बांधकामाचे साहित्य ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे 'सप्लिफाईड' 

0

दोन क्रियाशील व्यक्तिमत्वे, दोघांनीही २००९ साली जेव्हा रिअल इस्टेट क्षेत्रात गोंधळाचे वातावरण होते, तेव्हा त्या क्षेत्रात प्रवेश केला. २०११ साली हैद्राबाद येथे झालेल्या आयएसबीच्या कार्यशाळेदरम्यान त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्या दोघांनाही उत्तर भारतातील औद्योगिक संघटना CREDAI च्या युवा शाखेची स्थापना करण्याचा प्रकल्प सोपवण्यात आला. या दोघांचेही शिक्षण पारंपारिक बांधकाम व्यवसायपद्धतीनुसार झाले होते. मात्र यावेळेस त्यांना भविष्यातील गरजा ओळखून या सर्व गोष्टींना ट्विस्ट द्यायचा होता. या दोघांनीही एकत्र येऊन रिअल इस्टेट क्षेत्रात मार्गक्रमण करण्यासाठी एक मार्ग आखला. एकत्रित खरेदी करण्यासाठीच्या यंत्रणेची प्रत्येक विकासकाची वेगवेगळी गरज होती. विकासकाची ही गरज त्यांनी ओळखली होती. मोहित गोएलकरिता हा एक युरेका क्षण होता. त्यांचे साथीदार नलिन सलुजा यांनादेखील ही कल्पना पटली होती. असे असले तरीही, त्यांच्या कल्पनेने तेव्हा मूर्त स्वरुप घेतले नव्हते. तेव्हा फक्त या संकल्पनेचे बीज त्यांच्या मनोमनी रोवले गेले होते आणि त्याचे फलित त्यांना चार वर्षांनंतर म्हणजे सप्टेंबर २०१५ साली सप्लिफाईड (Supplified)च्या स्वरुपात झाले.

मोहित आणि नलिन या दोघांचीही कौंटुबिक पार्श्वभूमी उद्योजकांची होती. त्या दोघांचेही मार्गदर्शक त्यांचे वडिलच होते. २६ वर्षीय मोहित यांचा जन्म फरिदाबाद येथील पालवाल येथे झाला. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. अवघ्या पाचशे रुपयांपासून त्यांच्या वडिलांनी व्यवसायाला सुरुवात केली होती आणि कालांतराने त्याचे रुपांतर उत्तर भारतातील एका मोठ्या रिअल इस्टेट साम्राज्यात केले होते. 'रात्रीच्या वेळेस जेवणाच्या टेबलावर मला दररोज एक नव्या उद्योजकाची कथा ऐकायला मिळायची', असे मोहित सांगतात. ग्रॅंट थॉर्टन येथे सल्लागार म्हणून पहिली नोकरी केल्यानंतर मोहित यांनी त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले आणि २००९ साली रिअल इस्टेट क्षेत्रात झालेल्या गोंधळातून कंपनीला यशस्वीरित्या बाहेर काढले. दुसरीकडे गोल्डमॅन आणि सॅचचे माजी कर्मचारी नलिन हेदेखील मूळचे फरिदाबादचे आहेत. २०१० साली भारतात परतल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट व्यवसायाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मोहितप्रमाणे नलिन यांनादेखील बांधकाम व्यवसायाचा अनुभव पिढीजात व्यवसायामुळेच मिळाला.

२०१३च्या पीडब्ल्यूसीच्या अहवालानुसार, भारताच्या जीडीपीमध्ये बांधकाम व्यवसायाचे योगदान आठ टक्के एवढे आहे. supplified.com ने बांधकामाची तसेच घर सजावटीचे साहित्य आणि फिटींग्सची बाजारपेठ ऑनलाईन उपलब्ध करुन दिली. ही बांधकाम साहित्याकरिता बिझनेस टू बिझनेस बाजारपेठ आहे. बी२बीची सेवा दिल्यानंतर आणखी दोन बाजारपेठा कंपनीच्या दृष्टीक्षेपात होत्या. त्यांचा ई-कॉमर्स क्षेत्रावर आधीच परिणाम झाला होता. अर्थव्यवस्थेत आपले स्थान निर्माण करण्याचा सप्लिफाईडचा पुढचा टप्पा होता. ही कल्पना मोहित यांची होती. फक्त आपल्या कंपनीलाच नव्हे तर संपूर्ण बांधकाम क्षेत्राकरिता यंत्रणेत अनुकूल अशी संधी असल्याची मोहित यांना जेव्हा जाणीव झाली तेव्हा त्यांना ही कल्पना सुचली  होती.

