छोट्या कुटुंबातील महिलांच्या यशाच्या मोठ्या कथा

छोट्या कुटुंबातील महिलांच्या यशाच्या मोठ्या कथा

Friday October 23, 2015,

6 min Read


एकीकडे गाड्यांचा मोठा आवाज तर दुसरीकडे फेरीवाल्यांचा आरडाओरडा मुंबईच्या मोहम्मद अली रोडवरील भेंडी बाजारातील हे रोजचं दृश्य...इथून वाट काढणं म्हणजे महाकठीण काम..भेंडी बाजारात तर सगळं विकलं जातं, पण त्याचबरोबर इथं गुजरात आणि महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील लोक राहतात. आता भेंडीबाजाराला बुरहानी उत्कर्ष ट्रस्टमार्फत परिवर्तनाची अपेक्षा आहे. ट्रस्टतर्फे या परिसराची सुधारणा आणि इथल्या घरं तसेच दुकानांचं पुनर्निमाण करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे.


image


नुतनीकरणासीठी इथल्या कुटुंबांना दोन संक्रमण शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आणि यातूनच इथल्या महिलांना नवीन मार्ग सापडले. यातील चार महिला व्यापार चालवण्यासाठी इंटरनेटचा आधार घेत आहेत. तर काही महिलांना घरातून बाहेर पडून आपलं नेटवर्क चांगल्या पद्धतीनं बनवण्याची संधी मिळाली आहे.

आपल्याकडील उपलब्ध साधनांच्या आधारे लघुउद्योग चालवणाऱ्या ५ उद्योगी महिलांशी यूअर स्टोरीनं संवाद साधला...

सकीना वासनवाला या विविध प्रकारचे दागिने खरेदी करुन फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या समाज माध्यमातून ग्राहकांना विकतात. तीन वर्षांपूर्वी सकीना यांनी या कामाला सुरूवात केली. नेटवर्क तयार करण्याचं त्यांचं कौशल्य हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.


आपल्या व्यवसायाशी इतर महिलांना जोडण्यासाठी आणि परिचय वाढवण्यासाठी सकीना लोकल प्रवास तसंच इतर सार्वजनिक ठिकाणांचा उपयोग करतात. कधी कधी तर रस्त्यावर भेटलेल्या एखाद्या महिलेला त्यांनी परिधान केलेले दागिने आवडले तर त्या लगेचच ऑर्डर घेऊन तिथेच मोबाईल नंबरची देवाणघेवाण करतात. “ महिला ह्या कायम संवाद साधण्यासाठी तयार असतात. कधी कधी तर बसस्टॉपवर झालेली छोटीशी ओळखही तुमचं नेटवर्क वाढवण्यास पुरेशी असते. पण ती महिला किती मनमिळावू आहे यावरही सारं काही अवलंबून असतं,” असं सकीना सांगतात.

३९ वर्षांच्या सकीना यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. बी.कॉम आणि सीएस फाऊंडेशनचा कोर्स केलेल्या सकीना आयटी क्षेत्रात असलेल्या आपल्या पतीचीही व्यवसायासाठी मदत घेतात. “ मी दाहोद इथली आहे आणि तिथे मी क्लार्कची नोकरी करीत होते, इथे आल्यावर मी दूरस्थ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण ते अपूर्णच राहिलं”, असं सकीना सांगतात.

गेल्या १४ वर्षांपासून सकीना ह्या वैवाहिक आयुष्य जगत आहेत. एकत्र कुटुंब असल्यानं आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. जीवनात ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलीला मिळायला हव्यात यासाठी त्या आग्रही आहेत. “ आमच्या समाजात जर एखाद्या मुलीनं बी. कॉम केलं तर इतर मुलीही तिचं अनुकरण करतात, आमची आवड काय आहे आणि आमचं हित कशात आहे यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणीही नसतं. आजची मुलं खूप महत्त्वाकांक्षी आहेत, संधी कशी ओळखायची आणि संधीचं सोनं कसं करायचं याचं त्यांना पुरेपूर आकलन असतं. त्यामुळेच माझ्या मुलीला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी मी मदत करणार आहे,” असा विश्वास त्या व्यक्त करतात.

