रॉनी स्क्रूवाला यांच्या सहाय्याने भारतातील विमा क्षेत्र सुलभ करण्याचे 'ईझी पॉलिसी'चे लक्ष्य

रॉनी स्क्रूवाला यांच्या सहाय्याने भारतातील विमा क्षेत्र सुलभ करण्याचे 'ईझी पॉलिसी'चे लक्ष्य

Tuesday April 19, 2016,

5 min Read

बॅंकांच्या व्यवहारापासून ते कर्ज वितरणापर्यंत, आज तंत्रज्ञानाने देशातील अर्थ जगताचे चित्रच बदलून टाकले आहे. उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांमधून योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी वापरकर्त्यांकडे आज पॉलिसी बजारसारखे पर्याय उपलब्ध असले, तरीही ऑनलाईन विमा आणि योग्य त्या विम्याची निवड करणे हे काही सोपे काम नाही. ईझी पॉलिसी (Easy Policy) च्या स्थापनेमागेही हेच कारण होते....विमा सुलभ करण्यासाठी.... लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्यानुसार त्यांच्यासाठी कोणती योजना चांगली आहे, याबाबतचा सल्ला हे माध्यम पारदर्शक पद्धतीने देते.

पारंपारिक विमा दलाली व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेले नीरज अगरवाल हे ऑनलाईन जग आणि विमा यांना एकत्र आणण्यासाठी उत्सुक होते. युकेमध्ये घालविलेल्या थोड्या काळातच, त्यांना दिसून आले की संकेतस्थाळाच्या माध्यमातून विमा वितरण करुन संकलक जबरदस्त काम करत होते..

भारतात परतल्यानंतर लवकरच नीरज यांची भेट झाली ती त्यांचे मित्र अलोक भटनागर आणि दिव्यांशु त्रिपाठी यांच्यांशी... अलोक यांनी थॉमस रॉयटर्स सोडले होते, तर दिव्यांशु हे पॉलिसी बजारच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. याच काळात, २०१० मध्ये, इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍन्ड डेवलपमेंट अथॉरिटी (आयआरडीए) ने नियमात बदल केले होते, ज्यामुळे एजन्सी मॉडेलमध्ये घट आणली होती. त्यावेळी त्यांच्या टीमला जाणविले की ऑनलाईन माध्यम हे यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकते आणि त्यांनी या कल्पनेवर काम सुरु केले.

याच दरम्यान अलोक यांनी त्यांच्या एलआयसी पॉलिसी परत करण्याचे ठरविले आणि पंधरा वर्षे विम्याचे हफ्ते भरुनही मिळणारा परतावा हा केलेल्या गुंतवणूकीच्या जवळपास नकारात्मकच असल्याचे पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. त्यातूनच बहुतेक ग्राहकांमध्ये या परिस्थितीबाबत असलेल्या माहितीच्या अभावाची या त्रिकुटाला प्रकर्षाने जाणीव झाली.

image


छोटी सुरुवात

“ जेंव्हा आम्ही सुरुवात केली, तेंव्हा विम्याचे ऑनलाईन वितरण हे खूपच नवीन होते. लोकांना ऑनलाईन योजनांबाबत माहिती नव्हती, कारण विमा कंपन्यांनीच मोठ्या प्रमाणात अशा योजनांना सुरुवात केली नव्हती. तसेच याबाबात जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न करण्यात येत नव्हते. विम्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात विमा दलालांमार्फतच होत होती,” पंचेचाळीस वर्षीय अलोक सांगतात.

अजूनही ऑनलाईन विम्याबाबत लोकांमध्ये फारशी जागरुती नसल्यामुळे, त्यांनी संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांना येथील वैशिष्ट्ये आणि किंमतीचे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून टेली-सेल्सचा एक टप्पा तयार केला. मात्र याचाच दुसरा अर्थ असो होता की, विपणन खर्चाबरोबरच या खर्चातही मोठी वाढ होणार होती. सुरुवातीचे कर्मचारी हे स्पर्धेच्या माध्यमातून आणि या क्षेत्रातूनच मिळाले. पहिल्या सहा महिन्यात पन्नास लोक या वेगाने वाढ झालेल्या या संस्थेत आज २५० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

कामकाज

विम्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे जीवन विमा आणि दुसरा सर्वसाधारण विमा. जीवन विमा कमिशन्स ही फ्रंट एंड असतात तर सर्वसाधाराण विमा कमिशन्स ही एन्युईटी-बेस्ड असतात. टीमने मात्र निर्णय घेतला तो जीवन विमा विभागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा.. “ आम्ही लगेचच ‘स्पेंड व्हॉट यु अर्न’ मॉडेलचा स्विकार केला आणि व्यवसाय उभारणीसाठी हेवी कॅश-बर्न मॉडेलचा पर्याय निवडला नाही. यातून आम्हाला व्यवस्थितपणे वाढ होण्यास मदत झाली,” ते सांगतात.

भारतात विमा क्षेत्रात संरक्षित मार्जिन शक्य आहे आणि आयआरडीए सारख्या सक्रीय नियामकाचे आभारच मानायला हवेत, ज्यामुळे येथे दरांमध्ये घासाघासी होताना दिसत नाहीत. या क्षेत्रात फायदेशीर विस्तारसाठीच्या मॉडेलला वाव आहे आणि व्हिसी गुंतवणूकीची गरज आहे ती फक्त वाढीसाठी...

