इंदौरमधल्या दाम्पत्यानं तयार केलं आहे जगातलं सर्वात किफायतशीर 'एयर कंडीशनर' भारतातल्या या ‘पॉवरकपल’ची अनोखी कहाणी

इंदौरमधल्या दाम्पत्यानं तयार केलं आहे  जगातलं  सर्वात किफायतशीर 'एयर कंडीशनर' भारतातल्या या ‘पॉवरकपल’ची अनोखी कहाणी

Friday April 22, 2016,

6 min Read

एअर कंडीशन म्हणजेच वातानुकुलीन यंत्रापेक्षाही १० पटीने स्वस्त आणि कुलरपेक्षा अधिक प्रभावी असं काही मिळालं तर? एसी जे ताशी तब्बल २४०० वॅट्स इतकी वीज वापरते, त्याहून खूप कमी म्हणजे निव्वळ ताशी २५० वॅट्स इतकीच वीज या यंत्राने वापरली तर ? म्हणजेच एसी साठी जर दर महिन्याला तुम्ही ५००० रुपये घालवता, त्याऐवजी आता फक्त ५०० रुपयात तुमचं घर थंड करू शकणारं यंत्र मिळालं तर? आणि हो ! हे यंत्र प्रदूषणात भर न घालता, पर्यावरणाला पुरक असेल तर ? म्हणजे खरंतर हे जगातलं एकमेव अस यंत्र असेल जे थंडावा तर देतच पण वातावरणात उष्णता उत्सर्जित करीत नाही.

या चमत्कारिक शीतलतादायी तंत्रज्ञानाचं नाव आहे 'वायू' ! इंदौरच्या प्रणव मोक्षमार यांनी हे अफलातून यंत्र तयार केलं आणि त्यांना पाठींबा मिळाला तो खुद्द मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यादव आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदिया यांच्याकडून! तब्बल पाच वर्ष चुकत, पराभूत होत, पेटंटच्या लढाईत कसरत करत आणि प्रकल्पासाठी हळूहळू निधी जमा करत प्रणव यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. अखेर ऑक्टोबर २०१४ मध्ये 'वायू' प्रकल्पाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

image


वायू - हायब्रीड चिलर्स - या पेटंट असणाऱ्या तंत्रज्ञानाला, मध्यप्रदेश सरकारच्या सीजीटीमएसइ या योजनेंतर्गत इंदौरच्या कॉर्पोरेशन बँकेच्या माध्यमातून तब्बल १ करोड रुपयांचा निधी देण्यात आला. इंदौर मधल्या सांवर रोड इथे या कंपनीचे २ उत्पादन विभाग आहेत. सुरुवातीला १०० उत्पादनांवर त्यांनी चाचणी परीक्षा घेतली आणि आता या कंपनीला पर्यावरण जपणुकीसाठी कटिबद्ध असणाऱ्या विविध कंपन्यांकडून अधिकाधिक मागणी येऊ लागली आहे. आत्तापर्यंत वायू सहा राज्यांमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरलं आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरयाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये वायूची यशस्वी घोडदौड सुरु आहे. कंपनीच्या विक्रेत्यांवर किरकोळ ग्राहकांपर्यंत वायू पोहोचवण्याची जबाबदारी आहे. 


"आमचं उत्पादन ही अत्यंत नवीन संकल्पना आहे, त्यामुळे आम्ही ठिकठिकाणी 'वायू अनुभव क्षेत्र' स्थापन करीत आहोत. ज्यामुळे ग्राहकांना आमच्या या उत्पादनांची सत्यता पडताळून पाहता येईल. त्याचबरोबर औद्योगिक आणि व्यापारी विक्रेत्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना उत्पादन पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या विक्री आणि सेवा वितरकांवर आहे ." प्रणव आपल्या व्यवसायाच्या आखणीविषयी सांगत होते.

image


खरंच अशी गोष्ट असू शकेल का ?

