दूधविक्रेता ते रिटेल विश्वाचा सम्राट 'वॉलमार्ट' कंपनीच्या मालकाचा थक्क करणारा प्रवास

0

एक असा काळा होता ज्या काळात रोजच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरावं लागत असे. प्रत्येक वस्तू एकाच ठिकाणी मिळणं अशक्य होतं. हळूहळू काळ बदलला. बाजार बदलला. महत्त्वाचं म्हणजे लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली. याच बदलामुळे बाजारात अनेक नव्या गोष्टींचा समावेश झाला. रिंगल स्टोर्सनं शॉपिंग मॉलची जागा घेतली. तसंच किराणा दुकानांची जागा रिटेल शॉपनं घेतली. रिटेल शॉपच्या विश्वात जगभरात अग्रभागी असलेलं नाव म्हणजे वॉलमार्ट. रिटेल व्यवसायाचा जनक अशीही वॉलमार्टची ओळख आहे. २७ देशात ११ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी वॉलमार्टच्या रिटेल शॉप्सची साखळी आहे.

अब्जावधी रुपयांचा हा व्यवसाय सुरु करणा-या व्यक्तीचा जन्म हा अमेरिकेतल्या एका शेतकरी घरामध्ये झाला. त्यांना दोन वेळेसच्या जेवणासाठीही सुरुवातीला संघर्ष करावा लागत असे. रोजची खायची भ्रांत असल्यानं पोट भरण्यासाठी मोठा संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला. पण या संघर्षावर मात करुन त्यांनी वॉलमार्ट हे रिटेल विश्वातलं साम्राज्य उभ केलं. हे साम्राज्य उभं करणा-या कंपनीच्या मालकाचं नाव आहे सॅम वॉल्टन.

अमेरिकेतलं ओक्लाहामा हे सॅम वॉल्टन यांचे गाव. त्यांच्या वडिलांकडे असलेल्या शेतीमध्ये घरचा खर्चही भागत नसे. त्यामुळे अखेर नाईलाजानं सॅमचे वडिल थॉमस वॉल्टन यांना आपलं शेत विकून एका नातेवाईकाकडे विमा एजंट म्हणून नोकरी करावी लागली. या सर्व कठीण काळातही सॅमचा अभ्यास सुरुच होता. ते अभ्यासात हुशार होते. कॉलेजमध्ये त्यांना ईगल स्काऊट पुरस्कारही मिळाला. पण हळू हळू घरातली आर्थिक परिस्थिती आणखी खालवत होती. घर चालवण्यासाठी वडिलांचे उत्पन्न अपूरे होते. घरातल्या परिस्थितीमुळे सॅम अस्वस्थ होते. त्यावेळी पैसे कमावण्यासाठी सॅम यांनी उपाय शोधला. त्यांच्या घरच्या गाईचं दूध ते विकू लागले. तसंच पेपर घरोघरी टाकण्याचं कामही त्यांनी सुरु केलं. आपला अभ्यास सुरु असताना अनेक लहान-मोठी कामं करुन सॅम यांनी कुटूंबाला हातभार लावला.

त्याच दरम्यान सॅम यांनी वेगवेगळ्या रिटेल शॉपमध्ये काम केलं. तसंच दुस-या महायुद्धामध्येही ते सहभागी झाले. आपल्या कुटूंबाचं पालन-पोषण करणं ही सॅम यांची इच्छा होती. सर्व आवश्यक वस्तू खरेदी करता येतील इतका पैसा त्यांना कमवायचा होता. हुशार विद्यार्थी असलेल्या सॅम यांना काही तरी वेगळं करण्याची इच्छा होती. संधी मिळाली की परंपरागत मार्गापेक्षा काही तरी नक्की करु असा त्यांना विश्वास होता. पण आपलं हे मनोरथ पूर्ण करण्यासाठी ना वेळ त्यांच्या बाजूनं होती. ना त्यांच्याकडे पैसा होता.

सॅम वॉल्टन वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते. पण आपलं स्वप्न पूर्ण करणारी नोकरी काही त्यांना मिळाली नव्हती. याच वेळी आपणच आपला व्यवसाय सुरु करावा असा विचार सॅम यांच्या मनात घोळू लागला. हा व्यवसाय नव्या पद्धतीनं करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नोकरी करत असतानाच सॅम यांना व्यवसाय आणि उत्पादनाशी संबंधित बारीक गोष्टींचा अनुभव आला होता. आता गरज होती या अनुभवाचा वापर करण्याची. दृढ विश्वास आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर सॅम यांनी नवा व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी १९४० मध्ये आपल्याकडे साठलेल्या पैशातून अर्कन्यास शहरामध्ये छोटसं किराणा दुकान ( रिटेल शॉप ) खरेदी केलं. त्यानंतर सॅम यांनी हळू हळू शहरातली अनेक छोटी-मोठी दुकानं खरेदी करणं सुरु केलं. मोठ्या शहरात राहणा-या लोकांना नियमित शॉपिंग करण्यात रस नव्हता. उलट छोट्या शहरात किंवा दुर्गम गावांमध्ये राहणारी मंडळी नियमितपणे शहरांमध्ये येऊन आपल्याला आवश्यक अशा सामानांची खरेदी करतात. हे सॅम यांच्या लक्षात आलं. त्यामुळे केवळ मोठ्या शहरांपुरतं मर्यादीत राहण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा आहे हे सॅम वॉल्टन यांना जाणवले. त्यानंतर वॉल्टन यांनी आपले धोरण बदलले. आता त्यांनी विकसित होत असलेल्या छोट्या गावांवर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं. या गावात वॉल्टन यांनी मोठे-मोठे दुकानं उघडण्याचा सपाटा लावला. सॅम वॉल्टन यांनी आता आपल्या व्यापाराचा सर्व पोत बदलला होता. त्यांनी दुकानात घरामध्ये रोज लागणारी प्रत्येक वस्तू ठेवण्यास सुरुवात केली. त्याची किंमतही बाजारभावापेक्षा कमी ठेवली.ग्राहकांना एकाच छताखाली सर्व वस्तू कमी किंमतीमध्ये वॉल्टन देऊ लागले. वॉल्टन यांचा हा निर्णय म्हणजे आत्महत्या आहे. असं त्यांच्या सहकारी आणि मित्रांना वाटत असे. तसा इशाराही त्यांनी वॉल्टन यांना दिला होता. पण वॉल्टन यांना यांच्या डोळ्यांना यशस्वी व्यवसायाचं चित्र स्पष्ट दिसत होतं. यामुळे रिटेल विश्वात क्रांती होईल असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यानंतरच्या काळात त्यांचा हा विश्वास खरा ठरला.

वॉल्टन यांची आयडिया लोकांमध्ये हिट झाली होती. पाहता, पाहता सॅम वॉल्टन एका दिग्गज कंपनीचे मालक बनले. ज्या कंपनीतचे नाव होते वॉलमार्ट.

होय वॉलमार्ट. अर्कान्सासमधल्या छोट्या-छोट्या दुकानांमधून सुरु झालेला वॉलमार्टचा प्रवास आज २७ देशांमध्ये पोहचलाय. सुरुवातीला केवळ अमेरिकी उत्पादन विकणा-या वॉलमार्टमध्ये आज जगभरातले ब्रँड मिळतात. जगभरात याचे ११ हजारांपेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. वॉलमर्टकडे १५ बिलीयन अब्ज इतकी संपत्ती आहे. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये ती जगातली सर्वात मोठी कंपनी मानली जाते.या कंपनीत २० लाखांपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. सध्या कंपनीकडे अनेक स्टोअर्स आहेत. ज्यामध्ये वॉलमर्ट पासून सॅम कल्बपर्यंतचा समावेश आहे. ग्राहकांना कमीत कमी दरांमध्ये एकाच छताखाली त्यांना हवं असलेलं सारं सामान देणं हाच कंपनीचा एकमेव उद्देश आहे.

वॉलमार्ट हा केवळ व्यवसाय नाही. तर अमेरिकन यशस्वीतेचं उदाहरण ही आहे. सॅम वॉल्टन यांचं १९९२ साली निधन झालं. आता त्यांच्या कुटूंबाचे सदस्य वॉलमार्टचं व्यवस्थापन पाहतात. सॅम वॉल्टन यांनी ज्या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष केला त्याच्यापेक्षा बरंच काही त्यांनी आपल्या परिवारासाठी सोडलंय.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या सोबत वाद हा चिकटलेला असतो. सॅम वॉल्टन यांच्या व्यापार करण्याच्या पद्धतीचेही अनेक टीकाकार आहेत. पण सॅम वॉल्टन यांचे विरोधकही त्यांच्या क्रांतीकारी यशाचं मोठेपण मान्य करतात हे विशेष.

अब्जावधी लोकांमध्ये एखादेच सॅम वॉल्टन असतात. पण तुम्ही मोठं स्वप्न पाहत असाल तर ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक कष्ट आणि योग्य वेळी योग्य काम करणं आवश्यक आहे. त्यासाठी वेगळे विचार आणि वेगळी समजूतही हवी. हेच वॉलमार्ट यांच्यापासून शिकण्यासारखं आहे.

लेखक : सर्वेश उपाध्याय

अनुवाद : डी. ओंकार

Related Stories