मूर्तींत जीव ओतणारी महिला शिल्पकार…

मूर्तींत जीव ओतणारी
महिला शिल्पकार…

Monday October 12, 2015,

4 min Read

‘मूर्ती घडवणे मुलींचे काम नाही’ हे मायकेल अँजेलोचे विधान एका सोळा वर्षांच्या मुलीच्या वाचण्यात आले आणि तिने या जगविख्यात कलावंताला आपण खोटे पाडायचेच, असे ठरवून टाकले. नुसतेच खोटे पाडायचे नाही तर मूर्ती घडवणाऱ्यांमध्येही आपण आघाडी घ्यायची आणि तिने तसे पुढे खरोखर करून दाखवले. मूर्ती घडवणाऱ्यांचीही ती आदर्श ठरली. छपाई व्यवसायातील एका कुटुंबात अहमदाबाद येथे तिचा जन्म झाला. आज तिला जग ‘जसू शिल्पी’ म्हणून ओळखते. जसू यांनी मूर्तीकलेत ते स्थान मिळवलेले आहे, जे भल्या-भल्यांसाठी केवळ स्वप्न ठरावे. देशातच नव्हे तर परदेशांतूनही आपल्या कलेची छाप त्यांनी सोडलेली आहे.

अर्थात जसू यांना रातोरात हे यश मिळालेले नाही. त्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाची मोठी कथा आहे. चित्रकलेची विद्यार्थिनी म्हणून त्या मध्य प्रदेशातील झाशीत गेल्या आणि राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा पाहून आपणही मूर्तीकार बनावे, असा संकल्प सोडला. जसू यांच्या यशस्वी मूर्तीकार बनवण्यामागे सर्वांत मोठा वाटा त्यांचे पती मनहरभाई यांचा. दोघांचा प्रेमविवाह. मनहरभाई हे मूर्तीकारच. जसू यांनी त्यांच्याशी पळून जाऊन लग्न केलेले.

मनहरभाई हे मुस्लिम होते. जसू यांच्या कुटुंबीयांचा या विवाहाला प्रखर विरोध होता. मनहरभाईंनी जसूशीच लग्न करायचे म्हणून आपला धर्मही बदलला. ते हिंदू झाले तरीही जसू यांच्या कुटुंबाने त्यांचा स्वीकार केला नाही तो केलाच नाही. जसू आणि मनहरभाईंनी अंबावाडीत एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत आपला संसार थाटला. मनहरभाई अहमदाबादेतील महिपात्र आश्रमात काष्ठ आणि धातू शिल्प घडवण्याची कला मुलांना शिकवत.

image


लग्नानंतर जसू यांनी काही काळ शाळेत मुलांना चित्रकला शिकवली. दोघांचा पगार इतका कमी होता, की मिळून घरखर्च भागवणेही जिकिरीचे जाई. याचदरम्यान त्यांनी वर्तमानपत्रातून राजकोट नगरपालिकेचे मूर्ती घडवण्याचे टेंडर पाहिले. त्या स्वत: स्कुटरवरून राजकोटच्या नगराध्यक्षांना भेटायला गेल्या. जसूबेन यांचे धाडस आणि निश्चय पाहून नगराध्यक्षांनी २५ हजार रुपयांत बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम त्यांना सोपवले.

image


पती मनहरभाई यांना लहान-सहान मूर्ती घडवण्याचा अनुभव होता, पण इथे तर पुतळा साकारायचा होता. ऑर्डर तर घेतलेली होती. मग हे काम दोघांनी आव्हान म्हणून स्वीकारले. उत्तम दर्जाचे करायचे असेही ठरवले. खुप दिवस अर्थात त्यासाठी खल केला. अशात बांग्लादेशातील प्रसिद्ध मूर्तीकार हमिद्दुजमान यांच्याशी त्यांची गाठ पडली. ते कांस्यमूर्ती बनवण्यात वाकबगार होते. अत्यंत मोकळ्या मनाने त्यांनी या दांपत्याची मदत केली. आठवडाभर पुतळा कसा साकारावा त्याचे प्रशिक्षण दिले. बारिकसारिक तपशील ही शिकवला.

