सर्वोत्तम भेटवस्तूंसाठी एकच पर्याय- पल्लवी खेमका यांचं ‘खट्टे मिठे डिझायर्स’

0

पाच हॉस्पीटल्समध्ये प्रशिक्षणार्थी, वैद्यकीय मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण आणि विपणन व्यावसायिक म्हणून तीन महिने केलेलं काम...हा इतका अनुभव गाठीशी असताना पल्लवी खेमकाला उद्योजिका होण्यापासून काहीच रोखू शकत नव्हतं.

एकेकाळी एका वेळेस एका ब्लॉगपासून सुरु झालेल्या या धाडसानं पल्लवी यांचं रुपांतर का उद्योजिकेत केलं. गेल्यावर्षीच्या फेब्रुवारीपासून त्यांची ऑनलाईन भेटवस्तू देण्याची खट्टे मिठे डिझायर्स ही कंपनी सुरु झाली.


अत्यंत कुशाग्र व्यावसायिक बुद्धी ही कदाचित पल्लवी यांना त्यांच्या वडिलांकडून वारशानं मिळालेली देणगी असावी. ते स्वत: वस्त्रोद्योग क्षेत्रातले व्यावसायिक होते. पल्लवी यांनाही नेहमी स्वत:चं काहीतरी करण्याची इच्छा होती. पण नेमकं काय करायचं हे त्यांनाच कितीतरी वर्षं माहिती नव्हतं.

त्यांच्यासोबतचे विद्यार्थी पाहिल्यावर एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, ती म्हणजे त्यांना लहानपणापासूनच मानसशास्त्र विषयात खूप रस होता. काहीजण अगदी गुंड होते, त्यांच्यापैकी अगदी थोडेजण खूप मेहनती होते. पण प्रत्येक मुलाची मानसिकता अगदी वेगळी होती आणि याचमुळे माझ्या मनात विचार सुरु झाला. साहजिकच मी माझ्या उच्च शिक्षणासाठी मानसशास्त्र या विषयाची निवड केली, असं पल्लवी सांगतात. ज्याप्रकारे मुलाची जडणघडण होते, तसाच तो भविष्यात मार्ग निवडतो, यावर त्यांचा विश्वास आहे.

पल्लवी यांच्याबाबतही हे खरं ठरलं.त्यांच्या निर्मितीक्षम मनाला घरातून नेहमीच पोषक वातावरण मिळालं आणि त्यांच्या उद्योजिका बनण्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबाही मिळाला. मी फक्त डोळे मिटून इतकाच विचार केला की एका व्यक्तीला दुसऱ्याला भेट म्हणून काय वस्तू द्यायला आवडेल...आणि अशा प्रकारे माझ्या उत्पादनांचा जन्म झाला...असं पल्लवी आपल्या खट्टे मिठे डिझायर्जमधल्या भेटवस्तूंबद्दल सांगतात.

खट्टे मिठे हे नाव पल्लवी यांना नेहमीच आवडायचं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी याच नावाची निवड केली.

याचा अर्थ नर्मविनोदी असा होतो...तुम्ही एखाद्याची थट्टा करता...या नावाचा अर्थही तसाच आहे, असं पल्लवी सांगतात.

जसं सगळ्या उद्योजकांच्या बाबतीत घडतं तसंच उद्योजिका म्हणून प्रवास सुरु करणं हे पल्लवी यांच्यासाठीही अत्यंत अवघड आणि थकवणारं होतं...पण तरीही पुन्हा कधीही संधी मिळाली तरी त्यांनी हाच पर्याय निवडला असता.

मी अपेक्षा केली होती त्याहीपेक्षा यामुळे बरंच काही मला मिळालं. मी जे शिकले ते खूप मोठं आणि महत्त्वाचं होतं आणि त्याची तुलना कशाशीही होणार नाही, असंही पल्लवी सांगतात.

सुरुवातीला स्वत:चा तीन महिन्यांचा वाचवलेला पगार, तसंच स्वत:चे स्रोत वापरून त्यांनी खट्टे मिठे डिझायर्सची सुरुवात केली. ती अगदी छोटी गुंतवणूक होती. पण त्यातून त्यांना जो नफा मिळाला तोही त्यांनी परत व्यवसायातच टाकला.

उद्योजिका बनण्याचा आत्मविश्वास मिळण्यामध्ये त्यांच्या पहिल्या नोकरीचाही मोठा हात असल्याचं त्या मानतात. खरंतर ती नोकरी सोडल्यानंतर त्या थोड्याशा द्विधा मनस्थितीत होत्या आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे हेही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. त्यानंतर त्यांनी नीट नियोजन केलं आणि मग व्यवसाय सुरु केला.


मी काही जन्मजात उद्योजिका नव्हते, त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टीही कशा करायच्या हे माहिती नव्हतं. मग मला माझा संशोधनाचा पाया वाढवण्याची गरज आहे हे लक्षात आलं, असं पल्लवी सांगतात. पल्लवी यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या सध्याच्या आघाडीच्या इ-कॉमर्सच्या यादीत कधीच नाव पटकावलं आहे. साहजिकच याचा त्यांना आनंदच आहे.

नुकत्याच त्या एक फूटबॉल सामना पाहत होत्या. त्याचवेळेस त्यांना एक गोष्ट जाणवली...ती म्हणजे तुमच्या नशिबाला फक्त तुम्हीच जबाबदार असता. खेळाडू त्यांच्या नेमून दिलेल्या जागी उभे होते आणि तो सामना जिंकण्यासाठी त्यांच्या परीनं ते सर्व प्रयत्न करत होते. साहजिकच तो सामना जिंकण्यासाठी तेच महत्त्वाचं ठरलं, हे पल्लवी यांच्या लक्षात आलं. जोपर्यंत त्यांनी व्यवसायात उडी मारली नाही तोपर्यंत आपल्यामध्ये उद्योजिका होण्याची आणि स्वत:चं काहीतरी करण्याची क्षमता आहे हे आपल्या लक्षात आलं नव्हतं हे सांगायलाही त्या विसरत नाहीत.

खरंतर गुंतवणूक हे त्यांच्यासाठी नेहमीच एक आव्हान होतं. पण त्यांनी त्यांची बचत टाकून ही छोटीशी सुरुवात केली. दिल्लीतील अगदी पारंपरिक घरातून आलेल्या पल्लवी यांना सगळं काही तयार कधीच मिळालं नाही..पण त्याबद्दल त्या कधीही तक्रार करत नाहीत.

मला माझ्या गोष्टी स्वत: करायला आणि माझ्या मार्गानं नव्या गोष्टी शिकायला आवडतात. मी एकटी असताना सर्वोत्कृष्ट काम करू शकते..त्यासाठी खूप मेहनतही करायला लागते . पण दर महिन्याला मी किमान एक किंवा दोन दिवस तरी सुट्टी घेण्याची काळजी घेते, असं पल्लवी सांगतात. महिला उद्योजक असल्यानं अनेकदा कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुम्हाला गांभीर्यानं घेत नाहीत, असं या २५ वर्षांच्या उद्योजिकेचं म्हणणं आहे.

पल्लवी यांचं आयुष्यात एक ध्येय आहे- त्यांना खट्टे मिठे डिझायर्स म्हणजे भेटवस्तूंसाठीचा देशातील सर्वोत्तम पर्याय झालेलं त्यांना पहायचं आहे...

लेखक- सास्वती मुखर्जी

अनुवाद- सचिन जोशी