वायू या आपल्या उत्पादनाविषयी कुठेही सादरीकरण केल्यावर प्रणव आणि प्रियांका या उत्पादनाच्या प्रणेत्यांना, पहिली प्रतिक्रिया मिळायची ती म्हणजे, चक्क अविश्वास ! " एकदा आम्ही संशोधक विज्ञानाचे प्राध्यापक यांच्यासमोर हे सादरीकरण केलं आणि त्यातल्या अनेकांनी सांगितलं की आमचं उत्पादन हे थर्मोडायनामिक्स म्हणजेच उष्णता आणि यांत्रिक काम यांच्या परस्परसंबंधीचे शास्त्र यांच्या नियमाला धरून नाही ." प्रियांका त्यांना मिळणाऱ्या भल्या बुऱ्या प्रतिसादाविषयी सांगत होत्या.

मग वायुचं काम नेमकं कसं चालत ? " वायू सुरु केल्यानंतर, दाब नियंत्रक म्हणजेच काॅप्रेसर सुरु होतो आणि शीतपेटी म्हणजे रेफ्रिजरेटर कुलिंग कॉईल मध्ये वाहून जातं. ज्यामुळे पाणी थंड होतं. हे पाणी पंपाच्या सहाय्याने, मशिनच्या प्याडपर्यंत पोहोचतं. बाहेरील उष्ण हवा या थंड पाण्याच्या संपर्कात येते आणि उष्ण हवेत असणारे रेणू उष्णतामान मुक्त करून टाकतात. थर्मोस्ट्याट म्हणजे उष्णतापमानावर नियंत्रण ठेवणारे यंत्र, हे कम्प्रेसरवर सुद्धा नियंत्रण ठेवते आणि पाण्याच्या तापमानानुसार काॅम्प्रेसर बंद किंवा सुरु ठेवते, ज्यामुळे अतिरिक्त उष्णता वाढत नाही. कंडेंसर म्हणजेच विजेचा साठा करणारं यंत्र किंवा वाफेचं पाणी करणारं यंत्र, हे शीतपेटीस थंड राहण्यास मदत करते तसंच अतिरिक्त आर एच घटकास संतुलित ठेवून आर्द्रता पातळी योग्य राहण्यास मदत करते. सरतेशेवटी थंड हवा ही या भागात पसरते ती मशिनमधल्या फॅनच्या माध्यमातून " प्रणव या तंत्राविषयी भरभरून सांगत होते.

थोडक्यात सांगायचं झाल तर वायुच्या वापराने तुम्हाला एसी लावल्यानंतर जस कुडकुडायला होईल तसं होत नाही, पण तापमानाला योग्य पातळीवर आणून आर्द्रता संतुलित राखण्याचं काम वायू करतं ज्यामुळे वातावरण सुखद होतं.

वायू चिलर्स दिसतात अगदी कुलर किंवा एसीसारखेच ! पण ग्राहकांना वापरण्यास योग्य व्हावेत यासाठी "आम्ही हल्लीच 'वायू एमआयजी -२४' हे क्रांतिकारी उत्पादन बाजारात आणलं , ज्यामध्ये १००० चौरस फुट भागाला थंड ठेवू शकतं आणि ते सुद्धा फक्त ८०० वॅट इतकी वीज वापरून," प्रणव म्हणाले.

२०१६ -२०१७ या आर्थिक वर्षात त्यांच्या कंपनीनं दहा अन्य राज्यांमध्ये विस्तार करण्याचं ठरवलं आहे . " येत्या पाच वर्षात आम्ही संपूर्ण भारतभर पोहोचू आणि बाहेरील देशांमध्ये सुद्धा आमचं उत्पादन पोहोचवू . आम्हाला मेक्सिको, युएइ, आफ्रिकेसारख्या देशांमधून आता विचारणा होते आहे. हा विस्तार आम्ही लवकरच अंमलात आणणार आहोत आणि यासाठी लागणारा निधी हा भांडवलदारांकडून घेण्याचीकरण्याची आमची योजना आहे.

image


‘पॉवर कपल’

