महिलांना ‘आघाडी’वर ठेवणार्‍या नवी मुंबईच्या जयश्री पाटील!

महिलांना ‘आघाडी’वर ठेवणार्‍या नवी मुंबईच्या जयश्री पाटील!

Tuesday November 03, 2015,

3 min Read

नवी मुंबईतील २८ गावांमधील ७४ नोंदणीकृत महिला मंडळांची मध्यवर्ती संघटना म्हणून कार्यरत असलेली नवी मुंबई प्रकल्पग्रस्त महिला आघाडी १९९२ पासून जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, वैचारिक उन्नतीसाठी झटत आहे. महिलांसाठी स्वयंरोजगार,शैक्षणिक विकास आणि सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी नियमितपणे अनेक उपक्रमांचे आयोजन या प्रकल्पग्रस्त महिला आघाडीतर्फे करण्यात येते. प्रत्येक स्त्रीयांना स्वकर्तुत्वाबरोबरच गरज असते ती सहचाराच्या सक्रिय पाठिंब्याची. प्रत्येक स्त्रियांना आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी पाठबळ आणि प्रोत्साहनाची गरज असते. ही गरज ओळखून नवी मुंबईतील महिलांसाठी आदर्श ठरणार्‍या अशा जयश्री पाटील यांचा हा संघर्षाचा प्रवास...

जयश्री पाटील

जयश्री पाटील



जयश्री पाटील यांनी आपले पती सुप्रसिद्ध विधिज्ञ पी.सी.पाटील यांच्या सहकार्याने कोपरखैरणे येथील शांती संस्थेची स्थापना केली. आपल्या घरीच त्यांनी बालसंस्कार मंदिराची सुरूवात केली. शिक्षणाची ज्योत फुलवत आज त्यांनी मशाल बनविली आहे. त्यांच्या या शिशुवर्गात सुमारे ६०० मुले शिक्षण घेत आहेत. ज्ञानविकास संस्थेच्या त्या संस्थापक सदस्या व संचालिका म्हणून गेली २८ वर्षे कार्यरत आहेत. जगातल्या प्रत्येकाला एक गोष्ट अगदी समान मिळते. मग तो राजा असो वा गरिब. ती गोष्ट म्हणजे वेळ. प्रत्येक एक सेकंद कमी नाही की जास्त नाही. पण तरीही बर्‍याच जणांची तक्रार असते की, अमुक-अमुक गोष्ट करायला वेळ मिळाला नाही. पण याला अपवाद वाटतात त्या म्हणजे जयश्री पाटील. नेहमी हसतमुख असणार्‍या त्या घरातील जबाबदारीही अत्यंत सक्षमपणे सांभाळतात.

प्रारंभी प्रकल्पग्रस्त महिलांच्या सबलीकरणासाठी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त महिला आघाडी या संघटनेची स्थापना करण्यात आली. नंतर स्थानिक वसाहतींमधील अनेक महिला मंडळे यांच्याशी जोडले गेली. आजमितीस प्रकल्पग्रस्त महिला आघाडीच्या सुमारे साडेतीन हजार सदस्य असून आघाडीतर्फे २५० महिला बचत गट चालविण्यात येत आहेत. या बचत गटातील महिलांना चटणी, मसाले, हळद, मेंदी कापडी पिशव्या, उटणे निर्मिती आदींचे प्रशिक्षणदेखील प्रकल्पग्रस्त महिला आघाडीतर्फे दिले जाते. महिला आघाडीतर्फे प्रौढ महिला शिक्षण वर्ग चालविण्यात येत असून, आतापर्यंत या शिक्षणवर्गातून ४५० महिला शिक्षित झाल्या आहेत. त्यापैकी ७ महिला चौथीची परिक्षा पास झाल्यात. महिला आघाडीने आतापर्यंत सुमारे २५८ महिलांना बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण दिले आहे. प्रकल्पग्रस्त महिला आघाडीतर्फे कोपरखैरणे इथं शांतीजप वाचनालय चालविण्यात येत असून, या वाचनालयात सुमारे साडेपाच हजार ग्रंथ-पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध केला आहे.

image


महिला प्रौढ शिक्षण वर्ग, महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण, मोफत योग शिक्षण वर्ग, मुला-मुलींसाठी कराटे प्रशिक्षण वर्ग, भरतनाट्यम वर्ग, आरोग्य शिबिरे, अंधश्रद्धा निर्मुलन वर्ग, गॅससुरक्षा प्रात्याक्षिके, महिला समस्या निराकरण, वृक्षारोपण, बालदिन, महिला मेळावा, महिला स्पर्धा, कॅन्सर आणि एड्सबाबत चिकीत्सा शिबिर, बालक-पालक मेळावा, पर्यावरण जनजागृती मोहीम आदि अनेक उपक्रम प्रकल्पग्रस्त महिला आघाडीतर्फे नियमितपणे राबविण्यात येतात. नवी मुंबईतील एकमेव आदिवासी वस्ती असलेले अडवली-भुतवली गाव.

प्रकल्पग्रस्त महिला आघाडीने दत्तक घेतले आहे. या गावातील सर्वांची आरोग्य तपासणी केली जाते. तसेच अडवली-भुतवली गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे यांचे दरवर्षी वाटप केले जाते. प्रकल्पग्रस्त महिला आघाडीतर्फे चालविण्यात येणार्‍या शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्राचे दररोज ३० महिला शिवणकाम शिकत आहेत. जयश्री पाटील यांच्या समाजकार्याची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांना २००३-२००४ मध्ये ‘सावित्रीबाई फुले’ पुरस्काराने सन्मानित केले. २००५ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा असा ‘नवी मुंबई भुषण’ पुरस्कार प्रदान केला आहे. सन २००८ मध्ये दिल्लीच्या भारतीय दलित अकादमीकडून त्यांना ‘विरांगणा सावित्रीबाई फुले फेलासिक अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले. २०१५ मध्ये त्यांना नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांच्या मातृस्मरणार्थ ‘समाजभूषण’ हा पुरस्कार सामाजिक कार्यासाठी देण्यात आला आहे. या यशाचे गमक म्हणजे त्यांनी केलेले वेळेचे योग्य नियोजन. तसंच पतीच्या जीवनाशी त्यांच्या कार्याशी एकरूप होत असतानाच त्यांनी स्वतःचे अस्तित्व कायम ठेवले. त्यामूळेच त्यांना त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख आहे आणि हे त्यांच्या यशस्वी सहजीवनाचंही रहस्य आहे. सर्वत्र मिळणार्‍या प्रसिद्धीपेक्षा आपल्या कलागुणांनी तळागळातील महिलांच्याही मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे लाडके विद्यार्थीही जयश्री पाटील यांना ‘मोठ्या मॅडम’ म्हणतात. आपल्या जीवनात काही व्यक्ती अशा येतात की त्या आपल्या कायम स्मरणात राहतात. नातं, मैत्री, ओळख याही पलिकडच्या जयश्री पाटील आहेत असं त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे.

    Share on
    close