मोदींच्या आदर्श गावाने केले कोर्ट खटल्याला बाय-बाय !

मोदींच्या आदर्श गावाने केले कोर्ट खटल्याला बाय-बाय !

Wednesday February 10, 2016,

4 min Read

उत्तर प्रदेशातले जयापूर हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श गाव बनवण्यासाठी दत्तक घेतलंय. या गावात आता बापू पंचायत लागते. आपआपसातल्या तक्रारी गावकरी कोर्टाच्या माध्यमातून नाही तर बापू पंचायतीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी गावातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मदतीने ग्राम प्रधान निर्णय देतात.

वाराणसी मतदारसंघातले जयापूर हे छोटेसं गाव. वाराणसीपासून अवघे २० किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव हल्ली बातम्यांमध्ये असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेले गाव म्हणून जयापूर सा-या देशाला माहिती झाले आहे. पंतप्रधानांनी दत्तक घेतल्यापासून जयापूरचे नशिब पालटले. स्वच्छ गल्ली, चांगल्या सुविधा, सुसज्ज शाळा, पोस्ट ऑफिस, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय अशा एका गावासाठी आवश्यक असलेल्या सा-या मूलभूत सोयी आता जयापूरमध्ये उपलब्ध आहेत. हे सर्व निश्चितच पंतप्रधान मोदींमुळे घडले आहे. गावात आलेल्या या सुखसोयींमुळे इथल्या लोकांच्या विचारांमध्येही सकारात्मक बदल होत आहे. समाजाकडे पाहण्याचा त्यांच्या दृष्टीकोन बदलू लागला आहे. आदर्श गाव बनवण्याच्या या मोहिमेत जयापूरचे नागरिक पंतप्रधान मोदींना समर्थ साथ देत आहेत.

image


गावात प्रेम आणि सलोख्याचे वातावरण कायम राहावे म्हणून गावाने एक अनोखा प्रयोग सुरु केला आहे. आपआपसामधल्या भांडणाचा बोभाटा जगात होऊ नये यासाठी हा प्रयोग आहे. यानुसार गावातले प्रत्येक लहान-मोठे मतभेद आता गावकरीच सोडवतात. या अनोख्या प्रयोगाचे नाव आहे बापू पंचायत. बापू पंचायतीच्या माध्यमातून गावातले प्रधान आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या मदतीने आपआपासातले वाद-विवाद सोडविले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींने दत्तक घेतलेले हे आदर्श गाव आता राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आदर्श ठेवून मार्गक्रमण करत आहे. असा संदेश देशभर जावा यासाठी जयापूरच्या नागरिकांनी हा प्रयोग सुरु केला आहे. गावातल्या लोकांच्या भांडणाचे निराकारण आता पंचायतीमध्येच होते. मोठ्या प्रश्नावर परस्पर संमतीने तोडगा निघाल्यानंतर त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब करण्यात येते.

image


गावचे सरपंच श्रीनारायण पटेल यांनी ‘यूअर स्टोरी’ला सांगितले,

“ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेले गाव म्हणून आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण देशात आमच्या गावाची चांगली ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पंचायतीच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्यात आली आहे. गावातले लहान-मोठे विवाद परस्पर सहमतीने कसे सुटतील यावर आमचा भर असतो. जे खटले पूर्वीपासून कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्यामध्येही काही तोडगा निघतो का यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो. गाव संपूर्णपणे तंटामूक्त करण्याचा आमचा संकल्प आहे.”

