बंगळुरू शहर वाहतूक पोलिस “प्लास्टिक मनी” स्वीकारण्यास सज्ज

0


भारताची स्टार्टअप राजधानी असलेल्या बंगळुरू शहरामध्ये वाहतूक पोलिसांनी “प्लास्टिक मनी” वापरण्यास पुढाकार घेतला आहे. पुढील आठवड्यापासून या पद्धतीची अंमलबजावणी केली जाईल. “प्लास्टिक मनी” अर्थात रोख पैश्यांऐवजी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणे.

आता बंगळूरू शहरामध्ये जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि पैसे नसल्याचे कारण सांगत दंड भरण्यास नकार दिला तरी काळजी करण्याचे कारण नाही तुम्ही तुमच्या कार्डमार्फत दंड भरू शकता. इथले पोलीस कार्ड पेमेंटचा आनंदाने स्वीकार करतील आणि रस्त्यावरच तुम्हाला पावतीसुद्धा देतील. कार्ड पेमेंट साठी लवकरच पोलिसांना हाताळ्ण्याजोगी १०० पीओएस मशीन्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त (ट्रॅफिक) अभिषेक गोयल यांनी युवर स्टोरीशी बोलताना सांगितले. 

८ नोहेंबर पासून ५०० आणि १००० रुपयाच्या नोटांवर जेव्हापासून बंदी घालण्यात आली तेव्हापासून अनेकजण पैसे उपलब्ध नसल्याचे सांगत पोलिसांना चकमा देत सर्रास नियमांचे उल्लघन करत होते. त्यामुळे ट्रॅफिक समस्या आणखी वाढल्या होत्या. ट्रॅफिक नियमांचे उल्लघन करणारे कार्डद्वारे पेमेंट घेण्यास सांगत होते. पीओएस मशीन्स उपलब्ध नसल्याकारणाने अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या त्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात ट्रॅफिक पोलसांनी कठोर भूमिका घेत रोख रक्कम भरणे सक्तीचे केले होते, पैसे भरा नाहीतर तोपर्यंत वाहन ताब्यात द्या. यामुळे झाले असे की ऑफिसला जाणारे त्यांच्या मित्रांकडून किवा नातेवाइकांकडून पैसे येईपर्यंत रस्त्यावरच ताटकळत उभे राहायचे. ३०० ते ५०० रुपये दंड भरण्यासाठी त्यांचा वेळ वाया जायचा आणि पुढे ऑफिसमध्ये जायला उशिर व्हायचा. त्यामुळे विनाकारण वादावाद निर्माण व्हायचे, पोलीस उपायुक्तांनी पुढे सांगितले.

“सुरवातीला १०० PoS मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याने आता कोणतेही कारण दिलेले चालणार नाही, मुकाट्याने डेबिट किवा क्रेडीट कार्ड च्या माध्यमातून दंड भरावा लागणार आहे. हे मशीन्स वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात येतील, जेणेकरून दंड भरणाऱ्याला कोणतीही असुविधा होणार नाही”.

बंगळूर हे भारतातील पहिले मोठे शहर आहे ज्यांनी प्लास्टिक मनीचा स्वीकार करत कॅशलेस पद्धतीचा अवलंब केला आहे, या पद्धतीची अंमलबजावणी ईद च्या सुट्ट्यां नंतर पुढील आठवड्यात होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये सुद्धा वाहतूक पोलिसांनी प्लास्टिक मनीचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे.

५०० आणि १००० रुपयाच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर पीओएस मशीनचा वापर आता सर्वच किरकोळ विक्रेते करू लागले आहे. शक्य होईल तेथे पीओएस मशीनचा वापर करण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. २ डिसेंबर पासून टोलनाक्यावर देखील या पद्धतीची अंमलबजावणी सुरु आहे.

