आदिवासींच्या सेवेसाठी नोकरीला दिला पूर्णविराम, मोबाईलद्वारे करत आहे त्यांच्या समस्येचे समाधान

आदिवासींच्या सेवेसाठी नोकरीला दिला पूर्णविराम,
मोबाईलद्वारे करत आहे त्यांच्या समस्येचे समाधान

Sunday February 14, 2016,

5 min Read

असे म्हटले जाते की एका चांगल्या व्यक्तीची ओळख त्याने संपादन केलेल्या यशामुळेच होत असते, मात्र यशाबरोबरच आपल्या गुणांचा सदुपयोग करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात बीबीसी सारख्या मोठ्या संस्थानांबरोबर आणि गार्डियन मध्ये दोन दशक कामाचा अनुभव असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मातृभूमीच्या ओढीने असे काम सुरु केले ज्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. शुभ्रांशु चौधरी, एक असे व्यक्तित्व आहे ज्यांनी आदिवासी भागातील राहणाऱ्या लोकांच्या अडचणींना समजून, नक्षलवादाच्या समस्येचे मुळ कारण शोधून मग आधुनिक माध्यमाच्या मोबाईल व इंटरनेटद्वारे अशा प्रश्नांचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. ज्यानुसार लोकतांत्रिक व्यवस्थेला मजबूत करून एक सामान्य माणूस सुद्धा बातमीदाराप्रमाणे आपली समस्या दुसऱ्यांसमोर निर्भीडपणे मांडू शकतो. ते सुद्धा आपल्या मोबाईल फोनद्वारे.


image


शुभ्रांशु चौधरी यांचे छत्तिसगढच्या कोरिया जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्या असलेल्या मनेंद्रगढ मध्ये बालपण व्यतीत झाले. यामुळेच लहानपणापासून त्यांना आदिवासींच्या चालीरीती, त्यांची गरिबी, जीवनमान जवळून अनुभवले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करायचे, अन्यायाविरुद्ध लढायचे हे त्याने लहानपणापासूनच ठरवले होते, पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास आणखीनच बळावला होता.


image


शुभ्रांशु अशा वातावरणात लहानाचे मोठे झाले जिथे देशातील सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या स्थायिक असून नक्षलवादी समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात वीज, पाणी, रस्ते,शिक्षण तसेच स्वास्थ यासारख्या मुलभूत सुविधा आदिवासींपासून कोसो दूर आहे. अशिक्षित असल्यामुळे प्रशासनापर्यंत आपला आवाज ते पोहचवू शकत नाही. आता मात्र शुभ्रांशु चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती बदलताना दिसत आहे. हा त्यांच्याच प्रयत्नांचा परिणाम आहे की आता आदिवासी लोक आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने प्रशासनापर्यंत आपल्या तक्रारी नि:संकोच सांगू शकतात तसेच त्यांच्यावर दबाव आणून आपल्या भागातील अपूर्ण कामं पूर्ण करू शकतात.


image


पेशाने पत्रकार असलेले शुभ्रांशु चौधरी सांगतात की, "आपण प्रायोगिक वापर जर रचनात्मक पद्धतीने केला तर त्याचे परिणाम हे लाभदायकच असतात. प्रसारमाध्यमाचा वापर जर लोकतांत्रिक पद्धतीने केला तर अनेक समस्यांचे निवारण होऊन आपण शांततेचे वातावरण प्रस्थापित करू शकतो’’.


image


‘सीजी नेट स्वर’ज्याचा अर्थ आहे सेन्ट्रल गोंडवानांचा आवाज. हे असे मंच आहे जिथे आदिवासींच्या समस्या मांडल्या जातात. त्यांना समजावून त्या सोडवल्या जातात आणि हे फक्त एका मोबाईल फोनद्वारे शक्य आहे.

शुभ्रांशु चौधरी यांना वाटते की आजच्या काळात मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनत चालली आहे तसेच तो प्रत्येकाच्या खिशात असतो, म्हणून गोंडवाना भागातील कोणताही आदिवासी ८०५००६८००० या नंबरवर संपर्क करून आपली तक्रारीची नोंद करू शकतो. ज्या नंतर ‘सीजी नेट स्वर’ ची टीम या तक्रारी ऐकून त्यावर विचार करून त्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. विशेष बाब ही आहे की, ज्या व्यक्तीला एखादी समस्या असते तेव्हा त्या व्यक्तीने सांगायचे असते की त्यांनी त्या समस्येला दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले आहे, कोणत्या अधिका-यांना भेटले व कोणते लोक त्यांना मदत करू शकतात. यासाठी त्यांना त्या अधिका-यांच्या दूरध्वनी क्रमांकाची नोंद द्यावी लागते. तसेच ते संदेश देणाऱ्या लोकांना निवेदन करतात की त्यांनी समस्या निवारण्यासाठी संबंधित अधिका-याला विनंती करावी. ज्यानंतर कोणताही सामान्य माणूस संबंधित अधिका-याला फोन करून काम सांगू शकतो. याप्रकारे जिथे प्रशासनिक अधिका-यावर कामाचा दबाव पडतो, तिथे समस्येची जाण नसलेले अधिकारी काम करायला बांधील होतात. उदाहरणार्थ जर एखाद्या गावात शिक्षक येत नसेल तर त्याची तक्रार ‘सीजी नेट स्वर’च्या मंचावर करू शकतात. त्यानंतर हे लोक दिलेल्या क्रमांकावर शिक्षकाने शाळेत नियुक्त होण्यासाठी दबाव टाकू शकतात. या प्रकारे समस्येचे समाधान होऊन इतरांना आपली समस्या मांडण्याचे बळ मिळते.


image


शुभ्रांशु यांनी युवर स्टोरीला सांगितले की, "आम्ही लोकांना त्यांची तक्रार कशा प्रकारे मांडायची याचे प्रशिक्षण देतो. यासाठी आम्ही जागोजागी चौकात नाटक,कठपुतली नृत्याचे आयोजन करतो. यामुळे प्रेरित होऊन आज हजारो आदिवासी पत्रकार बनले आहे जे इतर लोकांच्या सहयोगाने आपल्या समस्या मांडत आहे’’.

शुभ्रांशु चौधरी यांच्या मतानुसार ते सन २००४ मध्ये रेडीओ माध्यमाद्वारे लोकांची समस्या एकमेकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत होते पण काही अडचणींमुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर सन २००९ मध्ये त्यांना एक अभिनव कल्पना सुचली की मोबाईलला इंटरनेटशी जोडून एक अशी ताकद बनवू शकतो जो लोकांच्या समस्येच्या समाधानासाठी मदत करू शकेल. गोंडी भाषेचा हा मंच आज फक्त छत्तीसगड मध्येच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेश, ओरिसा, मध्यप्रदेश, आंद्रप्रदेश आणि कर्नाटक मधील लोकांना उपलब्ध झाला आहे. शुभ्रांशु चौधरी यांच्यानुसार त्यांच्याकडे दररोज सरासरी दीडशे मोबाईल संदेश येतात. यासंदेशा मध्ये लोक आपल्या समस्येबरोबर आपल्या आवडीनिवडीचा पण समावेश करतात. ‘सीजी नेट स्वर’ ही एक ४५ लोकांची टीम आहे. जे भोपाळमधून आपल्या कामाची पूर्ती करतात. पूर्ण पणे अनुदानीत ‘सीजी नेट स्वर’ला शुभ्रांशु चौधरी पुढच्या स्तरापर्यंत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे ते म्हणजे ‘ब्लू टूथ रेडीओ’. याच्या मार्फत गावातील लोक आपल्या सामान्य मोबाईल फोन द्वारे आपल्या भाषेत बोलतात व गाणे रेकोर्ड करतात. त्यानंतर त्याला इंटरनेट रेडिओचे रूप देवून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाठविले जाते जिथे ब्रॉडबॅन्डची सुविधा उपलब्ध आहे. यानंतर गावातील एक व्यक्ती ग्रामपंचायतच्या कार्यालात जाऊन ब्लूटूथ मोबाईलफोन मध्ये त्या रेडीओ कार्यक्रमाला डाऊनलोड करून आपल्या गावात येऊन त्याच कार्यक्रमाला ब्लूटूथच्या मदतीने साथीदारांच्या मोबाईलवर विनाखर्च पाठवतात, शेअर करतात.


image


याव्यतिरिक्त शुभ्रांशु चौधरी सांगतात की आतापर्यंत या मंचावर स्थानिक समस्या मांडल्या जायच्या पण आता त्यांची योजना कृषी व स्वास्थ्य क्षेत्रात पुढे जाण्याची आहे म्हणजे लोक एकमेकांबरोबर आपल्या माहितीची भागीदारी करू शकतील. शिवाय त्यांनी अजून रेडीओ स्टेशन उघडण्याचे स्वप्न सोडले नाही. यासाठी ते निरंतर प्रयत्नशील आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाच्या त्या स्तराचा आवाज पोहचू शकेल ज्याची आजपर्यंत कुणीही दखल घेतली नाही, समाजाच्या त्या व्यक्तीला हिम्मत मिळू शकेल जो आज सगळ्यात मागे उभा आहे.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

एका आयआयटी अभियंत्याने शोधला ‘उपाय’,गरीब मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा!

गावात राहून मोबाईल ऍपची निर्मिती, शहरातून गावाकडे जाण्याचा संदेश देणारी ‘अकॉय ऍप्स’

‘टिच फॉर इंडिया’तून जय मिश्रा यांची गरीबांच्या शिक्षणासाठी धडपड!

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close