किरकोळ व्यापार क्षेत्रात दुकानांमध्ये काम करण्याचा अनुभव महत्वाचा - अमिषा प्रभू , सीईओ 'TRRAIN'

किरकोळ व्यापार क्षेत्रात दुकानांमध्ये काम करण्याचा अनुभव महत्वाचा  - अमिषा प्रभू , सीईओ 'TRRAIN'

Monday November 02, 2015,

7 min Read

अमिषा प्रभूने २० वर्षापूर्वी तिच्या किरकोळ व्यापार क्षेत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने काही प्रमुख संस्थासाठी कामं केली आहेत, जसे टेस्को हिंदुस्तान व्होलसेलिंग, आदित्य बिर्ला रिटेल, क्रॉसवर्ड बुकस्टोर्स, स्वॅच ग्रुप आणि शाॅपर स्टाॅप लिमिटेड इत्यादी. आमिषाने तिचं टेस्को मधील काम सोडलं, कारण तिच्या मनात ध्येय होतं किरकोळ व्यापार क्षेत्रातल्या लोकांसाठी काम करण्याचं आणि त्यांना सशक्त करण्याचं. त्यासाठी तिने ट्रस्ट फॉर रिटेलर्स अॅन्ड रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया (TRRAIN) ह्या संस्थेत काम करण्यास सुरुवात केली.


image


अमिषा आज तिच्या विविध-अंगी कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर अशा तरुण व्यावसायिकांसाठी प्रेरणास्त्रोत झाली आहे ज्यांना रिटेल क्षेत्रात कारकिर्द सुरु करायची आहे.

आज आपण तिच्या यशाचं रहस्य जाणून घेऊया.

नॅन्सी ड्रयूचे साहित्य वाचनाची आवड तिला दुकानांमध्ये काम करण्यापर्यंत घेऊन गेली

आमिषाचा जन्म गुजराती कुटुंबात झाला व ती मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली. मुंबई विद्यापीठातून तिने अर्थशास्त्राचे (Economics) शिक्षण घेतले व नंतर 'नरसी मोनजी' मधून मार्केटिंग चे शिक्षण पूर्ण केले. तिच्यावर पश्चिमी देशांतील इंग्रजी साहित्य, जसे नॅन्सी ड्रयूच्या कादंबऱ्याचा लहानपणापासून खूप गहिरा प्रभाव पडला होता. त्यामुळेच तिच्यामध्ये स्वतंत्र होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जबरदस्त उर्मी निर्माण झाली.

 "मला नेहमीच स्वावलंबी व्हायचं होतं कारण मी पश्चिमी देशांतील तरुण विद्यार्थी कसे विक्री विभागातील प्रतिनिधी बनतात किंवा हॉटेलमध्ये वेटरचं काम करून स्वतःचा खर्च आणि शिक्षणाचा खर्च निभावतात याबद्दल वाचलं होतं. म्हणूनच नॅन्सी ड्रयू प्रमाणेच इतर कादंबऱ्या वाचून माझ्या सुरुवातीच्या दिवसांत मला प्रेरणा मिळाली."

नरसी मोनजी मधील अंतिम परीक्षेच्या वेळेसच तिने एक जाहिरात वाचली. ती भारतातील आधुनिक किरकोळ व्यवसायाची सुरुवात होती. तिच्या आवडत्या सिनेमा थियेटरपैकी एक थियेटर पाडून त्या जागी नवीन शॉपिंग मॉल उभारण्यात येणार होता, जो नंतर रिटेल साखळीतील एक लोकप्रिय 'शाॅपर स्टाॅप' म्हणून नावारूपाला आला. 

"मी लगेचच तेथे नौकरीसाठी अर्ज दिला. स्वतंत्र व स्वावलंबी होण्याचं स्वप्न फारच विस्मयकारक होतं."

