परसातील सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ चा आनंद देत आहेत, नाशिकातील काळे कुटुंबीय!

1

आपल्या स्वयंपाकघरात दररोज येणारा भाजीपाला कुठून येतो? याचा आपल्याला फारसा गंध नसतो. हवा तो भाजीपाला किंवा फळे आपण बाजारातून खरेदी करतो आणि आवडीनुसार त्याचा वापर करुन उपभोग घेतो. या आवडीच्या भाज्या-फळे आपल्या स्वास्थ्यासाठी पूर्णत: सुरक्षित असतातच असा दावा आपण करु शकणार नाही. त्यामुळे कितीही नीट बघून पारखून आपण तो आणत असलो तरी त्यावर रासायनिक प्रक्रिया किंवा कोणत्याही अपायकारक गोष्टी आहेत की नाही याबाबत आपल्याला शंभर टक्के हमी देताच येणार नाही. आणि मग इथेच आपल्या भाज्या-फळे आरोग्यकारक नाहीत या शंकेने आपल्या त्यांच्या वापरातील आनंदाचा हिरमोड होतो आणि आपण आपल्या आवडीच्या फळे- भाज्या आणल्या तरी एका मानसिक आनंदाला मुकतो असे नाही वाटत का?

पण कल्पना करा या भाज्या –फळे तुम्ही तुमच्या हातानेच परसदारी कुंडीतील शेती करून सेंद्रीय पध्दतीने तयार केलेल्या असतील तर तुमच्या आनंदाला काय उपमा द्यावी लागेल. एक तर निर्सगाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत  सहभागी असल्याचा, श्रमदानाचा आनंद आणि पुन्हा निर्धोकपणाने हव्या त्या भाज्या –फळे घरच्याच असल्याचा आनंद आणि अभिमान! वा, क्या बा्त है? असेच म्हणाल ना?

असाच आनंद मिळवलाय नाशिक शहारातील मुळच्या शेतकरी असलेल्या काळे कुटूंबियांनी! सध्या त्यांच्या गच्चीवरील शेती गेल्या चार-पाच वर्षांपासून इतकी बहरली आहे की तो त्या परिसरात कुतूहल आणि चर्चांचा विषय झाला आहे. त्यांच्या या आगळ्या वेगऴ्या शेती प्रयोगांची माहिती घेण्यासाठी ‘युवर स्टोरी’ ने त्यांच्या या परसबागेला भेट दिली. नाशिकच्या पवन नगर भागात राहणारे मनोहर काळे हे मुळचे शेतकरी घराण्यातील. त्यांच्या पत्नी मिनाक्षी आणि बहिण जनाबाई यांनाही आपल्या घरच्या शेतीपरंपरेचा वारसा आणि आवड असल्याने आज घरच्या उष्ट्या-खरकट्याचा वापर करून घरीच सेंद्रीय खत निर्मिती  केली आणि त्या खताचा वापर परसबागेतील भाजीपाला फळांचे उत्पादन घेण्यासाठी केला जातो.

घरच्या घरी शेतीच्या या प्रयोगाबद्दल बोलताना मनोहर काळे म्हणाले की, “मुळच्या शेतकरी कुटूंबातील असल्याने शेतीची माहिती ब-याच प्रमाणात होतीच, आणि आवडही होती. बाजारातील भाजीपाला आपल्या परसबागेत पिकवण्याची ही सुरवात सुमारे चार- पाच वर्षात याच आवडीच्या छंदातून झाली. मग भाजीपाला फळांच्या रोपांना जोपसाण्यास त्यांची मशागत करण्यास आणि त्यातही रोज नवे-नवे प्रयोग करण्याचा आनंद घेत घरच्या शेतीच्या उत्पादनाची सुरूवात झाली.”

पत्ताकोबी, फुलकोबी, वांगी, घोसाळे, कांदा, मिरच्या, तुरी, अळू, मुळा, टोमँटो, लिंबू, कोथिंबीर, पुदिना अश्या भाज्या तर अंजीर, पेरू, बोर, आंबा, डाळिंब,चिकू अश्या फळांचीही लागवड त्यांनी केली. पुन्हा त्यात नाविन्यपूर्ण काय करता येईल याचा शोध घेण्यात आणि नैसर्गिक पध्दतीने त्याची निर्मिती करण्याचा आनंद ते घेत आहेत. आता हा छंद त्यांना घरच्या घरी परसभाज्या-फळे तर मिळवून देत आहेच, पण त्याबरोबर पंचक्रोशीत त्यांना त्यामुळे वेगळी ओळख देखील मिळाली आहे.