आपलं कुटुंब आणि मित्रांनी दिलेल्या प्रोत्साहनाबाबत सकीना त्यांचे आभार मानतात.

४८ वर्षांच्या मारिया जसदानवाला या ज्येष्ठ नागरिकांना यात्रा घडवण्याचं काम करतात. ज्येष्ठ नागरिक दूरवरच्या मंदिर किंवा मशिदींमध्ये दर्शन घेण्यासाठी यात्रेला जातात याची जाणीव मारिया यांना भेंडी बाजारातून बाहेर पडल्यावर झाली. वर्षातून एक मोठी आणि दोन महिन्यातून एक छोटी धार्मिक यात्रा करणाऱ्यांमध्ये ५८ वर्षांपासून ते ९४ वर्षांपर्यंतच्या वृद्धांचा समावेश असतो. यात साहसयात्रा आणि तीर्थयात्रा या दोन्हींचा समावेश असतो.


image


यात्रा अधिक रुचीपूर्ण आणि सोपी कशी होईल याचे अनेक पर्याय त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सुरूवातीला घरोघरी जाऊन सांगितले.

त्यांच्या व्यवसायाचा आता खूप विस्तार झाला आहे आणि अनेक लोकांना त्यांच्या या व्यवसायाशी जोडलं जाण्याची इच्छा आहे.

ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच बजेटची समस्या असते, त्यामुळे योग्य बजेटमध्ये त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील यासाठी मारिया प्रयत्न करतात. “ मी याकडे एक व्यवसाय म्हणून नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांची सेवा म्हणून बघते,” असं मारिया म्हणतात.

ही यात्रा प्रत्येकाला सुखाची आणि सोयीची व्हावी यासाठी मारिया यांची बहिण स्वत: त्यांच्यासोबत यात्रेला जाते. “ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी एसी तिकीटच बुक करतो तसंच काहीवेळा हवाई प्रवासालाही प्राधान्य देतो. औषधं कायम सोबत असतात आणि जिथे एका फोन कॉलवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल अशाच हॉटेल्सची आम्ही निवड करत असतो.” असं मारिया स्पष्ट करतात.

बी.कॉम पदवीधारक असलेल्या मारिया आपले पती आणि सासूसह राहतात. एकटेपणावर नियंत्रण मिळवणं हे त्यांच्यापुढचं मोठं आव्हान आहे. “ मला वाटतं की महिलांनी आपल्या स्वाभाविक ज्ञानानुसार काम करायला हवं, मनासारखं काम करण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे. आता आपण हे सर्व करु शकत नाही अशी निराशा न ठेवता पहिलं पाऊल टाकलं तर यश नक्कीच मिळेल हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे,” आपल्यासारख्या उद्योगी महिलांना त्या सल्ला देतात.

नजीकच्या काळात त्या ज्येष्ठ पुरूषांनाही यात्रांमध्ये सहभागी करुन घेणार आहेत. तसंच महिलांसाठी एक परदेश यात्रा आयोजित करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

२२ वर्षांची जमीला पेटीवाला ही एका मुलाची आई आहे. १२ वीत असल्यापासून जमीला शिवणकाम करत आहे.

आता त्यांनी कुटुंबाच्या मदतीनं ‘रिदास, एक पारंपरिक पोषाख’ या नावाने काही छोटी छोटी शिवणकामं करणाऱ्या शाखा सुरू केल्या आहेत. जमीला आता बूट, घड्याळ आणि टी शर्टची कामही करतात.


image


त्या रिदाससाठी कपडे डिझाईन करतात तर त्यांच्या सासू ते कपडे शिवण्याचं काम करतात. जमीला यांनी फोटोग्राफर असलेल्या पतीच्या सहाय्यानं आपली एक वेबसाईटही तयार केलीये. आपल्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी त्या सोशल मीडियाचा वापर करतात. आतापर्यंत त्यांच्या ग्राहकांची संख्या साडे पाचशे ते सहाशेपर्यंत पोहोचली आहे. यात मुंबई आणि भोपाळमधील काही लोकांचाही समावेश आहे.

