उद्योग जगतावर ठसा कर्नाटकातील उद्योगिनींचा

उद्योग जगतावर ठसा कर्नाटकातील उद्योगिनींचा

Monday February 01, 2016,

4 min Read

नानाविध पारंपारिक उद्योगधंद्यांचे एक प्रमुख केंद्र म्हणून कर्नाटक राज्याची ओळख आहे. रेशीम उत्पादन क्षेत्र ते चन्नपटना खेळणी, असे कितीतरी प्रकारचे उद्योग येथे भरभराटीला आले. एकूणच कुठल्याही राज्याला अभिमानास्पद वाटावा असाच कर्नाटकचा वैभवशाली इतिहास आहे आणि त्याचबरोबर एक मोठा सांस्कृतिक वारसाही राज्याला लाभला आहे. या राज्यातील हंपी, म्हैसुर,चित्रदुर्ग आणि धारवाड अशा केवळ काही मोजक्याच शहरांवर नजर टाकताच ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. सर्वात महत्वाचे म्हणजे या वारशाला साजेल अशीच कामगिरी आजही या राज्याकडून होताना दिसत आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञान अर्थातच आयटीच्या युगातही या राज्यातील बंगळुरु हे शहर हे प्रमुख केंद्र म्हणून नावारुपाला आलेले असून जगभरातील आयटी कंपन्यांनी याच ठिकाणची निवड केलेली दिसून येत आहे. गेल्या काही दशकांमध्ये तर हे राज्य विविध उद्योगांनी गजबजलेले असून आजच्या घडीला येथे अनेक स्टार्टअप्स सुरु झाले आहेत.

महिलांचे नेतृत्व लाभलेल्या अनेक मोठ्या व्यवसायांच्या उदयास हे वातावरण साक्षी आहे. मुख्य म्हणजे, १९८३ सालीच कर्नाटकमध्ये खास महिला उद्योजकांसाठी म्हणून AWAKE (Association of Women Entrepreneurs of Karnataka) या संस्थेची स्थापना झाली होती. आज अशा प्रकारच्या अनेक संस्था दिसत असल्या तरी त्या काळात सुरु झालेली ही संस्था विशेषच मानावी लागेल. किरण मजूमदार शॉ आणि इतर काही महिलांनी मिळून ही संस्था सुरु केली.

image


शून्यातून सुरुवात करत आपापले उद्योग उभारणाऱ्या, प्रचंड यश मिळविणाऱ्या आणि मुख्य म्हणजे उद्योग जगतात कर्नाटक राज्याचा झेंडा फडकावणाऱ्या तेथील काही मोजक्या महिला उद्योजकांची ओळख करुन देण्याचा हा आमचा प्रयत्न...

किरण मजूमदार शॉ

भारतातील आघाडीच्या उद्योजक म्हणून किरण मजूमदार शॉ यांचे नाव आज आदराने घेतले जाते. बंगळुरु स्थित बायकॉन लिमिटेड (Biocon Limited) या बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या त्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. “ १९७८ मध्ये जेंव्हा मला जाणवले की, ब्रू मास्टर बनण्याचे आणि ब्रूवरी चालविण्याचे माझे स्वप्न मी पूर्ण करु शकत नाही, तेंव्हा मी म्हटले ‘ ठीक आहे, मग मी आता दुसरे काय करु शकते’ आणि त्यानंतर केवळ एका अपघातानेच मी या व्यवसायाला सुरुवात केली. मी विचार केला ठीक आहे, हे बायोटेक आहे आणि बायटेक हे निश्चितच ब्रूविंगशी जोडलेले आहे आणि हे एक रोमांचक क्षेत्र आहे. पण व्यवसाय सुरु करण्याबाबत मला काहीच माहित नाही कारण मी यापूर्वी कोणताही व्यवसाय केलेला नाही. पण हा एक शोध प्रवास आहे. व्यवसायाचा हा प्रवास एकूण आहे तरी काय याचा शोध तर घेऊया,” गेल्या वर्षी युवरस्टोरीबरोबर मारलेल्या गप्पांच्या दरम्यान त्यांनी ही गोष्ट सांगितली.

आजच्या घडीला त्या देशातील आघाडीच्या महिला उद्योजकांपैकी एक आहेत. १.१ बिलियन डॉलर्सची नेट वर्थ अर्थात निव्वळ नफा असलेल्या कंपनीचे त्या नेतृत्व करतात. २०१५ मध्ये फोर्ब्ज मासिकाने जगातील सर्वाधिक शक्तीशाली महिलांच्या केलेल्या यादीत त्या ८५ व्या क्रमांकावर होत्या.

डॉ. कामिनी ए राव

प्रजननासाठी सहाय्य करणाऱ्या क्षेत्रातील आद्यप्रवर्तक म्हणून मिलान (Milann) कडे पाहिले जाते. अशा या मिलानच्या संस्थापिका आणि वैद्यकीय संचालक आहेत डॉक्टर कामिनी ए राव... १९८९ मध्ये बंगुळुरु मध्ये मिलानची स्थापना झाली.