या शेतीच्या बाबतीत माहिती देताना काळे कुटुंबीय  म्हणाले की, “आमच्या घरी कुतूहलाने येणा-या लोकांना हे सारे घरच्या घरी मिळवणे कसं शक्य आहे? याचे अप्रूप वाटते. पण या कामी सा-या कुटूंबाची मनापासूनची साथ आणि मेहनत देखील आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे.”


मनोहर काळे म्हणाले की, “कोणत्या भाज्यांच्या बियाण्यांची वाणे आहेत. त्यांचे वैशिष्ट्य काय आहे? याची माहिती घेतली की त्यासाठी या बागेत जागा तयार करायची, नैसर्गिक वाढ व्हावी यासाठी मातीचे वाफे तयार करायचे या कामात सारे कुटुंबीय सहभागी असतात त्यामुळे सामुहिक  शेतीचा वेगळा आनंदही न कळत मिळत असतो”. घरातील स्त्रियाना आपल्या घरातील रोजच्या कामानंतर वेळ मिळतो त्यात त्या देखील आवडीने या शेती प्रयोगांना वेळ देतात.

मनोहर काळे सांगतात की, “ या शेतीच्या प्रयोगात त्यांच्या मित्रांच्या आणि परिचितांच्या माध्यमातूनही अनेकदा मोठा हातभार लागला आहे.” त्यामुळे वेगवेगळ्या भागात होणा-या काही वेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याच्या वाणांची बियाणी ते मिळवतात आणि त्यांचा आपल्या कुंडीतील शेती मध्ये यशस्वी प्रयोग करतात. या सा-या भाजीपाल्याचा वापर रोजच्या जेवणात केला जातो त्यामुळे स्वच्छ, ताज्या भाज्या घरीच मिळतात आणि त्यांची चवही वेगळीच असते. या प्रकारच्या कोणत्याही रासायनिक प्रक्रिया नसलेल्या भाजीपाल्यामुळे कोणतेही आजार किंवा अपाय होत नाही आणि त्यामुळे जीवनात काहीतरी निर्भेळ मिळवल्याचा आनंद मिळतो असे या कुटुंबीयांचे म्हणणे आहे

आता काळे यांच्या या शेतीची माहिती घेण्यासाठी लोक येतात तसेच त्यांच्या शेजार-पाजारच्यांनाही या शुध्द भाजीपाल्याचे आकर्षण निर्माण झाल्याने ते देखील भाजीपाला घेण्यास त्यांच्याकडे येतात. मग त्यांनाही हा आनंदाचा ठेवा ते वाटतात. अनेकांना आता यातून प्रेरणा मिळाली आहे आणि त्यांनी देखील त्यांचे अनुकरण करण्यास सुरूवात केली आहे. असे सा-यांनीच परसदारी ‘कांदा,मुळा भाजी अवघी विठाबाई माझी” म्हणत मळे फुलवण्याचे हे कार्य सुरू केले तर निसर्गातील लपलेल्या सावळ्या विठू माऊलीला भेटल्याचा आनंद तर निश्चितच मिळेल पण स्वत:च्या श्रमातून शुध्द सेंद्रीय भाजीपाला निर्माण केल्याचा आणि त्याचा वापर वाढला तर आरोग्याचा प्रश्न सोपा होईल नाही का?

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कथा :

दोन अभियंता मित्रांचा ‘सात्विक’ प्रयत्न, सेंद्रीय अन्न खा निरोगी रहा ! आता शेतातील ‘शुध्द’ फळं भाज्या थेट तुमच्या स्वयंपाकघरात !

आता शेतीमालही ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध, postall.in वर करा कृषी उत्पादनांची खरेदी विक्री 

शेतकऱ्यांसाठी अनोखी चळवळ - लव दाय फार्मरworking as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte