महाराष्ट्र पूर्णत: डिजिटल सक्षम करून शिक्षण-आरोग्य सेवा प्रभावी करणार :सॅन फ्रॅन्सिस्कोतील ओरॅकल आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्र पूर्णत: डिजिटल सक्षम करून

शिक्षण-आरोग्य सेवा प्रभावी करणार :सॅन फ्रॅन्सिस्कोतील ओरॅकल आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Friday September 23, 2016,

3 min Read

 संपूर्ण महाराष्ट्र डिजिटल सक्षम करण्याचा आमचा निर्धार असून राज्यातील सर्व गावे डिसेंबर 2018 पर्यंत डिजिटली कनेक्ट केली जाणार आहेत. या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवेत लक्षणीय सुधारणा घडविण्यात येणार आहेत. त्यासोबतच सर्वसामान्य माणसाला मोबाईल फोनच्या माध्यमातून गतिमान आणि पारदर्शक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथे झालेल्या ओरॅकल ओपन वर्ल्ड-2016 या आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक उपक्रमांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि ओरॅकल कंपनी दरम्यान महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला.

image


ओरॅकलच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या कंपनीतर्फे आयोजित ओरॅकल ओपन वर्ल्ड-2016 या माहिती तंत्रज्ञानविषयक प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख निमंत्रित आहेत. या परिषदेत ते म्हणाले, भविष्यात मोठ्या संख्येने असलेली महत्त्वाकांक्षी तरुणाई भारताचे मोठे शक्तीस्थळ राहणार आहे. या लोकसंख्येचे मनुष्यबळात रुपांतर करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी सध्या योग्य वेळ येऊन ठेपली आहे. सर्वार्थाने निरपेक्ष असलेले प्रगत तंत्रज्ञान हे त्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे साधन आहे. त्यादृष्टीने उपस्थित होऊ शकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी येथे उपस्थित आहे. 2020 पर्यंत सर्व शासकीय प्रक्रिया ऑटो पायलट मोडवर टाकून सर्वार्थाने लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचा लाभार्थी राज्यातला सर्वसामान्य माणूस असेल. यादृष्टीने राज्यात सर्वव्यापी डिजिटल स्थित्यंतर घडवून आणण्यात येत असून राजकीय नेते म्हणून आम्ही मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी तंत्रज्ञांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सॅफ्रा कात्झ यांनी भारतात आणि महाराष्ट्रात विविध आघाड्यांवर होत असलेल्या परिवर्तनाबाबत माहिती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे होत असलेल्या सकारात्मक बदलांबाबत प्रशंसोद्गार काढले.

image


राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी अभियानातील विविध कार्यक्रमांसह माहिती तंत्रज्ञानविषयक विविध उपक्रमांना सहकार्य करण्याची तयारी ओरॅकलतर्फे दर्शविण्यात आल्यानंतर त्यादृष्टीने आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या निमित्ताने ओरॅकल ही जगप्रसिद्ध कंपनी प्रथमच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार करीत आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंगमुळे प्रशासनाचा चेहरामोहरा पूर्णत: बदलणार असून सर्वसमावेशक विकासासह एक डिजिटल सक्षम राज्य म्हणून परिवर्तन घडविण्यासाठी हा करार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करताना ओरॅकलने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

या करारानुसार राज्यातील शहरांच्या भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या सेवाविषयक गरजांचा विचार करून त्या अनुरूप सुविधा, यंत्रणा उभी करण्यात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या कंपनीचे कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवड अशा तीन महापालिकांना सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे राज्यातील ही तीन शहरे स्मार्ट सिटी होण्याकडे महत्त्वाचे पाऊल टाकणार आहेत.

या करारानुसार शासकीय सेवांची कार्यक्षमता वाढण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनीतर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील 10 प्रमुख शहरांत राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानात नागरिकांना सेवा देणारी शासकीय यंत्रणाही अद्ययावत होणार आहे. यासाठी ओरॅकलतर्फे मुंबईत सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी करण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून सर्व स्मार्ट सिटीज मधील सेवाविषयक उपक्रमांचे समन्वय आणि संनियत्रण केले जाणार आहे.

तसेच विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांवरही या केंद्रात संशोधन करण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणेकडून नागरिकांना तसेच व्यापारी समुहांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपायांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी ओरॅकलमधील संबंधित विषय तज्ज्ञांची मदत होणार आहे. मोबाईल ॲपसह विविध डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध प्रकारच्या नागरी सेवा देणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय साधून या सेवांची गुणवत्ता वाढविणे आता शक्य होणार आहे. तसेच शहरांमधील नागरी प्रशासनात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अचूकता आणि कार्यक्षमता वाढण्यासही मदत होणार आहे. या कराराच्या अंमलबजावणीसाठी ओरॅकल संपूर्ण यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे एकत्रित परिणाम म्हणून राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा डिजिटल आयाम प्राप्त होणार आहे.

कृषी विकासासाठी ॲमेझॉनचे सहकार्य

अॅमेझॉन कंपनीचे मॉनिक मेश यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. पुण्यात स्टार्टअपच्या क्षेत्रात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी अॅमेझॉन वेब सर्विसेस कंपनी महाराष्ट्र शासनाबरोबर भागीदारी करण्यास इच्छूक आहे. लहान प्रमाणात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सप्लाय चेनसह इ-मार्केट तयार करण्यास सुद्धा महाराष्ट्र शासन व अॅमेझॉन हे सोबत काम करणार आहेत. यातून लहान शेतकऱ्यांना अधिक मोठी बाजारपेठ आणि व्यापक व्यापाराच्या संधी मिळतील. यातून त्यांच्या कृषीमालाला अधिक भाव मिळणे शक्य होणार आहे.

मा. मुख्यमंत्री महोदयांचे सॅन फ्रॅन्सिस्को येथील भाषण पहा खालील लिंकवर

https://www.youtube.com/watch?v=fKf_QBfZNtM 

सौजन्य : जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)