डॉक्टर राव या प्रजनन एन्डोक्रनोलॉजी (रिप्रोडक्टीव एन्डोक्रनोलॉजी), अंडाशय शरिरशास्त्र (ओव्हेरियन फिजिओलॉजी) आणि सहाय्य प्रजनन तंत्रज्ञान (एसिस्टेड रिप्रोडक्टीव टेक्नॉलॉजी) यातील विशेषज्ञ आहेत. बंगुळूरुमधील सेंट जॉन’स वैद्यकीय महाविद्यालय आणि वाणीविलासमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर त्यांनी फेटल इनव्हेजिव थेरपीचे (Fetal Invasive Therapy) प्रशिक्षण घेतले असून भारतातील पहिल्या एसआयएफटी बेबी (SIFT Baby) च्या जन्माचे श्रेयही त्यांनाच जाते.

मीना गणेश

विविध उद्योगांच्या उभारणीचा अनुभव असलेल्या मीना गणेश या पोर्टीआ मेडिकल (Portea Medical), च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पोर्टीआ मेडिकल भारतात आरोग्यसेवा क्षेत्रात परवडणाऱ्या आणि उत्तम दर्जाच्या घरपोच सेवा देऊ करते. गेल्या वर्षी कंपनीने सिरिज बी राऊंडमधून, ऍकेल (Accel) आणि वर्ल्ड बॅंक ग्रुपचा सदस्य असलेले इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) या विद्यमान गुंतवणूकदारांसह क्वालकॉम वेंचर्स (Qualcomm Ventures) आणि वेंचरइस्ट (Ventureast) यांच्या मदतीने ३७.५ मिलियन डॉलर्स उभे केले.

आपले पती क्रृष्णन् गणेश यांच्यासह मीना या आणखी चार स्टार्टअप्सच्या सहसंस्थापक आहेत. भौतिकशास्त्र या विषयातील पदवीधर असलेल्या मीना यांनी आयआयएम, कलकत्ता येथून एमबीए केले आहे. त्यांनी पीडब्ल्यूसी (PwC), मायक्रोसॉफ्ट आणि टेस्कोबरोबरही काम केले आहे.

श्रीविद्या श्रीनिवासन

वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी त्यांनी बंगळुरुमध्ये इम्पल्ससॉफ्ट (Impulsesoft) या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या त्या सहसंस्थापक होत्या. २००६ मध्ये नॅसडॅक लिस्टेड सेमिकंडक्टर कंपनी एसआयआरएफने या कंपनीचा ताबा घेतला. हाताशी वेळ आणि आणखी मोठे काहीतरी उभारण्याची तीव्र इच्छा असलेल्या श्रीविद्या यांनी २००८ मध्ये आपले पुढचे पाऊल टाकले. अमागी टेक्नॉलॉजीज (Amagi Technologies) या कंपनीच्या त्या सहसंस्थापक बनल्या. पारंपारिक सॅटेलाईट टीव्ही ब्रॉडकास्टच्या पायाभूत सुविधेला विश्वसनीय, आणि खर्चाच्या दृष्टीने प्रभावी पर्याय उभारण्यासाठी अमागी क्लाऊड बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर करते.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्यांनी प्रेमजी इन्व्हेस्ट, विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी यांच्या कार्यालयाकडून आणि विद्यमान मेफील्ड फंडकडून अव्यक्त रक्कम सिरिज सी राऊंडमधून उभी केली. श्रीविद्या सांगतात, “ जेंव्हा तुम्ही तुम्हाला उत्साही करणारी गोष्ट कराल, तेंव्हा तुम्ही कुठच्या कुठे जाऊन पोहचाल. तेंव्हा काम हे काम रहाणार नाही, तर ते आयुष्य बनेल.”

रिचा कर

झिवामे ( Ziwame) या अंतर्वस्त्रांच्या ऑनलाईन दुकानाच्या त्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असून, मिनिटाला एक ब्रा विकत असल्याचा त्यांचा दावा आहे. बंगळुरुमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या झिवामेची सुरुवात २०११ मध्ये झाली. झोडियस टेक्नॉलॉजी फंड (Zodius Technology Fund) आणि खजानाह नॅसिऑनेल बरहाद (Khazanah Nasional Berhad) हा मलेशिया सरकारचे मोक्याचा गुंतवणूक फंड, या माध्यमातूम २५० कोटी सीरिज सी राऊंडमधून उभारल्याची घोषणा त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केली आहे.

बिटस् पिलानीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रिचा यांनी काही काळ आयटी क्षेत्रात नोकरी केली. त्याशिवाय झिवामे सुरु करण्यापूर्वी त्यांनी रिटेलर आणि जागतिक तंत्रज्ञान कंपनीबरोबरही काम केले आहे.

लेखक – तन्वी दुबे

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

    Share on
    close