इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींगच्या क्षेत्राला पुन्हा येणार सुगीचे दिवस, 'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६' कार्य़क्रमात तज्ज्ञांचा अंदाज

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींगच्या क्षेत्राला पुन्हा येणार सुगीचे दिवस, 'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६' कार्य़क्रमात तज्ज्ञांचा अंदाज

Saturday February 06, 2016,

5 min Read

भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करण्याचा सुरुवातीचा काळ हा माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ क्षेत्राच्या लकाकीमुळे झाकोळला गेला. मात्र मॅन्युफॅक्चरींग करण्याच्या काळाला पुन्हा सुगीचे दिवस येत असून, सध्या या क्षेत्राकडे लोकांचा कल वाढत असल्याचे मत उद्योग आणि सरकारी तज्ञ्जांनी 'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६' बैठकीत व्यक्त केले. 'कर्नाटकमधील अनेक स्टार्टअप्स सध्या मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राकडे वळत आहेत. यात बंगळूरूव्यतिरिक्त म्हैसूर आणि बेळगाव यांचादेखील समावेश आहे', असे कर्नाटक आयटी, बीटी आणि एस एण्ड टी विभागाच्या मुख्य सचिव वी मंजुला यांनी सांगितले. मात्र भारतीय कंपन्यांनी स्थानिक बाजारपेठांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले. कर्नाटक राज्यात अभियांत्रिकी विषयाचे कौशल्य मोठ्या प्रमाणात आहे. याचे सर्व श्रेय २०० अभियांत्रिकी महाविद्यालये आणि ३०० औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना जाते. राज्याची इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरींग धोरणात आता वेंचर मुद्दलीचादेखील सहाय्यकाप्रमाणे समावेश करण्यात आला आहे. कर्नाटकच्या सेमीकंडक्टर वेंचर फंडच्या माध्यमातून हे सर्व करण्यात येत असून, आतापर्यंत त्यांनी सहा स्टार्टअप्सना जवळपास ३० कोटी रुपयांचे सहाय्य केले आहे.

image


राज्यात २०२० या वर्षापर्यंत २० हजार तंत्रज्ञानविषयक स्टार्टअप सुरू होणे, हे कर्नाटक धोरणाचे लक्ष्य आहे. त्यापैकी सहा हजार स्टार्टअप्सची उत्पादने ही मिश्र प्रकारची असणार आहेत. यामुळे सहा लाख प्रत्यक्ष रोजगार तर १.२ दशलक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचा दावाही मंजूला यांनी केला. या धोरणात भागीदारीचादेखील पर्याय असून, इनक्युबेटरसोबत खासगी क्षेत्राबरोबरदेखील भागीदारी करता येऊ शकणार आहे. 'डिझाईननुसार मॅन्युफॅक्चरींग करण्यासाठी कर्नाटक राज्यात अनुकूल परिस्थिती आहे', असे मत तेजस नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नायक यांनी व्यक्त केले. सुरुवातीच्या काळात 'डिझाईन कोठेही करा, निर्मिती भारतात करा' किंवा 'डिझाईन भारतात करा, निर्मिती कोठेही करा', अशी प्रतिमा होती. मात्र आता ती बदलून 'डिझाईन आणि निर्मिती दोन्ही भारतात करा', असा काळ यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. याकरिता त्यांनी उदाहरण 'एप्पल' कंपनीचे दिले. प्रत्येक ५०० डॉलर्सच्या उत्पादनाची विक्री केल्यानंतर ३२१ डॉलर्स मिळवण्यात ते यशस्वी झाले.

'भारतीय ग्राहकांना सध्या अद्ययावत तंत्रज्ञान हवे असून, त्यात त्यांना सर्वोत्तम गुणवत्ता हवी आहे. मात्र ते सर्व त्यांना कमी किंमतीत हवे आहे. त्याला ते सुवर्ण मानकाप्रमाणे मानतात.', असे संजय सांगतात. सुदैवाने बंगळूरू शहरात ही सर्व आव्हाने पार पडू शकतात. त्याचे सर्व श्रेय हे कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला देण्यात येते. या सर्वांचा परिणाम म्हणून तेजस ही ऑप्टीकल नेटवर्कच्या क्षेत्रात जागतिक पातळीवरील अव्वल दहा कंपन्यांपैकी एक आहे. सर्वाधिक भारतीयांचे फोन कॉल आणि इंटरनेट ट्रॅफिक हे तेजसच्या उपकरणांवर चालवले जातात, असा दावा त्यांनी केला. तैवानची कंपनी मिडियाटेक यांनी बंगळूरू येथे संशोधन आणि विकास केंद्र स्थापन केले आहे. टेलिकॉम उत्पादनाची आयुमर्यादा कमी होत आहे, प्रामुख्याने मोबाईलची. भारत ही मोबाईलची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे बंगळूरू शहराला संशोधनाकरिता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

भारतात अनेक इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरर्स यशस्वी झाले आहेत. मात्र त्यांच्या यशात परदेशातील बाजारपेठांनीदेखील महत्वाची भूमिका बजावली आहे. 'अनेक भारतीय ग्राहक हे भारतातील अद्ययावत उत्पादने फक्त तेव्हाच विकत घेतात, जेव्हा ती अमेरिका, जर्मन आणि जपानसारख्या देशांमध्ये यशस्वी होतात.', असे निरीक्षण Skanray कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक विश्व प्रसाद अल्वा यांनी नोंदवले. द मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची मॅन्युफॅक्चरींग केंद्रे ही युरोप आणि ब्राझील येथे आहेत. याशिवाय रशिया आणि मॅक्सिको येथे ही केंद्रे उभारण्याची त्यांची योजना आहे. भारतीय निर्मितीच्या पद्धतीमध्ये चीनचा परिणाम जाणवल्यास मोबाईल फोनच्या किंमती येत्या काही वर्षात एक हजार डॉलर्सवरुन १०० डॉलर्स एवढ्या घसरू शकतील. 'गुणवत्तेच्या दर्जात कोणतीही तडजोड करता वैद्यकिय इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की क्ष-किरण मशीन, इसीजी आणि स्कॅनर यांच्या किंमतीदेखील २० ते ६० टक्क्यांनी कमी होतील.', असा दावा विश्वप्रसाद यांनी केला. बहुआंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी, पाश्चिमात्य देशांना निर्यात करणे आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्राप्त करणे, हे भारतातील स्थानिक निर्मात्यांच्या यशाकरिता आवश्यक आहे. 'अभियांत्रिकी आणि डिझाईन कौशल्याकरिता बंगळूरू हे सर्वात मोठे केंद्र आहे.', असे जीई हेल्थकेअर इंडियाच्या मुख्य तांत्रिक अधिकारी शाम राजन यांनी सांगितले. बंगळूरू येथील केंद्रात कंपनीचे एक हजार ५५० अभियंते कार्यरत असून, आतापर्यंत कंपनीने १०० उत्पादनांची निर्मिती केली आहे.

भारत हा सध्या आरोग्यासंबंधींच्या मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. अनेक रोगांच्या उत्पत्तीमुळे नवजात शिशुंच्या मृत्यूदरामध्ये वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी भारतात जन्मलेल्या १३९ दशलक्ष शिशुंपैकी एक दशलक्ष शिशु जन्मल्यादिवशीच मृत पावतात तर चार दशलक्ष शिशु पहिल्या महिन्यातच मृत पावतात. शाम यांनी हा डाटा उपस्थितांसमोर आणला. यामुळे जीई यांना रुरल इन्फान्ट वॉर्मर यासारख्या सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली. हे उपकरण कोठेही नेता येऊ शकते. तसेच मुलांना पहिल्या महिन्यात गंभीर परिस्थितीत असताना सुसह्य आणि आरोग्यदायी वातावरणात ठेवण्यास यामुळे मदत मिळू शकते. याशिवाय जीई इंडियाने जवळपास १०० बायो इमॅजिन स्कॅनर्सची निर्मिती केली आहे. 'काटकसर मिश्रित आणि 'सहानुभूतीसोबत विज्ञानाची जादू' अनुभवता येते', असे शाम सांगतात. 'टीवी रिमोटप्रमाणे सहजसोप्या रितीने वापरता येईल, अशा उपकरणाची निर्मिती करण्याचे आमचे ध्येय होते. त्यात फक्त तीनच बटण असून, ती देखील तुटणारी नव्हती', असे शाम विस्तृतपणे सांगतात.

भारतात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रामधील उद्योजकांमध्ये सर्जनशीलतेचा आत्मविश्वास वाढत असल्याचे मत पी. राजा मनिक्कम यांनी नोंदवले. पी. राजा मनिक्कम हे सेमीकंडक्टर टेस्टिंग कंपनी असलेल्या टेससॉल्वचे संस्थापक तसेच बंगळूरू येथील प्रमुख केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 'भारतातील मॅन्युफॅक्चरींग क्षेत्र हे आकर्षित करणारे असल्याचे भारतीय विद्यार्थ्यांना समजायला हवे', असे पी. राजा सांगतात. विरोधाभास म्हणजे, बहुआंतरराष्ट्रीय कंपन्यांचा भारतीय इलेक्ट्रॉनिक संशोधन आणि विकास क्षेत्रावर तसेच भारतीय ग्राहक आणि उद्योजकांवर अधिक विश्वास आहे. 'येथे सर्वाधिक आशावाद बाहेर आणि संशयखोर वृत्ती आतमध्ये आहे', असे निरीक्षण पी. राजा यांनी नोंदवले. ते पुढे सांगतात, 'सध्या एखाद्याची नक्कल करण्याची वृत्ती कमी प्रमाणात आढळते. भारताला मजबूत करण्यासाठी नवे संशोधन करण्याची तरुणांची तसेच व्यावसायिकांची इच्छा आहे.' मेक इन इंडियाकरिता हिच योग्य वेळ असल्याचे Skanray च्या विश्व प्रसाद यांनी मान्य केले.

लेखक – मदनमोहन राव

अनुवाद – रंजिता परब