... जेणेकरुन झोपडपट्टीत राहणारी मुलेसुद्धा फिल्म बनवू शकतील आणि पुढे जाण्याची ‘प्रेरणा’ घेतील

... जेणेकरुन झोपडपट्टीत राहणारी मुलेसुद्धा फिल्म बनवू शकतील आणि पुढे जाण्याची ‘प्रेरणा’ घेतील

Friday April 29, 2016,

5 min Read

सिनेमा ही एक अशी गोष्ट आहे ज्याची प्रत्येकाला सहसा थोडीफार आवड तर असतेच. मग आलिशान घरात राहणारे लोक असो वा झोपडीत राहणारे लोक. या सगळ्यांमध्ये समान बाब ही आहे की प्रत्येकासाठी फिल्म ही स्वप्नातील जगासारखी भासते. असे स्वप्न जिथे सर्व काही आहे, मात्र आपल्यापासून दूर आहे. जर इतरांच्या अशा स्वप्नाला साकार करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला काय म्हणावे? तोही अशा मुलांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न जी झोपडपट्टीमध्ये राहतात. दिल्लीत राहणारी प्रेरणा सिद्धार्थ काहीसे असेच करत आहे. ती राजधानी दिल्लीच्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांना ना केवळ स्वप्न दाखवत आहे, तर त्या स्वप्नांना प्रत्यक्षात कसे साकार केले जाते हे सुद्धा सांगत आहे. एवढेच नाही तर जी मुले आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी असे करु इच्छितात ज्याबाबत अनेक लोक केवळ विचारच करतात, अशा मुलांसाठी प्रेरणा खरोखरच एक ‘प्रेरणा’ आहे. प्रेरणा दिल्लीच्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांना मोफत फोटोग्राफी आणि फिल्म बनविण्याचे प्रशिक्षण देते. आतापर्यंत तिने ६०हून जास्त मुलांना फिल्म बनवायला शिकविले आहे.

image


प्रेरणा सिद्धार्थ सांगते, “जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हाच मी विचार केला होता की मोठी होऊन फिल्म मेकरच बनेन. ११ व्या वर्षापर्यंत माझे कॅमेरा आणि स्क्रिप्ट रायटींगचे काम शिकून झाले होते. या दरम्यान माझे शालेय शिक्षणही सुरु होते.”

प्रेरणाचे पिता निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. तिच्या वडिलांना सामाजिक कार्याची खूप आवड होती. ती सुद्धा आपल्या वडिलांबरोबर या कामांसाठी वेळ द्यायची. प्रेरणा जेव्हा १६ वर्षांची होती तेव्हा तिने आपल्या वडिलांबरोबर झारखंडची राजधानी रांचीमध्ये लहान मुलांसाठी ४० दिवसाचा एज्युकेशनल कॅम्प आयोजित केला होता. यामध्ये तिने मुलांना शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून शिकविण्याचा निर्णय घेतला. प्रेरणाचे म्हणणे होते की जर अशा पद्धतीने तिने मुलांना शिकविले तर त्यांना कोणतीही गोष्ट लवकर समजेल, कारण दृश्य पाहिल्यावर मुलांना लवकर समजतं.

image


प्रेरणाने शालेय शिक्षणानंतर फिल्म मेकींगचा कोर्स केला. फिल्म मेकींगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तिने विविध सामाजिक विषयांवर अनेक फिल्म्स बनविल्या. त्या दरम्यान दूरदर्शनसाठी काम करताना तिने उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगडच्या आतील भागांमध्ये जाऊन काम केले. त्यानंतर प्रेरणा ‘किड पावर मीडिया’ नावाच्या एका संस्थेबरोबर काम करु लागली. इथे एखादा विशेष मुद्दा घेऊन त्याविषयी मुलांना जागरुक करण्यात यायचे. यासाठी ती अनेक झोपडपट्ट्यांमध्ये गेली आणि मुलांकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ते कुठल्या विषयावर फिल्म बनवू इच्छितात. या दरम्यान तिच्या समोर असे अनेक विषय आले जे ऐकून ती आश्चर्यचकित व्हायची. झोपडपट्टीत राहणारी ही मुले दारुसारख्या गंभीर विषयांबरोबरच बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार यासारख्या कौटुंबिक मुद्द्यांवर फिल्म बनवायला सांगायची. विशेष म्हणजे फिल्म बनविण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये या मुलांना सहभागी करुन घेतले जायचे.

