अपयशाने खचून न जाता, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या दोन बालमित्रांची कहाणी....

अपयशाने खचून न जाता, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या दोन बालमित्रांची कहाणी....

Tuesday December 01, 2015,

4 min Read

वरुण बग्गा आणि वरिंदर सिंह या बालमित्रांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर निर्णय घेतला ते काहीतरी ‘कुल’ करण्याचा... काहीतरी वेगळे करुन पहाण्याची त्यांची इच्छा होती, पण नेमके काय करावे? हा प्रश्नही होताच. बऱ्याच विचारमंथनानंतर त्यांनी मुलांसाठी एक गमतीदार गणिती खेळ (मॅथेमॅटीकल फन गेम) सुरु केला. त्याचे नाव होते ‘मॅडवर्सेसमॅथ’. मात्र हा खेळ काही फारसा चालला नाही आणि एका वर्षानंतरच त्यांना तो बंद करावा लागला. पण या अपयशाने खचून न जाता, त्यांनी यातून एक महत्वाचा धडा घेतला आणि मागील उत्पादनापेक्षा अधिक चांगले उत्पादन निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

image


या दरम्यान त्यांच्या विचारमंथनातून त्यांना बऱ्याच कल्पना सुचल्या आणि त्यापैकी प्रत्येकीवर त्यांनी काम करुन पाहिले. मात्र प्रत्येकवेळी काम करताना, त्यांना मागच्या उत्पादनाच्या वेळी सामना करव्या लागलेल्या आव्हानांनाच पुन्हा सामोरे जावे लागत होते. एक दिवस, या गोष्टींचीच चर्चा सुरु असताना, त्यांनी विचार केला की त्यांच्यासारख्या इतर उद्योजकांनाही याच समस्यांचा सामना करावा लागत असणार आणि हाच तो क्षण होता जेंव्हा ‘स्टार्टअपयार’(StartupYar) या कल्पनेचा जन्म झाला.

या वर्षीच्या ऑगस्टमध्येच त्यांनी स्टार्टअपयारला सुरुवात केली. स्टार्टअपयार ही स्टार्टअप्सना वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत करु शकतील अशा साधनांची आणि ऍप्सची डिरेक्टरी अर्थात निर्देशिका असून, स्टार्टअपच्या सर्व गरजा पूर्ण करणारे एक परिपूर्ण ठिकाण (वन-स्टॉप डेस्टीनेशन) बनणे हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवत स्टार्टअपयारला सुरुवात झाली.

“ एखाद्याची स्टार्टअप सुरु करण्याची योजना असेल किंवा त्यांच्या स्टार्टअपसाठी सुरुवातीला वापरकर्ते मिळण्यामध्ये अडचण येत असेल किंवा त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सुरुवातीच्या ग्राहकांकडून त्वरित प्रतिक्रिया हव्या असतील, तर आम्ही त्यांना आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून मदत करु शकतो,” वरुण सांगतात.

त्याबाबत सविस्तर माहिती देताना ते सांगतात की, आपले उत्पादन बाजारात येण्यापूर्वी स्टार्टअप त्याचा समावेश आमच्या बिटा लिस्ट (Beta List) मध्ये करु शकतात, जे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे इंटरनेटवर येऊ घातलेल्या नव्या स्टार्टअपचा शोध सुरुवातीचे ग्राहक घेऊ शकतात. त्याचबरोबर संस्थापकही या व्यासपीठाचा उपयोग करत त्यांच्या स्टार्टअपची माहिती जगाला देऊ शकतात आणि पंचवीस हजारांच्या मोठ्या ग्राहक समुदायामधून त्यांना सुरुवातीच्या ग्राहकांच्या प्रतिक्रियाही मिळू शकतात.

