गावात राहून मोबाईल ऍपची निर्मिती, शहरातून गावाकडे जाण्याचा संदेश देणारी ‘अकॉय ऍप्स’

0

प्रगती करायची असेल तर गाव सोडून शहराकडे जावं लागतं असा सर्वसाधारण समज आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाला चांगलं जीवनमान देण्यासाठी हजारो तरुण गाव सोडून शहरात दाखल होत असतात. पण हा समज खोटा ठरवला आहे गुजरातमधल्या सुरेश केराई यांनी...अहमदाबाद शहर सोडून त्यांनी त्यांचं गाव मानकुआमध्ये एक ऍप डेव्हलपर कंपनी स्थापन केली. आतापर्यंत त्यांनी २४ मोबाईल ऍप तयार केले आहेत आणि या ऍपच्या डाऊनलोंडिंगची संख्या १० लाखांपर्यंत गेली आहे. नोकरी सोडून या व्यवसायात शिरण्याच्या निर्णयात सुरेश केराई यांना साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची...


गुजरातमधल्या भूजपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले मानकुआ हे सुरेश यांचं मूळ गाव..त्यांनी आपलं संपूर्ण शिक्षण गुजराती माध्यमातून घेतलं आणि त्यानंतर एमसीए पूर्ण केलं. आयटी क्षेत्रात नोकरी करत असताना तीन वर्ष त्यांनी मोबाईल ऍप तयार केले आणि त्यातले बारकावे शिकून घेतले. २०१२ मध्ये त्यांनी अधिक उत्पन्न मिळावं या हेतूने फ्री लान्सिंग सुरू केलं. आपला प्रोफाईल अधिक चांगला करण्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन आणि तत्वांवर आधारित ऍपची निर्मिती केली. पण हे ऍप बाजारपेठेत उतरवताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यानंतर सुरेश यांनी नोकरी सोडून आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.


गावी परतल्यानंतर सुरेश यांनी पत्नीच्या सहकार्यानं घरीच ऍप बनवण्यास सुरूवात केली. हळूहळू व्यवसाय वाढल्यानंतर त्यांनी गावातच एक ऑफीस सुरू केलं.

तुम्ही मित्रांसोबत खेळू शकाल असे शैक्षणिक प्रश्नमंजुषेवर आधारित गेम्स तयार करण्याला सुरेश यांचं प्राधान्य असतं. सुरेश यांच्या ‘अकॉय ऍप्स’ कंपनीत ८ महिला काम करतात. आजच्या काळात मुली मुलांच्या बरोबरीने शिकतात पण नोकरीची वेळ आली की मुलांना शहराचा मार्ग असतो. पण अजूनही मुलींना बाहेरगावी नोकरीसाठी जाऊ दिलं जात नाही. त्यामुळे गावातील ऑफिसमध्ये जास्तीत जास्त मुलींना नोकरी दिल्याचं सुरेश सांगतात. सुरेश स्वत: या मुलींना प्रशिक्षण देतात. त्यांच्याकडे कंन्टेट रायटर, डेव्हलपर आणि डिझायनर असे सर्व लोक आहेत. ऍपसोबत सेवा देण्याचं कामही कंपनी करते. कंपनीने आतापर्यंत २४ मोबाईल ऍप बनवले आहेत. यात गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधील ऍपचा समावेश आहे. या सर्व ऍपच्या डाऊनलोडची संख्या १० लाखांच्या घरात गेली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक ऍप बनवण्यास प्राधान्य देत असल्याचं सुरेश सांगतात.

लहान मुलांसाठी तयार केलेल्या ‘किंडर गार्डन’ या ऍपचे दोन लाखांपेक्षाही जास्त डाऊनलोडिंग झाले आहे. तर ‘जीके इन गुजराती’ या ऍपचे अडीच लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड झाले आहे. तर सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या ‘जीके इन हिंदी’ या ऍपलाही आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळालाय.


कंपनीतर्फे नियमितपणे ऍप अद्ययावत केले जातात. प्रश्नमंजुषेचे गेम तुम्ही मित्रांसोबत खेळू शकता आणि त्याचा निकाल लगेचच तुम्हाला कळतो. यासाठी त्यांनी गुगल गेम्स सेवेचा वापर केला आहे. नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आर्थिक अडचणी आल्या तरी कुटुंबीयांच्या मदतीने त्यावर मात करुन यश संपादन केल्याचं सुरेश सांगतात. भविष्यात आणखी शैक्षणिक ऍप बनवण्याचा आणि युवकांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. ऍपल आणि एँड्रॉइडसाठी ते ऍप्स बनवतात. आपल्या कामाचा विस्तार करुन जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणींना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचं सुरेश सांगतात.