पत्नी प्रियांका यांनी लग्नानंतरच त्यांचा उर्वरित पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. तर प्रणव यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आणि एचविएसी म्हणजेच ( हिटिंग,वेंटींग आणि एअर कंडीशनिंग ) याचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला. कॅरियर, सॅमसंग, आणि एलजी सारख्या विविध कंपन्यामध्ये त्यांनी उत्पादन व्यवस्थापक म्हणून तब्बल १४ वर्ष काम केलं. पण तंत्रज्ञानाची आवड असल्याने त्यांनी २००८ साली स्वत:ची छोटी कंपनी सुरु केली, ज्यामध्ये एसी विक्री आणि दुरुस्ती केली जात असे. मध्यप्रदेशातील विविध सरकारी प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केलं. त्या दरम्यान प्रियांका यांनी एमबीए केलं, विपणन या विषयात आणि व्यवस्थापन या विषयात पीएचडी केली. संशोधन पेपर लिहितानाच इंदौर मधल्या विविध महाविद्यालयात त्यांनी व्याख्यान द्यायला सुरुवात केली

"सुरुवातीला प्रणव याचं कार्यालय घरातच होतं त्यामुळे २०१०च्या उन्हाळ्यात प्रणवच्या वडिलांनी त्यांना वीज बिलासंदर्भात सुनावलं ,एके दिवशी त्यांनी एसीचे विविध भाग गोळा केले आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर कुलरवर काहीतरी काम करू लागले. मी विचारलं तर मला सांगण्यात आलं की कुलर मध्ये काॅम्प्रेसर बसेल का याची चाचपणी आम्ही करत आहोत. मला खरंच त्यावेळी असं वाटलं की हा सुद्धा त्याच्या लहरीचा एक भाग असावा, कारण प्रणव यांना इल्क्ट्रोनिक्स वस्तू आणि मशिन्ससोबत प्रयोग करायला आवडायचं. त्यावेळी मला खरंच या गोष्टीचा गंधही नव्हता की, ते अशा काही वस्तूचं संशोधन करतील, की ज्याचं पुढे आम्हाला पेटंट मिळेल." प्रियांका त्यावेळच्या आठवणी सांगत होत्या.

image


उत्पादनाच्या विपणनाचं महत्त्व प्रणव यांनी विशद केलं." आम्हाला दोनदा खूप सारे पैसे एकत्र कमावण्याची संधी आली होती. एक म्हणजे आमचं उत्पादन गुंतवणूकदारांना विकून टाकायचं आणि दुसरी म्हणजे आमच पेटंट विकून टाकायचं. पण अशा पद्धतीने करोडपती व्हायचं हे आमचं ध्येय निश्चितच नव्हतं." प्रणव सांगत होते.


कधीकधी या दाम्पत्याला आपल्याच प्रवासाचं आश्चर्य वाटत राहतं. " पण मग आम्हाला स्वर्गीय धीरूभाई अंबानी याचं वाचन आठवत राहतं. 'व्यापक विचार करा, लवकर विचार करा आणि काळापुढचा विचार करा. कल्पनांवर कोणाचीही मालकी नसते," प्रियांका म्हणाल्या.

वायूनं हल्लीच एक नावाजलेला पुरस्कार मिळवला. मेगा लाँचप्याड (युवरस्टोरी मिडिया या सोहळ्याचे सह प्रायोजक होते) त्याचबरोबर ,त्यांच्या शिरपेचात हल्लीच एक नावाजलेला पुरस्कार सामील झाला, तो म्हणजे स्कॉच अवार्ड ऑफ मेरिट आणि स्कॉच बेस्ट एसएमइ ऑफ इंडिया अवार्ड ! मुंबईतल्या कॉन्स्टीट्युशन क्लब मध्ये हा सोहळा पार पडला. इतकंच नव्हे तर, त्यांचा समावेश मध्यप्रदेश सरकारद्वारा निवडण्यात आलेल्या पाच सर्वोत्कृष्ठ स्टार्टअपमध्ये झाला आहे. पंतप्रधानांच्या 'स्टार्टअप इंडिया स्टॅँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत ही निवड झाली आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

बारावी उत्तीर्ण व्यक्तीने केवळ दहा हजारात निर्मित केला एक टन एसी, विजेचा वापर १०पटीने केला कमी!

भर उन्हाळ्यातही वितळणार नाही आईसक्रीम, थंड राहणार पाणी

सर्वात स्वस्त वॉशिंग मशीन

लेखिका: मुक्ती मसीह

अनुवाद : प्रेरणा भराडे