तळागाळातील वीणकाम कारागिरांना रोजगाराची संधी देणारे ʻबायलूʼ

तळागाळातील वीणकाम कारागिरांना रोजगाराची संधी देणारे ʻबायलूʼ

Saturday January 02, 2016,

4 min Read

हातमागावर तयार करण्यात आलेल्या त्याशिवाय पारंपारिक पद्धतीच्या साड्या मोठ्या महानगरात विकत मिळणे, ही दुर्मिळ अशी मेजवानीच झाली. मात्र जर तुम्ही कोलकातामध्ये आहात आणि हा अनुभव तुम्हाला एका छताखालीच घ्यायचा असेल, तर बायलू येथे जा. बायलू विणकाम, हाताने विणलेल्या सिल्क आणि कॉटनचे निवडक मिश्रण तसेच विविध प्रकारचे नक्षीकाम यांसाठी प्रसिद्ध असलेले हे कोलकातामधील किरकोळ विक्रीचे दुकान आहे. हातमाग अत्याधुनिक आणि पारंपारिक करण्यासाठी २००२ साली बायलू सुरू करण्यात आले. बाप्पादित्य आणि त्यांची पत्नी रुमी बिश्वास हे या दुकानाचे संस्थापक असून, बंगाल कापडउद्योगात होणारी घसरण पाहून त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली.

image


बाप्पादित्य सांगतात की, ʻबंगाल कापडउद्योगाला तेव्हा खरोखरच उतरती कळा लागली होती. सर्व तंत्रज्ञान उपलब्ध होते मात्र नवी काही प्रात्यक्षिके घडत नव्हती. त्याव्यतिरिक्त फक्त ते विणत असलेल्या पारंपारिक साड्या होत्या आणि पारंपारिक साड्यांचे बाजारपेठेतील प्रस्थ हलले होते.ʼ बाप्पादित्य हे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथून पदवीधर आहेत. तसेच त्यांची पत्नी रुमी यांनी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन डिझाइन येथून पदवी मिळवली आहे. उद्योजकतेच्या जगतात येण्यापूर्वी दोघांनीही कापडउद्योगात काही काळ काम केले आहे. त्यांचे प्रेम आणि कल यांच्यामुळे ते हॅण्डलूमच्या व्यवसायात ओढले गेले आणि वस्त्राची नवीन वीण तयार करणे, हे त्यांचे प्राथमिक लक्ष्य बनले. बायलूने आम्हाला एक नवीन संधी दिली, ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या कपड्यांचे मिश्रण करुन नवीन वस्त्र तयार करत होतो. नवी नक्षी, वीणकाम आणि पोत तयार करणे हे बायलूचे मुख्य काम असल्याचे बाप्पादित्य सांगतात.

image


भारतात तळागाळाचे वीणकाम करणाऱ्या लोकांचे नशीब पालटण्याचा बायलूने प्रयत्न केला. तळागाळातील वीणकाम करणाऱ्या कारागिरांसोबत बायलूने काम केले. तसेच त्यांना कामगारांप्रमाणे रोजगार देण्याऐवजी त्या प्रत्येकाचा उद्योजक म्हणून स्वतःसोबत विकास केला. ते सांगतात, ʻआम्ही तळागाळातील वीणकाम करणाऱ्या कारागिरांसोबत काम करणे सुरू केले. आम्ही त्यांना रंग सुताचे तसेच गुणवत्ता नियंत्रणाचे प्रशिक्षण दिले. आम्ही त्या प्रत्येकामध्ये उद्योजक घडवला. त्यामुळे सध्या आमच्या व्यवसायाची रचना अशी आहे की, आम्ही १२०० हातमाग करणाऱ्यांसोबत काम करतो. विविध प्रकारचे वीणकाम करणारे कारागीर आता उद्योजक बनले आहेत.ʼ याशिवाय ते प्रामुख्याने महिलांना काम देण्याचा प्रयत्न करतात, ज्यांच्याकडे काही उदरनिर्वाहाचे साधन नसते. घरीच बसून काथा वीणकाम करणाऱ्या कुशल वृद्ध महिला यामुळे त्यांच्या संपर्कात आल्या. ते सांगतात, ʻआम्ही वृद्ध महिलांसोबत काम करणे सुरू केले, ज्या त्यांच्या कुटुंबाकरिता काथा वीणकाम करत असत. त्यामुळे आम्ही त्यांना नव्या साड्या देऊ केल्या आणि आमच्यासाठी रजई विणण्यास सांगितले. या लोकसाहित्याशिवाय त्यांना पैसा कमाविण्याचा दुसरा मार्ग नव्हता.ʼ याशिवाय आम्ही गावातील महिलांना सुतकामाचे प्रशिक्षण दिले. जेणेकरुन त्यांच्याकरिता उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध होईल. याशिवाय महिला सबलीकरणासाठी बायलूने काही उपक्रमदेखील राबवले. साड्यांव्यतिरिक्त बायलू स्कार्फ, दुपट्टा, काथा आणि चादर तयार करतात. नक्षीकाम आणि वीणकामात अनेक प्रात्यक्षिके करण्यात येतात. ʻदेशात आम्ही कापडाच्या आत वीणकाम करण्याची पद्धत सुरू केली. त्याशिवाय आम्ही मटका बॉडीजसोबत पारदर्शक दुपट्टा तयार करण्यास सुरुवात केली. आम्ही तयार केलेले जमदानी पॅटर्न फार मोठे आणि ठळक होत होते. त्यात पल्लू पारदर्शक असे आणि त्यावरील नक्षीकाम ठळक आणि भरीव होत असे, जे बायलूचे एक वैशिष्ट आहे.ʼ

