जिंकण्यासाठी विकास शाह यांनी आव्हाने नुसती पेललीच नाही तर ती मनापासून स्वीकारली

जिंकण्यासाठी विकास शाह यांनी आव्हाने नुसती पेललीच नाही तर ती मनापासून स्वीकारली

Wednesday June 15, 2016,

7 min Read

बुद्धी तल्लख होती मात्र लक्ष अभ्यासात नाही तर खेळण्यात होते... दहावी परीक्षेत जेव्हा कमी टक्के मिळाले तेव्हा लक्षात आले की आई-वडिलांना खूप दुखावले आहे.... खूप मनस्ताप झाला आणि स्वतःला बदलायचे ठरवले....स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले...काहीतरी करून दाखवायचे या ध्येयाने झपाटले.... ही कहाणी आहे विकास शाह यांची, ज्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात कारकीर्द घडवत स्वतःला सिद्ध केले आहे.

विकास शाह यांचे वडील जम्मू विश्वविद्यालय मध्ये विज्ञान-विभागचे डीन होते. त्यांची आई शाळा चालवत होती. आई-वडील दोघेही त्यांचे ज्ञान आणि हुशारीमुळे जम्मू-कश्मीर मध्ये प्रसिध्द होते. विकास शाह यांची बहिण अभ्यासात खूप हुशार होती, विकास यांना मात्र अभ्यासात काडीमात्र रस नव्हता. त्यांचे सर्व लक्ष एनसीसी, स्काउट-गाइड, मैदानी खेळ यामध्ये होते. दहावीच्या परीक्षेत आई-वडिलांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या मात्र अपेक्षाभंग झाला. दहावीच्या वर्गात ७८ मुलांपैकी विकास यांना ३८ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांच्या आई-वडिलांना खूप दुखः झाले. आपल्या आई-वडिलांना दुखावल्याची त्यांना पुरेपूर जाणीव झाली. आपल्या प्रतिष्ठित आई-वडिलांचा आपण अपमान केला असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर मात्र त्यांनी मनापासून खूप अभ्यास केला, कष्ट घेतले आणि बुध्दिमान विद्यार्थ्यांच्या यादीत आपले स्थान प्राप्त करत त्यापुढच्या सर्व परीक्षेत चांगले गुणक्रमांक प्राप्त केले.

image


विकास यांनी सांगितले की, “ आई-वडील दोघेही शिक्षक असल्याकारणाने घरात शिस्तीचे वातावरण होते. तरीसुद्धा मला अभ्यासापेक्षा जास्त खेळायला, हुंदडायला आवडायचे. माझी बुद्धी तल्लख असतानाही मला अभ्यासात स्वारस्य वाटत नव्हते. मी सकाळी घरातून निघालो की रात्री आठ वाजताच घरी यायचो. मला कमी मार्क्स मिळाले म्हणून माझ्या पालकांनी मला रागावले नाही. मला त्यांनी असेही कधी विचारले नाही की तु तुझ्या बहिणीसारखा हुशार का नाही म्हणून. पण जेव्हा दहावीचा रिझल्ट आला तेव्हा माझी मलाच लाज वाटली. मला जाणीव झाली की, शिक्षणाच्या क्षेत्रात ज्या पालकांचं नाव आहे त्यांच्या मुलाला इतके कमी गुण मिळावेत यासारखी लाजिरवाणी बाब नाही. तेव्हा मात्र मी मनापासून ठरवले की यापुढे त्यांना कोणतेही दुखः द्यायचे नाही”. तिथून पुढे विकास यांनी गांभीर्याने अभ्यास करून विश्वेश्वरय्या इंजीनियरिंग कॉलेजमधून डिस्टिंक्शन मध्ये बीटेकची डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जम्मू विश्वविद्यालय मधून एमबीए केले, तिथेही त्यांनी पहिल्या तीन क्रमांकामध्ये आपले स्थान प्राप्त केले. विकास यांनी सांगितले की, “ माझ्याकडे बुध्दीमत्ता होती, पण सुरवातीला अभ्यासासाठी मी त्याचा वापर केला नाही, जेव्हा वापर केला तेव्हा परिणाम चांगले आले. या स्वतःमध्ये केलेल्या बदलानंतर मला एका गोष्टीने झपाटले ते म्हणजे काहीही झाले, कितीही अडचणी आल्या तरी फक्त जिंकायचे.”

image


गंमतीची गोष्ट म्हणजे आपल्या चुलत भावाचे बघून त्यांनी बीटेक करायचे ठरवले होते. त्यांनी सांगितले की त्यांना ठाऊकच नव्हते की इंजीनियरिंग काय असते. माझ्या बारा चुलत भावंडांनी इंजीनियरिंगच केले होते आणि मीही त्यांचा वारसा पुढे चालवला. सगळ्यांनी केले म्हणून मीही केले. इंजीनियरिंगचा अभ्यास करताना मी स्वतःला विचारायचो की, “मी हे काय करतो आहे ?”.