सुरुवातीच्या दिवसांच्या गोड आठवणींमध्ये रमून जात आमिषाने आम्हांला सांगितलं, " माझी मुलाखत श्री. बी एस.नागेश यांनी घेतली जे भारतातील रिटेल व्यवसायातील मूळ प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी कामावर रुजू होण्यास सांगितले. तिथे मी माझी कारकीर्द ११००/- रुपये महिना ह्या पगारावर सुरु केली."

अमिषाने झोकून देऊन काम केलं म्हणूनच ती यशाच्या पायऱ्या फार लवकर चढत गेली. तिने शाॅपर स्टाॅपमध्ये खूप वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केलं."मला सुरुवातीच्या दिवसांमधील बिबा ची आठवण होते. तेव्हा कोणालाही त्या ब्रँडविषयी काहीही माहिती नव्हती आणि आज बिबा वर्षाला १२०० कोटीची उलाढाल करते . मी बिबाच्या पहिल्या काही ग्राहकांमधील एक होते."

अडचणींवर मात करून यशाच्या पायऱ्या चढणे

अमिषासाठी शाॅपर स्टाॅपमधील विविध-अंगी अनुभवांनंतर मागे वळून बघण्याची कधी वेळ आली नाही. तिथून त्या भारतातील स्वॅच (ओमेगा ग्रुप ) मध्ये विक्री विभागातील प्रमुख झाल्या. "तिथून मी १ वर्षाची सुट्टी घेतली कारण माझ्या गरोदरपणात काही गूंतागुंत निर्माण झाली होती. पण जेव्हा मी परत काम करण्यास सुरुवात केली तेंव्हा मी क्रॉसवर्ड मध्ये खरेदी-विक्री विभागाची प्रमुख झाले. माझ्यासाठी एक वर्षाची मोठी सुट्टी घेणे अगदी योग्य होते कारण मी तेंव्हासुद्धा स्वतःला रिटेल व्यवसायातील घडामोडींबद्दलचे ज्ञान अवगत केले होते. " अमिषा सांगते,"स्त्रियांनी फक्त काही अडचणींमुळे माघार घेऊ नये. खरतरं नंतर परत नवीन सुरुवात करणे अगदी सोप्पं असतं."

क्रॉसवर्ड नंतर अमिषा आदित्य बिर्ला रिटेलमध्ये रुजू झाली, "मी काम केलेल्या चारही संस्थामध्ये तेव्हा कामास सुरुवात केली जेव्हा त्या नवीनच सुरु होत होत्या. अशाप्रकारे मी भारतातील नव्याने सुरु होणाऱ्या अनेक रिटेल ब्रँडच्या जडणघडणीत गुंतले होते. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की मला अशा सगळ्या संधी मिळाल्या. TRRAIN मध्ये कामाला सुरुवात करण्याआधी शेवटची नौकरी मी टेस्कोमध्ये केली. मी त्यांच्या खाद्यपदार्थांच्या संबंधित नसलेल्या खरेदी-विर्क्री विभागाची प्रमुख होते. "

जेव्हा तुम्ही अमिषाशी बोलत असता तेव्हा तिची रिटेल व्यवसायाविषयी असणारी भावनिक गुंतवणूक आणि त्या क्षेत्रा त्यांना असलेले सखोल ज्ञान स्पष्टपणे प्रकट होत असते.

TRRAIN साठी कामाची सुरुवात

अमिषा सांगते, "माझी एकदा माझे गुरु श्री. बी. एस. नागेश यांच्याशी 'ग्रँड हयात' हॉटेल मध्ये भेट झाली. त्यांनी मला सांगितलं की त्यांना अशा एका रिटेल कंपनीची स्थापना करायची आहे की जी भारतातील पहिलीच रिटेल कंपनी असेल. मला ती कल्पना खूपच आवडली. मी लगेच त्या संधीचा फायदा घेतला." 

TRRAIN चं मूळ ध्येय हेच आहे की रिटेल व्यवसायामध्ये मध्ये काम करणाऱ्या लोकांना सशक्त करणे. 

