अॅस्पायर : आत्मविश्वास वाढवणारं 'मुक्तपीठ': इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शिक्षणाचं नवं दालन उघडणाऱ्या तरूणाची प्रेरक कहाणी

अॅस्पायर : आत्मविश्वास वाढवणारं 'मुक्तपीठ': इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शिक्षणाचं नवं दालन उघडणाऱ्या तरूणाची प्रेरक कहाणी

Wednesday May 18, 2016,

5 min Read

प्रवेशाची अट – कुठलीच नाही.

वयोमर्यादा – नाही, फक्त शिकण्याची आवड पाहिजे.

गुण – गुणांची गरज नाही, फक्त आत्मविश्वास पाहिजे.

कोर्स – तुम्हाला आवडणारा नाही, तर तुम्हाला आवश्यक असणारा देणार.

ग्रामीण भागात इंग्रजी भाषेची कमालीची भीती आणि न्यूनगंड. याच भीतीमुळे ग्रामीण भागातले विद्यार्थी स्पर्धेत मागे पडतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत ग्रामीण भागातल्या एका तरूणानं इंग्रजी भाषेवर आज असामान्य प्रभुत्व मिळवलं. त्याच्या कतृत्वानं आता देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत. तो फक्त इथेच थांबला नाही तर इंग्रजी भाषा ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये रूजवण्यासाठी आणि मुलांना फुलवण्यासाठी त्यानं एका संस्थेची स्थापनाही केली. आज या संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचं इंग्रजीशी घट्ट नातं जुळलंय. फक्त भाषेपुरतंच मर्यादित न राहता संपूर्ण व्यक्तिमत्व विकास करून नव्या जगाचा स्मार्ट माणूस बनवण्याचं काम ही संस्था करत आहे. या संस्थेचं नाव आहे 'अॅस्पायर' आणि हा कर्तृत्ववान तरूण आणि या संस्थेचा संस्थापक आहे सचिन बुरघाटे, वय फक्त ३३ वर्ष. विदर्भातल्या अकोला या शहरामध्ये असलेल्या 'अॅस्पायर' चा प्रवास थक्क करणारा आहे.

सचिन बुरघाटे या तरूणाची ही कहाणी अत्यंत प्रेरणादायक आहे. कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यानं आज नवी पायवाट निर्माण केलीय.... 

image


संघर्षातून सुरवात

अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातलं 'लाडेगाव' हे सचिनचं जन्मगाव. बालपण अतिशय गरिबीत गेलं. आई, वडिल दोघंही दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणारे, आईचं शिक्षण दुसरी तर वडिल तिसरीपर्यंत शिकलेले. शिक्षण फारसं नसलं तरी अतिशय स्वाभिमानी. परिस्थितीशी हार न मानता पुढं जायचं हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला. सचिन सातवी पर्यंत सर्वसाधारण विद्यार्थी होता. आठवीत असताना गणिताच्या शिक्षकांनी वर्गात त्याला शिकवायला सांगितलं. त्यानंतर त्याला कौतुकाची थाप मिळाली. ही कौतुकाची थाप त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आपण काहीतरी करू शकतो ही जाणीव त्याला पहिल्यांदा तिथे झाली आणि इंग्रजीची आवडही निर्माण झाली. शिकत असतानाच शेतातली सर्व कामंही तो करत असे. दहावीत त्याला ५२.६६ टक्के गुण पडलेत. आर्थिक परिस्थिती नसल्याने वडिलांनी त्याला शिक्षण सोडून घरच्याच लहानशा किराणा दुकानात मदत करायला सांगितलं. पण शिक्षणाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नंतर त्याने कॉमर्समधून ११ वी आणि १२ वी केलं. नंतर बी.कॉम, पुढे पुण्यात जावून एम.बी.ए. नंतर सिंटेल या आय.टी. कंपनीत सहा महिने नोकरी केली. नंतर आय.सी.ए. या कंपनीत कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून नोकरी केली . त्यानंतर तिथेच ब्रांच मॅनेजर म्हणून त्याला बढतीही मिळाली. तोपर्यंत सचिन पूर्णपणे बदलला होता. इंग्रजीवर त्यानं कमालीचं प्रभुत्व मिळवलं होतं. इंग्रजी भाषा, त्याचे नेमके उच्चार, बोलण्याची खास पध्दत आणि त्याच्या जोडीला सर्वांना भावणारं संभाषण कौशल्य यात तो पारगंत झाला. पण गावाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. प्रतिकूल परिस्थितीतून आपण शिकलो, भाषेवर, बोलण्यावर प्रभुत्व मिळवलं. आता देण्याची वेळ आली आहे याची जाणीव त्याला झाली. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये इंग्रजीची गोडी निर्माण करावी, त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल घडवावा यासाठी त्याने पुन्हा अकोल्यात परतण्याचा निर्णय घेतला आणि 'अॅस्पायर' चा जन्म झाला.