विकास सांगतात की ते खूप नशीबवान आहे की त्यांना जे काम करायला आवडते तेच काम ते करत आहेत. सचिन तेंदुलकर आणि विराट कोहली यांचे उदाहरण देऊन ते सांगतात की, “ दोघांनाही क्रिकेटचे वेड आहे आणि त्यात ते अव्वल कामगिरी करत आहे.” विकास पुढे सांगतात की, नव्वद टक्के लोकं असे आहेत ज्यांना त्यांच्या आवडीचे काम करायला मिळत नाही, पण तरीसुद्धा ते मिळालेले काम उत्तम पद्धतीने करत असतात. मला वाटते लोकांनी तेच करायला हवे त्यांना जे आवडते, ज्यात ते निपुण आहेत, “ एका प्रश्नाचे उत्तर देताना विकास म्हणाले की, मी गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून काम करत आहे आणि आजपर्यंत मी कधीही ऑफिसमध्ये जायचा कंटाळा नाही केला, कारण माझे माझ्या कामावर खूप प्रेम आहे”.

image


नोकरी करत असताना ज्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले त्याबद्दल माहिती देताना ते सांगतात की, “ प्रत्येक दिवशी कुठल्यातरी नवीन अडचणीचा सामना करावा लागतो. जर मला कोणी हे सांगितले की एखादे काम होऊ शकत नाही, तेव्हा ते काम मी एक आव्हान म्हणून स्वीकारतो. आणि ते काम पूर्ण होईपर्यंत मी शांत बसत नाही. मला आव्हानं स्वीकारायला खूप आवडतात.”

विकास यांना एका गोष्टीची खंत वाटते की ते टाटा टेलीसर्विसेस मध्ये त्यांचे जे नुकसान झाले त्यातून त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. त्यांचे हे अपयश सांगायला त्यांना कुठेही कमीपणा वाटत नाही. उलट आपल्या आयुष्यातले सर्वात मोठे अपयश असल्याचे ते सांगतात. ते म्हणतात की, मी त्या कंपनी बरोबर दहा वर्ष काम केलं. त्या कंपनीसाठी मी माझे सर्वस्व पणाला लावले होते. तसे म्हटले तर मी एकट्यानेच त्या कंपनीला उभारी दिली होती. मी कंपनीच्या सर्वात जुन्या कर्मचाऱ्यांपैकी एक होतो. माझा कर्मचारी क्रमांक ३१ होता आणि जेव्हा मी कंपनी सोडली तेव्हा १२७०० हा क्रमांक सुरु होता. कंपनी सोडताना मला खूप दुखः झाले. मी संपूर्ण एक युनिट सांभाळायचो, मात्र कंपनीला नफा मिळत नव्हता. मी जेव्हा कंपनीमध्ये रुजू झालो तेव्हा कंपनीचा टर्नओवर प्रत्येक महिन्याला दीड कोटी इतका होता आणि जेव्हा मी कंपनी सोडली तेव्हा कंपनीचा टर्नओवर प्रत्येक महिन्याला १७५ कोटी इतका झाला होता. असे असूनही कंपनी नफ्यात नव्हती. आणि मला वाटले की मी एक हरलेली लढाई लढत आहे. म्हणून मी नोकरी सोडून दिली”.

image


ते दिवस फारच कठीण असल्याचे सांगत विकास म्हणतात की, नोकरी सोडल्यानंतर मला कळेचना की मला काय करायला हवे आणि काय नको. मला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. मी खूप बेचैन होतो. मी त्या कंपनीमध्ये अनेकांना नोकरीला लावले होते. त्यांना प्रशिक्षण दिले होते. नोकरी सोडताना मला असे वाटले होते की यांची जबाबदारीही माझीच आहे. मी त्याचा प्रमुख होतो. मी त्यांना एक मार्ग दाखवला होता. स्वप्न दाखवले होते. आणि मला वाटत होते की मी त्यांच्या स्वप्नांना पूर्ण केले पाहिजे. मी त्या लोकांना स्थिरस्थावर केल्यानंतरच दुसरी नोकरी केली.”

