चायनीच पदार्थांची घरपोच सेवा उपलब्ध करुन देणारं ‘हॅपी हक्का’

चायनीच पदार्थांची घरपोच सेवा उपलब्ध करुन देणारं ‘हॅपी हक्का’

Sunday December 27, 2015,

4 min Read

खूप भूक लागली असेल आणि काही करायचा कंटाळा आला तर पिझ्झा होम डिलिवरीचा पर्याय अनेकजण निवडतात. पण चायनीज पदार्थ खायचे असतील तर घरातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो कारण फक्त चायनीज पदार्थांची घरपोच सेवा देण्याची पद्धत अजून भारतात रुढ झालेली नाही. हा ट्रेन्ड बदलण्यासाठी गौतम घई, आरुषी वैश, पुनीत सैनी आणि चंदर मोहन यांनी हॅपी हक्काची सुरूवात केली. पुनीत, चंदर आणि गौतम यांची ही मूळ संकल्पना होती. नंतर आरुषी त्यांच्या या कामात सहभागी झाली.

दिल्लीत चायनीज पदार्थ सहज मिळतात पण ते फक्त रेस्टॉरंट्समध्येच मिळत असल्याचं त्या दोघांच्या लक्षात आलं. दर्जेदार चायनीज पदार्थ परवडणाऱ्या किमतीत घरपोच देणारी यंत्रणा भारतीय बाजारपेठेत नसल्याचं आमच्या लक्षात आलं असं, गौतम सांगतात. या क्षेत्रात घरपोच सेवा देणाऱ्या अन्य कंपन्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी मोबाईल ऍप किंवा एकच हॉटलाईन नंबरवरुन ऑनलाईन चायनीज पदार्थांची ऑर्डर देण्याच्या पर्यायावर त्यांनी लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं.


गौतम घई, संस्थापक आणि सीईओ

गौतम घई, संस्थापक आणि सीईओ


योग्य किमतीत दर्जेदार पदार्थ घरपोच आणि लवकर देणारं रेस्टॉरंट म्हणून हॅपी हक्का राष्ट्रीय पातळीवर ओळखलं जावं हे ध्येय असल्याचं गौतम सांगतात. प्रवासात, ऑफीसमध्ये किंवा घरी अगदी सहजपणे खाता येतील अशा नाविन्यपूर्ण पॅकेजमध्ये ओरिएन्टल चवीचे पदार्थ पुरवणं हेच ध्येय असल्याचंही गौतम सांगतात. या स्टार्टअपच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्याच्या मार्गातील सुधारणा आणि पदार्थ विक्रीचे ठिकाण तसेच घरपोच सेवा दिल्यानंतर कॅश किंवा कार्डद्वारे पैसे देण्याचा पर्यायही असतो.

संपूर्ण जेवणासोबत चमचे, टिशू पेपर असं साहित्य पुरवलं जाते. त्यामुळे ग्राहक त्या बॉक्समध्येच जेवण करु शकतो. अशा पद्धतीनं खाणं हे अत्यंत सोयीचं आहे. त्यामध्ये ग्राहकाला भांडी चमचे किंवा ताटांचं काय करायचं काळजी करण्याची गरज नाही, असं गौतम सांगतात.

ऑर्डर मिळाल्यानंतरच हे पदार्थ बनवले जातात. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया या पदार्थांवर केली जात नाही तसंच त्यात चवीसाठी दर्जेदार मसाले वापरले जातात. भाजीपाल्याचा भरपूर वापर आणि तेलाचा कमीत कमी वापर करण्यावर भर असल्याचं गौतम सांगतात. ब्राऊन राईससोबत काही आरोग्यदायी सूप आणि सॅलड्सही उपलब्ध आहेत. या पदार्थांची किंमत ५१ रुपयांपासून ते २८९ रुपयांपर्यंत आहे. तर जेवण ९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. तर दोन जणांसाठीचं जेवण ४०० रुपयांना मिळतं.

सध्या दररोज ४०० ते ४५० ऑर्डर्स मिळत असल्याचा दावा हॅपी हक्का करतंय. यातील ८० टक्के ऑर्डर्स या सध्याच्या ग्राहकांकडून मिळतात. सर्व पदार्थ हे त्यांच्या मध्यवर्ती किचनमध्ये तयार केले जातात आणि मग त्यांच्या सर्व आऊटलेट्समध्ये ग्राहकांना घरपोच देण्यासाठी पाठवले जातात. यामुळे या स्टार्टअपला त्यांचं शुल्क कमी ठेवण्यास मदत होते आणि दिल्लीतलं हे पहिलं असं स्टार्टअप आहे. मुंबईतील नूडल प्ले आणि चारकोल बिर्यानी या दोन स्पर्धक कंपन्या आहेत. पण पदार्थांची ऑर्डर देणं अगदी सोपं करणारी यंत्रणा विकसित केली तर ग्राहकांना त्याची सवय लागेल, हे ध्येय असल्याचं गौतम सांगतात. सोर्सफ्यूज या संस्थेच्या सहाय्यानं त्यांनी स्वतंत्र असं घरपोच सेवा देणारं जाळं निर्माण केलंय. सोर्सफ्यूज ही गौतम यांची दुसरी संस्था आहे. ही संस्था डिजीटल उत्पादनं आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम करते आणि स्टार्टअप्स आणि महापालिकांना वेब, मोबाईल आणि इतर सॉफ्टवेअर उपलब्ध करुन देण्याचं काम करते.

