निष्फळ चर्चा नाही तर प्रत्यक्ष कृती करणाऱ्या मराठीच्या कैवाऱ्याची ट्विटरवर टिवटिव

0

सलग अस्खलित मराठी बोलू शकेल असा मराठी माणूस आता महाराष्ट्रातही क्वचितच सापडेल. दिवसेंदिवस मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचे प्रमाण वाढल्यामुळे अध्ययनाची मुख्य भाषाच इंग्रजी असलेल्या या मुलांमध्ये अस्खलित मराठी शब्दांची जाण कमी असल्याचे अनेकदा पहायला मिळते. खरे तर ‘काळाजी गरज’ असे म्हणून आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेल्या मराठी पालकांनी आपल्या पाल्याबरोबर इंग्रजीसोबतच अस्खलित मराठीमध्येही संभाषण सुरु ठेवल्यास या मुलांना इंग्रजीबरोबरच मातृभाषेचीही तितकीच जाण राहिल. मात्र कळत नकळत ‘इंग्रजाळलेली मराठी’ बोलणाऱ्या पालकांना स्वतःलाच अनेकदा ‘सफरचंदा’ऐवजी ‘ऍप्पल’च जवळचे वाटते. मात्र हे सर्वकाही आज घडलेले नाही. भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा शिरकाव अनेक वर्षांपूर्वीपासून हळूहळू होत गेला आणि काही शब्द मराठी भाषेतीलच शब्द असल्याप्रमाणे इथेच स्थिरावले. तर काहींचा अपभ्रंश करुन मराठीने त्यांना आपलेसे केले. खरे तर भाषाशास्त्रानुसार अशा पद्धतीने दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द काही वर्षांनी मूळ भाषेचेच शब्द समजले जाऊ लागतात आणि ते भाषा अधिक समृद्ध करतात. मात्र एक एक इंग्रजी शब्द म्हणता म्हणता आजकाल मराठी लोकांच्या व्यावहारिक भाषेचे स्वरुप हे अधिकाधिक इंग्रजी शब्दांचा भरणा असलेली इंग्रजी मिश्रित मराठी म्हणजेच ‘मिंग्लीश’ झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र यामुळे अनेक मराठी शब्द हे केवळ शब्दकोश आणि साहित्य कलाकृती यांमध्येच दडले गेले आहेत. अशाच शब्दांचा परिचय करुन देण्याचा वसा उचलला आहे पुण्यातील स्वप्निल शिंगोटे या इंजिनिअर तरुणाने.

कुठल्याही भाषेचा पुढचा प्रवास हा भावी पिढीच्या भाषा कौशल्यावरच अवलंबून असतो. त्यामुळे मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाविषयी केवळ चर्चा करण्यापेक्षा युवा पिढीला मराठीतील अपरिचित आणि लोप पावत चाललेल्या शब्दांची ओळख करुन देण्याची स्वप्निलची मोहिम म्हणूनच कौतुकास्पद आहे. त्याने यासाठी तरुणांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या सोशल मीडियाचा वापर केला आहे. ‘आजचा शब्द’ या ट्विटर हँडलच्या माध्यमातून स्वप्निलने सुरु केलेल्या या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता इंग्रजाळलेल्या मराठीजनांना मराठीच्या सौंदर्यांने आकर्षित केल्याचे स्पष्टपणे जाणवते. वर्षभरापूर्वी स्वप्निलने सुरु केलेल्या या हँडलचे आजघडीला साडेतीन हजाराच्या वर फॉलोअर्स आहेत.

स्वप्निल सांगतो, “ मराठी भाषेच्या परिस्थितीबद्दल अनेकदा बोलले जाते. अशा चर्चा ऐकून वारंवार वाटायचे की केवळ चर्चा करण्यापेक्षा यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मात्र नेमके काय आणि कसे हे सुचत नव्हते. एक - दीड वर्षापूर्वी एका मराठी वृत्तपत्रामध्ये सोशल मीडियावर मराठीचा कमी वापर होत असल्याबद्दल आलेली बातमी वाचली आणि त्यानंतर सोशल मीडियालाच माध्यम बनवायचे ठरविले.” सुरुवातीला एक-दोन महिने त्याने वॉट्सअपवर मित्रांच्या आणि कुटुंबियांसमवेतच्या ग्रुपमध्ये वापरात नसलेले मराठी शब्द त्यांच्या अर्थासह टाकायला सुरुवात केली. याला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्याने ट्विटरचा उपयोग करायचे ठरविले. ‘आजचा शब्द’ या ट्विटर हँडलच्या माध्यमातून दर महिन्याला घोणशा(सुस्त, आळशी), निष्णा(धार लावण्याचा दगड), रिघाव(शिरकाव, प्रवेश, वाट), मेधावी(कुशाग्र बुद्धीचा) यासारखे किमान २० शब्द लोकांपर्यंत पोहचविण्याचा स्वप्निलचा प्रयत्न असतो.

