'रेड लाईट' भागातील चकाकणारे रंग बदलण्याचा प्रयत्न ‘कट–कथा’

'रेड लाईट' भागातील चकाकणारे रंग बदलण्याचा प्रयत्न ‘कट–कथा’

Saturday December 12, 2015,

4 min Read

गीतांजली बब्बर या दिल्लीच्या जीबी रोडवरील रेडलाईट भागात जातात तेव्हा तिथल्या सेक्स वर्कर्स आपुलकीने त्यांना दीदी म्हणून त्यांची गळाभेट घेतात. हा सामान्य माणसाच्या इभ्रतीचा प्रश्न, इथे येण्यासाठी मन कचरत असेल पण गीतांजली बब्बर या सगळ्यांपासून भिन्न व अनभिज्ञ. इथे राहणाऱ्या सेक्स वर्कर्सच्या आयुष्यात काहीतरी निश्चित असा सकारात्मक बदल घडविण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. आपल्या चांगल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या महिलांना आपली संस्था ‘कट–कथा’ तर्फे सशक्त बनविण्याचा विडा उचलला आहे.


image


‘कट- कथा’ च्या संस्थापिका गीतांजलीने संस्था सुरु करण्यापूर्वी दिल्ली विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या दरम्यान ‘अनंता’ नामक एका थीएटर ग्रुपशी संलग्न झाल्यावर त्यांचा कल सामाजिक कार्याकडे झाला . गांधी फेलोशिपच्या अधिकाराने त्यांनी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातल्या ‘थिरपाली बडी’ गावात दोन वर्षे अनेक नवीन अनुभव घेतले. यानंतर त्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था म्हणजे ‘नाको’ या संस्थेत कार्यरत झाल्या.

 

image


इथेच त्यांचा वास्तविक सामना दिल्लीच्या जीबी रोडच्या रेड लाईट भागाशी झाला. तेव्हा त्यांच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले की तेथील वातावरण कसे असेल, आपण कशा प्रकारे तिथे काम सुरु करायचे. गीतांजली सांगतात की,’ जेव्हा मी पहिल्यांदा एका कोठ्यावर गेले तेव्हा तिथले वातावरण बघून तीन रात्र झोपू शकले नाही आणि या विचारांनी त्रस्त झाले की दिल्लीच्या मधोमध आणि इंडिया गेटच्या काही अंतरावर प्रत्येक क्षणाला एक मुलगी विकली जात आहे, प्रत्येक क्षणाला ती मरत आहे पण त्यांच्याबद्दल विचार करायला कोणालाही वेळ नाही. या घटनेने माझ्या अंतर्मनावर खोलवर परिणाम केला. 

यानंतर गीतांजलीने वेगवेगळ्या कोठ्यावर जाऊन तिथल्या स्त्रियांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी एक जवळीक निर्माण झाली. कुणासाठी त्या लहान बहिण , दीदी तर कुणासाठी मुलगी झाल्या. या दरम्यान काही कोठ्यांवर त्यांना वाईट वागणूक मिळाली पण त्याची पर्वा न करता निडर होऊन त्या महिलांच्या मदतीसाठी जातच राहिल्या.


image


गीतांजलीला काही कोठ्यांवरच्या महिलांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली- तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले पण दुसऱ्या काही महिलांनी त्यांना स्वतःला शिकविण्याचा आग्रह केल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शनिवार आणि रविवार त्या कोठ्यांवर जाऊन महिलांना शिकवण्याचे काम करू लागल्या. प्रारंभी त्यांना या कामात जीबी रोडवर असणाऱ्या दवाखान्यातील डॉक्टर रईस यांनी मदत केली. दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर गीतांजलीने महिलांना शिकवण्यास प्रारंभ केला पण काही अडचणींमुळे ती जागा सोडावी लागली. म्हणून नाईलाजाने गीतांजली कोठ्यावर जाऊन शिकवू लागली कारण जीबी रोडवर राहणाऱ्या स्त्रिया दुसऱ्या कोठीवर जात नसत. काही काळाने गीतांजलीने नोकरी सोडून दिली आणि स्वतः त्यांना शिकवू लागल्या. त्यांच्या खऱ्या निष्ठेने आणि इमानदारीने त्यांचे मित्र प्रभावित होऊन तेसुद्धा या अभियानाला जोडले गेले. मित्रांच्या सहकार्याने त्या महिलांची मुलेसुद्धा अभ्यासात रुची दाखवू लागली. प्रयत्न दोन्हीकडून सुरु झाले. या मुलांना अभ्यासाबरोबर वेळोवेळी सिनेमा पण दाखवू लागले. अनेक मुलांच्या सहभागामुळे त्यांनी जीबी रोडवर जागा भाड्याने घेतली. आज त्या मुलांपैकी चार मुले दिल्लीच्या निजामुद्दीन भागातल्या एका शाळेत शिकत आहेत व त्यापैकी एकाला शिष्यवृत्ती मिळाली आहे. आज त्यांच्याद्वारे शिक्षित मुलांनी फोटोग्राफी, नाटक आणि नृत्य यात प्राविण्य मिळविले आहे. तसेच यापैकी चार मुलांची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ( एनएसडी) मध्ये झाली आहे. अशाप्रकारे गीतांजलीने त्यांच्या स्वप्नांना पंख दिले आहेत.


image


गीतांजली सांगतात की, ‘कट-कथा’ ही संस्था अशा महिलांना समाजात आपली ओळख स्थापन करण्याच्या उद्देशाने जीबी रोडवर राहणाऱ्या ५०० पेक्षा जास्त महिलांचे व्होटरकार्ड, रेशनकार्ड आणि आधारकार्ड बनविले आहे. तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांचे बँकेत खाते पण उघडले आहे. जीबी रोडवरील काळ्या एकाकी दुनियेत राहणाऱ्या महिलांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी ‘कट-कथा’ एका नोटबुक प्रोजेक्टवर काम करीत आहे. इथे राहणाऱ्या महिला शिल्पकला, फोटोफ्रेम, कानातले डूल आणि टिकल्या इ. बनविण्याचे काम करीत आहे जेणेकरून स्वतःचा आर्थिक विकास करण्यात त्या सफल होतील. 


image


या महिलांच्या एकत्रित विकासासाठी त्या दिवाळी, नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करतात. ‘कट-कथा’ मध्ये ७ लोकांची एक मजबूत टीम आहे आणि १०० सहाय्यकांची जोड आहे. आज गीतांजली आणि त्यांची संस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रुपात रोडवर राहणाऱ्या ६६ मुलांची मदत करीत आहेत. मुलांच्या गरजेनुसार ‘कट-कथा’ चे कार्यकर्ते त्यांच्यासाठी दिवस-रात्र काम करीत असतात. आम्ही जीबी रोडवर राहतो हे आता मुले आत्मविश्वासाने सांगतात. गीतांजलीची अशी इच्छा आहे की १५ ऑगस्टला सरकारने ‘सेक्स् फ्री डे’ घोषित करावा म्हणजे त्या दिवशी देशातले सगळे कोठे बंद राहतील आणि तो दिवस त्या महिलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगता येईल. 

Website : www.kat-katha.org

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close