या स्टार्टअपचं ऍप हे किचनशी थेट जोडलं असल्यानं ऑर्डर आल्यानंतर ते लगचेच कामाला लागू शकतात. हॅपी हक्काचं स्वत:चं घरपोच सेवा देणारं एक जाळं आहे त्यामुळे ऑर्डर घेऊन प्रक्रिया पूर्ण करणं त्यांना सहज शक्य होतं.

हॅपी हक्काच्या व्यवस्थापनातील विविधता दर्शवण्यासाठी प्रत्येक सभासद वेगळी टोपी घालतो. गौतम यांना व्यवसायातील १० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी अर्नस्ट अँड यंग कंपनीत व्यवसाय जोखीम विभागात काम केलंय.

त्यांनी युरोपीतील सगळ्यात मोठी ट्रॅव्हल कंपनी इ बुकर्ससोबतही काम केलंय. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांच्या जिनेव्हातील सुरक्षा मंडळ आणि क्वार्क इंक यातही काम केलंय. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या SSCBSमधून २००३मध्ये माहिती तंत्रज्ञान विषयात पदवी मिळवली आहे.

हॅपी हक्कामध्ये विस्तार, विक्री आणि दररोजचं काम यावर आरुषी वैश काम करतात. त्यांना इंजीनिअरिंगमधील ३ वर्षाचा आणि बांधकाम क्षेत्रातील एका वर्षाचा अनुभव आहे.

हॅपी हक्काचं विपणन आणि रणनीती आखण्याचं काम पुनीत करतात. व्यवसाय स्त्रोत नियोजनात काही काळ काम केल्यानंतर ते जाहिरात क्षेत्राकडे वळले. २०११मध्ये घरपोच सेवा देणाऱ्या एका दक्षिण भारतीय कंपनीसाठी जाहिरातीचं काम करत असताना चायनीज पदार्थांच्या घरपोच सेवेसाठी एक ब्रँड असावा अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यातूनच हॅपी हक्काचा जन्म झाला.

पडद्यामागील सारं काम आणि कंपनीचं आर्थिक व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी चंदर यांच्यावर आहे. चंदर यांना दररोजचं कामकाज आणि आर्थिक व्यवस्थापनतील १० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सबवेसोबत त्यांच्या नॉयडा इथल्या मुख्य कार्यालयात तीन वर्ष काम केलंय.

हॅपी हक्काला सीएक्स पार्टनर्स या खासगी गुंतवणूक संस्थेचे दिल्लीतील व्यवस्थापकीय भागीदार अजय रेलन यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिलाय. आता या टीमला आणखी निधीसाठी प्रयत्न करायचे आहेत.

सध्या त्यांचे दिल्लीत दोन स्टोअर्स आहेत आणि येत्या दोन वर्षात देशभरात ५० स्टोअर्स सुरू करण्याचं त्यांचं लक्ष आहे. एकूण २०० स्टोअर्सचं लक्ष्य असल्याचं ते सांगतात. यात भौगोलिकदृष्ट्या दिल्ली केंद्रस्थानी असेल अशा जयपूर, चंदिगड, आग्रा, लुधियाना, जालंधर आणि मेरठ या शहरांमध्ये स्टोअर्स सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

घरपोच त्वरीत सेवा देणाऱ्या स्टार्टअपचा विचार केला तर जागतिक पातळीवर तो विक्रम केलाय डॉमिनोज पिझ्झाने.. फोर्ब्जनुसार कंपनीने ७५० टक्क्यांनी प्रगती केलीये.

ही प्रगती फक्त पिझ्झाची चव आणि दर्जा याच्यावर झालेली नाही तर डिजीटल यंत्रणा आणि तंत्रज्ञान रणनीतीचाही या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. डिजिटल यंत्रणेमुळे ग्राहकांना ऑर्डर देणं, पैसे देणे आणि ऑर्डरची स्थिती जाणून घेण्याचा आणि पिझ्झा घेऊन जाण्याची सोय झाली आहे. भारतातही हे शक्य झालंय. हॅपी हक्कालाही अशीच यंत्रणा उभारुन यशस्वी व्हायचं आहे.


लेखक- सिंधु कश्यप

अनुवाद - सचिन जोशी