"भारतीय संस्कृती व संस्काराचे श्री श्री रविशंकर हे राजदूत"

0

जगभरात भारताच्या विचाराला, जीवनपध्दतीला, संस्कृतीला, योगाला श्री श्री रविशंकर यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली, ते खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या विचारांचे आणि संस्कारांचे राजदूत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, पालकमंत्री गिरीश बापट, ऑल जर्नालिस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर, वसंत मुंढे, विजय बाविस्कर, गोंविंद घोळवे, मंदार फणसे, किरण जोशी उपस्थित होते.


मुख्यमंत्री म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांच्या सामर्थ्यावर जगावर विजय मिळवला. त्यांनी पहिल्यांदा आपल्या देशाच्या महान संस्कृतीचे दर्शन जगातील मान्यवरांना शिकागो येथे झालेल्या धर्मपरिषदेत घडवून आणले. त्यानंतर दिल्ली येथे रविशंकर यांनी जगभरातील धार्मिक गुरुंचा एकत्रित कार्यक्रम घेवून “वसुधैवं कुटुंबकमं”चा अविष्कार जगाला दाखवून दिला. स्वामी विवेकांनदांच्या विचारांचा अविष्कार गुरूजींनी सर्वांसमोर मांडला. चारित्र्य संपन्न, वैचारिक बैठकीचे अधिष्ठान असलेले नेतृत्व सर्व क्षेत्रात असणे आवश्यक आहे. गुरुजींच्या विचारांच्या माध्यमातून हे घडत आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार गुरूजींनी प्रकट रुपाने आपल्या समोर मांडले आहेत. याच विचारांतून देशाचे नवीन भविष्य घडणार आहे.

‘जलयुक्त शिवार’ला आर्ट ऑफ लिव्हिंगची साथ

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्ययमातून अध्यात्माबरोबरच इतर आठ क्षेत्रात गुरुजींचे मोठे कार्य आहे. देशाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी त्यांचे कार्य सुरु असून, राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातही आर्ट ऑफ लिव्हिंगची मोलाची साथ आहे. वैज्ञानिक पध्दतीने जलयुक्त शिवारची कामे ही संस्था करत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची आवश्यकता समजून घेवून काम करण्याची गरज आहे. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती हा केवळ एकच उपाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा नाही, तर शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मंत्र देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. यामुळे राज्याचा कृषीचा‍ विकासदर साडे बारा टक्क्यांवर गेला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.


श्री श्री रविशंकर म्हणाले, सर्वांनी एकत्र येवून काम केले तरच सर्व समाज पुढे जाईल. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा सन्मान करणे हेच खरे अध्यात्म आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्याची साथ देणे हे पत्रकारांचे काम आहे. मात्र हे करत असताना विकास पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. समाजात सुरू असणाऱ्या चांगल्या गोष्टी पत्रकारांनी समाजासमोर मांडाव्यात. सत्याला समोर ठेवताना समाजाला प्रेरणा देण्याचे काम पत्रकारांनी करणे अभिप्रेत आहे. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानाची कल्पनाही अत्यंत चांगली असून लोकसहभागामुळेच ती यशस्वी झाली आहे. अध्यात्मात सांगितलेल्या नेत्यांच्या अंगातील सर्व गुण देवेंद्र फडणवीस यांच्या अंगी असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.


श्री श्री रविशंकर यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, फेटा देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने लोकमतचे समुह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकारांचा “आदर्श पत्रकार” म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. (साभार : महान्युज)