एचआर इण्डस्ट्रीतील पार्श्वभूमी नसतानाही नऊ वर्ष लोकांची करिअर ‘अपस्ट्रीम’ करणारी निथ्या डेव्हिड

0

गतिमान, तंत्रज्ञानावर आधारित आजकालच्या जगात करिअरचा योग्य निर्णय घेणे आणि योग्य वेळी योग्य नोकरी मिळणे सोपे नाही. निथ्या डेव्हिडला सुरुवातीपासूनच हे चांगलेच माहिती होते. नऊ वर्षांपूर्वी ‘अपस्ट्रीम’ नावाने व्यवसाय सुरु करुन आज ती ह्युमन रिसोर्सच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती बनली आहे. तिच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान आठवणींना उजाळा देत तिने सांगितले की एच आरच्या कामाची पार्श्वभूमी नसल्यामुळे कॉर्पोरेट रिक्रूटींगच्या क्षेत्रात काम करताना ती अनेकदा अडखळली, मात्र आज ती तिचा हा प्रवास एन्जॉय करते आहे.


निथ्या डेव्हिड  
निथ्या डेव्हिड  

2000 साली ‘जे. वॉल्टर थॉम्प्सन’मध्ये (जेडब्ल्यूटी) निथ्याने क्लाएंट सर्विसींग एक्झिक्युटिव्ह म्हणून जाहिरात क्षेत्रामध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. दोन वर्ष तिने जाहिरात क्षेत्रातील कामाचा अनुभव घेतला. एक वेळ अशी होती जेव्हा ती ‘लाइफस्टाईल’चे अकाऊंट सांभाळत होती. ‘लाईफस्टाईल’ बंगळुरुमध्ये आपले रिटेल स्टोअर सुरु करणार होते. त्यासाठी ती बंगळुरुला गेली होती. काम पूर्ण करण्यासाठी कामाप्रती निथ्याचे समर्पण पाहून (ती पहाटे 3 वाजेपर्यंत दुकान व्यवस्थित लावण्यासाठी आणि सजविण्यासाठी इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या साथीने काम करत होती) क्लायंट हेडने तिला त्यांच्या कंपनीमध्ये नोकरी देऊ केली. त्यानंतर निथ्या ‘लँडमार्क ग्रुप’मध्ये (ज्यांनी लाईफस्टाईल ब्रॅण्ड विकत घेतला) मार्केटिंग को-ऑर्डिनेटर म्हणून काम करण्यासाठी दुबईला गेली. लहान मुलांच्या विभागावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच ती युएईमधील आठ प्रदेशांमध्ये कंपनीच्या प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट आणि ब्रॅण्ड डेव्हलपमेंट विभागाची इन्चार्ज होती. अडीच वर्ष ती दुबईत राहिली. त्यानंतर लग्न झाल्यानंतर ‘ओगल्वी ऍण्ड मेदर’ कंपनीत नोकरी स्विकारुन ती भारतात परतली.

कामाकरिता बाहेर गेली असताना तिला एका इव्हेंटमध्ये बॉलीवूडचे प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते शेखर कपूर यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. शेखर यांनी नुकतेच गौथम कॉमिक्स भारतामध्ये सुरु केले होते. नित्याच्या पतीने तिला विविध कॉमिक पात्रे आणि कॉमिक पुस्तके याबाबत खूप काही सांगितले होते.

तेवढ्या ज्ञानाच्या आधारावर, ती शेखर कपूर यांच्याकडे गेली आणि अनौपचारिक संभाषण साधायला सुरुवात केली. तिला त्यांच्याबाबत असलेली माहिती पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी निथ्याला गौथम कॉमिक्समध्ये मुलाखतीला बोलावले. निथ्या इन्टरव्ह्यूमध्ये पास झाली आणि तिने तिथे मार्केटिंग विभागात काम करायला सुरुवात केली. त्याचबरोबर तिच्यावर मीडिया सेल्स, पीआर आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटीजची जबाबदारीही सोपविण्यात आली. ती विविध प्रोजेक्ट्ससाठी कन्टेन्ट तयार करण्याच्या कामात आणि क्रॉस ब्रॅण्ड प्रमोशनमध्येही सहभागी झाली.

२००७ च्या शेवटी, निथ्या गौथम कॉमिक्सबरोबर कन्सल्टन्ट म्हणून काम करु लागली आणि त्यामुळे तिला इतर प्रोजेक्ट्स घेण्यासाठीही वेळ मिळू लागला. एकदा नवीन जॉबच्या शोधात असलेल्या तिच्या एक्स-बॉसशी तिची अचानक भेट झाली. ज्या एचआरना कर्मचाऱ्यांची गरज होती अशा लोकांशी त्यांची ओळख करुन देऊन तिने त्यांची मदत केली. तिचा एक्स-बॉस कामावर रुजू झाल्यानंतर एचआरने तिचे आभार मानले आणि विचारले, तुम्ही आमच्याकडे आणखी माणसे पाठवू शकाल का?

जरी ह्युमन रिसोर्स क्षेत्रामधील औपचारिक शिक्षण तिने घेतलेले नसले तरी तिला त्यातले कसब समजले असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला. तिच्या कुटुंबात तोपर्यंत कुणीही स्वतःचा व्यवसाय सुरु केला नव्हता. त्यामुळे स्वाभाविकपणे ते धास्तावलेले होते. यामध्ये मोठी रिस्क असू शकते असा विचार करुन तिच्या वडिलांनी तिला स्वतःचा व्यवसाय न करण्याचा सल्ला दिला.

धीर न खचता तिने आपल्या कुटुंबाची भिती घालवली आणि सांगितले की ती तीन महिने तिचे नशीब आजमावेल आणि जर नाही जमलं तर ती पुन्हा ९  ते ५  नोकरीचा पर्याय निवडेल. ज्या दिवशी तिने ‘अपस्ट्रीम’ सुरु करण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी तिची ड्रीम कंपनी असलेल्या मधुरा गार्मेन्ट्समधून तिला ऑफर लेटर आल्याने स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेणे आणि त्यावर ठाम रहाणे अधिकच कठीण झाले होते. मात्र आता नऊ वर्ष कंपनी चालवल्यानंतर निथ्या सांगते की तिला तिच्या निर्णयाबद्दल जराही पश्चात्ताप होत नाही.

आता तिच्या क्लायंट्सच्या यादीत तनिष्क, झिवामी, विप्रो कन्झ्युमर केअर, कार्बन मोबाईल्स, लिनोवो आणि लॅण्डमार्क ग्रुपचा समावेश आहे. त्याचबरोबर ती जेडब्ल्यूटी, ओगल्वी, लव, मुद्रा, मॅकॅन, एफसीबी उल्का यासारख्या जाहिरात एजन्सीजबरोबरही काम करत आहे.


निथ्याने यशाची चव चाखली असली तरी त्याचबरोबर तिने अनेक आव्हानांचा सामनाही केला आहे. तिने व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर दोन वर्षांनी बाजाराला मंदीचा तडाखा बसला आणि जवळपास सर्वच कंपन्यांना नोकरभरती थांबवून ठेवावी लागली. निथ्या सांगते की ती जॉब शोधणाऱ्या अशा लोकांच्याही संपर्कात आली आहे जे प्रोफेशनल्स आहेत, मात्र आपल्या कराराचे पालन करत नाहीत. ती स्पष्ट करते, “एचआर इण्डस्ट्रीमधील काम खूप कठीण आहे. काही लोक तुमची दिशाभूल करतात. त्यांचा इरादा निश्चित असूनही ते कोणत्याही नोटीसशिवाय नोकरी सोडतात. काही प्रकरणात तर अगदी ज्येष्ठ लोकही कामावर रुजूच होत नाहीत.”

निथ्याने एचआरमधील औपचारिक प्रशिक्षण घेतले नसूनही, या क्षेत्रात बराच काळ काम केल्यामुळे नोकरी देणाऱ्या कंपन्या कशाच्या शोधात आहेत हे तिला समजते. त्यामुळे नोकरीसाठीच्या संभाव्य उमेदवाराने ज्या कंपनीमध्ये अर्ज केला असेल त्या कंपनीबाबत जास्त चांगल्यारित्या जाणून घेण्यासाठी त्याला निथ्या मदत करते आणि त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे याबाबत आवश्यक प्रशिक्षण देते. तिच्या या प्रवासात तिने शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खरं बोलण्याचे महत्त्व. ती सांगते, “लोकांना खरं ऐकायचं नसतं. अगदी जेव्हा त्यांनाही माहिती असतं की त्यांनी त्यांचे करिअऱ खूप गोंधळाचे करुन ठेवले आहे, तेव्हाही ते त्यांच्या कम्फर्टसाठी माझ्याकडे बघतात. मी माझ्यापरीने सर्व प्रयत्न करते, पण प्रत्येकवेळी मुत्सद्देगिरीने वागणं कठीण असतं. कधीकधी तुम्हाला सत्य सांगावं लागतं.”

निथ्यासाठी आवड आणि विश्वास ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ती सांगते, “मी ज्या ब्रॅण्डसोबत काम करते त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. व्यवसायामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा आहे.” सध्या काही इन्टर्न्सना बरोबर घेऊन स्वतःच पूर्ण व्यवसाय सांभाळणाऱ्या निथ्याला तिच्या प्रत्येक क्लायंटला स्वतंत्ररित्या शक्य होईल तेवढा वेळ द्यायला आवडते. २०१६ मध्ये एक टीम तयार करुन आणखी मोठ्या क्लायंट्सपर्यंत पोहचण्याचे निथ्याचे लक्ष्य आहे. कामाव्यतिरिक्त, निथ्याला तिच्या बहिणीबरोबर ‘स्टाईलसिस्टर’ हा स्टाईल ब्लॉग चालवायला आणि काम व धमाल-मस्ती यामध्ये समतोल राखायला आवडते.

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

यशस्वी क्लाऊड तंत्रज्ञान कंपनी उभारताना... 

मंदीच्या काळात नोकरी गमावूनही, सौम्या गुप्ता बनली करोडपती! 

लेखिका – हर्षिता माल्ल्या
अनुवाद – अनुज्ञा निकम