बी.ई कॉम्प्युटर असलेला स्वप्निल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतो. ऑफीसला येता-जाता बसमध्ये मिळणारा वेळ, घरी आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत तो शब्दकोशाच्या सहाय्याने शब्द शोधून काढतो. स्वप्निल सांगतो, “लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. ट्विटर हँडलवर मी दिलेल्या शब्दाव्यतिरिक्त लोक स्वतः सुद्धा काही शब्दांचे अर्थ विचारतात. अनेकजण इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थाची विचारणा करतात.”

स्वप्निल पुढे सांगतो, “मराठीचा वापर वाढावा यासाठी वापरात नसलेल्या शब्दांची ओळख करुन देण्याबरोबरच वेगवेगळ्या मोहिमा मी राबवित आहे. मे महिन्याच्या आसपास आठवडाभर ‘हॅशटॅग हरवलेले शब्द’ ही मोहिम राबविली होती. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये वापरले जाणारे, मात्र आज विस्मृतीत गेलेल शब्द ट्विट करण्याचे लोकांना आवाहन करण्यात आले होते. याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास तीन ते चार हजार ट्विट पडल्या. त्यानंतर २-३ दिवसांसाठी ‘हॅशटॅग नवा शब्द’ ही मोहिम राबविली. ज्यामध्ये जे शब्द केवळ इंग्रजीतच वापरले जातात अशा शब्दांसाठी नवीन मराठी शब्द तयार करण्यासाठी सांगण्यात आले. यावरही एक ते दीड हजार ट्वीट पडले.” अधिकाधिक लोकांनी या मोहिमांमध्ये सहभाग घ्यावा आणि मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी या मोहिमांना स्पर्धेचे रुप देऊन बक्षिसेही ठेवण्यात आली होती. “’हॅशटॅग हरवलेले शब्द’ अंतर्गत मराठवाड्यातील एका प्रोफेसरना जास्तीत जास्त शब्द ट्विट केल्याबद्दल बक्षिस देण्यात आले. तर ‘हॅशटॅग नवा शब्द’ अंतर्गत ‘ई-मेल’साठी ‘विपत्र’ हा शब्द सुचविणाऱ्याला बक्षिस दिले,” असं स्वप्निल सांगतो.

दोन आठवड्यांपूर्वी या हँडलवर ‘हॅशटॅग शब्दमंजूषा’ सुरु करण्यात आली आहे. यामध्ये एखादा मराठी शब्द सांगून लोकांना त्याचा अर्थ विचारण्यात येतो. यालाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामुळे लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढायला मदत होत आहे. ही शब्दमंजूषा यापुढे कायम सुरु ठेवणार असल्याचे स्वप्निल सांगतो. तो पुढे सांगतो, “भविष्यात या हँडलवर आणखी एक उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जे शब्द रोजच्या वापरात सर्रासपणे इंग्रजीतच वापरले जातात अशा १०० शब्दांची यादी करणार आहे आणि या शब्दांसाठी मराठी शब्द सुचविण्याचे आवाहन लोकांना करण्यात येईल. यासाठी सध्या अभ्यास सुरु आहे.”

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्याला लोकांकडून मराठीच्या जास्तीत जास्त वापराची अपेक्षा आहे. तो म्हणतो, “जिथे गरज असेल तिथेच इंग्रजी वापरावी. जिथे गरज नसेल तिथे जास्तीत जास्त मराठीचा वापर केला पाहिजे. कारण भाषा राहिली तरच आत्मसन्मान राहील. आपली ओळख टिकेल. स्वतःचा विकास साधतानाही आपली भाषा जपण्याबाबत आपण युरोपिय देशांकडून प्रेरणा घेऊ शकतो.”

मराठीचा वापर करणारी किमान चारशे ते पाचशे हँडल सध्या ट्विटरवर सुरु असल्याची माहिती स्वप्निल देतो. तसेच ट्विटरनेही नुकतेच देवनागरीत हॅशटॅग सुरु केला आहे. तर मोबाईलवर मराठी की बोर्ड उपलब्ध झाल्याने स्मार्टफोनच्या माध्यमातून सोशल मिडियावर चॅटींग करतानाही देवनागरीचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे देवनागरीतून संदेश पाठविण्याचे प्रमाणही वाढले आहे. सोशल मीडियावरचा मराठीचा वाढता वापर, मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाविषयी स्वप्निलसारख्या तरुणांची तळमळ, त्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या प्रयत्नांना लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता मराठीची प्रभा आणि तिचे अस्तित्व भविष्यातही कायम राहील अशी आशा करायला आता काहीच हरकत नाही.