फार रडलोय हसवण्यासाठी…

0

जगण्याच्या धावपळीत माणसाचं हसणं कमी कमी होत जातं, असं बालपणापासनंच आम्ही ऐकत आलोय. खरं तर हसणं म्हणजे एक दिव्यच. वेळ बदलते तशी परिस्थितीही बदलत जाते म्हणूनही हसणं हे दिव्यच. खळखळून हसण्याला तर बरेचदा महिनोन्‌महिने लोटलेले असतात. अलीकडच्या काळात आपल्या देशातही ‘स्टँड-अप कॉमेडी’ला चांगले दिवस आलेले आहेत. टीव्हीवरल्या ‘रिअॅलिटी शोज्‌’मुळे तर सोन्याहून पिवळे झालेय. ‘स्टँड-अप कॉमेडी’ आणि ‘मिमिक्री’ (नकला) हे सारखेच कलाप्रकार आहेत, असे बहुतांश लोक समजतात, पण तसे ते नाहीये. दोन्ही प्रकारांत फरक आहे. एक मात्र खरे, की आता ‘स्टँड-अप कॉमेडी’ला तिचे स्थान मिळू लागलेले आहे.

कधीकाळी स्टेजवर चढला रे चढला, की लोकांच्या हुटिंगचा, टोमण्यांचा सामना करण्याचे कितीतरी प्रसंग ओढवलेल्या एका व्यक्तीला स्टँड-अप कॉमेडीमुळे अक्षरश: नवे जीवन मिळालेय. प्रवीणकुमार ही ती वल्ली. अनेकदा तर त्यांच्या सादरीकरणात प्रेक्षकांकडून फुगेही फोडले जात. प्रवीणकुमार यांना बालपणापासूनच इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आवडे. तारुण्याच्या उंबरठ्यावर आले तसे स्टँड-अप-कॉमेडियन म्हणून आपण लोकांना हसवू शकतो, असे त्यांना आवर्जून वाटू लागले. पण ना कुणाचे प्रोत्साहन होते, ना कुणी मदत केली. या कलेत कुणी त्यांना पारंगत करण्याचा प्रयत्न करणे तर मग दूरच राहिले. शिकत असताना ते जेव्हा ‘बिट्‌स पिलानी’त पोहोचले, तेव्हा या कलेतील कौशल्याचे टोक गाठण्यासाठी म्हणून त्यांनी अक्षरश: जिवाचे रान केले. मित्रांमध्ये स्टँड-अप कॉमेडी करायला सुरवात केली. हळुहळू कॉलेजातील कार्यक्रमांतून भाग घ्यायला सुरवात केली. शेकडो विद्यार्थ्यांसमोर आपली कला सादर करायला मिळणे ही खरं तर कला आजमवण्याची नामी संधी होती. प्रेक्षक हसले म्हणजे या महाशयांचे पोट भरे! शिक्षण आटोपल्यावर सर्वसामान्य तरुणांप्रमाणेच प्रवीणकुमार यांचा नोकरी-भाकरीसाठीचा शोध सुरू झाला. नोकरीच्या शोधात ‘स्टँड-अप कॉमेडी’ जरा मागे पडली.