image


ते पुढे सांगतात की, ʻलोक त्याचे अनुकरण करत असत आणि बायलू साडीच्या नावाखाली त्याची विक्री करत असत. त्यामुळे बायलू हा एका ब्रॅण्डऐवजी शैली म्हणून ओळखला जाऊ लागला. बायलू हा सध्या जवळपास १२०० हातमागांसोबत काम करतो आणि बंगालमध्ये अजून लाखो हातमाग आहेत.ʼ बाप्पादित्य यांच्या मते, जर एखादा हातमागावरचा कारागिर बायलूच्या शैलीचे अनुकरण करत असेल आणि त्यावर आपली उपजिवीका चालवत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. समाजाची परतफेड करण्याचा हा अजून एक मार्ग आहे आणि त्यांना ते स्पर्धेप्रमाणे वाटत नाही. सध्या ते लिनेनसोबत काम करत आहेत. तसेच साडीमध्ये घिचा सुताचा वापर पहिल्यांदा आम्हीच केला होता, असा दावा ते करतात. त्यालाच नंतर बाजारात ज्युट नावाने ओळखले जाऊ लागले. याशिवाय ते विविध प्रकारचे कॉटन, सिल्क आणि लिनन यांचे मिश्रण करुन नव्या पॅटर्नची निर्मिती करतात.

image


सद्यस्थितीला बायलूची कोलकातामध्ये बायलू नावाची दोन दुकाने आहेत. त्यापैकी एक हिंदुस्थान पार्क येथे तर दुसरे सॉल्ट लेक येथे आहे. याशिवाय ते देशभरातील ४० होलसेल व्यापाऱ्यांद्वारे आपल्या उत्पादनाची विक्री करतात. देशातील विविध राज्यात होणाऱ्या हातमाग प्रदर्शनातदेखील ते सहभागी होतात. सध्या बायलू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशात निर्यात करतात. हातमागाची माहिती असलेल्या लोकांसोबत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. बायलूम यांची उत्पादने सध्या www.byloom.co.in या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहेत. भविष्यकाळात त्यांना हातमाग अधिक अद्ययावत बनवायचा आहे. तसेच हातमागावरील उत्पादने अधिक पारंपारीक आणि सुलभ बनविण्याचा त्यांचा मानस आहे. गेल्या काही वर्षांपासून बायलू तळागाळातील वीणकाम कारागिरांना एक स्थिर राहणीमान देण्याचा प्रयत्न करत आहे. या कारागिरांकरिता त्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची सवलत किंवा अनुदान अपेक्षित नाही, तर ते राहत असलेल्या खेडेगावांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

image


बाप्पादित्य सांगतात की, ʻअनेक तरुण मुलींवर सध्या बायलू साड्यांचा प्रभाव आहे. हातमाग समजण्याची आणि जाणून घेण्याची त्यांच्यात इच्छा आहे. त्यामुळे हातमागाला काही उतरती कळा लागलेली नाही. आपल्याला नक्षीकामात आधुनिकता आणण्याची गरज आहे.ʼ २००२ साली बायलू यांनी दोन हातमागांसोबत काम सुरू केले होते. सध्या ते संपूर्ण पश्चिम बंगालमधील १२०० हातमागांसोबत काम करत असून, ते त्यांचा विस्तार ओडिशा आणि आंध्रप्रदेशमध्ये करण्याचा प्रय़त्न करत आहेत. इतर राज्यांमध्येदेखील ते याच कार्यपद्धतीचा वापर करणार आहेत, ज्यात तळागाळातील हातमाग कारागिरांना रोजगाराची संधी देण्यात येते.

लेखक - डोला समंता

अनुवाद - रंजिता परब