इझी पॉलिसी आता जीवन विमा आणि जीवन विम्या व्यतिरिक्तच्या विभागातील विविध उत्पादने देऊ करते, ज्यामध्ये वाहन विमा, आरोग्य विमा, लहान मुलांसाठी योजना, गुंतवणूक योजना आणि निवृत्ती वेतन योजनांचा समावेश आहे. एकदा का वापरकर्त्यांनी त्यांच्या गरजेनुसार विम्याच्या प्रकाराची निवड केली की त्यानंतर त्यांना त्यांना स्वतःविषयीचा तपशील भरावा लागतो, ज्यानुसार त्यांना विमा कंपन्यांकडून किंमतीबाबतची माहिती बघता येते. याठिकाणी वापरकर्त्यांना प्रत्येक योजनेतील वैशिष्ट्यांची माहिती तर समजतेच, पण त्याचबरोबर त्यांना विविध योजनांची तुलनाही करता येते.

“ वापरकर्त्यांना त्यांच्या गरजांनुसार सर्वोत्तम योजना निवडणे सोपे करण्यासाठी म्हणून आम्ही येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाशी संपर्क साधतो आणि योजनांची निवड करताना कोणती वैशिष्ट्ये विचारात घ्यावीत, यासाठी त्यांना मदत करतो,” अलोक सांगतात. एकदा का वापरकर्त्याने योजनेची निवड केली की त्यांना प्रस्ताव अर्जापर्यंत नेले जाते आणि त्यानंतर विमा कंपनीच्या संकेतस्थळावर ते पैसे भरतात. त्यानंतर त्यांची विमा योजना जारी होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर टीम त्यांना मदत करते.

चार वर्षांनंतर निधीची उभारणी..

इझी पॉलिसी टीमचा असा दावा आहे की, इतर पोर्टल्सप्रमाणे केवळ तुलना करणे एवढाच त्यांचा हेतू नसून, विमा खरेदीची संपूर्ण प्रक्रियाच सोपी करणे हे त्यांचे खरे लक्ष्य आहे. म्हणजे अगदी योग्य ती योजना निवडण्यापासून ते कागदपत्र मिळविणे ते अगदी विमापत्र जारी करण्यापर्यंत...

या टीमने युनिलेझर वेंचर्स, डाबरचे गौरव बर्मन आणि चैनई स्थित उद्योजक अनिल जैन यांच्याकडून प्री-सिरीज ए फंडींगच्या माध्यमातून निधीची उभारणी केली आहे, “ सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करणाऱ्या नीरज यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ‘संपूर्ण ग्रुपने’ आमच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका केली,” अलोक सांगतात.गेल्या चार वर्षांत त्यांची जवळपास सहाशे टक्क्यांनी वाढ झाल्याचा टीमचा दावा आहे. तसेच गेल्या वर्षअखेरपर्यंत कंपनीमध्ये कमीतकमी बाह्य गुंतवणूक करण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया सोपी करणे आणि वाहन विमासारख्या काही साध्या विमा उत्पादनाच्या खरेदीसाठी सहाय्याची गरज कमी करणे, हे त्यांचे लक्ष्य आहे.

“ मोबाईल आणि बी2बी चॅनेलचा विकास हा यामध्ये महत्वाची भूमिका करेल. त्याचबरोबर देशात बहुभाषिक, ग्रामीण आणि टीयर टू शहरांमध्ये आणि त्यापुढेही अधिक खोलपर्यंत जाण्याची आमची इच्छा आहे. जेणेकरुन विम्याचा प्रसार हा केवळ शहरांपुरताच मर्यादीत न रहाता, सर्वत्र होईल,” अलोक पुढे सांगतात.

अधिक तंत्रज्ञान सुधारणा आणि तंत्रज्ञान आधारीत स्टार्टअप्सना आपल्यात सामावून घेण्याच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातील आर्थिक चित्रात परिवर्तन होताना दिसत आहे. मग ते फिनोमिना सारखे कर्ज देणारे माध्यम असो किंवा व्याज दरात बदल करण्यास मदत करणारे स्विचमी सारखे माध्यम असो, आज विविध स्टार्टअप्स हे आर्थिक सेवांचा पुरवठा सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

इझी पॉलिसीसाठी, आत्ता लगेच आणि थेट स्पर्धक आहे तो म्हणजे पॉलिसी बजार... पॉलिसी बजार यापूर्वीच दूरवर पोहचले असून, त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्राहकही मिळविले आहेत. त्याचबरोबर गोल्ड लोन रिपेमेंटसारख्या सेवा आणि इन्शुरन्स पॉलिसी प्लॅटफॉर्मसह रिंगणात उतरलेल्या पेटीएममुळे तर इझी पॉलिसीसमोरील स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. महत्वाचे म्हणजे, एसबीआय जनरल इन्शुरन्स हे पेटीएमबरोबर लाईव्ह जाणारे पहिले असणार आहे. सध्या बॅंकबजार आणि झिबिका हे इतर काही खेळाडूंपैकी आहेत, जे विमा आणि ईएमआय कर्ज भरणा क्षेत्रात कार्यरत आहेत.

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन