निशाणी नसलेल्या उमेदवाराचा निवडणुक सुधारणा करण्याचा ध्यास

‘चेंज इंडिया फाउंडेशन’च्या सचीन धनकुडे यांच्या निशाणीवजा उमेदवारीची पुण्यात सर्वत्र चर्चा!

0

राजकारण म्हटले की, आपल्या समोर समाजसेवेच्या बुरख्या आडून लबाड्या करणा-या काही राजकीय नेते आणि पक्षांची नावे आणि निशाण्या समोर येतात. आपल्या निशाणीवर शिक्का मारा म्हणून निवडणुक प्रचाराच्या काळात हे नेते त्यांचे कार्यकर्ते आकाश पाताळ एकत्र करताना दिसतात. एवढे सारे करताना ते हमीसुध्दा देतात की, या चिन्हावर शिक्का मारला तरच त्या मतदारांचे कल्याण होईल! अनेकदा त्यासाठी मतदारांना अमिष देखील दाखवले जाते, मत देण्यासाठी ठराविकच चिन्हावर शिक्का मारावे म्हणून दारु, पैसे किंवा अलिकडच्या काळात रेल्वेच्या तिकीटबुकींगपासून तिर्थयात्रेपर्यंतची अमिषे दिली जातात. सांगायचा अर्थ हाच की, ही निशाणी त्या राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते आणि मुख्यत: उमेदवारांसाठी किती जीव की प्राण असतात याची तुम्ही कल्पना करु शकणार नाही.


निवडणूक चिन्हासाठी अनेक पक्ष आणि उमेदवारांमध्ये वाद झाल्याचेही अनेकदा आपण पाहतो, अमुकच चिन्ह मिळावे म्हणून उमेदवारांचा आणि राजकीय पक्षांचा हट्ट असतो, मात्र कोणतेही चिन्ह न घेता मतदारांपुढे जाणारा उमेदवार देखील असू शकतो हे सांगितले तर तुम्हाला काय वाटेल? काहीतरीच काय? असे तुम्ही म्हणाल ना? पण पुणे तेथे काय उणे उगाच नाही म्हणत, पुणे महापालिका निवडणुकीत असा एक उमेदवार आहे, ज्याला कोणतेही निवडणूक चिन्ह न घेता मतदारांसमोर जायचे आहे. त्याने त्यासाठी चिन्ह नकोच असा जगावेगळा हट्ट केला आहे आणि तो निवडणुक आयोगाला पुरवावा लागला आहे! आहे ना आश्चर्य?

पुण्यातील प्रभाग दहा (ड) मधून सचिन दत्तात्रय धनकुडे हे अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. त्यांचा विश्वास आहे की, माझा चेहरा आणि नाव हीच माझी ओळख असली पाहिजे, एखादे चिन्ह नव्हे.

निशाणी किंवा चिन्हाविना निवडणूक लढवणारे धनकुडे हे केवळ पुण्यातलेच नव्हे तर कदाचित राज्यातले एकमेव उमेदवार असावेत. ४६ वर्षांचे धनकुडे, डेअरी उत्पादने आणि इतर वस्तूंची विक्री करणारे दुकान चालवतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे अनुयायी असणाऱ्या धनकुडे यांनी ‘चेंज इंडिया फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली आहे.

यंदाची त्यांची निवडणुकीत उमेदवारी करण्याची दुसरी वेळ आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना अवघी १७६ मते मिळाली होती. तरीही या वेळी चिन्ह न घेता निवडणुकीला सामोरे जाण्याचा त्यांचा हट्ट त्यांनी पुरविला आहे.

या सा-या अट्टाहासामागचे कारण काय आहे याचा शोध घेतला तर धनुकडे यांचे वेगळे विचार तुम्हाला थक्क करुन टाकतील. ते म्हणतात, “ पराभव मला महत्त्वाचा वाटत नाही. परंतु माझ्या या प्रयत्नांमुळे चिन्हविरहित निवडणुकांचा काळ देशात येणार असेल तर मला त्याचा आनंद आहे.” त्यांच्या मते उमेदवार महत्त्वाचा, त्याचे चिन्ह नव्हे, ‘या भूमिकेची दखल घेत निवडणूक आयोगाने तसा नियम केला तर समाधान वाटेल.’ असे ते म्हणतात.

या मागचा दृष्टीकोन समजावून देताना ते म्हणतात की, “चिन्हच नसल्यामुळे प्रत्येक उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न करेल. यामुळे मतदारांनाही त्यांचा उमेदवार कोण, त्यांचे प्रतिनिधित्व कोण करू इच्छितो हे जाणून घेण्याची संधी मिळेल. दुर्दैवाने अजूनही लोक चिन्ह पाहून मतदान करतात. उमेदवार पाहून करत नाहीत. पक्षाच्या चिन्हाची निवड लोक करतात,’ त्याच्या या निरीक्षणात तथ्य देखील आहे. मग चिन्ह नसलेल्या उमेदवारांच्या निवडणुकीत खरा समाजसेवक उमेदवार निवडून देताना मतदारांना त्याला जाणून घ्यावेच लागेल आणि ख-या अर्थाने जागरूक मतदार म्हणून तो मतदान करेल हा मुद्दा तुम्हालाही पटला ना?