शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी राज्यभरातील गडकिल्ल्यांची पवित्र माती आणि जल कुंभ

राज्यभरातून आलेल्या हजारों शिवप्रेमींच्या उपस्थितीत मिरवणूक

0

मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नद्यांचे जल असलेले कलश मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ संकलित करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आज सकाळी चेंबूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार विनायक मेटे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन व जलपूजन होणार आहे. या स्मारकासाठी राज्यभरातील 36 जिल्ह्यांतून आणलेल्या 72 कलशांमधील पाणी चेंबूर येथे एकत्र करण्यात आले. त्यानंतर हे जल चेंबूरपासून शीव, दादर, परळ, लालबाग, गिरगाव मार्गे गेट वे ऑफ इंडिया येथे आणण्यासाठी मिरवणूकीस सुरवात झाली.

आज सकाळी चेंबूर येथील मिरवणूकीदरम्यान अवघे वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यावर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जल्लोषाने परिसर निनादून गेला होता.

मंगलकलश मिरवणुकीत शिवप्रेमींचा अभुतपूर्व उत्साह

राज्यभरातील गडकिल्ल्यांची पवित्र माती आणि जलकुंभाच्या मिरवणुकीला चेंबूर येथून मोठ्या उत्साहात आज सकाळी सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेंबूर येथील अश्वारूढ पुतळ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार रावसाहेब दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक मार्गस्थ झाली.

चेंबूर येथून सुरुवात झालेली ही मिरवणूक शीव, दादर, परळ, लालबाग, गिरगाव, हुतात्मा चौक या मार्गे गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचली. या मिरवणुकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार रावसाहेब दानवे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे सहभागी झाले होते. डोळ्यांचे पारणे फेडणा-या या मिरवणुकीत अब्दागिरी आणि झेंडेधारी, लयबद्ध ढोलताशा पथकांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे, लाठीकाठी आणि दांडपट्टा या शिवकालीन मर्दानी खेळांचे दर्शनही या मिरवणुकीदरम्यान झाले. आबालवृद्धांसह या मिरवणुकीत फेटेधारी दुचाकीस्वार तरुण- तरुणी, राज्यातील विविध भागातून आलेले लोकप्रतिनिधी, हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले होते.

संपूर्ण मिरवणुकीच्या विविध मार्गांवर राज्यभरातील गडकिल्ल्यांची पवित्र माती आणि जलकुंभाला अभिवादन करण्यात आले. जिजाऊ माँसाहेबांचे माहेरघर असलेल्या सिंदखेडराजा येथून मंगलकलश घेऊन आलेला रथ या मिरवणुकीच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.