"मी आधी जे काम करत होते आणि आता जे काम करत आहे ह्यामध्ये खूपच फरक आहे. पूर्वी मी एका वेळेस फक्त एका रिटेलर बरोबर काम करायचे व आता मी अनेक रिटेलर बरोबर काम करते. मला आधी फक्त ठराविक कंपनीशी निगडीत उद्दिष्ट पूर्ण करावी लागत असे. आता मला अनेक रिटेल संस्थाचे उद्दिष्ट एकाच वेळेस पूर्ण करावे लागतात. मला समान विचारांच्या लोकांना एकत्र आणणे आणि सामुहिकरित्या काम करून नवीन वाटा शोधणे, हे सगळं फारच थरारक वाटतं."

काही यशस्वी पुढाकारांविषयी बोलताना अमिषा सांगते, "आम्ही हैद्राबाद येथील एका रिटेल स्टोरमध्ये विकलांगांसाठी प्रकल्प राबवला होता. आम्ही ५०० विकलांग लोकांना प्रशिक्षण दिलं व आज त्या सगळ्यांना नौकरी मिळाली आहे. अशा योजना जेव्हा यशस्वी होतात तेव्हा मनाला प्रचंड समाधान लाभते."

रिटेल व्यवसायातील बदल

९० च्या दशकातील सुरुवातीला भारतात रिटेलमध्ये फार थोडे स्थानिक पातळीवर परिचित नसलेले व्यवसाय होते. 

"मी त्या स्थित्यंतराचा एक भाग होते ज्यात एक अनोळखी नावं ते आजच्या संघटित रिटेल क्षेत्रापर्यंतचा प्रवास मी अनुभवला आहे, पूर्वी, खरेदी फक्त उत्सवांच्या निमित्ताने होत असे. आज त्या स्थितीपेक्षा आपण फारच पुढे गेलो आहोत. आज इंटरनेटच्या वापरामुळे ग्राहकांच्या इच्छा आणि जागरुकता खूप जास्त उंचावल्या आहे. त्यांना माहित आहे की त्यांना काय हवं आहे आणि त्यासाठी किंमत चुकवण्यासाठी ते तयारही असतात."

कारकिर्दीतील सकारात्मक यशस्वी अनुभव

'मी शाॅपर स्टाॅप लिमिटेड आणि टेस्कोसाठी बनवलेलं पहिलं खाजगी लेबल हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे यश होतं. ग्राहकाला जे हवं आहे तेच देण्यासाठी मी उत्सुक असायचे. मी स्वतःला ग्राहकोपयोगी सेवा देण्यामध्ये तज्ज्ञ मानते. माझं दुसरं सर्वात मोठं यश म्हणजे पुस्तकांचा व्यवसाय समजून घेणे. तो समजायला मुळीच सोपा नाही कारण जवळजवळ ३०,००० पुस्तकं आणि अनेक प्रकाशक सांभाळणं साधं काम नाही, त्यामुळेच क्रॉसवर्डसाठी पुस्तकांचा व्यवसाय सांभाळणे माझ्या साठी खूप मोठं यश होतं."

कारकिर्दीतील नकारात्मक अनुभव

"एक वेळ अशी आली होती की टेस्को मधील संपूर्ण व्यवस्थापकीय संघ इंग्लंडमध्ये होता व तेथील व्यवस्थापक भारतातील ग्राहकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नव्हते. काही वेळेस आपल्याला लढाऊपणा दाखवावाच लागतो; त्या वेळेस मी कठोर भूमिका घेतली आणि त्यांना ही गोष्ट मान्य करण्यास भाग पाडलं की मी माझ्या देशातील ग्राहकांना जास्त चांगली ओळखते व त्या बाबतीत माझाच निर्णय अंतिम असेल."