image


कसा झाला 'अॅस्पायर' चा जन्म

मुलांना इंग्रजी शिकवत त्यांचा सर्वांगिण विकास घडवून आणवा हे सचिनचं ध्येय होतं. सुरवातीला संस्थेचं नावं होतं… SPS (S – Sure , P – Pure, S – Standard) आणि विद्यार्थ्यांची संख्या होती फक्त १६. सुरवातीला हा सर्व उपक्रम भाड्यांच्या दोन खोल्यांमध्ये चालायचा. तोपर्यंत सचिनला काही सहकारीही मिळालेत. त्यांच्या कल्पक नियोजनामुळे आणि शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढतच गेली आणि ५ सप्टेंबर २००९ या शिक्षक दिनाच्या दिवशी 'अॅस्पायर' या संस्थेचा जन्म झाला. अवघ्या सात वर्षांमध्ये 'अॅस्पायर' नं अकोल्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली आहे. इंग्रजी भाषा, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, उच्चारशास्त्र शिकवणारी 'अॅस्पायर' ही विदर्भातलीच नव्हे तर राज्यातली आज एक अव्वल संस्था आहे.


image


अकोल्यातली संस्थेची तीन मजली देखणी वास्तु सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलीय. अस्पायरमध्ये २२ प्रकारचे विविध कोर्सेस आज शिकवले जातात. आठ वर्षांच्या मुलांपासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत कुणीही येथे येवून शिकू शकतो. वय, शैक्षणिक पात्रता असं कुठलंही बंधन प्रवेशासाठी नाही. दररोज दोन हजार विद्यार्थी अॅस्पायरमध्ये शिकतात तर वर्षाला १० हजार विद्यार्थी शिकून बाहेर पडतात. कोर्सेसचा कालावधी आहे दोन ते तीन महिने. शिक्षणाची प्रचलित चौकट मोडून अॅस्पायरनं आपली वेगळी शैली निर्माण केलीय. फक्त गुणांच्या मागे लागणारे परिक्षार्थी न बनता चौफेर विकास व्हावा यासाठी अॅस्पायर मध्ये विशेष लक्षं दिलं जातं. होय, हे तुम्ही करू शकता असा विश्वास मुलांमध्ये निर्माण केला जातो. तुमची स्पर्धा ही इतरांसोबत नसून तुमची स्पर्धा ही तुमच्याशीच आहे. आजच्या पेक्षा उद्या तुम्हाला नवं, चांगलं काही तरी करायचं आहे ही भावना मुलांमध्ये निर्माण केली जाते. वर्गात स्पर्धेची नाही तर सहकार्याची भावना निर्माण करण्याचा अॅस्पायरचा प्रयत्न असतो. सचिनच्या या प्रयत्नांची किर्ती देशाबाहेरही गेली आहे. अकोल्यातल्या मुलांना इंग्रजीचे धडे द्यायला ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया, कॅनडा इथले तज्ञ मार्गदर्शक अस्पायर मध्ये येत असतात. तर अॅस्पायरच्या अनेक मुलांना विदेशात जावून शिकण्याची संधीही मिळाली आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक, व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी अस्पायर प्रेरणेचं केंद्र ठरलंय. केवळ विदर्भातूनच नाही तर सर्व राज्यातून आणि काही इतर राज्यांमधूनही मुलं आता शिकण्यासाठी अॅस्पायरमध्ये येत आहेत.


image


अॅस्पायरचा संस्थापक एवढीच सचिनची आज ओळख नाही. तो उत्तम वक्ताही आहे. हिंदी आणि इंग्रजीतून देशभर प्रेरणा देणारी व्याख्यानंही तो देत असतो. अकोल्यात होणाऱ्या त्याच्या व्याख्यानांना तर तुडूंब गर्दी होत असते. विदेशातही त्यानं असे काही कार्यक्रम केले आहेत. युट्यूबरही त्याच्या भाषणांच्या व्हिडिओंना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या शैक्षणिक कामाव्यतिरिक्त विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्याचा सक्रीय सहभाग असतो.

image


पाचशे लोकवस्तीच्या लाडेगाव या लहानश्या खेड्यापासून ते सिंगापूरपर्यंतच्या नामांकित संस्थेपर्यंतचा सचिनचा हा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक परिस्थिती नाही, उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, शालेय जीवनात हुशार विद्यार्थी अशी ओळख नाही, अशा सर्व परिस्थितीवर मात करत हालापेष्टा सहन करत, अपमान पचवत त्यानं शुन्यातून नवं विश्व निर्माण केलं. त्याच्याकडे होता फक्त प्रचंड आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी, जिद्द आणि आपल्या माणसांविषयी अपार कळवळा, या भांडवलाच्या जोरावर त्यानं यशाचं शिखर काबीज केलंय. या शिखरावर पोहोचल्यावरही त्याचे पाय अजूनही मातीला घट्ट चिटकून आहेत. सचिनच्या या जिद्दीला आणि प्रयत्नांना सलाम...

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी चार दशकांपासून घेतलाय भारताला स्वच्छ करण्याचा वसा 

अंध वाचकांसाठी उमेश जेरे आणि सहकाऱ्यांचे निरपेक्ष कार्य

‘हिंडन’ नदीच्या पुनरुज्जीवनासाठीचा भगीरथ प्रयत्न म्हणजेच विक्रांत शर्मा