सामान हलवायचं आहे? ट्रक ऑनलाईन बुक करा!

सामान हलवायचं आहे? ट्रक ऑनलाईन बुक करा!

Friday September 02, 2016,

4 min Read

मालवाहतुकीसाठी इंटरनेटवर ट्रकचे आरक्षण करण्यासाठी ‘ब्लॅकबक’ हे एक नवे व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. आयआयटी खरगपूरच्या राजेश याबाजी आणि चाणक्य हृदया या दोन विद्यार्थ्यांनी मालवाहतुक करणाऱ्या उद्योगाचे ऑनलाईन व्यासपीठ निर्माण करून एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे पूर्ण भरलेला ट्रक पाठवायचे काम अगदी सोपे केले आहे.अत्यंत वेगवान अशा भारतीय कृष्णमृगाचे नाव घेतलेली ही ‘ब्लॅकबक’ संस्था, मोठमोठ्या विशाल उद्योगसमुहांपासून ते अगदी छोट्या खाजगी उद्योगांपर्यंत, सर्वांना आपली ट्रक सेवा इंटरनेटवर पुरवत आहे.

आजचा वाहतूक व्यवसाय इतका अकार्यक्षम आहे की, दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणारे असंघटीत ट्रक-डायव्हर्स आणि त्यांचे अगतिक ग्राहक, दोघांनाही, अनंत अडचणीना तोंड द्यावे लागते. केविलवाणी गुणवत्ता, अनिश्चित उपलब्धता आणि संशयास्पद दर-आकारणी या ग्राहकांना नेहमी सतावणाऱ्या अडचणी आहेत. याउलट, वाहतूक क्षेत्रांत नित्य आकारण्यात येत असलेले योग्य दर माहित नसणे, आपल्या वाहनमालमत्तेचा धोकादायक अतिवापर आणि धंद्यातील गंभीर गैरप्रकार या समस्यांना ट्रक-डायव्हर्सना सतत सामोरे जावे लागते. एकंदरीत, सुरळीत व्यवहारासाठी लागणाऱ्या उचित कार्यपध्दतींचा मालवाहतूक क्षेत्रात आज तसा अभावच आहे. ही कार्यपध्दती जास्तीतजास्त सोपी आणि परिणामकारक व्हावी यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे हे दोघे सांगतात.

ब्लॅकबक टीम

ब्लॅकबक टीम


एका कंपनीचा माल दुसऱ्या कंपनीकडे वाहून नेण्याची जबाबदारी पार पाडणारी B2B ही नवी स्टार्टअप संस्था, ट्रक-डायव्हर्सना आणि त्यांच्या ग्राहकांना इंटरनेटच्या माध्यमातून समोरासमोर आणते. त्यांनी शोधून काढलेली आणि फक्त त्यांच्या जवळ असलेली एक आधुनिक संगणक प्रणाली हेच ब्लॅकबकच्या तात्काळ यशाचे रहस्य आहे. मोबाईल आणि कॉम्प्यूटर यांच्यात सुसंवाद साधणारी स्मार्ट मोबाईल इंटरफेस यंत्रणा वापरून, ग्राहक आणि चालक या दोघांनाही जास्तीतजास्त समाधानकारक वाटतील असे व्यवहार शक्य करून देणारी एक अप्रतिम सुजाण सार्वजनिक विक्रीव्यवस्था (इंटेलिजन्ट ऑक्शन) आता या अॅपच्या सहाय्याने वाहतूक क्षेत्रांत उपलब्ध झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर केल्यामुळे ते व्यवहार अत्यंत कार्यक्षमपणे पार पाडता येतात.

वाहतूक क्षेत्रांत इतके आधुनिक तंत्रज्ञान अजून तरी पोहोचलेले नाही आणि त्यामुळे नाविन्यपूर्ण युक्त्या वापरून या धंद्यात वर्चस्व प्राप्त करण्याची अफाट संधी ब्लॅकबकला मिळालेली आहे. या बदलांमुळे गुंतवणूकदारांचा फायदा तर नक्की वाढेलच, पण शिवाय वाहतूक व्यवस्थेचा एक नवा आदर्श समोर येईल. या क्षेत्रातल्या जुनाट प्रथा मोडून नव्या कार्यक्षम पध्दती अंमलात आणण्याचा क्षण आता जवळ आला आहे. ब्लॅकबकने भांडवल गोळा करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात (सिरीज बी मध्ये) टायगर ग्लोबल, अॅपोलेट्टो (डीएसटी—युरी मायनर्स फौंडर्स फंड), अॅक्सेल आणि फ्लिपकार्ट यासारख्या नामवंत कंपन्यांकडून २५ दशलक्ष अमेरिकी डॉलर जमा केले आहेत. यापूर्वी, चालू वर्षाच्या सुरुवातीला त्यांना अॅक्सेल पार्टनर्स आणि फ्लिपकार्टकडून २५ दशलक्ष अमेरिकी डॉलर मिळाले होते. या भांडवलाचा उपयोग कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी, नवीन सेवा-उत्पादने निर्माण करण्यासाठी आणि व्यवस्थापक गटाची जुळणी करण्यासाठी वापरला जाईल.