अमिषाचा तरुणींसाठी सल्ला आणि तिने जे योग्य केलं त्याबद्दल

"माझ्या आयुष्यात तीन 'P' नां खूप महत्व आहे, Passion (उत्कटता), People (लोक) आणि Purpose ( उद्दिष्ट).
जर तुम्हांला तुम्ही जे काम करताय ते योग्य वाटत नसेल तर ती संस्था तत्काळ सोडा. नाहीतर तुम्ही तुमची नकारात्मकता तुमच्या बरोबर काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांवर लादाल.
तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं लक्ष लोकांवर आणि तुमच्या संघावर केंद्रित करा. मला चांगलं आठवतय, माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, मी माझ्या वरिष्ठांकडे गेले आणि काम न करणाऱ्या सहकाऱ्यांची तक्रार केली. त्यावर माझे वरिष्ठ जे बोलले ते फारच विचार करण्यासारखे होते, ते म्हणाले, 'तुझ्या संघातील लोकांचं काम न करणं त्यांचा नाकर्तेपणा दर्शवत नसून, तुझ्या नेतृत्व क्षमतेतील कमतरता दाखवत आहे'. मी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली. आणि त्यानंतर ,माझ्यातल्या कमतरता बाजूला सारत एक चांगली टीम तयार केली. "

रिटेल क्षेत्रात कारकिर्द करण्याची इच्छा असणाऱ्यांना महत्वाचा सल्ला

अमिषा आजच्या तरुण व्यावसायिकांना एकच सल्ला देते तो म्हणजे त्यांनी दुकानांमधून कामाची सुरुवात करावी,

"तेथे सुरुवातीचे सहा महिने काम करा आणि तुम्हांला या क्षेत्रातील पायाभूत खाच-खळगे कळतील, आणि त्यानंतर ह्या क्षेत्रात कारकिर्द करण्यासाठी खूप संधी आहेत. २०२० पर्यंत रिटेल क्षेत्राचा दुप्पटीने विकास होणार आहे. आणि तेंव्हा वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील व्यवस्थापकांसाठी मोठ्या संधी निर्माण होतील.

कारकिर्द घडवण्यात मोठे योगदान

शाॅपर स्टाॅप लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री. बी. एस. नागेश यांच अमिषाची कारकिर्द घडवण्यात तिच्या सुरवातीच्या दिवसांपासून मोठं योगदान आहे. "त्यांच्याकडे लोकविलक्षण प्रतिभा आणि दुरदृष्टी आहे. त्यांच्या बरोबर काम करणे म्हणजे कोऱ्या कागदावर चित्र रंगवण्यासारखं आहे. माझ्या दुसऱ्या नौकरीच्या ठिकाणी कोणतीही चांगली वाईट परिस्थिती निर्माण झाल्यास मी नेहमीच स्वतःला असा प्रश्न विचारायचे की श्री. नागेश ह्या परिस्थितीत असते तर त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली असती. त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी खूपच मोलाचे ठरले. "

यशाचं सर्वात मोठं गुपित

नेहमीच परिपूर्णतेची आस धरणे आणि कधीही कामात तडजोड न करणे, ह्या दोन मुलभूत गोष्टींनी अमिषाला यशाच्या शिखरावर आज नेऊन ठेवलं आहे.

" उच्च ध्येय गाठण्यासाठी जो मार्ग मी निवडला आहे, त्याच मार्गाने मला सातत्याने सतर्क राहून काम केलं पाहिजे. माझ्या बऱ्याचश्या सहकाऱ्यानां माझ्या अशा वागण्याचा तिटकारा होता, पण तसेच त्यासाठी ते माझा आदरही करीत, कारण ज्या कुठल्या कामाला मी सुरुवात करते त्यात मी माझे १००% योगदान देते."

आधुनिक माहिती कायम आत्मसात करत चला

खूप वाचन करा. स्वतःला इंटरनेटद्वारा सतत ताज्या घडामोडींबाबत जाणून घ्या. तुम्ही काम करत असलेल्या व्यवसायातल्या तसेच त्या परिघाबाहेरील लोकांच्या नेहमी संपर्कात राहा, हाच तिचा मनपूर्वक सल्ला आहे. 

"मला ट्विटरवर सतत लोकांशी संवाद साधायला आवडतं. रोज नवीन काहीतरी शिकण्यासाठी स्वतःच्या अशा नवीन वाटा शोधत राहा."