युअरस्टोरीच्या भाषा मेळ्याला आज नवी दिल्लीत शानदार सुरवात...

0

युअरस्टोरीच्या पहिल्या वहिल्या भारतीय डिजिटल भाषा मेळयाला आज नवी दिल्ली येथे सुरवात झाली. कार्यक्रमाचे उद्‌घाटन युवर स्टोरीच्या संस्थापिका श्रद्धा शर्मा, व्यवस्थापकीय संचालक अरविंद यादव, रेवेरी लॅग्वेज टेकनॉलजिस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अरविंद पानी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाले.  युअर स्टोरी, भारत सरकार आणि केंद्रीय सांस्कृतिक खातं यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

“भारतीय इंटरनेट माध्यमात स्थानिक भाषांचा पाया रचण्याच्या कामाला आम्ही याद्वारे सुरूवात करत आहोत. यापूर्वीच इंग्रजी व्यतिरिक्त १२ भारतीय भाषांची कवाडं आम्ही उघडून अधिकाधिक लोकांशी या माध्यमाने जोडले गेलो आहोत. भारत आणि इंडियामधली दरी सांधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत” असे सांगत श्रद्धा शर्मा यांनी या कार्यक्रमाला सुरवात केली.

या मेळ्यात इंटरनेट कंपन्यांनी बहुभाषी होण्याची गरज आणि स्थानिक भाषेचा इंटरनेटच्या जगातला प्रवेश या विषयांवर आधारित वेगवेगळ्या परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

वेगळ्या वाटा धुंडाळणारे स्टार्टअप्स, गुगल, झियोमी, मायक्रोमॅक्स, बाबाजॉब्स, प्रथम बुक्स, रिवेरी लँगवेज टेक्नॉलॉजीज, रेडिओ मिरची यासारख्या बऱ्याचशा मातब्बर कंपन्या बहुभाषिक झाल्यावरचे, स्थानिक भाषेत रुजतानाचे आपले अनुभव आणि धोरणं सांगणार आहेत. तर आमचे भाषातज्ज्ञ, धोरणकर्ते, अभ्यासक आणि लेखक भाषेच्या डिजिटल माध्यमातल्या प्रवेशाचा एका चांगल्या संस्कारणाकरता कसा उपयोग करता येईल यावर मार्गदर्शन करणार आहेत.