 ब्लॅकबकचे संस्थापक (उजवीकडून) राजेश याबाजी, चाणक्य हृदया व सुब्बु

 ब्लॅकबकचे संस्थापक (उजवीकडून) राजेश याबाजी, चाणक्य हृदया व सुब्बु


देशातल्या चाळीस शहरांत आज ब्लॅकबक कार्यरत आहे. येत्या वर्षात हा आकडा दोनशे शहरांपर्यंत नेण्याची त्यांची योजना आहे. ते अभिमानाने सांगू शकतात की त्यांच्या ग्राहकवर्गात एशीयन पेंट्स, युनिलिव्हर, ब्रिटानिया, मारिको, ज्योती लॅब, ईआयडी पॅरी यासारख्या मातबर कंपन्या आहेत. ब्लॅकबकच्या पुढील योजना जाहीर करताना कंपनीचे सह-संस्थापक आणि चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर श्री. राजेश याबाजी म्हणतात, “ वाहतूक व्यवसाय हे जगातील सर्वात मोठे असंघटीत क्षेत्र आहे”. “भारतातला मालवाहतुक धंदा हा शंभर अब्ज यूएस् डॉलर्स इतका प्रचंड आहे, आणि त्याचे योगदान एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपीच्या) सहा टक्के एवढे मोठे आहे”.

“परंतु हा महत्वाचा व्यापार उद्योग अत्यंत असंघटीत आणि विस्कळीत असा आहे आणि तोदेखील इंटरनेटचा वापर न करता, जुनाट पध्दतीने चालवला जात आहे”. “ब्लॅकबक स्थापन करण्याचा मुख्य हेतु, प्रवासी व माल वाहतुकीच्या धंद्यात मुलभूत बदल करून तो पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्हावा आणि त्यायोगे प्रवाश्यांची आणि मालाची ने-आण सोपी आणि परिणामकारक व्हावी हाच आहे”.

“आम्ही ज्या अडचणी इथे सोडवायचा प्रयत्न करत आहोत त्या जगभरातसुध्दा सर्वत्र जाणवत आहेत. आम्ही विकसित करत असलेले तंत्रज्ञान अखिल जगताच्याही उपयोगी होईल आणि त्यामुळे आम्हाला जागतिक स्तरावरची सर्वात मोठी वाहतूक कंपनी बनता येईल असे आमचे स्वप्न आहे”.‘एस सेल’चे भागीदार आनंद डॅनिअल म्हणतात,” ब्लॅकबक ही मालवाहतूक आणि दळणवळण क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी व्हावी या त्यांच्या प्रयत्नांत सहभागी होण्यात आम्हाला फार उत्सुकता आहे.”

“आज ब्लॅकबक जवळ स्वतः विकसित केलेली आणि फक्त त्यांच्या जवळ असलेली आधुनिक तंत्रप्रणाली आहे. त्यामुळे, जिथे आधुनिक तंत्रज्ञान अजून पोहोचलेले नाही अशा या मागासलेल्या, विस्कळीत आणि असंघटीत वाहतूक क्षेत्रांत स्वतःची प्रचंड प्रगती करणे ब्लॅकबकला सहज शक्य आहे”.

“सेवक-ग्राहक यांच्यासाठी ते जे तांत्रिक व्यासपीठ निर्माण करत आहेत त्यामुळे इतर कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवसायाची मालवाहतुकीची पध्दतच पूर्णपणे बदलून जाणार आहे”. ब्लॅकबकमध्ये केलेल्या गुंतवणुकीबद्दल फ्लिपकार्टचे सीओओ आणि सहसंस्थापक श्री. बिन्नी बन्सल म्हणतात. “आज देशामधली पुरवठा-साखळी अगदी अविश्वसनीय आहे. त्यामुळे या स्टार्टअपने आणलेल्या वाहतूक-पुरवठा साखळीच्या नव्या कार्यप्रणालीमुळे देशाचा प्रचंड फायदाच होणार आहे. ही क्रांती नक्कीच उत्साहवर्धक आहे. आम्हाला स्वतःलाच या कार्यप्रणालीचे वातावरण अधिक एकीकृत आणि प्रगत व्हावे यात रस आहे आणि म्हणूनच आम्ही या कंपनीत गुंतवणुक केली आहे.

ब्लॅकबकने विकसित केलेल्या नव्या तांत्रिक क्षमता, फ्लिपकार्टची पुरवठाशृंखला अधिक बलवान बनवेलच पण त्याशिवाय, या क्षेत्रात नाविन्यपूर्ण सेवा देण्याची चढाओढ लागण्याची ही पूर्वतयारी आहे असे आम्ही मानतो. त्यामुळे, ही भागीदारी आमच्या व्यवसाय व्यूहरचनेचा एक मोक्याचा टप्पा आहे असा आमचा विश्वास आहे”.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.