नलिन सांगतात की, 'आमचा मुख्य हेतू लोकांना ऑफलाईनपासून ऑनलाईनवर आणण्याचा होता.' या टीमचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. 'भारतातील २० ते ३० टक्के बांधकाम हे दिल्ली आणि एनसीआर येथे सुरू असल्याचा विचार केल्यास सुरुवात करण्यासाठी ही एक मोठी बाजारपेठ आहे. बांधकाम करणाऱ्या लहान-मोठ्या सर्व कंपन्यांपासून ते मोठ्या विकासकांपर्यंतच्या सर्वच कंपन्यांकडे आम्ही लक्ष दिले आहे. सर्वच लोक टेक्ऩॉसॅव्ही नसतात. त्यामुळे आम्ही हा विचार मनात ठेऊन यूआय/यूएक्स अशा प्रकारे डिझाईन केले, जे सहजसोप्या पद्धतीने हाताळता येतील.' याबरोबर त्यांनी खरेदी विक्रीची पारंपारिक पद्धतदेखील सुरू ठेवली आहे. सप्लिफाईडच्या टीममध्ये २० कर्मचारी हे व्यवसायाचा विकास करणाऱ्या टीममध्ये आहेत. जे आसपासच्या लहान-मोठ्या कंत्राटदारांशी संपर्क साधतात.

सप्लिफाईडची काम करण्याची पद्धत

जर एखाद्या बड्या कंपनीला सामानाची मोठ्या प्रमाणात खरेदी करायची असल्यास ते थेट उत्पादन करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधतात आणि त्यांना आकर्षक अशी मोठ्या प्रमाणात सूटदेखील देतात. तसेच ऑफलाईन बाजारपेठेत प्रामुख्याने सिमेंट आणि स्टीलच्या खरेदीत ग्राहकाला क्रेडिटची सेवादेखील देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांकरिता या वस्तू पारंपारिक पद्धतीने विकत घेणे सोयीचे ठरते. त्यासोबत सप्लिफाईड कशाप्रकारे स्पर्धा करते? याबाबत बोलताना नलिन सांगतात की, 'उत्पादकांशी थेट संपर्क करत आम्ही सारख्या किंमती ठेवण्याकरिता अनेक प्रयत्न केले. जे उत्पादक आमच्याशी संलग्न आहेत, त्यांनी बड्या कंपनीला तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्रेडीट सेवा देऊ केली आहे.' स्टार्टअपची विक्री टीम ग्राहकांच्या कायम संपर्कात असते. सध्या सप्लिफाईड कडे ६५४ नोंदणीकृत ग्राहक आहेत आणि प्रत्येक महिन्यात त्यांचा व्यवसाय ११० टक्क्यांच्या दराने वाढतो. 'आम्ही आता आमचा व्यवसाय चंढीगड, लुधियाना आणि इतर शहरांमध्ये विस्तारीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच मशीन्स आणि साहित्य रेंटलवर देणे, क्रेडीट रेटींग यंत्रणा यांसारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावर्षी आम्ही आमचा निधी वृद्धींगत करण्याचादेखील विचार करत आहोत.' त्यांच्या भौगोलिक विभागातील मुख्य प्रतिस्पर्धी कंपनी म्हणजे बिल्डझर (Buildzar). सप्लिफाईडच्या तुलनेने ही कंपनी जुनी असून, त्यांचा प्रतिमाह महसूल हा जवळपास ११ कोटी एवढा आहे. प्रत्येक भौगोलिक विभागात अशा कंपन्या असतात. ई-कन्स्ट्रक्शन ही त्यापैकी सर्वाधिक कमाई करणारी एक कंपनी असून, तिचा विस्तार गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये झालेला आहे.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

‘स्मार्ट व्हिलेज’साठी स्वत:चे आगळे सिमेंट! लाकडापाठोपाठ पोलादातही ‘क्लोरोअर्थ’ आजमावणारं कर्तृत्व

उज्ज्वला हावरेः जिद्द आणि निग्रहाची अनोखी कहाणी

“ कुणी घर देता का घर ?”: लाखोंचा प्रश्न, ‘शुभम’चे उत्तर

लेखक – बिंजल शाह
अनुवाद – रंजिता परब