स्टँड-अप कॉमेडीसाठी खरे पाहाता रसिकश्रोतेही त्याच धाटणीचे हवेत. अन्यथा हास्यकल्लोळ उडतच नाहीत आणि सादरकर्त्यावर रडण्याची पाळी येते. असो. २००८ पर्यंत प्रवीणकुमार मित्रांसमोरच आपल्या कॉमेडीला फोडणी देत राहिले. प्रवीणकुमार यांचे लग्नही याच वर्षात झाले. हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी मग सगळीच सामुग्री त्यांना घरातच उपलब्ध होऊ लागली. प्रवीण आता आपल्या कलेबाबत आधीपेक्षाही जास्त गंभीर झालेले होते. याचदरम्यान स्टँड-अप कॉमेडियन पापा सीजे यांचा एक लेख वर्तमानपत्रातून वाचण्यात आला. आता प्रवीण यांनी व्यावसायिक पातळीवर कला सादर करण्याचा चंगच मनाशी बांधला. अशातच कॉलेजात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा आयोजिला गेला. कार्यक्रमात प्रवीण यांना दहा मिनिटांचा एक स्टँड-अप कॉमेडी शो सादर करण्याची संधी मिळाली. मोठ्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची ही नामी संधी होती. प्रवीण यांची तयारीही जोरदार होती. त्यांनी शो सुरू केला आणि प्रेक्षक हसायला लागले. प्रवीण यांचा उत्साह वाढला त्यांना वाटले आपण सादर केलेल्या विनोदाला दाद मिळतेय, पण प्रत्यक्षात प्रेक्षक त्यांनाच हसत होते. म्हणजे एका अर्थाने हा त्यांच्या कलेचा पाणउतारा होता. वेळ पुढे सरकत गेला तशी हुटिंग वाढतच गेली. प्रवीण यांना या प्रसंगाने धक्काच बसला. त्यांच्या मित्रांचाही अपेक्षाभंग झालेला होता. ज्यांच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असते, त्यांना त्या गोष्टीतील एखादे अपयश स्वस्थ बसू देत नाही, असे म्हणतात. प्रवीण यांच्याबाबतीत सुदैवाने असेच झाले. प्रवीणनी प्रयत्न सोडले नाहीत. आपल्या कार्यालयाच्या कार्यक्रमांतून त्यांनी कितीतरी शो केले. इथे थोडी दादपुकारही मिळाली. जुलै २००९ मध्ये प्रवीणकुमार यांनी पहिल्यांदा ‘ओपन माइक’मध्ये सहभाग नोंदवला. पण पुढल्याच दिवशी आयोजकाने त्यांना बोलावून घेतले आणि दोन गोष्टी सांगितल्या. अर्थात उत्साह संपवणाऱ्याच त्या होत्या. आयोजकाने सांगितले, की एकतर ‘स्टँड-अप’ कॉमेडी हे फार जबाबदारीने करावयाचे सादरीकरण आहे आणि प्रवीण यांच्या संवादफेकीच्या लकबीतून ते दक्षिण भारतीय असल्याचे लगेच कळते. सबब त्यांनी इथून पुढे ‘स्टँड-अप कॉमेडियन’ बनण्याचे स्वप्न पाहणे सोडून दिलेले बरे!

प्रवीणकुमार यांना क्षणभर पायाखालची जमीन सरकल्यासारखेच वाटले. एका क्षणासाठी ते निराशही झाले, शस्त्रे मात्र टाकली नाहीत. सप्टेंबर २००९ मध्ये ओपन माइक स्पर्धेसाठी वीर दास हे बेंगळुरूला आलेले होते. प्रवीणकुमार यांनी वीरदास आणि संदीप राव यांची भेट घेतली. दोघांकडूनही प्रवीणकुमार यांना प्रोत्साहन मिळाले. प्रवीणकुमार यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. हा शो प्रवीणकुमार यांच्या जीवनाला वळण देणारा ठरला.

ओपन माइक स्पर्धेतील यशाने प्रवीण यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. जग जिंकण्याचा आत्मविश्वास या विजयाने त्यांना मिळवून दिला. पण आता जबाबदारीही अर्थातच वाढलेली होती. नोव्हेंबर २००९ मध्ये प्रवीण यांना स्टँड-अप कॉमेडियन म्हणून पहिला कॉर्पोरेट शो यानंतर मिळाला होता. वीस मिनिटे त्यांच्या वाट्याला आलेली होती. सुरवातीची ५ मिनिटे सभागृहात शांतताच शांतता होती. नंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली. प्रवीण यांना वाटले, की त्यांची कॉमेडी लोकांना आवडते आहे. नंतर लक्षात आले की प्रवीणनी आवरते घ्यावे म्हणून या टाळ्या आहेत. प्रेक्षकांच्या टाळ्या सुरू असतानाही प्रवीणनी आपले सादरीकरण सुरूच ठेवले होते, पण आता प्रेक्षक फुगे फोडू लागले. प्रवीण यांची सहनशक्तीही आता संपलेली होती. रंगमंचावरून त्यांनी काढता पाय घेतला. प्रेक्षकांच्या अशा वागण्याने प्रवीणकुमार कोलमडून गेले होते. दिवस काढणेही त्यांना अवघड झालेले होते. डोळ्यांतून सारखे अश्रू वाहात राहिले. कुटुंबियांनी आणि मित्रांनी त्यांना सांभाळले. धीर दिला.

प्रवीणकुमार यांनीही स्वत:ला पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न सुरू केला. २०१० मध्ये संजय मनकताला आणि संदीप राव यांच्यासमवेत स्टँड-अप कॉमेडियनचे एक त्रिकुट त्यांनी तयार केले. शो सुरू केले. त्रिकुटात सल युसुफ यांचाही प्रवेश होऊन आता चौकडी तयार झाली. चौघांनी मिळून ‘स्टँड-अप कॉमेडी’त आपले स्वतंत्र स्थान असावे, हा प्रयत्न सुरू केला. प्रतिसादही मिळू लागला. पुन्हा प्रवीण यांच्यासाठी आणखी एक वाइट घटना यादरम्यान घडली. प्रवीणच्या एका सादरीकरणानंतर एका ब्रिटिश गृहस्थाने येऊन सांगितले, की प्रवीणच्या शोमधून त्यांची एकही गोष्ट त्यांना (ब्रिटिश गृहस्थाला) समजली नाही. पुन्हा प्रवीण यांच्या दक्षिण भारतीय असण्याचा विषय आला. विशेष म्हणजे हा ब्रिटिश गृहस्थ ‘शो’चा मालक होता. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले, की इथनं पुढे प्रवीण यांना तो एकही शो देणार नाही. प्रवीणवर आणखी एक आकाश कोसळलेले होते. आता काय करावे? याच दरम्यान प्रवीण यांची अश्विन यांच्याशी मुंबईत गाठ पडली. अश्विन म्हणाले, की तुम्ही तमिळ आहात तर स्टेजवर ते दिसायला हवे. प्रवीण यांच्या आयुष्याला हे तिसरे वळण होते. अश्विन यांच्या या वाक्याने प्रवीण यांच्यात जणू प्राण फुंकले. प्रवीण यांनी पुढल्या शोमध्ये अश्विनबरहुकूम सादरीकरण केले. आपण तमिळ असल्याचे प्रेक्षकांना सांगून टाकले. प्रेक्षकांचा विश्वास जिंकला. तमिळ बाजातून ‘कॉमेडी’चे असे काही जलवे दाखवले, की प्रवीणही खुश आणि प्रेक्षकही खुश.

प्रवीणकुमार यांनी आता आपल्या मित्रांसह बेंगळुरूत आता ‘ओपन माइक’ शो करायलाही सुरवात करून दिली. आता प्रवीण यांची गोष्टच बदलली. लोक त्यांच्या कॉमेडीतून आनंद लुटायला लागले. प्रवीण यांची गाडी आता सुसाट सुटलेली होती. गेल्या तीन वर्षांपासून दर बुधवारी ओपन माइक शोचे आयोजन आता केले जाते. कॉर्पोरेट शोही आता भरपूर व्हायला लागले. प्रवीणकुमार यांच्या कॉमेडीने आता बेंगळुरूची वेस ओलांडली आहे. देशभरातून त्यांना आमंत्रणे येऊ लागली आहेत.

२०१४ मध्ये प्रवीणकुमार यांनी दोन मोठे निर्णय घेतले. पहिला म्हणजे ‘द टिकल माइंडेड’ नावाचा एक तासाचा शो त्यांनी स्वत: करायला घेतला. आणि दुसरा म्हणजे त्यांनी नोकरीला राजीनामा दिला आणि आता फुलटाइम कॉमेडियन म्हणून कामाचा श्रीगणेशा केला. तासाभराचा पहिला शो त्यांनी ४ जानेवारी २०१४ मध्ये सादर केला होता. तो कमालीचा यशस्वी झाला. नोकरी सोडल्यानंतर आता वेळच वेळ होता. आता प्रवीण यांनी ‘थिमबेस्ड शो’ करायला घेतले. अर्थात ओपन माइक शोही सुरूच ठेवलेले होते. दर्जेदार कॉमेडियन बनायचे तर ओपन माइकमध्ये सहभाग अत्यावश्यक असतो, असे प्रवीणकुमार यांचे ठाम मत आहे.

सध्या बेंगळुरूत ओपन माइकचे आठवड्यातून तीन शो होतात. बेंगळुरूत स्टँड-अप कॉमेडीचे किती क्रेज आहे, हे यावरून लक्षात येते. अबालवृद्धांची गर्दी या शोंना होत असते.

वेगवेगळी कामे एकाचवेळी करण्यापेक्षा एकच काम केले तर त्याला तुम्ही अधिक न्याय देऊ शकता, असे प्रवीणकुमार यांना वाटते.

ते म्हणतात, ‘‘हृदयाची साद ऐका. मग डोक्याशी तिचा ताळमेळ बसवून या कल्पनेला खरे रूप द्या. जगात अशक्य असे काहीही नाही. आपल्या पद्धतीने जगायचे तर त्यासाठी मेहनत करावीच लागेल. योग्य दिशेने केलेले प्रामाणिक प्रयत्नच तुम्हाला पुढे नेतात. किंबहुना तेच तुमच्या यशासाठी रस्ता तयार करत असतात’’