विकाश शाह हे वाॅटर हेल्थ इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्यांना अनेक भाषा येतात. व्यवस्थापन क्षेत्रात त्यांना हजारो लोकांबरोबर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. वाॅटर हेल्थ इंटरनॅशनल कंपनी जगातल्या ५० लाख लोकांपर्यंत सुरक्षित पाणी पोहोचवण्याचे काम करते. आणि आगामी काळात १० कोटी लोकांपर्यंत सुरक्षित पाणी पोहोचवण्याचे त्यांचे उद्दीष्ट आहे. विकास शाह यांना २०१२ चा मॅनेजर ऑफ दि इयर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मात्र सातत्याने काम करत राहणे हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार आहे.

विकास हे वाॅटर हेल्थ इंटरनॅशनलची नोकरीही आव्हान असल्याचे सांगतात. ते सांगतात की, “जेव्हा मी टेलीकॉम इंडस्ट्रीत रुजू झालो, तेव्हा ती इंडस्ट्री प्रगतीपथावर होती. मी अगदी योग्य वेळी त्या कंपनीत रुजू झालो होतो. मात्र वाॅटर हेल्थ इंटरनॅशनलच्या बाबतीत तसे नव्हते, मी योग्य ठिकाण तर निवडले होते, पण वेळ चुकीची होती. कमीत कमी किमतीत लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या या व्यवसायात जास्त नफा नाही आणि हेच माझ्यासाठी आव्हान आहे. आणि हे आव्हान मी स्वीकारले आहे आणि पूर्णपणे झोकून देऊन काम करत आहे. माझ्या आयुष्यातले सर्वात मोठे यश म्हणजे मी वॉटर हेल्थ कंपनीत अपेक्षित पदावर रुजू झालो. या कंपनीत मला खूप काम करायचे आहे. कमीत कमी किमतीत स्वच्छ पाणी लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे”.

आव्हानं तर असतातच, उद्दीष्टही मोठे असते, त्यामुळे ताणतणावांपासून वाचाण्यासाठी ते नेमके काय करतात ? असे विचारले असता विकास सांगतात की, “ मी लहानपणापासूनच खेळाडू वृत्तीचा होतो, खेळायचो, जिमला जायचो. पण नोकरीत असताना मला वेळ काढणे जरा कठीणच होते. एके दिवशी मी स्वतःला आरश्यात निरखून पहिले आणि मला धक्का बसला, मी खूप बेढप दिसत होतो, माझे वजन खूप वाढले होते. त्यानंतर मी निश्चय केला की रोज व्यायाम करायचा. आता मी रोज दोन तास व्यायाम करतो. मी घरीच जिम सुरु केले आहे. त्यामुळे दिवसभर मी तणावमुक्त असतो. याच संदर्भात ते पुढे सांगतात की, तणावमुक्त होण्यासाठी ते आपला वेळ त्यांच्या लहान मुलीबरोबर घालवतात. एक म्हण आहे, ‘चाइल्ड इज़ दि फादर ऑफ़ मैन’ मी माझ्या मुलीकडून नवीन नवीन गोष्टी शिकत असतो.

तरुण उद्योजकांना सल्ला देताना विकास शाह सांगतात की, “आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित होता कामा नये, ज्याप्रमाणे अर्जुनाने मासोळीच्या डोळ्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. पुढे जाण्यास आणि स्वतः मध्ये बदल घडवून आणण्यास कायम संधी असते, त्यामुळे कधी थांबू नका. थांबणे म्हणजे संपणे”.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्टार्टअप इंडियाच्या घोषणेआधीच या योजनेला सार्थ ठरविणारे अभिजात अभियंता व ठेकेदार शरद तांदळे !

ऑपरेशन थिएटरच्या प्रकाशात मेंदूची शस्त्रक्रिया करणारे डॉ. रंगनाथम कंदिलाच्या प्रकाशात करत होते अभ्यास

‘हेअर कटिंग सलून’ च्या व्यवसायातून महिन्याकाठी ४० लाखाचे उत्पन्न घेणाऱ्या मंगेशचा प्रेरणादायी प्रवास

    Share on
    close