अखेर जसूबेन आणि मनहरभाई यांनी साकारलेला पहिला पुतळा राजकोट शहरातील मुख्य रस्त्यावर दिमाखात उभा राहिला. पुतळ्याचे कौतुक झाले. लवकरच गुजरातभरातून त्यांना कामे मिळू लागली. कधीकाळी कामे मिळवणे आव्हान होते तर आता इतकी कामे येऊन पडत की ते पूर्ण करणे आव्हान होऊन बसले. एकतर घर छोटेसे होते आणि या कामासाठी जरा बऱ्यापैकी जागेची गरज होती.

image


याचदरम्यान घरात दोन नवे पाहुणेही आलेले होते. दोन मुलांचे भवितव्य घडवायचे तर आता आपण काबाडकष्ट करणे गरजेचे होते. घराजवळच मग त्यांनी रायपुरात एक जागा भाड्याने घेतली. मूर्तींसाठीचे अवजड साचे हलवणे अवघड काम होते. बरं त्यांच्या गैरहजेरीत मुलं सांभाळणारंही कुणी नव्हतं. हे सगळं एकदाचं निस्तारूनच टाकू म्हणून मग त्यांनी काही मित्रांकडून हातउसनवारी केली. बँकेकडून कर्ज घेतले आणि बस्तरपूरमध्ये एक जमीन खरेदी केली. घर आणि कारखाना एकाच जागेवर केला.

… आणि नेमके आता ऑर्डर मिळणे कमी झाले. पुन्हा चणचण जाणवू लागली. चित्रकलेत जसू पारंगत होत्याच. पेंटिंगची कामेही त्या घेऊ लागल्या. उकई धरणाच्या भिंतींवरील पेंटिंग्ज्चे काम त्यांनी घेतले. तीन महिन्यांत पूर्ण केले. गाडी पुन्हा रुळावर आली. जसू आणि मनहरभाई यांनी आपल्या कामाच्या हिशेबाने ‘शिल्पी’ (मूर्तीकार) हे नवे आडनाव धारण केले.

अडचणींनी अजूनही पिछा सोडलेला नव्हता. मनहरभाईंना कँसर झाला. पुढे लवकरच ते मरण पावले. जसू यांनी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहात स्वत:च स्वत:ला हिंमत दिली. दु:खातून सावरत नाहीत तोवर पुढ्यात एक नवे काम येऊन पडले. दहा फूट उंचीची शिवाजी महाराजांची मूर्ती बनवण्याचे हे काम होते. जसूबेननी ते नवे आव्हान म्हणून स्वीकारले. एवढी उंच मूर्ती त्यांनी या आधी कधीही घडवलेली नव्हती. खूप दिवस कष्ट उपसल्यावर ३.२५ टन वजनाची ही महाराजांची कास्यप्रतिमा त्यांनी साकारली. यश मिळाले. राजकोटच्या रेसकोर्स रोडवर मोठ्या दिमाखात या पुतळ्याचे अनावरण झाले.

image


यानंतर महाराणा प्रताप यांचा अकरा फुटी पुतळा साकारला. शिवाय राजकोट नगरपालिकेसाठी राणी लक्ष्मीबाईंचा पुतळाही साकारला. झांशीत ज्या लक्ष्मीबाईंना (पुतळा) पाहून मूर्तीकार बनण्याच्या आकांक्षेला पहिले घुमारे फुटले होते, त्या लक्ष्मीबाईंचा पुतळा आपल्या हातून साकारला गेला, याचे मोठे समाधान त्यांना होते. जसूबेनचे नाव आणि प्रसिद्धी आता दूरदूरवर पोहोचली. दोन्ही मुलेही आता हाताशी आलेली होती. तरणीबांड होती. दोघांनाही आता त्यांनी आपल्यासोबत कामाला जुंपले. मुलांच्या कौशल्यावर शेवटचा हात फिरवायला सुरवात केली.

जसू यांनी आता सीमा ओलांडलेल्या होत्या. अमेरिकेसह अन्य देशांतून त्यांना कास्यप्रतिमा घडवण्याची कामे मिळू लागली. यशस्वीपणे ती पार पडली. जसूबेन यांनी साकारलेल्या गांधीजी आणि अब्राहम लिंकन यांच्या अमेरिकेत प्रतिष्ठापित प्रतिमा देशाचा गौरव वाढवणाऱ्या आहेत. मान उंचावणाऱ्या आहेत. एक महिला जेव्हा ठरवते तेव्हा काहीही करू शकते, याचा दाखला या प्रतिमा जगाला देताहेत. शिल्पकलेतील त्यांचे योगदान पाहून अमेरिकेतील गुजराती समुदायाने त्यांना एक मानाचा पुरस्कार देऊन गौरवले.

image


अखेर १४ जानेवारी २०१३ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी हृदयविकाराने जसू शिल्पी यांनी जगाचा निरोप घेतला. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी साकारलेल्या पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांची प्रतिभा आजही आपल्यात जिवंत आहे… चिरंतन आहे…