बी कॉम झालेल्या आणि मुंबईत राहणाऱ्या जमीला म्हणतात, “ माझ्या मुलीला मला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे. तिचं प्रत्येक स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. तिला आवडलेली वस्तु मिळवण्यास ती असमर्थ आहे अशी जाणीव मला तिला कधीही होऊ द्यायची नाहीये.”

लहान पातळीवर जेवणाच्या डब्यांची सेवा सुरू करणाऱ्या शहनाज इलेक्ट्रिकवाला या आधी शिकवणी वर्ग घ्यायच्या. भेंडी बाजारातूनच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. आता त्या ज्येष्ठ नागरिक आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अन्न पोहोचवण्याचं काम करतात. त्या स्वत: स्वयंपाक करत असल्याने डब्यांची संख्या त्यांनी मर्यादित ठेवली आहे. त्यांना स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे आणि आपल्या कामाचं मार्केटिंग त्या तोंडीच करतात.

शहनाज या ४८ वर्षांच्या असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. “ आम्ही एकत्र कुटुंबात राहत असल्यानं हे खूप कठीण होतं, सर्वकाही चांगलं असलं तरी मी जसं चांगलं आयुष्य जगले तसं आयुष्य आणि तशा भव्य सुविधा आपल्या मुलांना मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे.” असं शहनाज म्हणतात. त्यांच्या मते शिक्षणामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल झालाय. आता लोक त्यांची पत्नी आणि मुलीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहेत.


image


जैनब पिपरमिंटवाला यांना बेकिंगमध्ये काही खास अशी रुची नव्हती, पण स्वयंपाक करण्याच्या आवडीमुळे त्यांच्या मनात बेकिंगविषयी आवड निर्माण झाली. त्यांनी चॉकलेट बवनण्यापासून सुरूवात केली आणि आता त्यांची वेबसाईट सुरू होत आहे. आपले ग्राहक वाढवण्यासाठी त्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा वापर करत आहेत. तसेच आपले कुटुंबीय, परिचित आणि मित्रांच्या माध्यमातून त्या तोंडीही प्रचार करत आहेत.

जैनब यांनी साधे केक बनवण्यापासून सुरूवात केली. त्यानंतर हळूहळू त्या कलात्मक आणि थीम केक बनवू लागल्या. इथंही त्यांना इंटरनेटचं खूप सहाय्य झालं. बेसिक कोर्स केल्यानंतर त्या इंटरनेटवरील माहिती आणि व्हिडिओजच्या माध्यमातून खूप काही शिकल्या. महाविद्यालयीन शिक्षणआधीचा अभ्यासक्रम त्यांनी दूरस्थ पद्धतीनं पूर्ण केला. त्यानंतर त्या एका कंपनीत अकाऊंट्स विभागात काम करत होत्या. पण बाळंतपणासाठी त्यांनी इथून सुटी घेतली. आता पती, सासरे आणि मुलं असं त्यांचं परिपूर्ण कुटुंब आहे. फोटोग्राफीसह सर्व कामं त्या स्वत:च करतात. काम जास्त असेल तर त्यांचे पतीही त्यांना मदत करतात.


image


घरातूनच काम आणि कुटुंबियांचं प्रोत्साहन यामुळे त्यांना चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.

मुल झाल्यानंतर घरी बसू नये यासाठी त्यांनी या कामाची सुरूवात केली होती, पण आता त्या मोठ्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी विविध कंपन्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत.

“ उद्योगशीलतेने आमचं संपूर्ण जीवनच बदलून टाकलंय आणि इंटरनेट नसतं तर आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असता, असं जैनब सांगतात.