समाधान करवून इथे चालणार नाही. ई -कॉमर्समुळे या सर्व बाबीमध्ये समतोल आला आहे. डिजायनर्सना मिळणारा प्रतिसाद हा चक्रावून टाकणारा आहे." असं त्या सांगतात.

भविष्यातल्या फॅशनचा कल हा लोकपरंपरा आणि समकालीन वस्त्र यांची सांगड घालणारा असेल, असं त्यांना वाटत. पुढील येणाऱ्या वर्षात , लोकपरंपरा आणि आंतरराष्ट्रीय कलाप्रकार या संगमातून नवीन ट्रेंड उदयास आलेला असेल. ही नवी पिढी, सेंद्रिय उत्पादन खरेदी करण्यावर आणि खाण्यावरही भर देते आहे. त्यामुळे ही जी सरमिसळ आहे, ती सर्वच जण आता स्वीकारू लागले आहेत . "माझा आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला होता . अनेक उतार- चढाव अनुभवले . हे असं काम आहे जे मला आवडतं आणि आवडीच्या क्षेत्रात असल्यानं मी काम करतेय असं मला कधीच जाणवलं नाही. मी रोज जेंव्हा कामावर जाते तेंव्हा मी कामाला जातेय असं मला कधीच वाटत नाही , किंबहुना, रोज रचनेच्या एका नव्या दुनियेत प्रवेश करतेय असाच मला वाटत राहतं."

लेखक – दिव्या चंद्रा

भाषांतर – प्रेरणा भराडे