राज्यातील वाईन उद्योगात गुंतवणुकीची जर्मन शिष्टमंडळाने दर्शविली तयारी

राज्यातील वाईन उद्योगात गुंतवणुकीची

जर्मन शिष्टमंडळाने दर्शविली तयारी

Wednesday November 23, 2016,

2 min Read

जर्मनीमधील ऱ्हिनेलँड-पॅलाटिनेट राज्याचे आर्थिक, परिवहन व कृषी विषयक मंत्री व्होल्कर विषिंग यांनी आज शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली व जर्मनमधील लघु व मध्यम उद्योग कंपन्या महाराष्ट्रात वाईन तसेच तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. देसाई यांनी जर्मन उद्योगांनी कृषी, संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन करून त्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य व सहयोग करण्याचे आश्वासन दिले.

image


जर्मनमधील ऱ्हिनेलँड –पॅलाटिनेट राज्याचे मंत्री विषिंग यांनी देसाई यांची पुरातन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी उपस्थित होते. जर्मन शिष्टमंडळात ऱ्हिनेलँड-पॅलाटिनेट राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य आमदार सर्वश्री ख्रिस्तीन बालडॉफ, जुट्टा बाल्टिझेम रोगलर, स्टिव्हन विंक, मॅथिस जो, डॉ. टन्जा मॅक्चलेट, डॉ. जॉय वाईंगार्टन, अल्मुट रुसबिल्ट, माईक बत्रा यांचा समावेश होता.

 व्होल्कर विषिंग म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून उद्योगांना या राज्यात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जर्मनमधील लघु व मध्यम उद्योजक हे महाराष्ट्रात वाईन, तंत्रज्ञान, कृषी आधारित प्रक्रिया क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने मदत करावी.

image


राज्यातील गुंतवणुकीविषयी माहिती देऊन देसाई म्हणाले की, महाराष्ट्र हा देशात उद्योगात सर्वात अग्रेसर राज्य आहे. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना राज्य शासन पाणी, वीज, जमीन यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असते. तसेच इतर सोयीसुविधाही देण्यात येतात. त्यामुळे जागतिक तसेच स्थानिक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी नेहमीच इच्छूक असतात. जर्मनीमधील अनेक मोठ्या कंपन्यांनी यापूर्वीच येथे उद्योग सुरू केले आहेत. आता लघु व मध्यम उद्योगांनीही राज्यात गुंतवणूक करावी, त्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. राज्य शासनाने कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांवर जास्त भर देण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कापूस उत्पादन क्षेत्रात वस्त्रोउद्योग पार्कची उभारणी, फूड पार्कची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगितले. चंद्रा यांनी राज्यातील उद्योग विषयक विविध सवलतींची माहिती यावेळी दिली. तसेच कृषीआधारित प्रक्रिया उद्योग, संरक्षण उत्पादन उद्योग तसेच वाईन उद्योगासाठी राज्यात पोषक वातावरण असल्याचे सांगितले.