image


जेव्हा की काही मुले अशीही होती जी काहीही बोलायची नाही. म्हणून प्रेरणाने अशा मुलांच्या वैयक्तिक विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. प्रेरणाने युअरस्टोरीला सांगितले, “जर आम्हाला बालविवाहावर फिल्म बनवायची असेल तर सर्वात आधी आम्ही त्यावर संशोधन करतो की असे का होते?, बालविवाहादरम्यान आणि त्यानंतर मुलांबरोबर काय घडते?, लोक बालविवाह का करतात? जर कुणाचा बालविवाह होत असेल तर तो थांबवता कसा येऊ शकतो.”

image


प्रेरणाने ही सर्व माहिती गोळा करण्यासाठी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना सहभागी करुन घेतले जे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, कारण त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी सामान्य होत्या. प्रेरणा सांगते की झोपडपट्टीत राहणारी अनेक मुले अद्भूत असतात. ज्यांच्यामध्ये फिल्म मेकिंगचे गुण जन्मजात असतात. फिल्म तयार करताना या मुलांना माहिती असते की कुठे कुठला शॉट घ्यायचा आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट कसा आणायचा आहे, कॅमेऱ्याचा एँगल कसा असेल इत्यादी. या सर्व गोष्टी मुलं स्वतःहून करतात.

image


प्रेरणाने समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेपोटी २०१२ साली दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना फिल्म मेकिंगचे काम शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांना याकरिता खूप समजवावे लागले. ही मुलं अशा परिवारातील होती जिथे पैसे कमाविण्यासाठी ती आईवडिलांना मदत करायची. प्रेरणाने तेव्हा ठरवले की ती शनिवार, रविवारच्या दिवशी या मुलांना फिल्म मेकिंगचे काम शिकवेल. कारण त्यादिवशी या मुलांना सुट्टी असायची. तिने हे काम तिचा मित्र केविनसह सुरु केले.

यासाठी तिने दिल्लीच्या ईस्ट ऑफ कैलाशमध्ये स्वतःची एक शाळा सुरु केली. जिथे ती या मुलांना फिल्म मेकिंगशी संबंधित सर्व माहिती देते. ती झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना एडिटींग, स्क्रिप्ट रायटींग आणि इतर गोष्टी शिकवते. प्रेरणाचे म्हणणे आहे की फिल्म मेकिंग एक कला आहे, जर एखाद्या मुलामध्ये ती कला नसेल तर तो हे शिकू शकत नाही. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक मुलांमध्ये हा गुण जन्मजात असतो. ती सांगते की ज्या मुलांनी पूर्वी कधी कॅमेरा पाहिलाही नव्हता ते जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतात, तेव्हा काहीतरी करण्याची आणि शिकण्याची इच्छा त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते. या मुलांना जेव्हा फोटो काढण्याची संधी मिळते तेव्हा ते अद्भूत फोटो काढतात.

image


प्रेरणाने आजवर दिल्लीच्या विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या जवळपास ६० मुलांना फिल्म मेकिंगचे काम शिकविलेले आहे. ती एका वेळी आठ मुलांना शिकवते. ती अशाच मुलांना निवडते ज्यांच्यामध्ये तिला या कामामधील आवड दिसते आणि तिला वाटतं की हे मुल पुढे जाऊन या क्षेत्रात काहीतरी चांगले काम करेल. दिल्लीमध्ये ती हे काम सीलमपूर, मालवीय नगर, तुगलकाबाद, ओखला, उत्तम नगरसारख्या झोपडपट्टी भागात करत आहे. निधीविषयी प्रेरणा सांगते की तिला कुठूनही कुठल्याच प्रकारे निधी मिळत नाही आहे. ती आणि केविन आठवड्याचे पाच दिवस नोकरी करुन आणि स्वतः बनविलेल्या फिल्म्स कॉर्पोरेट्स किंवा इतर लोकांना दाखवून जे कमवतात त्या बचतीमधूनच ते या मुलांना शिकवतात. आपल्या भविष्यातील योजनांविषयी ती सांगते की जर त्यांना निधी मिळाला तर या कामाचा विस्तार करुन ती जास्तीत जास्त मुलांना फिल्म मेकिंगचे काम शिकवू इच्छिते.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

अंतर्मनाची साद ऐका आणि अद्भूत अनुभूतीचा आनंद मिळवा – शेखर विजयन

नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग

बियॉन्ड ऑस्ट्रेलिया – भारतीय डॉक्युमेन्ट्रीच्या शोधात

लेखक – गीता बिश्त

अनुवाद – अनुज्ञा निकम

    Share on
    close