स्वतः च्या स्वप्नांचा विचार न करता वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी वकिली क्षेत्रात करिअर करणाऱ्या मीना जाधव बनल्या न्यायाधीश

स्वतः च्या स्वप्नांचा विचार न करता वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी वकिली क्षेत्रात करिअर करणाऱ्या मीना जाधव बनल्या न्यायाधीश

Saturday April 23, 2016,

3 min Read

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात काहीतरी वेगळं बनायचं स्वप्नं असतं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी ती जीवाचं रान करून दिवसरात्र प्रयत्न करत असते. मात्र कुटुंबियांच्या इच्छेखातर आपल्या स्वप्नांना मुरड घालत वेगळ्या दिशेने पावले वळवावी लागतात तेव्हा मात्र घोर निराशा होते आणि स्वप्न भंगल्याचं दुखःही. असेच काहीसे झाले उस्मानाबाद जिल्हयातल्या मीना जाधव यांच्याबाबतीत, जे त्यांनी ठरवले ते झालेच नाही, मात्र त्या निराश झाल्या नाही तर जिद्दीने वकील झाल्या. वकिली या क्षेत्राबद्दल त्यांच्या वडिलांना आकर्षण होतं. मीना यांना न विचारताच पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी लॉ (law)चा फॉर्म भरला आणि त्यांचा नंबर लागल्यावर अॅडमिशन घ्यायला सांगितले. स्वतः च्या स्वप्नांचा विचार न करता वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्या वकिली क्षेत्रात आल्याचं सांगतात. वकिली करत असतांना सोबतच एमपीएससी स्पर्धापरीक्षा पास होऊन आज त्या न्यायाधीश बनल्या आहेत.

 न्यायाधीश मीना जाधव

न्यायाधीश मीना जाधव


मीना यांना लहानपणापासून पोलीस सेवेत जायचं स्वप्नं होतं, त्यासाठी त्या लहानपणापासूनच जोरदार तयारी करत होत्या, मात्र वडिलांच्या इच्छेचा मान ठेवत त्यांना एलएलबी केलं. त्यांना वकिली या क्षेत्राबद्दल काहीही माहीत नव्हतं तरही त्यांनी मोठ्या जिद्दीने पूर्ण केलं. पण नंतर वकिली करतानाचे अनुभव घेतल्यानंतर त्यांनी न्यायाधीश व्हायचं ठरवलं. ग्रामीण भागातील असल्यामुळे या क्षेत्रात आल्यावर वेगवेगळे अनुभव येत होते. त्यांनी जास्तीत जास्त महिलांच्या केसेस हाती घेतल्या. महिलांवर होणारे अन्याय दिवसेंदिवस वाढत होते, त्यांना लवकर न्याय मिळत नव्हता वकिलीचं काम करत असताना लागणारा वेळ यामुळे या महिलांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होतांना दिसून येत होता, कोर्टाच्या कामात महिलांना दिली जाणारी दुय्यम वागणूक यामुळे त्याचं मन कासावीस होत होतं. कोर्टात तारखेवर तारीख दिली जात असे, त्यामुळे महिलांची होणारी फरफट उघड्या डोळ्यांनी दिसत होती, पण शेवटी कोर्टाच्या पुढे काहीच करता येत नव्हतं.

image


न्यायदानाचं काम करत असताना पीडित, वंचित व्यक्ती, महिला यांच्यासाठी काम करत राहणार 

'ज्या दिवशी एलएलबी पूर्ण केलं आणि काळा कोट अंगावर चढवला त्या दिवसापासून कामं मिळत गेली आणि त्याच दिवसापासून घरची आर्थिक मदत मिळणं बंद झालं, तशी घरची परिस्थिती बेताचीच होती, पण वकीलीतून पैसे येत गेले. मात्र मिळणाऱ्या कामामुळे आत्मिक समाधान मिळत नव्हतं, त्यामुळे मन अस्वस्थ व्हायचं," मीना सांगत होत्या. ज्युनियरशिप करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यात त्या खचून जात असे. त्यानंतर मैत्रिणींच्या साहाय्याने एमपीएससी या स्पर्धा परीक्षेकडे वळून २०१४ ला अभ्यासाला सुरवात केली. यासाठी वकिली बंद करून अभ्यास करण्यासाठी पुणे गाठावे लागले. पहिल्या प्रयत्नात अपयश आले पण खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं आणि आज त्यांची न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे.

image


वकिली या क्षेत्रात २००७ पासून आल्यानंतर महिलांसाठी सामाजिक शिबीर घेणे, स्वतः एक कराटेपट्टू असल्याने महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतःच केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन आणि प्रोत्साहनपर शिबीरं घेणे तसेच सामाजिक कार्यासोबतच महिलांसाठी वेळोवेळी कायदेविषयक शिबिरे घेण्याचे काम त्या करत आहे. 

image


स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासदरम्यान वकिली बंद पडली, त्यामुळे आर्थिक टंचाई क्षणोक्षणी जाणवत होती घरची परिस्थिती हलाखीची होती. पुण्यात राहण्याचाही प्रश्नही गंभीर होता मात्र खचून न जाता सर्व अडचणींवर मात करून न्यायाधीश व्हायचं हे पक्क मनात ठरवलं होतं. म्हणतात ना तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर सर्व काही साध्य होऊ शकतं. आणि तसंच झालं मैत्रिणींची  पक्की साथ व वेळप्रसंगी आर्थिक मदतही मिळाली. त्यांचे आई-वडील आणि मैत्रिणींमुळे त्या न्यायधीशपदापर्यंत पोहोचल्याचे सांगतात.

वकिली या क्षेत्रात ज्या दिवशी तुम्ही कायदा हातात घेऊन कामाला लागता त्या वेळेस सर्व जिम्मेदारी तुमच्यावर असते.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी त्या सांगतात की, वेळ न दवडता पूर्ण अभ्यासाकडे लक्ष्य द्या, यश तुमचेच आहे. त्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यासाची जोड ही असावीच लागते मग यशापासून तुम्हाला कोणीही दूर ठेऊ शकत नाही. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

लष्करात धाडसी कारकीर्द घडविणाऱ्या रिटायर्ड कॅप्टन तनुजा काबरे

पैश्यांसाठी झाडू-पोछा करणाऱ्या इंदुमतीताई आज इतर महिलांना बनवत आहेत आत्मनिर्भर

अंतर्मनाची हाक ऐकून इतर स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नरत स्त्रीची कथा