बंगळूरू वाहतूक पोलिसांच्या या सुविधेमुळे आधीपासूनच प्लास्टिक मनी वापरणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. उमाश्री विश्वनाथ एटीएम मधून पैसे काढण्याकरिता गेली असता, तिथली लांबलचक रांग बघून घाईघाईने रांगेत नंबर लावण्या करिता तिची दुचाकी चुकीच्या ठिकाणी उभी केली. नंतर तिने पहिले की तिची दुचाकी वाहतूक पोलीस उचलून ट्रकमध्ये टाकत आहे. तिने तसच पळत जाऊन पोलिसांना विनंती केली की तिने चुकून नो पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क केली.  पोलसांनी जेव्हा ३०० रुपये दंड भरण्यास सांगितला तेव्हा तिने पैसे नसल्याने ती एटीएम समोर रांगेत उभी असल्याचे सांगितले. पण तिचे म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले नाही आणि तिला दंड भरण्यासाठी पुन्हा एटीएमच्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागले. त्यानंतर पैसे काढून ती तिची दुचाकी ताब्यात घेण्याकरिता जेव्हा पोलिस स्थानकात पोहोचली तेव्हा मात्र आणखी एका अडचणीला तिला सामोरे जावे लागले ते म्हणजे २००० रुपये तिच्याकडे आणि पोलिसांकडे देखील सुट्टे नव्हते. त्यातल्या त्यात तिला तिच्या मुलाला शाळेतून घरी आणायचे होते. त्यामुळे सुट्ट्या पैशांसाठी तिने तिच्या पतीला ऑफिसमधून बोलावून घेतले आणि दंड भरून दुचाकी ताब्यात घेतली. या सर्व गडबडीमध्ये पाच तास निघून गेले होते आणि मनस्ताप झाला तो वेगळाच इंदिरानगरच्या रहिवाशीने सांगितले.

यासारखाच आणखी एक किस्सा आहे. मनीष शर्मा, याने सिग्नल तोडल्यामुळे त्याला वाहतूक पोलिसाने दंड भरावयास सांगितला. “माझ्याकडे रोख रक्कम उपलब्ध नसल्याकारणाने कार रस्त्याकडेला पार्क करावी लागली आणि चावी पोलिसांच्या ताब्यात द्यावी लागली,” मनीष शर्मा यांनी सांगितले. मनीष यांनी वाहतूक पोलिसांशी वाद घालणे टाळले. कारण दंडाची पावती त्यांना देण्यात आली आणि सांगण्यात आले की रोख रक्कम भरणे बंधनकारक आहे, तेव्हा रक्कम भरा आणि चारचाकी ताब्यात घ्या. मनीष यांच्याकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती त्यांनी त्यांच्या मित्रांना फोन केले, त्यापैकी एकजण येऊन त्यांना रक्कम देऊन गेला. पण रस्याच्या कडेला त्यांना दोन तास वाट बघावी लागली कारण दंड भरण्याचा दुसरा कोणताही पर्याय तिथे उपलब्ध नव्हता.

वाहतूक पोलीस उपायुक्त गोयल यांनी सांगितले “आता मनीष शर्मा सारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड भरताना फारश्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आम्ही वाहतूक पोलिसांतर्फे एक बँक खाते उघडणार आहोत, या खात्याशी हे पीओएस मशीन जोडले जातील म्हणजे दंडाची सर्व रक्कम बँक खात्यात जमा होईल.”

“इतर व्यावसायिक ज्याप्रमाणे व्यवहार करतात त्याचप्रमाणे हा व्यवहार देखील केला जाईल. कार्ड स्वाईप केल्यानंतर पासवर्ड कार्डधारकच टाकणार, त्यानंतर एक पावती पोलिसांकडे रेकॉर्ड म्हणून राहिल आणि दुसरी कार्डधारकाकडे. त्यामुळे हा व्यवहार सुरक्षितपणे हाताळला जाईल,” गोयल यांनी सांगितले.

पुढील तीन महिन्यात बंगळूरच्या सर्व वाहतूक पोलिसांकडे जे पोलिस उपनिरीक्षकाच्या पदावर आहेत त्यांच्याकडे पीओएस मशीन सुपूर्द करण्यात येतील. जेणेकरून प्लास्टिक मनी स्वीकारण्यास त्यांना कोणतीही असुविधा होणार नाही.

लेखक : अनिल बुदूर लुल्ला
अनुवाद : नंदिनी वानखडे पाटील