वरुण यांच्या मते आज अनेक वेब ऍप्स आणि साधने उपलब्ध आहेत, जी स्टार्टअप्सना विविध टप्प्यांवर मदत करु शकतात. पण स्टार्टअपसना आपले काम लवकरात लवकर आणि सहजपणे करण्यासाठी योग्य त्या साधनाचा शोध घेणे हे निर्णायक असते. त्यांनी या सर्वांची मोफत असलेले, मोफत नसलेले अर्थात विक्रीसाठी असलेले आणि फ्रिमियममॉडेल अशी विभागणी केली असून, त्यामुळे त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशा साधनाची निवड करणे सहज शक्य होते.

वाढ आणि महसूल

स्टार्टअपयार मधील सुरुवातीची गुंतवणूक ही ५,००० रुपयांपेक्षाही कमी होती. या सहसंस्थापकांनी ही रक्कम डोमेन खरेदीसाठी आणि होस्टींगसाठी खर्च केली. आतापर्यंत त्यांनी विपणनावर काहीच खर्च केलेला नाही.

“ स्टार्टअपयारला सुरुवात करुन अवघे तीन महिने झाले आहेत आणि आम्हाला जगभरातून चांगला प्रतिसाद आहे. पाचशेहून अधिक वापरकर्त्यांनी आमच्या मासिक वृत्तपत्रिकेची (newsletter) सदस्यता घेतली आहे. तर शंभरहून जास्त कंपन्यांनी स्टार्टअपयारच्या लिस्टमध्ये येण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला आहे,” वरुण सांगतात.

जरी या व्यासपीठावरील लिस्टींग हे मोफत असले तरी आम्हाला अनेक कंपन्यांबरोबर असलेल्या संलग्न भागीदारीमधून महसूल मिळत आहे. यापैकी काही साधनांची जाहिरात संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रिकेच्या माध्यमातून करण्याचीही आमची योजना आहे. “ सध्या तरी, ग्राहकांना महत्व देण्याकडे आणि त्यांना सांभाळून ठेवण्याकडेच आमचे संपूर्ण लक्ष आम्ही केंद्रीत केले आहे. आर्थिक उलाढालीबद्दल म्हणाल तर आम्ही यापूर्वीच ब्रेक-इव्हन पोईंटवर पोहचलो आहोत,” ते सांगतात.

वाढीची आशा आणि आव्हाने

या व्यासपीठावरील वाढीबाबतच्या आपल्या आशा वरुण मोकळेपणाने व्यक्त करता. त्यांच्या मते, गुणवत्तापूर्ण डिजिटल उत्पादनांसाठी स्टार्टअपयार ही एक मोठी बाजारपेठ बनू शकते. “ सध्या आम्ही केवळ वेब ऍप्सचे लिस्टींग करत आहोत. तसेच आम्ही समावेश करत असलेले प्रत्येक साधन हे ग्राहकांना चांगले मूल्य देऊ करत आहे, याची आम्ही खात्री करुन घेत आहोत,” ते पुढे सांगतात.

त्यांच्या मते, या क्षेत्रातील मुख्य आव्हान आहे ते मौल्यवान गुणवत्ता असलेली सामग्री मिळविणे आणि वापरकर्त्यांना व्यस्त ठेवण्याचे. सादर झालेल्या साधनांना वरुण सातत्याने चाळणी लावत असतात, जेणेकरुन केवळ सर्वोत्तम साधने आणि ऍप्सच या व्यासपीठापर्यंत पोहचू शकतील.

स्पर्धा विभाग

स्टार्टअपस्टाशडॉटकॉम (Startupstash.com) आणि स्टार्टअपरिसोर्सेसडॉटआयओ (Startupresources.io) हे या क्षेत्रातील दोन स्टार्टअप्स स्टार्टअपयारचे थेट स्पर्धक आहेत. स्पर्धेबाबत बोलताना वरुण म्हणतात की, बरेच नवे खेळाडू या क्षेत्रात येत आहेत कारण येथे प्रवेश सोपा आहे. “ मात्र, आम्ही स्टार्टअपयार सुधारण्यासाठी सातत्याने कष्ट घेत आहोत, जेणेकरुन ते ग्राहकांसाठी अधिकाधिक मूल्य निर्मिती करत राहील,” ते स्पष्ट करतात.


लेखक – तौसिफ आलम

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन