मंदीच्या काळात नोकरी गमावूनही, सौम्या गुप्ता बनली करोडपती! 

0

एक काळ होता जेव्हा सौम्या गुप्ताच्या बाबतीत एखाद्या चित्रपटात शोभेल अशा घटना घडत होत्या. तिचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि अर्थात समाजातील अनेक घटक जे तुमच्या आयुष्याचं मोजमाप करत असतात हे सारे तिच्या डोक्यात फेर धरून नाचत होते, "तू अपयशी ठरलीयस" , "तुला काहीच जमणार नाही" , "तुझं आयुष्य संपलय". त्यामुळे त्यांच्या निरनिराळ्या उपदेशांकडे तीनं सरळ कानाडोळा केला आणि एक निर्धार केला ज्यानं तिचं नशिबच पालटलं.

‘बॉम्बे’ या शहराला साजेशी झालेली तिची जडणघडण, या शहराला शोभणारी सारी विशेषणं तिच्यात आहेत. बेधडक, बिनधास्त, महत्त्वाकांक्षी, व्यवहार कुशल आणि अर्थात उत्कृष्ठ परिधान शैली असणारी ! उद्योगपतींच्या घरातच वाढलेल्या सौम्याचं शालेय शिक्षण झालं मुंबईत. पण तिने ठरवलं अमेरिकेत जायचं, हवाई उड्डाण प्रशिक्षण घेण्यासाठी. " त्यावेळी या क्षेत्रात फार मुली नव्हत्या. त्यामुळे मी घेतलेला निर्णय अर्थात खूपच धाडसी होता."

तिने हा प्रवाहाविरुद्ध जाण्याचा निर्णय अंंमलात आणायचं ठरवलं आणि योग्य त्या दिशेनं वाटचाल सुरु केली. पण दूर्दैवानं २००८ सालची मंदी आली आणि वेळ आणि नशीब या दोघांची साथ न मिळाल्यानं तिचा हा अभ्यासक्रम संपुष्टात आला. विमानचालक समुदायावर तर बेकारीची मोठी कुऱ्हाड या काळात कोसळली होती. ती परतली तेंव्हा तिच्या हातात न पदवी होती, ना नोकरी आणि ना शिक्षणासाठी खर्च केलेले किंबहुना वाया गेलेले ५० लाख रुपये. 

"मी घरी बसून होते आणि एक वर्षभर विविध हवाई कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज केले. पण उत्तर एकच मंदीमुळे नोकरी नाही. मी अर्थात मनाने खचले आणि विचार करत बसायचे, लोक काय म्हणत असतील ? मी अमेरिकेत जाऊन सुद्धा पराभूत ठरले. मी एवढं शिकूनसुद्धा घरी का बसलेय ? मला स्वत:लाच अगदी हरलेलं वाटू लागलं."

त्या भयानक शांततेला अखेर तिच्या पालकांनी मोडायचं ठरवलं. त्यांनी तिला सांगितलं की आता तू पैसे कमवायला हवेस. नोकरी करायला हवी आणि तुला देण्यात येणारा खर्च आम्ही बंद करणार आहोत. पण दुसरी नोकरी मिळवणं सुद्धा कठीण होत. " विमान चालक हा कुशल कामगार मानला जातो. पण कागदावर आमची गुणवत्ता ही बारावी उत्तीर्ण इतकीच असते आणि एखाद्या बारावी झालेल्या मुलाला चांगली नोकरी मिळणं केवळ अशक्य. मला चांगल्या पगाराची नोकरी हवी होती माझी बिलं भरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी सुद्धा.

शेवटी एका काॅल सेंटरमध्ये तिला नोकरी मिळाली, २०,००० रुपये प्रति महिना.

अगदी पहिल्याच दिवशी मला कळलं  की माझा इथे टिकाव लागणार नाही. मला माहित होतं, हे मला नकोय. तब्बल आठ महिने मी फोन घ्यायचे आणि काम करायचे आणि सोबत माझे पैसे सुद्धा साठवायला सुरुवात केली, कारण मला इथून निसटायचं होतं."

पण एक दिवस असा आला की कामाचे तास संपल्यावर  ती कोलमडून पडली आणि अत्यंत अस्वस्थ मनाने झोपण्याचा प्रयत्न करू लागली. " त्यावेळी माझी आई माझ्या मदतीला धावून आली आणि मला म्हणाली, की असं काहीतरी शोध की जे तुला आवडतं. मला फक्त कपडे आवडतात एवढंच माहित होतं. मी माझ्या आईला सांगितलं की आपण कपडे विकूया घरी. आई नेहमीप्रमाणे पाठींबा द्यायला ठाम उभी राहिली आणि म्हणाली चालेल." आणि तो दिवस होता जेंव्हा माझ्या 'टेन ऑन टेन' या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

"  ज्या दिवशी मी माझा मार्ग बदलण्याची गोष्ट केली,  माझ्या पालकांनी मला पाठींबा दर्शवला. ते म्हणाले की मी बरंच काही करू शकेन आणि त्यांना मला आनंदी बघायचं आहे. त्यांनी मला सांगितलं की माझ्या उद्योगात गुंतवायला त्यांच्याकडे सध्या निधी नाही. पण त्यांचा माझ्या निर्णयाला पाठींबा असणार  इतकं तेव्हा मला पुरेसं होतं, त्यामुळे मी अगदी छोटसं ध्येय ठरवलं. ते म्हणजे, स्वत:ची बिलं चुकवता यावीत आणि उद्योगाच्या पुढच्या टप्प्यासाठी पैसे जमा व्हावेत.

त्यांनी एका कापड निर्यातदाराला गाठलं ज्याच्याकडे उच्चतम फॅशन उत्पादनं होती. रोबर्टो कावली आणि जीन पॉल गौटियरसारखे ब्रांड त्याच्याकडे होते. " मी सुरुवातीला फक्त तीसच पिसेस घेऊ शकले. मुंबईतल्या सगळ्या मित्रपरिवाराला घरगुती प्रदर्शनासाठी बोलवलं. अनेकजण प्रदर्शनापूर्वीच आले , कारण नामांकित उत्पादनं लवकरात लवकर आपल्याला मिळायला हवीत, हाच प्रत्येकाचा हेतू होता. आमची उत्पादनं प्रदर्शनाच्या आदल्या दिवशीच संपली. "

त्यानंतर काही महिने सौम्याने रात्री कौल सेंटरची नोकरी सुरु ठेवली आणि सकाळी ती कपडे विकत असे. दुसऱ्यांदा तिने ४५ पिसेस आणले जे सुद्धा अर्थात विकले गेले .

त्यानंतर लवकरच ४५ चे ६०, ६० चे ८० झाले आणि सौम्याच्या छोट्या छोट्या ध्येयांनी मोठी स्वप्न पाहायला सुरुवात केली .

" मला असं वाटलं की मी काहीतरी अर्थपूर्ण करतेय आणि माझा आवाका मला वाढवायला हवा. निव्वळ माझा मित्रपरिवार आणि त्यांच्या ओळखीने येणारे ग्राहक यांच्यापर्यंत मी सीमित राहू नये. मला क्लास आणि मास यांच्यातील फरक ओळखू येऊ लागला होता. मला मग फॅशन एंड यू सारखं एखादं पोर्टल हवं होतं, ज्यामध्ये मी माझ्या संग्रहाचं प्रदर्शन करू शकेन. पण माझ्याकडे चांगला कॅमेरा नव्हता, ज्यामुळे मी माझे फोटो अपलोड करू शकेन आणि अर्थात आर्थिक दृष्ट्या मला ते परवडणार नव्हतं. पैसे वाचवण्यासाठी मग मी मित्र संगतीत राहणं कमी केलं.

एकावेळी एक पाऊल या पद्धतीने ती चालत गेली. " मी माझ्या एका छायाचित्रकार मैत्रिणीला भेटले. ती सुद्धा एका प्रोफाईल शुटच्या शोधात होती. मी तिला सांगितलं की ती माझे कपडे मॉडेलला वापरायला देऊ शकते आणि स्टुडियोचा निम्मा खर्च मी पेलेन. मॉडेलला द्यायला मात्र तिच्याकडेही पैसे नव्हते. आम्ही मग बोस्कीला भेटलो .( स्प्लिट्सविलाची कलाकार ) ती माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीणही होती. या दिलदार मुलीनं आमच्यासाठी एकही पैसा न घेता शूट केलं. तिने स्वत:चा मेकअप सुद्धा स्वत:च केला कारण मेकअप साठी कलाकार बोलावणं आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. "

तिने मग आपलं नशीब आजमावून पाहिलं . ‘फॅशन एंड यु’ ला तिने हे फोटोज पाठवले. त्यांना ते आवडले आणि तिचा प्रवेश सुखकर झाला.

पण मुख्य प्रवाहात जाणं म्हणजे अधिक आव्हान! " आम्हाला व्यावसायिक फोटोशुट करावं लागणार होतं . त्यासाठी पैसे तर खर्च करावे लागणारच होते. मला एक कल्पना सुचली, पण त्याने आमचे सर्वच पैसे संपणार होते. आम्ही हा धोका पत्करायचा ठरवला. आम्ही मॉडेलिंगसाठी महाविद्यालयीन तरुणींना गाठायचं ठरवलं. माझी आई आणि मी मिठीबाई महाविद्यालयाच्या बाहेर उभ राहून मुलीना आमच्या शूटसाठी तयार होण्यासाठी विनवत असू . अनेकींनी आमच्याकडे विचित्र नजरेनी पाहिलं तर काहींनी त्यांच्या फेसबुक वर फोटो अपलोड करण्याच्या शर्तीवर आम्हाला होकार दिला. आम्ही प्रत्येकीला भेट म्हणून दोन दोन ड्रेसेस सुद्धा दिले."

" आम्हाला तीन महिने लागले निधी गोळा करायला. आम्ही तेच पैसे पुन्हा व्यवसायास लावले. बराच काळ आम्ही अगदी गरीबासारखे राहिलो आणि एक एक पैसा व्यवसाय वृद्धीसाठी जोडत राहिलो. मला कर्ज सुद्धा मिळू शकत नव्हतं कारण माझ वय होतं अवघं २१ वर्ष ! कर्ज मिळण्यासाठी २३ वर्ष किंवा त्यापुढे वय असावं लागतं. एच डी एफ सी बँकेकडे मी कर्जासाठी अनेकदा विचारणा केली. यात खूप वेळ खर्च झाला ."

अखेर त्यांनी आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर शूट केलं. त्यांचा ब्रांड ‘टेन ऑन टेन’ फॅशन एंड यूच्या पोर्टलवर अखेर लाइव झळकला. यात वापरलेले सगळे कपडे विकले गेले, इतकंच नाही तर आणखीनही मागणी वाढत गेली. त्यानंतर मग आम्ही मागे वळून पाहीलंच नाही."

६० कपड्यांपासून ६ लाखापर्यंत कपड्यांची विक्री वाढतच गेली. आता वर्षाला १५०% एवढी विक्री आमची व्हायला लागली. आय एस ओ प्रमाणपत्र मिळालं आणि गॅरेजच्या जागेतून आम्ही १,००० चौरस फुटाच्या जागेत स्थलांतरित झालो. त्यानंतर थेट मुंबईतल्या कॉर्पोरेट प्रांतातल्या ५,००० चौरस फुटांच्या जागेत आमचा व्यवसाय पोहोचला. " आम्ही महिन्याला सुमारे एक ते सव्वा करोडची कमाई आता करतो आणि वर्षाला सुमारे १० ते १५ कोटी ! "

गेल्याच वर्षी सौम्याला महिला उद्योजिका २०१५ या सन्मानाने नावाजण्यात आलं आणि तिला हा सन्मान देण्यात आला तो कुणाल बहेल यांच्या हस्ते.

ती आपल्या या यशाचं श्रेय धैर्य, श्रद्धा, आवड आणि आपली तत्व यांना देते. 

नुसत्याच कल्पनांवर विचार करण्यापेक्षा त्यांना मूर्त स्वरूप द्या. मी हेच केल . मला माहित होतं माझी उत्पादनं कोणासाठी आहे आणि टेन ऑन टेनचा ग्राहक वर्ग कोण असेल. अगदी सुरुवातीपासून मला माझ्या गुणवत्तेची खात्री होती आणि जे मी घालू शकणार नाही ते मी कधीच विकलं नाही.

आज ती आपल्या यशाची गाथा सांगतेय पण व्यवसायातले कठीण क्षण आजही तिच्या डोळ्यासमोर आहेत, अगदी काल घडल्यासारखे ," करीयर बदलताना जगाला तोंड द्यायचं ! लोक तुमच्या पराभवाला सतत आठवतील आणि तुम्हाला आणखी पराभूत करतील. माझी पहिली योजना फसली, ठीक आहे ! मी जे स्वप्न पहिले होतं सुरुवातीला, ते पूर्ण नाही झालं, मला आजही त्याबाबत लोक विचारतात. मी आता एक शिकले, की इतरांना तुमच्या आयुष्यात लुडबुड करू देऊ नका आणि तुमची आवड तुमच्या आनंदाचा सर्वप्रथम विचार करा. माझ्या कामाचा प्रत्येक दिवस मी साजरा करते. जग तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करील, पण तुम्ही त्याला बळी पडू नका. ते तुम्हाला नाही तर तुमच्या चुका पाहणार आहेत. तुमचं स्वप्न असेल तर ते नक्की पूर्ण करा, थांबू नका .

लेखिका : बिंजल शाह
अनुवाद : प्रेरणा भराडे