ऑस्कर नामांकन स्पर्धेतला समृद्ध अनुभव- निर्माती-दिग्दर्शिका समृद्धी पोरे

ऑस्कर नामांकन स्पर्धेतला समृद्ध अनुभव- निर्माती-दिग्दर्शिका समृद्धी पोरे

Saturday January 02, 2016,

3 min Read

काही दिवसांपूर्वी हेमलकसा हा हिंदी सिनेमा ऑस्करच्या नामांकन यादीच्या स्पर्धेत आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि चर्चेचा महापूर आला. काहींना ही बातमी म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट वाटला तर काहींना स्वागतार्ह बाब वाटली. पण या सगळ्यात नोंद घेण्याची बाब होती ती हेमलकसा या हिंदी सिनेमाची. २०१४च्या वर्षात 'डॉ.प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांच्यावर आलेला हा चरित्रात्मक सिनेमा. प्रकाशजींचे अमुल्य असे सामाजिक वर्ष या सिनेमानिमित्ताने मराठीच्या रुपेरी पडद्यावर आले.

हेमलकसा हा याच मराठी सिनेमाचा काही भाग हिंदी भाषेत परत शुट करुन तयार झालेला सिनेमा. ज्याचा ऑस्करपर्यंतचा प्रवास ही तेवढाच थरारक आहे. समृद्धी सांगतात, “डॉ.प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा तयार झाला पण त्यावर्षी हा सिनेमा काही अपरिहार्य कारणामुळे मला राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाठवता आला नाही, ज्याची खंत मला आजही आहे. भारतातनं सिनेमा जेव्हा ऑस्करसाठी पाठवला जातो त्या आधी भारतातली ज्युरी सिनेमांची एक यादी बनवते आणि त्यातनं योग्य सिनेमा ऑस्करसाठी भारताची ऑफिशिअल एंट्री म्हणून पाठवला जातो.”

image


“प्रत्येक इच्छुक निर्मात्याला या यादीत सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्या प्रक्रियेनंतरच सिनेमा ज्युरींपर्यंत पोहचतो. मी ही प्रक्रिया मला आई व्हायचंय या माझ्या पहिल्या सिनेमाच्या वेळी अनुभवली होती पण प्रकाश बाबा आमटे सिनेमाच्या वेळेला पुन्हा एकदा काही कारणांमुळे मला ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. सर्वांनाच माहीती आहे की यावर्षाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी कोर्ट सिनेमाची भारतातली ऑफिशिअल एंट्री म्हणून निवड झाली होती हा सिनेमाही आता या स्पर्धेतनं बाहेर पडलाय ज्याचे दुःखं मला आहे. ”

image


समृद्धी पुढे सांगतात “ऑस्करसाठी कोर्टची अधिकृत निवड झाल्यानंतर मी माझा हेमलकसा हा हिंदी सिनेमा स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. कोर्ट हा सिनेमा ऑस्करच्या फॉरेन फिल्म लँग्वेज विभागाच्या स्पर्धेत होता तर माझा हा सिनेमा ऑस्कर नामांकनासाठीच्या खुल्या विभागात समाविष्ठ होणार होता. मी ही उत्सुकतेने कामाला लागले.”

खरंतर डॉ.प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा तोपर्यंत प्रदर्शित होऊन विविध पुरस्कारांचा मानकरी ठरलेला. पण ऑस्करच्या स्पर्धेत समृद्धी यांनी हेमलकसा हा डॉ. प्रकाश बाबा आमटे याचा हिंदी रिमेक पाठवला.

ज्याबद्दल समृद्धी सांगतात, “ऑस्करच्या खुल्या विभागासाठी म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमा विभाग, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता या विभागासाठी मी सिनेमा पाठवत होते आणि या विभागाच्या निकषानुसार हे स्पष्ट होते की येणारा सिनेमा हा पूर्णपणे कोरा असावा म्हणजे तो कुठेही प्रदर्शित झालेला किंवा त्याचे पब्लिक स्क्रिनिंग झाले नसावे. त्यामुळे हेमलकसा या सिनेमाला ऑस्करच्या या स्पर्धेसाठी पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला.”

image


सिनेमा तर पाठवला पण पुढे फक्त प्रतिक्षा करणे एवढेच त्यावेळी हातात होते. आणि एक दिवस अचानक समृद्धीला त्यांच्याकडून एक मेल आला ज्यात हा सिनेमा ऑस्कर नामांकनाच्या स्पर्धेत सहभागी झालाय असे नमूद करण्यात आले होते. यानंतर खरी लढाई सुरु झाली. कारण तीनशे सिनेमांच्या यादीत हेमलकसा समाविष्ट झाल्यानंतर आता ऑस्करच्या ज्युरीपर्यंत हा सिनेमा पोहचवायचा होता.

समृद्धी सांगतात, “ही प्रक्रिया जेवढी मानसिक आणि शारीरिक रित्या थकवणारी असते तेवढीच खर्चिक आहे. कारण ऑस्करच्या या ज्युरी मेंबर्ससाठी तुम्हाला तुमच्या खर्चाने स्क्रिनिंग आयोजित करावे लागते तेही लॉस एंजलिसमध्ये त्यांनी ठरवून दिलेल्या सिनेमागृहात. इतकंच नाही तर त्यांनी ठरवून दिलेल्या पब्लिक रिलेशन्स कंपनीची तगडी फी भरुन आपला सिनेमा तिथे सतत दोन आठवडे दाखवावा लागतो, तिथल्या स्थानिकांना आणि मान्यवरांना सिनेमाबद्दल माहीती द्यावी लागते. यानंतर रितसर वोटिंग होतं आणि मग सिनेमा ऑस्करच्या अंतिम नामांकनामध्ये समाविष्ट होतो.”

सध्या लॉस एंजलिसमध्ये वोटिंगची प्रक्रिया सुरु आहे. जी येत्या ८ जानेवारीपर्यंत सुरु राहील आणि फेब्रुवारीमध्ये अंतिम निकाल कळतील. हेमलकसा हा सिनेमा सध्या तिथे झळकतोय. आत्तापर्यंत ६५ टक्के ज्युरी मेंबर्सनी हा सिनेमा पहिला.

image


“ऑस्करच्या या स्पर्धेत माझा सिनेमा किती तरतोय हे पहाणं उत्सुकतेचं असेलच पण त्याहीपेक्षा मला समाधान आहे की जे स्वप्न पाहीलं होतं ते खऱ्या अर्थानं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतंय". ऑस्कर निमित्ताने विविध राष्ट्रांमधले मान्यवर आणि प्रेक्षक हेमलकसाविषयी जाणून घेतायत, प्रकाशजींच्या कार्याची दखल घेतायत याचा समृद्धी यांना अत्यानंद आहे.

काही वर्षापूर्वी डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना आर्थिक कारणांमुळे अमेरिकन व्हिसा नाकारला गेला होता, आज त्यांच्यावरचा हा सिनेमा लॉस एंजलिसच्या सिनेगृहात तिथल्या प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय. हा अनुभवही समृद्धी आणि भारतीयांसाठी ऑस्कर विजेत्याची जाणीव करुन देणारा आहे.