सामाजिक संस्थांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वरिष्ठ मंडळींनी गावाच्या मदतीसाठी आपला हात पुढे केला आहे. जयापूर हे गाव तंटामूक्त करण्यासाठी गावक-यांशी चर्चा सुरु आहे असे सेंट्रल बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनी सांगितले. यामध्ये वेगवेगळ्या कोर्टामधले प्रलंबित खटल्यांचे एकत्रिकरण सूरु आहे. गरज भासल्यास जिल्हा न्यायाधीशांशी चर्चा करुन जयापूरसाठी लोक न्यायालय भरवून परस्पर संमतीने या खटल्यांचा निकाल लावला जाईल.

image


बापू पंचायतीच्या पहिल्याच दिवशी दोन लोकांमधल्या गुरांच्या वादावर तोडगा काढण्यात आला. या पंचायतीमध्ये समाजातल्या सर्व वर्गातल्या महिला तसेच पुरुषांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. गावाच्या सरपंचांची पंचायतीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा निर्णय सर्वमान्य असेल. बापू पंचायतीच्या माध्यमातून गावातील जास्तीत जास्त वाद संपुष्टात येतील अशी या गावक-यांची खात्री आहे. जयापूरमधले बरेचसे वाद हे शेती, येण्या जाण्याचा रस्ता तसेच पैशांची देवणा-घेवाण याच्याशी संबंधित आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टामध्ये पुराव्यांची आवश्यकता असते. पण हे प्रकरण गावाशी संबंधित असल्याने कागदपत्रे आणि पुरावे लवकर सादर करणे शक्य होत नाही. त्यामुळे गावातल्या दोन गटामधल्या वैराला हिंसक वळण लागते. त्यामुळे बापू पंचायत या प्रयोगाचे गावक-यांनी स्वागत केले आहे.

जयापूरचे नागरिक विश्वनाथ यांनी सांगितले,

“ बापू पंचायत हा चांगला प्रयोग आहे. प्रत्येक घरांमध्ये भांड्याला भांडे लागतात. पण या भांड्यांचा आवाज बाहेर ऐकायला जाऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. परस्पर संमतीने जर हा प्रश्न सोडवला गेला तर कोर्ट कचेरीच्या दगदगीतून गावक-यांची सुटका होईल.”

image


जयापूरच्या गावक-यांच्या या उपक्रमाचं जिल्हा प्रशासनानेही कौतूक केलं आहे. गावांमध्ये पूर्वीही पंचायत भरत असे. अशा प्रकारे गावातली मंडळी सारे वाद परस्पर संमतीने सोडवू लागली तर प्रशासनाला बरीच मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी राजमणी यादव यांनी व्यक्त केले आहे. फक्त या पंचायतींनी कायद्याचं पालन करावं हीच एकमेव अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जयापूरमध्ये प्रत्येक रविवारी बापू पंचायत बोलवली जाते तसेच त्यावेळी गरज पडली तर कायदेशीर सल्ला देण्यासाठी वकील उपस्थित असतो असे जयापूरच्या मुख्य सरपंचांनी सांगितले.

देशाच्या सक्षमीकरणाची सुरुवात ही गावापासून होते असे महात्मा गांधी सांगत. गांधींजींचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जयापूरच्या नागरिकांनी सुरु केलेला हा प्रयोग नक्कीच कौतूकास्पद आहे. पंचायतीनेच गावातल्या समस्या सोडवल्या तर वरिष्ठ न्यायालयांवरील कामाचा भार हलका होईल. या कामामध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा आवश्यक आहे. पंचायतीच्या नावाखाली दिले जाणारे तालिबानी फर्मान आपल्यासाठी नवे नाहीत. अशा परिस्थितीत जयापूरच्या गावक-यांनी सुरु केलेला हा प्रयोग देशात नवा आशेचा दिवा जागवणारा आहे.

यासारख्या काही सामाजिक हित जपणाऱ्या कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

विदर्भातील एक शेतकरी, ज्याने लाखो शेतक-यांना दिलासा देऊन फोर्ब्स नियतकालिकात मिळवली जागा!

चाय पर शादी - एक अनोखा सामाजिक उपक्रम

दुष्काळी भागात हरितक्रांती घडवणारा महापुरुष : सिमोन उराव


आणखी काही प्रेरणादायी यशोगाथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

मुळ लेखक – आशुतोष सिंह

अनुवाद – डी. ओंकार